घाव अजुनी...

शनिवार, १६ मे, २०१५

पडदा...

तू भेटशील तेव्हा..

माझ्या अंगप्रत्यांगातून
जागणाऱ्या

तुझ्या अस्तित्वाच्या
खाणाखुणांची अडगळ

मी झाकून टाकीन
एक बऱ्यापैकी
हलक्या रंगाचा
पडदा लावून...

आणि त्यावर
चिकटवून देईन

माझ्या नवऱ्यासोबतचा
माझा
एकूलता एक हसरा फोटो...

आणि मग
आताही तुला
नाहीच कळणार
पडद्यामागे काय चाल्लंय ते!

****

घाव बसला...

घाव बसला भाकरीचा...
डाव जमला चाकरीचा...

डिग-या मज पुसती पुन्हा...
भाव किती रं नोकरीचा...

यार पहाडी ढासळला...
डाव डसला छोकरीचा...

जहर कडवट प्यालो जरी...
महाल केला साखरीचा...

नांग्या फुटल्या मेंदूला...
रस्ता झाला ठोकरीचा...


***

नंतर...

अचानक तुझी
चप्पल तुटली रस्त्यातच...
आणि
लगेचच सापडावी
एखादी सेफ्टी पिन!
.
तसा भेटलो मी तुला...
.
कित्ती खुश झाली होतीस तू..
आणि
मी ही गेलो होतो हरखून..
उगाचच !
.
कसला धांदरट होतो ना मी!!!
.
हम्मम्....
.
नंतर तू चपलांचा
नवा कोरा जोड विकत घेतलास...

******

जर.. तर...

काळजाचा अता पत्थर करते...
अन् रस्ता तुझा हा खडतर करते...
.
वाट अशी का.. ही चुकू पहाते...?
नि घाट जीण्याचा दुस्तर करते...
.
हेवा तुला.. माझ्या कुंकवाचा...
मी तुझ्या मळ्याचा मत्सर करते...
.
अवघडलेले.. हे रंग दडवण्या...
या अजाणतेचे.. अस्तर करते...
.
पतंग म्हणतो.. भस्म होऊ दे...
पण ज्योत ही उगा.. जर तर करते..


****

भर दूपारी....

आणि भर दूपारी
शेठ यायचे गोणी घेऊन..
तांबूस चेह-यावरचा
घाम पूसत
सगळे चणे फुटाणे पसरवून
द्यायचे चौकात...
मग कबुतरांचा
झेपावणारा थवा बघतांना
हरखुन जायचे...
शेठ जवळ
एक लांब काठीही होती..
चणे गोळा करून
अधाशीपणे खाणा-या
क्रूर हडकुळ्या पोरांना
हूसकावून लावण्यासाठी....

***

बरं झालं....

बरं झालं!
तुझ्या डॉगीचं डॉगफुड संपलं तेव्हा
माझी पोरं गेली होती गावाला...
.
नाहीतर
पर्याय म्हणून तू आणलेल्या
पारले बिस्किटांकडे
ती पहात बसली असती
आशाळभूतपणे...
.
आणि मी पुन्हा
तणतणत निघून गेलो असतो बाहेर...
.
पोरांसाठी पारले बिस्किटांपेक्षा
काहीतरी स्टैंडर्ड
खाऊ आणायला...
.
*****