घाव अजुनी...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

चांदरात

काजळकाळा कृष्ण जणू
व्यापून गेला रान,
काळ्याकुट्ट आसमंती
अवघडून उभे एक पान.

मिट्ट झुळूक वाऱ्याचीही
सरसरत निघून गेली,
अंधारा बिलगून बसल्या
गडद मिठीच्या वेली.

अशा या गर्द प्रवाही
चंद्रकिरण सळसळले,
त्या तिथे असावे क्षितिज
पहुडल्या ओढ्याला कळले.

सोडते गंधीत हुंकार
रानफुलांची जाळी,
दूर आतुरला घुबड
देतो कुणा आरोळी.

हाळीने अपशकुनाच्या
अंधार गहिरा बावरला,
डोहात पहुडला चंद्रही
हलकेच जरा थरथरला.
चंद्राने प्रसवल्या प्रतिमा
जणू तिच्या पायीचे चाळ,
चंद्राचे खेळती वंशज
करुनी रुपेरी ओळ.

ही माळ चांदपुतुळ्यांची
रात्र घालुनी सजते,
कल्पून स्वतःचे रूप
गडद स्वतःशी हसते.
000

शुक्रवार, १२ मार्च, २०१०

आहोत ना आपण दोघं...

आता थांब थोडीशी
पुरे झाली दगदग,
आयुष्यभर राबूनही तुला
कसा नाही येत उबग?

आठवते विशीतली
तुझ्या कपाळीची चंद्रकोर,
काया तुझी नव्हाळीची
मनातले नाचरे मोर.

सकाळीच विझवून दिवे
तू कामामागे लागायचीस,
राबून सारा दिवसभर
सारं सोसून वागायचीस.

नाही हरखवू शकलो तुला
आणून एखादी भेट,
तरी भिडून राहिलीस तू
या ह्रदयाशी थेट.

कधी गमावून आधार
माझा झोक जायचा,
हलत्या काळजाचा झोका
तुझ्या डोळ्यात दिसायचा.

चार तपं झाली असतील
पण वाटतं क्षण चार,
आताशीच तर झाला होता सुरू
तुझा माझा संसार.

पोरं सुना उडून गेली
सारा चिवचिवाट घेऊन,
पण नको म्हणूस कधी
'काय करायचं जगून! '

आहोत ना आपण दोघं
जगू नवी कहाणी,
गुणगुणू एखादं गाणं
कधी पुसू डोळ्यातलं पाणी.

आता कर पोळ्या छान
मी भाजी खुडू की तांदूळ नीसू,
घटकाभराने देऊ ढेकर
मग गप्पा मारत बसू.













000

मंगळवार, ९ मार्च, २०१०

आभाळ

आपण तुटतच गेलो सारखे
तुटल्यापासून नाळ
तरी तुझ्यावर पांघरलेलं
आहे माझं आभाळ.

रांगता-चालतानाच
दुडुदुडू धावलीस
कधी पापे घेतलेस
कधी कडकडून चावलीस

हळूहळू तोडत गेलीस
भावगर्भांचे पाश
कळलंही नाही कधी पांघरलंस
जाणीवांचं आकाश.

विसरून निष्ठुर कायदे
मी झाले आश्चर्यचकित
जेव्हा निघून गेलीस तू
हळूच त्याच्या मिठीत.

म्हणायचीच 'उपटून दुसरीकडे
लावता येईल का झाड?
रुजतील का मुळे त्याची
होईल का गं वाढ! '

कळलं ना 'जागा असते दुय्यम'
फक्त माया जिवंत हवी
मग रमतोच जीव कुठेही
उमलते पालवी नवी.

परक्या बागेत उमललीच आसवे
तर तुझी तूच ढाळ
पण नको विसरू कधीही
पांघरलेलं आभाळ.












