घाव अजुनी...

रविवार, २४ मे, २०२०

बुस्टर डोस

नुसतीच होते सकाळ अन्
नुसताच येतो सुर्य माथ्यावर,
या खोलीतून त्या खोलीत
नुसताच भटकतो वारा घरभर..

भूक झालेली फरार अन्
नुसताच चावतो मचमच घास,
चव हरवलीय जिभेची
अन् नाकाचा गहाळ वास..

दाढीवर वाढलीत खुंटे
अन् ढवळे तूरे डोक्यावरती,
'प्रौढपणाचा गळा घोटणे'
हौसही वाटे फिटली पूरती..

रुसवा, वाटे चिडचीड त्रागा
चिवचिवाट हा वाटे कल्ला,
अख्ख्या अवघ्या भरलेपणावर
रितेपणाचा भयाण हल्ला..

अन् लगेच येशी तू आश्वासक
होई झाडापानांत सळसळ,
क्षणाकणावर साकळलेली
क्षणात हटते सारी मरगळ..

अशाच वेळी असाच मिळतो
आशेचा हा बुस्टरडोस,
असेच आपण चालत राहू
असेच अजून शंभर कोस..
***