घाव अजुनी...

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

इतरांचं काय होतं..?

.
प्रत्येक क्षणाला
अब्जावधी शुक्राणू
झेपावताहेत ध्येयाकडे..
.
प्रत्येकात आहे चेतना..
.
पण एखादाच
भिडतो ध्येयाशी..
.
इतरांच्या
चेतनेचं काय होतं..?
.
या अनादी ब्रह्मांडात
अनंतकोटी बियांनी
स्वतःमध्ये
अविरतपणे जपलेला असतो
एक सुप्त जीव..
.
त्यांपैकी
रूजतात थोड्याफार...
.
इतर जीवांचं काय होतं..?
.
सहस्त्रावधी मेंदूंच्या
गहन पसाऱ्यात
सारखी उधाणत असतात
अभिव्यक्तिच्या आवाक्याबाहेरची
अजागळ वादळं..
.
काही उतरतात शब्दात..
काहींची होतात अक्षरं..
.
इतरांचं काय होतं..!
*****

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

झुळुक

.
तुमचा
रस्ता तोच आहे..
पण
रस्त्यावरची झाडं
नाहीयेत आता...
.
त्यामुळं
'रस्ता चुकलाय'
असं तुम्हाला उगाच वाटतंय..
.
झाडांना
निर्दयीपणे विसरायला शिका..
.
मग कालांतराने
हा रस्ताही
तुम्हाला
ओळखीचा वाटू लागेल..!
.
असो..
पण झाडं निष्ठूर असतात..
.
तुमच्या
विस्मृतींच्या असीम अनंतराळात
ती राखून असतात
त्यांचं अस्तित्व..!
.
तुमच्या
पुढील उण्यापुऱ्या आयुष्यात
येत रहाते अधूनमधून
एखादी
जहरी झुळुक..!
***

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

कण


मी अंगणात
पहूडलोय उन्हात
बघत आकाशात..
.
माझ्या समोरच्या सुर्याला
इवल्याशा कणात घेऊन
हिंडणारी आकाशगंगा,
स्वतःच एक कण बनून
सामावलीय तिच्या दीर्घिकेत
.
अन्..
या दीर्घिकेचा थेंब
तरंगतोय
विश्वाच्या अथांग समुद्रात...
.
तुझा सुर्य कुठे आहे?
.
तू तुझ्या घरात आहेस
कि अंगणात आहेस?
***

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

वाफ

.
पायी चालणाऱ्याला
सायकल हवीय,
सायकलवाल्याला बाईक
अन् बाईकवाल्याला कार हवीय..
.
हॕचबॕकवाला सेडानसाठी
नि सेडानवाला
लक्झरी एसयुव्हीसाठी झुरतोय..
.
बेघराला घर हवंय
झोपडीवाल्याला वनरूमकिचन
अन्
वनरूम किचनवाल्याला
टू बीएचके हवाय..
.
थ्री बीएचके वाला पेन्टहाऊससाठी
अन् पेन्टहाऊसवाला
फार्महाऊस बँगलोसाठी
मरमर करतोय..
.
अशा
कित्येक पायऱ्या आहेत..
.
तुम्ही
यापैकी
एखाद्या पायरीवर जन्माला येता..
.
अन्
जीतोड मेहनत किंवा
लांड्यालबाड्या करून
दोनचार पायऱ्या वर चढता..
.
मग
यातल्याच एखाद्या पायरीवर
तुमची यथासांग वाफ होते..!
****

शनिवार, २२ जुलै, २०१७

खरं तर...

.
माणसं तर
सहोदर आहेत
एकमेकांची..
.
एकमेकांसाठी
त्यांचा जीव
हळहळतो सदैव..
.
एकमेकांच्या
जीवावर उठल्यात
टोप्या, फेटे
अन्
दाढ्या नि शेंड्या..
.
बुरखे, ओढण्या, पदर
अन् टिकल्या बांगड्यांची
चाल्लीय उगाच फरफट..
.
पण खरं तर
अजुनही...
माणसं सहोदर आहेत
एकमेकांची...
.
त्यांचा जीव
हळहळतो
एकमेकांसाठी...!
***

पुन्हा पुन्हा अन्...

तुझ्याच गर्भातली
तुटली जुळली रसायने
पुन्हा पुन्हा अन्
अवतरलो मी.
.
कातर गहिवर चिडके रडके
लाडीगोडीचे ताणेबाणे
पुन्हा पुन्हा अन्
बागडलो मी.
.
झालो निब्बर जरठ दगड
वादळलो रगमस्तीने
पुन्हा पुन्हा अन्
विरघळलो मी.
.
झालो किंचित नि अनंत चराचर
पण तुझ्यातल्या मृगजळाने
पुन्हा पुन्हा अन्
गोंधळलो मी.
.
पुन्हा पुन्हा हे सांगून सवरुन
झेपावयाच्या अथक प्रयत्ने
पुन्हा पुन्हा अन्
तुरूंगलो मी....!
***