घाव अजुनी...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?

नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते. म्हणजे योग्यप्रकारे रचना असलेले पाणी शरीरात शंभर टक्के शोषले जात असेल तर असे कल्चर्ड किंवा संस्कारीत पाणी १०० टक्के शोषले जाते.  अशा संस्कारीत पाण्याच्या नेहमी प्राशनामुळे बहिरेपणा, गुढगेदूखी, मानसिक ताणतणाव आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..

असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा  जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात.  कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.

मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू   ;)  अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.

पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का?  मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.

आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही. 

म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

वरुणयंत्र

डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे. (इतर वृत्तपत्रांना मात्र याचे वावडे असल्यासारखे वाटते). आयआयटी चे पदवीधर असलेले मराठे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हवेची विशिष्ट आर्द्रता, आकाशातील ढगांचे प्रमाण यांचा मेळ जुळला की या वरुण यंत्राच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे (ढगांचे) सांद्रीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्प्रेरकाचा पूरवठा झाला की चोवीस तासात पाऊस पडतो असा मराठे यांचा दावा आहे. उत्प्रेरक म्हणून मिठाचे कण हवेत पोचवण्यासाठी भूस्सा, लाकडे, कचरा यांची होळी करून त्यात मीठ टाकले की ते ढगांपर्यंत पोहोचते अशी या प्रयोगाची संकल्पना आहे.  असो.

या प्रयोगाबद्दल जिज्ञासू व विज्ञानाबद्दल, पर्यावरणशास्र, हवामानशास्र यांतील तज्ज्ञ लोकांनी अजूनपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सकाळने मात्र वरुणयंत्राच्या प्रयोगानंतर (किंवा प्रयोग सुरू असतांच) पाऊस . (हा पाऊस चोवीस तासांनी पडतो की चोवीस तासात या बद्दल स्पष्टीकरण सापडत नाही ) अशा आकर्षक जाहिरात वजा बातम्यांचा मारा सुरू ठेवला आहे. अर्थात चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला हवीच. पण सततच्या जाहिरातींनी एखादी गोष्ट चांगली वाटायला लागते हे ही लक्षात घेतले पाहिजे.

मिठाचा असा उत्प्रेरक म्हणून वापर करुन खरेच ढगातील वाफेचे पावसाच्या थेंबात रुपांतर होण्यचा वेग वाढवता येतो का? माझ्या माहिती प्रमाणे तर वाफेचे पाण्यात रुपांतर होण्याची क्रिया ही भौतिक क्रिया आहे. अशा भौतिक क्रियांमध्ये उत्प्रेरक वगैरे असते का याबद्दल मी जरा अज्ञानीच आहे.

वर सांगितल्या प्रमाणे हवेतील आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण यांचा अपेक्षित मेळ जमला की हा प्रयोग करता येतो. आणि मग चोवीस तासात पाऊस पडतो. पण असा मेळ जमणे हे निव्वळ नैसर्गिकरित्याच फक्त होऊ शकते. आणि असे घडून आल्यावर आपसूकच पाऊस पडत नाही काय. किंवा पाऊस पडण्याच्या शक्यतेची टक्केवारी वाढत नाही काय.

कुठल्याही कामामागे कोणाचा हातभार व सहभाग आहे या वरुन कामाची किंमत कमी किंवा जास्त मानन्याची एक जून खोड काही जणांना असते. खरे तर ह्या कामाच्या उपयोगितेतली व यशातली वैश्विकता हा निकष कामाची प्रत ठरवण्यासाठी वापरला जावा. वरुण यंत्रावरची एक मजेशीर प्रतिक्रीया वाचनात आल्याने हे लिहीले आहे.

ती प्रतिक्रिया अशी -श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .

असो वरुणयंत्राचा मंत्रालयातही प्रयोग झाल्याचे वाचनात आले आहे. जर हे प्रकरण खरेच मानवजातीच्या इतक्या उपयोगाचे असेल तर यावर लगेच सरकारने पाडताळणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमायला हवी.