घाव अजुनी...

सोमवार, २३ मार्च, २०१५

नागीण

तु सुखी रहाविस आस ही अनंत आहे
तु सुखी आहेस ही आजही खंत आहे...
.
चिंब चिंब भिजलोय, आसमंत धुंद दिसे
पण सखे खरे तर पाणी गळ्यापर्यंत आहे...
.
रातराणी फुलते, निःशब्द नि गळून जाते
चांदण्यात गुंतल्या वा-यास ना उसंत आहे...
.
थरारलेले ओठ प्रिये, रोमहर्षी ही मिठी
मात्र दिवान्यास या गळफास तो पसंत आहे...
.
लाख ठेचला सखे, मी फणा हा विखारी
पण तव प्रितीची नागीण ही जिवंत आहे...


***

आगतिक

समुहातलाच एक मी ठरतो तेव्हा
नुसताच आगतिक मी उरतो तेव्हा...
.
पदर तुझा सावरते भुवई माझी
पुन्हा एकदा सनातन ठरतो तेव्हा...
.
दुर्दम्य बढाया या भरात येती
मी ओंजळीने सागर भरतो तेव्हा...
.
शोधतो तव नयनी पाणावलेपण
अविरत आंतरिक मी झरतो तेव्हा...
.
अजाण वाटेने तू चालत जाशी
माय हरवल्यागत भिरभिरतो तेव्हा...
.

****

बुधवार, १८ मार्च, २०१५

कैदी

शब्दांना पॅरालिसिस नि लुळे जाहले अर्थ 
मौनाचे डायालिसिसही पुन्हा ठरे निरर्थ...
.
धूरकट प्रतिमा सा-या नाती सारी लख्ख
मळकट लालिमा लेउन सांजवेळ ही मख्ख...
.
गढूळल्या लाटांच्या खडकांशी लोचट धडका
हुळहूळल्या आकांशांची चिता घेतसे भडका...
.
झगमगत्या वारूळांशी मुंग्यांचा व्याभिचार
तगमगत्या अंतर्मनाला खुणावतो अविचार...
.
धमन्यातून धावे रक्त जणु दंगल सैरावैरा
हृदयातून होऊ पाही हा कैदी अता फरारा...
***

धोका


धोका दिलास बाई
मौका मिला न कोई...
.
एकजात हे मवाली
इनमे भला न कोई...
.
थापा मारते गर्दी
तनहा मिला न कोई...
.
नाटकबाजी सगळी
परदा खुला न कोई...
.
हसणे उधार माझे
धंदा चला न कोई...

***