घाव अजुनी...

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

महीलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण याबद्दल...

पुरूषांवर अन्याय?


या आरक्षणामूळे पुरूषांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असले तरी तरी ते तसे नसुन माझ्या मते आजवरच्या पूरुषी वर्चस्वाचे परिमार्जन ठरावे. आजही शंभरटक्के जागांवर स्रियांना उभे राहण्याचे स्वातंत्र्य असले तरी किती टक्के स्रियांना लोकसभेला उभे राहण्यासाठी त्यांच्या घरातील पूरुष परवानगी (!) देतील याचा ही विचार व्हायला हवा.

पुरूषांना बंदी ?

स्रियांसाठी आरक्षित केलेल्या फक्त तेहतिस टक्के जागांवर पुरूषांना उभे रहायला बंदी असणार आहे. हा पदांसाठी इच्छुक पुरूषांवर अन्याय असला तरी आजवर पुरूषांनी स्रियांना शंभरटक्के जागांवर उभे राहायला अलिखित बंदी घातलेली आहे त्याचे काय?

पुरूष मतदारांवर अन्याय?

एखाद्या मतदारसंघात सगळे पुरूष उमेदवार असले तर तो स्रीमतदारांवर अन्याय ठरतो असे आपण म्हणू शकत नाही. त्याच न्यायाने स्री साठी आरक्षित मतदारसंघातील पूरुष मतदारांना उभ्या असलेल्या स्रियांपैकी कुणालाही मत देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना त्याला अन्याय कसे म्हणता येईल. कोणत्याही एका चांगल्या, सुशिक्षित, विकासाची जाण व तळमळ असलेल्या स्री उमेदवाराला मत देण्याचे स्वातंत्र्य (जे की आपण आजवर पुरूष उमेदवारांच्या संदर्भात भोगून आपल्या लायकी परीक्षणाचे अनेक नमूने उभे केले आहेत) असतांना एका स्रीला मत द्यावे लागणार म्हणून अन्यायाची बोंब ठोकणे हे अप्पलपोटेपणाचे लक्षण आहे.

पडद्यामागचे पुरूष?

स्रियांच्या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कारभार पडद्यामागून पुरूष चालवतील, चालवतात हे मान्य. मूळात त्या स्रीला निवडणूकीला उभे करण्यासाठी तयार करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत हे पडद्यामागचे पुरूषच कार्यरत असतात. मग ते त्या सत्तेच्या वापर करणारच झाले. पण एकदा सत्तास्थानी पोचलेली स्री ही नंतर आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय घेण्याच्या (प्रसंगी पुरूषांचा विरोध टाळून) क्षमतेपर्यंत येईलच.

मागासवर्गीय स्री?

स्रियांसाठीच्या आरक्षणात मागास व मुस्लीम स्रियांना आरक्षण असावे ही मागणी म्हणजे मागास स्रियांचे कैवारी असल्याचा डंका मिरवत पूरुषांचे फायदे जपण्याचा प्रकार दिसतो. परंतु तरीही स्रियांसाठीच्या आरक्षणांतर्गत मागास स्रियांसाठी आरक्षण ही या आरक्षणाची अनुभवांती पूढची पायरी होऊ शकते. या मुद्यापायी सगळ्या स्रियांच्याच आरक्षणात खोडा घालणे योग्य ठरत नाही.

एकंदरीत

स्री आजवर पूरुषाच्या हातचे शारीरिक, सांस्कृतिक आणि मनस्वी खेळणे बनून राहीली. पूरुषांनीही तिला कधी दासी तर कधी माता तर कधी देवी म्हणून झुलवत ठेवले. पण आपल्या अज्ञानापोटी आणि या अज्ञानातच आपला आत्मसन्मान मानण्याच्या व्यवस्थित (पूरुषांकडून) जोपासल्या गेलेल्या मानसिकतेपोटी स्रीने आजवर खऱ्या अर्थाने पूरुषाला आपले सर्वस्व बहाल केले आहे. तिने तिच्या अस्मितेची झापडे बंद केली असेही म्हणता येते त्याच बरोबर सगळे जाणवत असूनही पुरूषाशी मांडलेल्या सहजीवनापायी सारे सोसले असेही म्हणता येते. आज स्री आरक्षण म्हणा की अजून काही अशा बाबी म्हणा पूरुषांकडून स्रीला काहीतरी अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करतांना निदान जाणीवेच्या कक्षा विस्तारलेल्या माणसांनी तरी त्यांच्यातल्या पुरूषाला चरफडू देऊ नये असे वाटते.