घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

सगळेच लबाड

ब्राह्मण काय , मराठा काय किंवा महार काय जातीचा अभिमान बाळगणारे, लाज बाळगणारे तिच्या समर्थनासाठी पुस्तकीज्ञान खर्ची करणारे सगळेच लबाड आहेत. मी किती पूरोगामी हे न सांगता आमची जात कशी पूरोगामी हे सांगण्याची आता नवी टूम निघाली आहे. जातीची या व्यवस्थेची असली फडतूस समर्थनगीरी करण्यापेक्षा म्हणू द्या ना कोणत्याही जातीला कुणालाही काही. तुमच्या माझ्या पूर्वजांचे नाव घेऊन कुणी बोलले तर प्रतिवाद करा. ही जात अशी होती म्हणणा-याला ती जात तशी नव्हती असे सांगणे हा ही जातीचाच प्रसार आहे. शेवटी भुकेल्या पोटाशी जेव्हा सगळ्या गोष्टी येऊन पोहोचतात तेव्हा जात कुठे असते. तेव्हा फक्त मुलभूत प्राणच तेवढा असतो ना. मग त्याचीच धरा ना लाज जरा. कुणाची जात ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही की माझी जात कुठे दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा अमलात आणा. जातींनी पूर्वी पापे केली ती काही जातींनी भोगली आता आम्ही पापे करू तुम्ही भोगा हे कुठपर्यंत. विवेक जागा करा. याचाही शेवट होईल. स्वतःपासून सुरूवात कराल तर आशावादी रहायला काहीच हरकत नाही. शेवटी जातीप्रथा वाईट किती यावर खरडत बसण्यापेक्षा ही नाहीशी करायला काय उपाय करता येईल आणि तो स्वतः तुम्ही किती अमलात आणता ते सांगा.