000

शनिवार, ६ मार्च, २०१०

गहन प्रश्न अर्थात किरकिर

आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे.  पण चला.  आपण ही आपली घालमेल लिहून टाकू येथे. जगाचं जे व्हायचं ते होईल निदान आपलं मन तरी थोडंफार हलकं होईल.
 कालपरवा स्वामी नित्यानंद महाराजांच्या लिलांचे बऱ्यापैकी मार्केटींग करण्यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाने यश मिळवले. या महाराजांच्या निषेधापायी पून्हा सामान्य जनताच वेठीस धरली गेली. या जनतेतलीच बरीच डोकी आधी त्यांच्यावरच्या भक्तीपायी वेठीस धरल्या गेली होती. स्वामी नित्यानंद यांचा किंवा अशा मंडळींचा आधी श्रद्धेने ओतप्रोत अशा शब्दप्रयोगांनी उल्लेख करणाऱ्या लोकांनी नंतर जाहीरपणे त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. यात कोण मुर्ख बनते आहे. आणि कोण बनवते आहे. आपण आपल्यावरच हसतो, चिडतो आहोत की आणखी कुणावर हा प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूलाच राहीला. नित्यानंदासाठी नरेंद्र मोदींनीही हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती हे नंतर चर्चिल्या गेले. जनतेच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरित्या आपल्या तथाकथित श्रद्धेचे प्रदर्शन करणे खरे तर लाजिरवाणे आहे. पण हे सगळे एखाद्या महाराजांचा भंडाफोड झाल्यावरच. तोपर्यंत ती लोकभावनेची एका सुज्ञ व्यक्तीने केलेली कदर असते. बरं हा भंडाफोड ही जनमाणसावर फार काळ परिणाम करु शकत नाही. ज्या सत्यसाईबाबांची पद्मपाद्यपूजा की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी केली त्या सत्यसाईबाबांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या मासिकांचे स्पेशल एडीशन निघाल्याचे मला आठवते. कालपरवा ज्या कृपाळू महाराजांच्या कृपेने सत्तरावर लोकांना जी सद्गती मिळाली त्या कृपाळूमहाराजांना बलात्काराच्या आरोपांनंतर नागपूरहून हाकलण्यात आले होते हे ही बऱ्याच जणांना आठवत असेल. बरं कृपाळू महाराजांची भक्तमंडळी तर महाराजांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर या मृत लोकांना काळाने मारले त्यात महाराजांचा दोष काहीच नाही असे सांगत आहेत. नित्यानंदांच्या युट्यूब मिटक्या मारत पहाणारेही अर्धीमुर्धी क्लीप पाहील्यावर थोडे मनाशी चडफडून महाराजांना शिव्या घालीत आहेत. या शिव्या संस्कृतीच्या अधःपतनाबद्दल कीती आणि संधी का न मम जिवाला या न्यायाने घातल्या जात आहेत हे ही या मंडळींना एकदा विचारायला हवे. आणि मूळात एखाद्याच्या खाजगी आयुष्याची अशी लक्तरे टांगणारेही संस्कृतीनिष्ट किती आणि व्यवसायनिष्ठ किती हा प्रश्न उरतोच. शेवटी माणूस काय नि महाराज काय हा सामान्य विकारांना बांधील असतोच. बाकी तपस्वीपणाच्या आणि आत्मज्ञानाच्या गप्पा माराव्या त्या नित्यानंदक्षमता निकामी झाल्यावरच. अन्यथा सर्व वृथा खेळ. माणसाने माणूसपणाच्या संस्कृतीचा मुलामा कितीही मिरवला तरी तो मुलामाच. माणूस हा शेवटी एक पशूच. तो दिवसरात्रीतल्या काही क्षणापूरता का होईना पशूसारखा जगू इच्छितो. जगो बापडा. पण असं जगतांना त्याने सामान्य माणसाच्या श्रद्धेला का वेठीस धरावे. आणि जी वेठीस धरली जाऊ शकते ती श्रद्धा असते का. मांढरदेवीला जा की हज यात्रेला, कृपाळू महाराजांकडे जा की अजून एखाद्या दैवताकडे. जेव्हा जीवावर बेतते तेव्हा आपणच आपल्याला धावपळ करुन लोकांना, लोकांच्या लहानग्यांना पायाखाली तुडवून वाचवायला हवे. ही दगडी दैवते आपल्या कामाची नाहीत हे जनतेला कळते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत, प्रसंगी उन्हातान्हात वृद्धांना लेकरांना पायी चालवत या दगडांपर्यंत पोचतांनाच माणसाची ही समज कुठे जाते हा मोठा गहन प्रश्न आहे......

बुधवार, ३ मार्च, २०१०

उत्तर

लौकिक सारे ध्येय मनाचे
सामावलेले या हातात,
तरीही अजून भूक जागी
या देहाच्या कणाकणात.

पंखांना अजूनही वाटे
घ्यावे पुढचे आकाश कवेत,
स्नायू असे हे वाकत राहो
अन् झेपावत या हवेत.

पण काही ओंजळींचीच होती
कालच तर ही तहान माझी,
खांद्यांना या नव्हती पेलवत
आशा अपेक्षांची ओझी.

पण आता उंच भरारीस्तव
धावपळीचा कणकण क्षणक्षण,
विचार जर करतो थांबून
'का उरात असले हपापलेपण? '

या अतृप्ती अन् व्यस्ततेचे
मग मला उमगते उत्तर
'पुसायचे आहे तू दाखवलेले
ते तुझ्या नि माझ्यातले अंतर. '
०००