घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

फलज्योतीषाच्या खरेखुरेपणाच्या चाचणीचा प्रयोग

माझ्या मते फलज्योतीष हे अशा चाचणीच्या पात्रतेचे नाही. माझा ज्योतिषातला अभ्यास किती असा प्रश्न या ओघाने उपस्थित होईलच. पण हा अभ्यासाच्याही लायकीचा विषय नाही असे माझे स्पष्ट मत आहे.  नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या सोबतच्या तज्ज्ञांनी घेतलेली चाचणी पूर्णतः तटस्थपणे घेतलेली आहे. आणि तिचे निष्कर्ष कुठल्याही सारासार विचार करणाऱया माणसाला मान्य होण्यासारखे आहेत. यासाठी नवीन कुठल्या चाचणीची गरज खरे तर अजिबात नाही. लेखनात एके ठिकाणी असा मुद्दा आहे की फलज्योतिषाला खरेपणा सिद्ध करावयाचा असेल तर त्याने अशा चाचण्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. परंतु अशा चाचण्यांमधून फलज्योतिषाचा खरेपणा सिद्ध होण्याऐवजी त्याचा खोटेपणाच अधिकाधिकपणे उघडा पडेल याची खात्री असल्यानेचे बहूतांश ज्योतिषी या चाचण्यांना विरोधच करतील. आणि ही सगळी मंडळी अशी चाचणी सुचवण्यासाठी किंवा सुचवलेल्या चाचणीच्या सर्वमान्य त्रुटी दाखवण्यासाठी कुठेही पूढे येणार नाहीत. मात्र एकदा का चाचणीचे निष्कर्ष जाहीर झाले की त्यावर शब्दांच्या कसरती करुन ती कशी पोकळ आहे हे सांगण्यास अहम्अहीकेने पूढे येतील. कारण मूळात ज्योतिष सांगणारे सगळे बुद्धीमान लोक आहेत. आणि त्यांना खात्रीने माहित आहे की आपण जे सांगतो आहे ते म्हणजे निव्वळ भाकडकथेत जमा होणारे आहे. हे खरे होण्याची शक्यता छापाकाटय़पैकी काय पडेल अशा प्रकारातली आहे. म्हणून भविष्य चुकले की जन्मतारखेच्या चुकीपासून ते भविष्य सांगणाऱयाला भविष्यातले मूळात काहीच कळत नाही हा दावा करण्यापर्यंतची कारणे त्यांच्या पोतडीत आधीपासूनच तयार असतात. असो. वर म्हटल्याप्रमाणे फलज्योतीषाच्या खरेपणाविषयी चाचणी तयार करणे म्हणजे समोरचा रंग लाल आहे हे ढळढळीत दिसत असतांना तो लाल आहे हे कसे सिद्ध करावे याची चाचणी तयार करणे होय. हा म्हणजे हातच्या कांकणाला आरशात पहाण्याचा प्रकार झाला. तरीही मी (या क्षणापूरता थोडासा जास्तीचा मूर्ख होऊन) जी चाचणी सुचवतो आहे तशा चाचण्या इतरही विद्वान लोक सुचवतील. त्यापैकी जी चाचणी प्रकाश घाटपांडे निवडतील तिच्यावर आधी सांगोपांग चर्चा व्हावी आणि यात फलज्योतिषाच्या समर्थकांचा आणि अभ्यासकांचा (!) जास्तीत जास्त सहभाग कसा होईल (निदान उपक्रमवरच्या तरी) हे पहावे. अशा कुठल्याच चाचणीला मान्यता देण्यास ही मंडळी समोर आली नाहीत तर चाचणी घेऊन काहीही उपयोग होणार नाही. कारण त्यांच्या लेखी चाचणीचे स्वरुप व निष्कर्ष त्यांच्या लेखी त्यांना विचारात न घेता मांडले गेले असल्याने ते मान्य होणार नाहीत व विज्ञानवाद्यांची कुत्सित चाल म्हणून सगळेचे निकालात निघेल. आणि मला याचीच शक्यता जास्त वाटते. तरी बघू काय होते ते.
चाचणीचा पहीला प्रकार
१.ही चाचणी फलज्योतीषाच्या सहाय्याने मुलाचे तो जन्मल्यानंतरच्या पाच वर्षापर्यंतचे भविष्य अचूक वर्तवल्याजाऊ शकते या मुद्यावर आधारीत आहे. फलज्योतीषाला जर चाचणीच्या पूर्णत्वासाठी चाळीस पन्नास वर्षांचे आयुष्य हवे असेल तर हा प्रकार तितकाच कालावधी घेईल.
२.चाचणीसाठी ज्यांचा सहभाग घ्यावयाचा आहे त्या कुटुंबातील महिला गरोदर असावी व पूढील महिनाभरात तिच्या प्रसूतीची तारीख असावी.
प्रसूती ज्या रुग्णालयात होणार आहे त्याचे अक्षांश रेखांष तज्ज्ञांच्या सहाय्याने निश्चित करुन घ्यावे. ते जर अधेमध्ये असतील तर असे निश्चित अक्षांश रेखांश सांगता येणारेच रुग्णालय निवडावे. किंवा अशा रुग्णालयातील प्रसूतीच चाचणीसाठी निवडावी.
३.जन्माची वेळ नोंदवतांना संबंधित डॉक्टर व परिचारीकांच्या स्वाक्षऱया घेऊन नोंदवावी.
