घाव अजुनी...

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

मातृभाषेच्या ठेकेदारांच्या सनातनीपणाचे व अहंगंडाचे काय करायचे?

शिक्षण हे मातृभाषेतून हवे हे निर्विवादरित्या मान्य आहे. प्राथमिक पातळीवर तर ते मातृभाषेतूनच हवे.

मराठी बोलणाऱ्या कुटुंबात वाढणाऱ्या अपत्याचे जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु होते तेव्हा त्याचा भावनिक कोंडमारा होतो. त्याचा इंग्रजी संकल्पना समजून घेण्याचा प्रवास मराठी संकेत- इंग्रजी अर्थ -इंग्रजी संकेत या व अशा आडवळणांच्या मार्गाने चालतो.

उदा. त्याला स्काय शब्द शिकायचा तर स्काय शब्द ऐकल्याबरोबर पहिल्यांदा तो त्याचा मराठीतला अर्थ शोधतो जेव्हा आकाश हा शब्द सामोरा येतो तेव्हा कुठे मग स्काय ही संकल्पना स्पष्ट होते.

पण मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी ज्यांच्या कडे आहे त्यांना जगात जे काय श्रेष्ठ आहे ते आपल्याच कर्तृत्वाने कसे आहे हे लांड्यालबाड्या करुन का होईना जागोजाग पटवून द्यायची सवय जडलेली आहे. त्यामूळे जेव्हा विज्ञान मराठी भाषेतून शिकायचा प्रश्न येतो तेव्हा मराठी रुपांतर करतांना अवाजवी सनातनीपणा केल्याने व्यवहारात बोलल्या ऐकल्या जाणाऱ्या मराठी विज्ञानापेक्षा हे मराठीतले विज्ञान म्हणजे बोजडपणाचा उत्तम नमुना ठरते. यातली भाषा मराठी असते पण ती मातृभाषा मराठी नक्कीच नसते.

उदा. सनातनी पणाने इंग्रजी भाषेतील शब्दांचा मराठीत केलेला अनुवाद पहा

कॉम्प्यूटर - संगणक, डिस्क- चकती, टायपिंग-टंकलेखन, किबोर्ड-कळफलक, ऑपरेशन-शल्यचिकित्सा, आयसीयू- अतिवदक्षता कक्ष, सुपरवायझर- पर्यवेक्षक

या सर्व शब्दांपैकी जे मूळ इंग्रजी शब्द आहेत तेच वापरुन मराठी बोलली जाते. ती मराठीच असते इंग्रजी नव्हे.

मराठी भाषांतर करुन कायदा, विद्यूत अभियांत्रिकी (?) या विषयांवरची लिहीलेली पुस्तके वाचली की हा बोजडपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो.

ज्या बाबी मूळात पाश्चात्य किंवा इंग्रजी जगतातल्या आहेत त्या फक्त लिपि व उच्चारात किरकोळ फेरफार करुन वापरल्या तर मराठी भाषेत विज्ञान व इतर तत्सम शाखांमधले ज्ञान घेणे अधिक सुलभ होईल.

विज्ञान शाखेत भरपूर नवीन लेख/पुस्तके/मासिके प्रसिद्ध होत असतात. ही बहुतेक करून इंग्रजीत असतात.

हे म्हणणे मान्य पण मराठीतून किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतून जेव्हा विज्ञान शिकले जाते तेव्हा त्यातला मूळ शब्द संग्रह जो की बहूतेक करुन (वैज्ञानिक प्रगतीचे आद्यस्थान असल्याने) युरोपीय भाषांमधून येतो तो किरकोळ उच्चार व लिपीतले बदल करुन वापरला आणि इंग्रजीचे फक्त एक भाषा म्हणून (जसे की आजही घेतले जाते) शालेय जीवनात शिक्षण घेतले तर असे लेख किंवा मासिके इत्यादी वाचायला व समजून घ्यायला अडचण येणार नाही.

उदा.
Photosynthasis means the process in which light energy is transfer in to chemical energy with the help of chlorophyll.
या वाक्यातले फोटोसिंथेसिस आणि क्लोरोफिल हे शब्द जसेच्या तसे ठेऊन ही संकल्पना आपण मराठीतून शिकलेलो असलो आणि इंग्रजी फक्त एक भाषा म्हणून शिकलेलो असलो तरी चटकन लक्षात येते.
मूळात फोटोसिंथेसिस म्हटले की उर्जा रुपांतरणाची प्रक्रिया मनासमोर यायला हवी त्यात फोटोसिंथेसिसचा मराठी अर्थ प्रकाशसंश्लेषण, क्लोरोफिल चा अर्थ हरितद्रव्य (की लवके) आणि मग सारी प्रक्रीया असा किचकट प्रवास करायची गरजच नसावी.

इंग्रजीतले असे शब्द मराठीत भरमसाठ आले तर मूळ मराठी राहील का असा प्रश्न यावर हमखास येतो.
पण मूळ भाषा म्हणजे भाषेचे व्याकरण, त्यातली शब्दसंपत्ती तर भाषेला समृद्ध करते.
(पण संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार)
जोपर्यंत हे व्याकरण, भाषा व्यवहार करणाऱ्यांची भाषेची रुपे सुलभ करण्याची प्रवृत्ती (प्रमाणीकरणा वाल्यांच्या प्रमाण भाषेत गावंढळपणा) जो पर्यंत कायम आहे तो पर्यंत भाषा वेगवेगळी वळणे घेत समृद्ध होत राहणारच. पण आहे ते आपल्यापूरते मर्यादित ठेवण्याच्या अप्पलपोटेपणापोटी (मराठी भाषेतले तत्सम व तद्भव शब्द कोठले हे फक्त ठराविक लोकांनाच माहित असते परिणामी शुद्ध मराठी आम्हीच समजू शकतो हे ही आलेच) विज्ञान हवे इंग्रजीतूनच अशी भूमिका येते.

कालच कलेक्टरच्या पी.ए.ची आपाईंटमेंट घेऊन आलो. पूढच्या महीन्यात सेकंड विकला तुमचे काम सक्सेस होईलच अशी ग्यारंटी देलीय तेनं.
असं सहजपणाने बोलणारा सामान्य मराठी शेतकरी वर्गातल्या माणसाच्या घरातली मूलं फक्त भाषा म्हणून जरी इंग्रजी शिकले तरी चालेल.
इंग्रजी भाषेतून शिक्षण हा आग्रह नकोच.