घाव अजुनी...

गुरुवार, २० मे, २०१०

शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान ?

एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते. अर्थात ज्याचा त्याचा विचार करण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याने मला तरी वाटते की अशा शंकासुरांचा मूळ बाब निर्दोष ठरण्याला बऱ्याचदा उपयोग होतो. कधीकधी सामोऱ्या न आलेल्या बाजू अचानक दृष्टीक्षेपात येतात.

केंद्रशासनाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार माननारे ऐतिहासिक वगैरे असे एक विधेयक सध्या मंजूर केले आहे. ज्यामूळे शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत अधिकारात समावेश झाला आहे. महाराष्ट्राने आपला पूरोगामीपणा दाखवत (की मिरवत) हे विधेयक तात्काळ राज्यात लागू केले आहे. यानुसार नुकत्याच राज्यशासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार आता इयत्ता आठवीपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला अनुउत्तीर्ण करता येणार नाही. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या वार्षिक परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नापास घोषित केले असेल त्यांना पूढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असो.

तर शंका अशी की विद्यार्थ्याचा घरी करवून घ्यावयाचा अभ्यास ही जी काही शाळाबाह्य संकल्पना आहे ती फक्त संख्येने अतिशय मर्यादित असणाऱ्या मध्यमवर्गाबाबतीत अवलंबली जाणारी बाब आहे. महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मुलाचा गृहपाठ घरी करुन घेणे तर सोडाच पण त्याने त्याच्या शाळेच्या वेळेत काळी केलेली पाने पाहण्यासही त्याच्या आईबापाला वेळ नसतो. हे घडून येते ते त्यांच्या गरीबीपायी किंवा अज्ञानापायी. नोकरदार व तत्सम मध्यमवर्गात मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायच्या वेळापत्रकाचे नियोजन आईवडीलांनी व्यवस्थितपणे पाळलेले दिसून येते. या सगळ्यातून एक बाब समोर येते की नापास करु न शकणाऱ्या भाबड्या शिक्षकाची इथून पूढे काडीचीही भीती न बाळगणारे मूल निदान आईवडीलांच्या गृहपाठाने तरी किमान ज्ञानाचे धडे गिरवत राहील. (शिक्षकाने विद्यार्थ्याला भीती दाखवलीच पाहीजे का? ही बाब इथे दूर्लक्षिली जरी गेली असली तरी पास होणे ही जबाबदारी मानूनच भाबडी मूले कष्ट करुन शिक्षकाला सहकार्य करीत असतात. आपणाला ज्ञान मिळवायचे आहे या भावनेतून शिकायचे असा विचार करण्याची त्यांची क्षमता असते का याची मला शंका आहे.)

