घाव अजुनी...

बुधवार, २० एप्रिल, २०१६

तांबूस...

त्याच्या पसंतीच्या मुलीशी
त्याचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट..
.
नव्या जोडप्याचं जिथेतिथे कौतुक..
म्हणून हा बऱ्याच लग्नांमध्ये
कौतुकाने तिला सोबत घेऊन जायचा..
.
नंतर नंतर
घरी आल्यावरी ती
तिच्या बहीणींशी, मैत्रिणींशी
नुकत्याच लावून आलेल्या लग्नाबद्दल
फोनवर बोलायची..
.
तिकडून प्रश्न यायचा,
"कसा होता गं नवरा मुलगा..?"
.
मग ही लगेच उत्तर द्यायची,
"छान होता गं.. गोराप्पान होता अगदी..!"
.
ह्याच्या कानावर हे शब्द पडले की
आगतिकतेच्या ज्वाळांनी
त्याची कानशीलं तापायची..
.
‘कमावलेल्या डिग्र्या..
प्रतिष्ठेची नोकरी..
महिन्याचा तगडा पगार..
वर्तुळातलं नाव..
हे सगळं
भस्म होऊन जावं क्षणार्धात...
.
नि त्या बदल्यात
माझी त्वचा थोडी उजळ व्हावी’
.
असले काहीबाही विचार
त्याच्या मनात यायचे..
.
एक दिवस .
त्यानं मला मनातली सल सांगितली..
.
मी म्हटलो..
“येडझव्या..
गोरी पोरगी शोधता शोधता
पन्नास गावं पालथी घातलीस..
पाचपंचवीस जणींना
निव्वळ गव्हाळ नि सावळ्या रंगावरून
नकाराचं गालबोट लावून आलास..
.
तेव्हा त्या प्रत्येक प्रसंगी
त्या जीवाच्या मनात काय घालमेल होत असेल
हे कळतंय ना आता..!
तेव्हा
त्या पोरींचं ज्ञान नि पदव्या
सोयीस्कर नजरेआड केल्यास..
आता पदरात पडलेलं
अगाध ज्ञान नि
शुन्य परिघ असलेलं वर्तुळ
भोग चुपचाप...’
..
माझ्या बोलण्यामुळे
त्याचा चेहरा मग बऱ्यापैकी तांबूस झाला..
***