घाव अजुनी...

शनिवार, ९ जुलै, २०२२

तू वेगळं काय करतोस..!

कोण तू..!
कुठून आलास..!!
कशासाठी !!!
.
तुझ्या येण्याने काय फरक पडला..!
तू नसता आलास तर
काय बंद पडलं असतं... !!
.
आहेस कशासाठी..!
.
तुझ्या असण्याने काय फरक पडतो.. !!
आणि नसण्याने काय बिघडतं.. !!!
.
जाणार कुठे आहेस...!
.
गेल्याने काय फरक पडणारै..!!
आणि न गेल्याने काय बिघडणारै..!!!
.
जन्म घेणं..
जवान होणं..
जन्माला घालणं.., आणि 
ज्याला जन्म दिला त्याला,
जन्म देण्यालायक बनवणं..!
.
संपलं की तुझं तथाकथित इतिकर्तव्य..!!
.
तुला माहित्यीये..?
जगातले असंख्य जीव, जंतू, किडे नि झाडं
हेच इतिकर्तव्य करतात..!!
.
तू वेगळं काय करतोस..!!!
***

सोमवार, १० जानेवारी, २०२२

रेसिपी

पसा दोन पसा

बाजरीचं पीठ ताटात घेऊन

चिमुटभर मीट टाकून

वाटीभर पाण्यात मळून

थापलेली भाकर

तव्यावर अन् मग चुलीतल्या विस्तवावर

खरपूर भाजून घ्यावी.


या रेसिपीचा व्हिडीयो

बनवताना

गरमागरम भाकरीचा 

एक तुकडा तोडून 

तोंडात टाकावा.


कोणत्या इनर्जेन्ट्सचा

कोणता फ्लेवर

जीभेच्या कोणत्या भागावर जाणवतोय

हे सांगायला जाल 

अन् तोंडावर चवीची एक्सप्रेशन्स द्यायला जाल

तर त्रेधातिरपीट उडेल तुमची.


पीठ, मीठ, पाणी अन् अग्नी मिळून

पोटाची आग विझवणे

हा एकच इरादा असतो या रेसिपीचा.


पोटाची आग विझत असतानाचे एक्स्प्रेशन्स

तुम्ही कुठून आणाल?


इनर्जेन्ट्स, मसाले आणि त्यांचे फ्लेवर्स

या सगळ्या गोष्टी तर लागतात

भरल्यापोटी करायच्या 

पदार्थांच्या रेसिपीत...

****