घाव अजुनी...

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

ये....

ये पुन्हा तापल्या दुधात साखर घोळून जा...
मीठ जरा लाडक्या जखमेवर चोळून जा...

क्रूर तुझी तलवार बेजार जिंकून आता...
ये जरा बाहूपाशात 'हार' तर माळून जा..

जा जीवा तू माहेरी फक्त माहेरासाठी तुझ्या...
जाताना 'पण' एक कर 'त्याचे' घर टाळून जा...

भोग कपाळीचे, कुठवर रे ही हळहळ...
कर गलबला, नियंत्याचे अक्षर गाळून जा...

तू सनातन आक्रमक शुद्धवंशी गे प्रिये...
ये मनातुन हो विवेकी बुद्धावर भाळून जा...
***



गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

साळसूद...

तांबारल्या डोळ्यांनी...
चाळवतो अन् बावळतो.
दिवस नशीला कधीकधी...
गालावर तुझिया मावळतो.

खरपूस तांबूस देही तुझ्या...
थरथर थरथर थरथर थरथर.
रात्रभराचे जाग्रण जाग्रण...
मग उशीराने उगवतो.

तिन्ही प्रहर साळसूद तू...
चोपून चापून मोजून मापून.
पण कातळवेळी गर्भागारी...
दर्या कोठला खळबळतो.

........
***