४.हय़ा काळ आणि स्थळानुरुप जन्मपत्रिका तयार करावी व त्यानुसार सर्वमान्य ज्योतीषांच्या गटाने त्या बालकाचे पूढील पाच वर्षाचे भविष्य नेमक्या भाषेत व लेखी स्वरुपात वर्तवावे.
५.पाच वर्षानंतर हे भविष्य खरे की खोटे हे संबंधित बालक, त्याचे आईवडील, शाळेतील शिक्षक यांच्या तटस्थ मुलाखतींद्वारे ठरवावे.
हे निष्कर्ष फलज्योतिषाच्या अर्थातच विरोधात जातील पण त्यावर काही जालीम उपाय निघेलच. पहीला म्हणजे या चाचणीत भविष्य वर्तवणारे जे ज्योतिषी निवडल्या गेले होते त्यांना भविष्याचे ज्ञानच नव्हते त्यामुळे ही चाचणीच खोटी आहे. एखादा म्हणेल की माझे मत विचारात न घेता ही चाचणी झाली (चाचणी ठरतेवेळी मी पोटशूळाने आजारी होतो ) म्हणून हा सगळा फलज्योतीषाच्या विरोधकांचा कट आहे.
चाचणीचा दूसरा प्रकार
हा दूसरा प्रकार म्हणजे घाटपांडे यांनी आयोजित केलेली चाचणीच होय. यात आईवडीलांच्या स्वाक्षरीने मुलांच्या जन्माची तारीख वेळ व स्थळ यांचा तक्ता मागवावा व त्यांचे भविष्य जन्मापासूच्या पंधरा वर्षापर्यंतचे वर्तवून घ्यावे. ही मुले आजच पंधरा वर्षापेक्षा जास्त वयाची असावी म्हणजे लगेच शहानिशा करून निष्कर्ष हाती येतील. मुलांच्या कुटुंबांची नावे, आडनावे मात्र संकेतीकरण करुन ज्योतीषांपासून गुप्त ठेवावीत.
पण या चाचणीचे भविष्य घाटपांडे यांनी घेतलेल्या पहील्या चाचणी सारखेच असेल. ज्यांचे भविष्य बरोबर आले नाही त्यांच्या एकतर जन्मतारखा चुकलेल्या असतील किंवा ज्योतीषाची पद्धत चुकलेली असेल किंवा कुटुंबात कुणीतरी काही चुकीचे वर्तन केल्याने असे झाले असेल. भविष्य खरे की खोटे ठरवायला ही चाचणी उपयोगी नसून दुसऱयाचाचणीचा शोध घ्यायला हवा असा विचार पूढे येईल.
एक अनुभव
अकरावीच्या वर्गात असतांना कन्नड तालुकय़ातल्या (जि.औरंगाबाद,महाराष्ट्र) सारोळा या गावी आम्ही पाच मित्र एका निश्चयाने गेलो. या गावच्या जवळ असणाऱया डोंगरावर धोका आहे आणि शनिवारच्या रात्री त्या डोंगराकडे वळून पाहिल्यानेही दूसरा दिवस वाईट जातो ही ठाम समजूत. दूपारी आम्ही शेतवस्तीवरच्या आमच्या मित्राच्या कुटुंबासहीत इतर काही लोकांना रात्री डोंगरावर मुक्कामाची कल्पना सांगितली. सगळ्यांनी आमचे काय काय होईल याच्या काही गंमतीशीर कल्पना मांडल्या. आमच्या मित्राच्या आईवडीलांची तर तयारीच नव्हती. शेवटी त्यांचे म्हणणे मान्य असे म्हणून आम्ही खळ्यावर झोपायला जायची परवानगी घेतली. रात्री जेवण आटोपल्यावर एक टार्च, एक काडेपेटी आणि एक मोठी सतरंजी घेऊन आम्ही रात्री अकराच्या सुमारास जंगलातून वाट काढत डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. काटक्या गोळा करुन शेकोटी पेटवली. गप्पा मारता मारता रात्री कधीतरी चंद्र उगवला. या चंद्रोदयाचे आणि नंतरच्या सुर्योदयाचे त्या दरम्यानच्या गाढ शांत झोपेचे वर्णन मला कदाचित येथल्या मूळ विषयापासून दूर नेईल. सकाळी गावातल्या लोकांचा धोक्याचा समज दूर झाला असे वाटत असेल तर मंडळी फसलात. आम्ही जाळ पेटवल्यामूळे आमचा धोका टळला होता. आमच्या एका मित्राच्या गळ्यात ओमची प्रतिमा होती म्हणून आमचा धोका टळला होता. आमच्यापैकी एका मित्राचे नाव दत्तात्रय होते म्हणून धोका टळला होता. नाहीतर आमची काही धडगत नव्हती..... हूश्श.........ऽऽऽऽ..!
(गावातील लोकांनी स्वतःचा समज न बदलण्यामागे फक्त त्यांची जैसे थे वृत्ती आणि इतर काही त्यांच्या वृत्तीवरील पगडे असतील इथे ज्योतीषाबद्दल स्वतःचे मत बदलले तर सरळसरळ कमाईवरच पाणी सोडावे लागेल. हा फायदा सुटू नये म्हणून कुठल्याही मार्गाने फलज्योतिषाचे खरे स्वरुप उघड होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.)