घाव अजुनी...

रविवार, १७ जुलै, २०१६

गुरूवंदन

मागणी तसा पुरवठा असं करणाऱ्या कविलोकांबद्दल साहित्यिक वर्तुळात फारशी चांगली धारणा नसते..
पण एकमेव मैत्रिणीने तिच्या मुलीसाठी वरील विषयावर कविता मागितली..
मला अर्थातच हट्ट मोडता आला नाही..
आणि मी काही कवी नाही साहित्यवर्तुळाची भीडभाड बाळगायला...
:D
***
#गुरूवंदना
प्रश्न अनेक मनाला पडतात
पण भीती कधीच नसते त्यांची,
तुमचा आधार असतो सर
तुमच्याकडे असतात उत्तरे सगळ्यांची...
.
कष्टाने, अभ्यासाने तुम्ही
गुरू, शिक्षक आणि सर बनून,
अनमोल ज्ञानकण विश्वामधले
देता मला प्रेमाने शिकवून...
.
दिवसभरात ही शाळाच असते
माझे जग अन् माझे घर,
आई, बाबा अन् मित्रसुद्धा
तुम्हीच तर असता माझे सर...
.
मोठी होईन, जग जिंकेन
देश, प्रदेश सारा पुढे नेईन,
गुरू म्हणून तुमचे नाव
या हृदयात कायम ठेवीन...
.
गुरूपौर्णिमेच्या आजच्या दिवशी
माझे विनम्र वंदन तुम्हाला,
आयुष्यभर शिकत राहीन सर
विसरू नका तुमच्या विद्यार्थिनीला..
***

बुधवार, २० एप्रिल, २०१६

तांबूस...

त्याच्या पसंतीच्या मुलीशी
त्याचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हाची गोष्ट..
.
नव्या जोडप्याचं जिथेतिथे कौतुक..
म्हणून हा बऱ्याच लग्नांमध्ये
कौतुकाने तिला सोबत घेऊन जायचा..
.
नंतर नंतर
घरी आल्यावरी ती
तिच्या बहीणींशी, मैत्रिणींशी
नुकत्याच लावून आलेल्या लग्नाबद्दल
फोनवर बोलायची..
.
तिकडून प्रश्न यायचा,
"कसा होता गं नवरा मुलगा..?"
.
मग ही लगेच उत्तर द्यायची,
"छान होता गं.. गोराप्पान होता अगदी..!"
.
ह्याच्या कानावर हे शब्द पडले की
आगतिकतेच्या ज्वाळांनी
त्याची कानशीलं तापायची..
.
‘कमावलेल्या डिग्र्या..
प्रतिष्ठेची नोकरी..
महिन्याचा तगडा पगार..
वर्तुळातलं नाव..
हे सगळं
भस्म होऊन जावं क्षणार्धात...
.
नि त्या बदल्यात
माझी त्वचा थोडी उजळ व्हावी’
.
असले काहीबाही विचार
त्याच्या मनात यायचे..
.
एक दिवस .
त्यानं मला मनातली सल सांगितली..
.
मी म्हटलो..
“येडझव्या..
गोरी पोरगी शोधता शोधता
पन्नास गावं पालथी घातलीस..
पाचपंचवीस जणींना
निव्वळ गव्हाळ नि सावळ्या रंगावरून
नकाराचं गालबोट लावून आलास..
.
तेव्हा त्या प्रत्येक प्रसंगी
त्या जीवाच्या मनात काय घालमेल होत असेल
हे कळतंय ना आता..!
तेव्हा
त्या पोरींचं ज्ञान नि पदव्या
सोयीस्कर नजरेआड केल्यास..
आता पदरात पडलेलं
अगाध ज्ञान नि
शुन्य परिघ असलेलं वर्तुळ
भोग चुपचाप...’
..
माझ्या बोलण्यामुळे
त्याचा चेहरा मग बऱ्यापैकी तांबूस झाला..
***

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

एकंदरीत..

हिरव्यागार झाडावर
सरळ कु-हाड चालवू नये...
अशावेळी फार हल्लकल्लोळ माजतो..
आणि तुम्ही निर्दयी खलनायक दिसू लागता......
.
त्यापेक्षा
विषाची चारदोन इंजेक्शन्स द्यावीत टोचून..
हळूवार..
मग ते महाकाय झाड पोखरलं जातं आतून...
निष्पर्ण ... उजाड होतं...
कधीही कोसळण्याच्या बेतात येतं...
.
मग करावेत करवतीने त्याचे तुकडे तुकडे..
अशावेळी तुम्ही
सालस नि जागरूक समाजसेवक दिसता..
.
‪#‎एकंदरीत‬..
चोरटा स्पर्श करून
विनयभंग करण्यापेक्षा
मायेने गालगुच्चा घेऊन हौस भागवून घेणं
केव्हाही श्रेयस्करच...
.
‪#‎सन्मान्य_दूष्प्रवृत्ती‬

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

कट्टर...

अंगभर..
काळा बुरखा पांघरून..
काळ्याभोर भिरभिरत्या डोळ्यांनी
अन् लांबसडक गो-यापान बोटांनी
त्या पोरी रंगीत कपड्यांच्या
सगळ्या छटा पारखत असतात...
.
परंपरांचा पोलिओ झालेला
तरणाबांड समाज
युरोपियन मासिकातल्या सुंदर
नायिकांची चित्रे
न्याहाळत असतो....
.
कट्टर रंगाचा प्रोफाईल
फोटो लावून
याची त्याची आयभैन एक करतांना
तो अधून मधून
अॉस्ट्रेलियन तरूणीने
त्याची रिक्वैस्ट अक्सेप्ट
केलीय का.. ते तपासत असतो..
***

एकंदरीत...

हिरव्यागार झाडावर
सरळ कु-हाड चालवू नये...
अशावेळी फार हल्लकल्लोळ माजतो..
आणि तुम्ही निर्दयी खलनायक दिसू लागता...
.
त्यापेक्षा
विषाची चारदोन इंजेक्शन्स द्यावीत टोचून..
हळूवार..
मग ते महाकाय झाड पोखरलं जातं आतून...
निष्पर्ण ... उजाड होतं...
कधीही कोसळण्याच्या बेतात येतं...
.
मग करावेत करवतीने त्याचे तुकडे तुकडे..
अशावेळी तुम्ही
सालस नि जागरूक समाजसेवक दिसता..
.
‪#‎एकंदरीत‬..
चोरटा स्पर्श करून
विनयभंग करण्यापेक्षा
मायेने गालगुच्चा घेऊन हौस भागवून घेणं
केव्हाही श्रेयस्करच...


***