घाव अजुनी...

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

दाहक

कायम टपून बसलेली ही आठवण तुझी असते
तिच्या धाकापोटी माझे शेड्युल बिझी असते...
.
रडू येते खुप पण कायम डोळ्यात असतो कचरा
डोक्याखाली तिच्या हाताची कारण उशी असते..
.
गळा माझाच कापला जातो फरार मीच होतो
बहूमताची सत्ता असतांना वेळच तशी असते...
.
बदाम तेव्हा आवडायचे नि आता ठेचा भाकर
शेजारणीची वेणी सदैव मोहक जशी असते...
.
दोन चिमणे भिकारी जेव्हा दारी उभे असतात
मग कळते ही भरपेट स्थिती दाहक कशी असते?

***

माती

नकोस खोदू बाई जुन्या गढीची माती
उगाच बोलंल काही जुन्या गढीची माती
.
भरोशाने या धन गाडून घेते निश्चळ
बधणार अशी नाही जुन्या गढीची माती
.
सुन्या गावठाणात अजुनही ती सळसळते
व्यापून दिशा दाही जुन्या गढीची माती
.
पाया खोदत जाता घबाड कसले आता
श्वास गाडते काही जुन्या गढीची माती

***

कणीक

एखादी स्री गप्पा मारेल..
तुमचं ऐकून घेईल..
प्रसंगी तिखट होईल..
हॉटी नॉटी होईल..
वर तुमच्यावर तिची काहीच जबाबदारी नसेल..
मग तुम्ही तुमचं पुरूषत्व
सहज हाताशी लागेल असं बाजुला ठेऊन
अमर्याद उदारही होऊ शकता...
स्रीवादी होउ शकता...
कारण ती तुम्हाला प्रत्यक्षात भेटणारच नसते..
.
फेसबुक वरून बाजुला झाल्यावर
तुम्ही भाजी पूरेशी तिखट नसल्याबद्दल
बायकोवर डाफरता...
झालंच तर तिच्या गालावरच्या खळीतला
ताजेपणा पाहून
मनात किंचित चिंताही करून घेता..
.
दुसऱ्या बाजुला जी कोणी फेसबुकवरून
बाजुला झालेली आहे..
ती पुढच्या काही रिक्वेस्टांकडे दुर्लक्ष करून
एक लांब सुस्कारा सोडते...
.
आणि मग कित्येक स्रीवादी पुरूषांचा पाचोळा
उडून जातो हवेत..
ती उठून स्वयंपाकाला लागते..
नि मळत बसते आपल्या सनातन प्रश्नांची कणीक..

***