घाव अजुनी...

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

अस्सल मराठी

भाषा ही मग ती कोणतीही असो कालपरत्वे तिच्यात बदल होत आलेले आहेत आणि हेच भाषेचे स्वभाववैशिष्ट्यही आहे. दंडूकेशाहीने भाषा बदलायचे प्रयत्न करणाऱ्यांना मात्र प्रत्येकवेळी तोंडघशी पडावे लागते. ग्रामीण भागातून शहरात आल्यावर किंवा शहरी मध्यमवर्गीय संस्कृतीशी संपर्क आल्यावर हळूहळू शब्दांच्या वापरात आपसूकच बदल होत जातात. चार मध्यमवर्गीयांच्या समुहात एखादा इरसाल शब्द किंवा वाक्यप्रयोग झाला तर लगेच भुवया उंचावल्या जातात. परंतु ग्रामीण भागात तुझ्या मायला तुझ्या


असली वाक्ये दोन जिवलग मित्र गप्पा मारतांना कितीतरी वेळा सहजपणाने उच्चारुन जातात. तशीच गत जातीवाचक शब्दांचीही आहे. जातींनी माणसामाणसात उतरंडी निर्माण केल्या परंतु दोन वेगवेगळ्या जातीतले मित्र त्यांना जातीचा विखारीपणा अहंपणा कळु लागेपर्यंत अतिशय मोकळेपणाने दुसऱ्याच्या जातीचा उल्लेख टिकास्पदरित्या करतात. आणि तो अगदी सहजपणाने होतो. च्या मायला तुमी सोनार अन् कोनाला होनार.... किंवा चुंगुस मारवाडी असले वाक्यप्रयोग कित्येकदा खेळीमेळीच्या वातावरणात कानी पडतात. असो.  परंतु समोरच्यावर टिका करतांना ग्रामीण जीवनाच्या संचितातुन येणारा जातीतला उल्लेख आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्यांकडून कुत्सितपणे केली जाणारी शेरेबाजी यातले अंतर राखायला हवेच. त्यासाठी मग काही शब्द टाळता आले तर उत्तमच. पण तरीही भाषा ही आपले सांस्कृतिक व सामाजिक व्यक्तिमत्व घेऊन प्रकट होत असते. ते जोपर्यंत अस्सल महाराष्ट्रीयन आहे तो पर्यंत मराठीला वरुन कितीही रंग फासण्याचे प्रयत्न झाले तरी तिचा मूळ स्वभाव जायचा नाहीच.