घाव अजुनी...

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

लक्षात असू द्या..

आजकाल कुत्रे फार भुंकत असतात..
पण तुम्ही घाबरू नका..

सत्ता, संपत्ती अन् जनमत
तुमच्या बाजूने असल्यावर
तुम्हाला
भुंकणाऱ्या कुत्र्यांची चिंताच कशाला..!

पण काही कुत्रे
तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.. 

कारण त्यांचे भुंकणे 
नियमबध्द अन् सुसंगत असते..

असू द्यात..

भांग मिसळून
चार-दोन बिस्किटे फेकली की
त्यांची लय तुमच्या ताब्यात येते..

पण मग नंतर
हे कुत्रे पुन्हा पुन्हा
बिस्किटे मागू लागतात..

बिस्किटांचा खर्च
जास्त व्हायला लागल्यावर
बिस्किटात द्या थोडंसं जहर मिसळून..!

आता ही कुत्री भुंकायची तर बंद होतीलच...
उलट
जहरावरचा उपाय शोधत शोधत
तुमच्या  पायाशी येतील..

मजबुरीतून तुमचे पाय चाटणाऱ्या कुत्र्यांची 
अशी पोसलेली फौज
हेच तर तुमचं वैभव आहे..

पण
तरीही तरीही तरीही तरीही...

जे कुत्रे तुमच्या
सत्तेला, संपत्तीला, 
बिस्किटांना अन् धमक्यांना
अजिबात जुमानत नाहीत..

ते हडकुळे स्वाभिमानी कुत्रे
एक दिवस
तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय
राहणार नाहीत..
हे कायम लक्षात असू द्या..!!
***

रविवार, २४ मे, २०२०

बुस्टर डोस

नुसतीच होते सकाळ अन्
नुसताच येतो सुर्य माथ्यावर,
या खोलीतून त्या खोलीत
नुसताच भटकतो वारा घरभर..

भूक झालेली फरार अन्
नुसताच चावतो मचमच घास,
चव हरवलीय जिभेची
अन् नाकाचा गहाळ वास..

दाढीवर वाढलीत खुंटे
अन् ढवळे तूरे डोक्यावरती,
'प्रौढपणाचा गळा घोटणे'
हौसही वाटे फिटली पूरती..

रुसवा, वाटे चिडचीड त्रागा
चिवचिवाट हा वाटे कल्ला,
अख्ख्या अवघ्या भरलेपणावर
रितेपणाचा भयाण हल्ला..

अन् लगेच येशी तू आश्वासक
होई झाडापानांत सळसळ,
क्षणाकणावर साकळलेली
क्षणात हटते सारी मरगळ..

अशाच वेळी असाच मिळतो
आशेचा हा बुस्टरडोस,
असेच आपण चालत राहू
असेच अजून शंभर कोस..
***

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

पक्षी

.
तुमच्या मनसोक्त जगण्याला
या जगरहाटीने दिलाय
एक निर्दयी चकवा..
.
खरं तर
तुमचं जर तुझ्यावर
जीवापाड प्रेमच नसतं
कुणावरही,
तर तुम्हीही नसता बनलात
कोणाचंही सर्वस्व..
.
तुमच्या अशा
एकमेकांत लीन होण्यातुन
नसती अस्तित्वात आली
तुमची लाडकी लेकरं..
.
आणि मग
तुम्हाला मरणाची अजिबातच
वाटली नसती भिती..!!
.
मग तुम्ही तुमच्या मनासारखं
मनसोक्त जगत..
खात, पित, हिंडत
मनसोक्त मरून गेला असता...
.
मानमर्यादा, प्रतिष्ठा..
अन् जीव धडधाकट ठेवण्यासाठी
सोसाव्या लागणाऱ्या
या मरणयातनांमधून सुटला असता...
.
असो..
.
तुमचा जीव गुंतलेला
हा पसारा आहे म्हणून
मजबूत आहेत, राहतील..
या पिंजऱ्याचे गज..!
.
पिंजऱ्यातला पक्षी
गपगुमान खात राहील
पुढ्यात टाकलेले दाणे..!
****