या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिकणारे लाखो विद्यार्थी कोणत्या उद्दीष्टाला समोर ठेऊन ज्ञान संपादन करतील हा प्रश्नच आहे. शिक्षकांना (अपवाद क्षमस्व) आजपर्यंत ज्या पोरांच्या परीक्षा घेतल्या त्यांचे नियमानुसार पेपर तपासून त्यांना पास करता करता नाकीनऊ येत होते. ती पोरे आता विनासायास वरच्या वर्गात जात असतांना पाहून हायसे वाटेल. (विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या नव्या पद्धतींनी शिक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल असे शासन म्हणते आहे हा एक दिलासा.) पोरगा पास झाला का याची तरी ग्रामीण भागात पूर्वी विचारणा होत होती आता त्याचीही सोय राहीली नाही. शिक्षणतज्ञांचे या विधेयकानंतर दर्जाबाबतचे मत पाहीले तर त्यांना मूल पहील्यांदा शाळेत आले व टिकले पाहीजे हे महत्त्वाचे वाटते. अनेक मुले आज शाळाबाह्य ठरली आहेत हे मान्य पण जी शाळेत येतात. नियमित अभ्यास करतात. एकेका मार्कासाठी शिक्षकांना भांडतात. अभिमानाने दरवर्षी गुणपत्रक मिरवतात त्यांना आता आपण अभ्यास कशासाठी करायचा ह्याचे काहीतरी संयुक्तीक कारण पटवून द्यावेच लागेल. अन्यथा सगळी मूले आठवी पास होतील आणि नववीत अर्धी व दहावीत अर्धी गळतील. ही सगळी गळती अर्थातच ग्रामीण भागातल्या मुलांची असेल. कारण आज फक्त ग्रामीण भागात औपचारीक शिक्षण हे शंभर टक्के शाळेवर अवलंबून आहे. पहीलीत घातलेल्या पोराची प्रगती कितपत झाली हे खेड्यापाड्यातल्या आईबापांना मुलगा दहावीत पास/नापास झाल्यावरच कळते. एरवी आजही फक्त परीक्षेला गैरहजर राहणारी मुलेच फक्त नाईलाजाने नापास केली जातात. आता तर गैरहजर राहीला तरी शिक्षक या विद्यार्थ्यांची मिनतवारी करुन त्याला पूढच्या वर्गात प्रवेश देणार आहेत. म्हणजे ग्रामीण भाग त्यातही ग्रामीण भागातल्या अशिक्षित, मोलमजुर, शेतकरी लोकांची पोरे फक्त आठवीपर्यंत शिकतिल आणि मग पुढचे सगळे मार्ग शहरी मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय मुलांच्या पाल्यासाठी मोकळे उरतील. आठवी पर्यंत सक्तीचे शिक्षण म्हणजे फक्त आठवीपर्यंतच शिक्षण असे होण्याचीच शक्यता जास्त वाटते. शिक्षणाचा अधिकार मूलभूत नसतांनाही लाखो मूले शिकत होतीच. शिक्षणाचा हक्क देण्याची भाषा करतांना आपण समाजाच्या मोठ्या भागाला फक्त प्राथमिक शिक्षणापूरते मर्यादीत करण्याच्या मोठ्या कटकारस्थानात तर सहभागी होत नाही नाही ना याचा ही या निमित्ताने विचार व्हायला हवा.




रविवार, ९ मे, २०१०

नवस

उडणाऱ्या धूळीची
वाट गावाकडची,
सांजावलेला दिवस
ओढघराकडची.

अंगाला अंग घासत
आमचा चाललेला कळप,
उगाच बें बें करीत
कधी थांबत कधी पळत.

घरापाशी आल्याबरोबर
वेगळा झालो कळपापासून,
हात बदलले हाकणारे
जीव दाटला कसमसून.

टरकामधला प्रवास
खायला कोवळा चारा,
वाटलं आज सुखाला
नशिबानं दिलाय थारा.

गळ्यात घातलेला हार
अन कुंकवाने पूजन,
देवापूढं मान दाबून
मला घडवल्या गेलं दर्शन.

जीव एकवटून माझा
मी पाय घट्ट रोवले,
जेव्हा शेंदऱ्या दगडाजवळ
लालभडक रक्त पाहिले.

पाय खोरले जात होते
इतकेच आहे आठवात,
खच्चून साद दिली होती
जीवघेण्या आवाजात.

माझाच बळी देऊन देवा
इतका नवस कर पुरा,
एकदा पोटचं लेकरू धरून
नुसता लावून बघ सुरा.

थरारलास ना आतून
मग कशी असेल माझी माय,
कसे तुझे दानव भक्त
कसा तुझा उलटा न्याय.
000

शुक्रवार, ७ मे, २०१०

आधूनिक लोकगीते?

महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो. प्रसंगी लोकगीत ही समुहाची निर्मिती सुध्दा असते. आज महाराष्ट्रात लोकगीते म्हणून ज्या कॅसेट्स व सीडी प्रकाशित होत आहेत त्या गीतांकडे ही लोकगीतांची आधूनिक आवृत्ती म्हणून पहाता येते. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक लोकगीते एचएमव्हीच्या व आकाशवाणीच्या सहाय्याने घराघरात जाऊन पोहोचली व अजरामर झाली. त्यांची परंपरा नंतर पुढे आनंद व मिलिंद शिंदे यांनी काही प्रमाणात चालवली. काही प्रमाणात या साठी की आनंदमिलिंद यांनी नंतर लोकप्रियता व द्विअर्थी रचनांना जास्त महत्त्व दिले. खरे तर असे म्हणणे ही मलाच पून्हा एकांगी वाटते. आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या व त्यांच्या सोबत इतर समकालीन लोकगीत गाणाऱ्या गायकांची एकूण गीते पाहता त्यातल्या द्विअर्थी गाण्यांची संख्या मर्यादीतच आहे. परंतु या अशा द्विअर्थी गाण्यांना प्रसिद्धी मिळण्याचे प्रमाण मात्र अर्थातच जास्त आहे. अभिरुचीचे काही संकेत निर्माण करणारी व सर्वांवर ते संकेत लादू पाहणारी एकूणच व्यवस्था या व इतर गीतांकडे डोळेझाक जरी करत आली असली तरी जनमानसांवर या गीतांनी केलेली जादू मात्र नाकारता येणे शक्य नाही. जवा नवीन पोपट हा या गीताने आनंद शिंद्यांना प्रसिद्ध केले. हे गीत द्वीअर्थी नव्हते. त्यानंतर दरसाल एक तरी हीट गाणे देऊन त्यांनी आपला चाहता वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला. ज्या गीतांशिवाय अभिजनांच्याही लग्नाच्या वरातीला पूर्णत्व येऊ शकले नाही अशी गीते दरसाल प्रसिद्ध होणारी गीते आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेली आहेत. उदा.


हॅलो मी बाबूराव बोलतोय.
माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं.
हाताला धऱलया म्हणती लगीन ठरलंया

अशी अजूनही कित्येक गाणी लोकांच्या लक्षात असतील. आणि या गाण्यांना द्विअर्थी म्हणता येत नाही. अर्थात द्विअर्थी गाण्यांच्या बाबतीत आनंदमिलिंद शिंदे यांनी काही वेळा अगदी कहर केला आहे हे मात्र मान्य करावेच लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र द्विअर्थी गाणी गायली नाहीत. त्यांच्या

कुठ जातील काळ्या पोरी
दिसते कोणाची गाडी
गोडीनं नांदाव लागंलं सखे
संसार माझा छान
कशाचं खरं खोटं पिकतय रं
सुय़ा घे गं दाभण घे
जीव लावा पोरीला माझ्या जावईबूवा

या आणि अशा कित्येक भावपूर्ण व सुरेल लोकगीतांच्या तुलनेत चल ग सखे पंढऱीला ही कॅसेट तुफान गाजली. कदाचित समाजमनावर असलेला भक्तीरसाचा पगडा व एचएमव्हीचे व्यवस्थित मार्केटींग या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असाव्यात. असो एकूण या टिपणात लोकगीतांच्या नावाखाली द्विअर्थी गाण्याची जी अभिरुचीहीन रेलचेल सध्या सुरु आहे तिचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण द्विअर्थी नसलेली आणि चाल आणि विशिष्ट ठेक्यावर ताल धऱायला लावणाऱ्या गाण्याच्या आस्वादापासून अभिरुची संभाळण्याच्या नादात कुणी दूर राहू नये असे वाटते. या निमित्ताने वाचकांनी आपल्या आठवणीतील काही या प्रकारची गाजलेली लोकगीते सांगावीत. या गाण्यांचे प्रकाशन जरी लोकगीते म्हणून होत असले तरी ती खरेच लोकगीते आहेत का यावरही अभ्यासूंनी अवश्य मत व्यक्त करावे. बाकी या गीतांच्या प्रसिद्धी मागच्या कारणांचीही चर्चा करता येईल.