घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

समानता व विषमतेविषयी

समानता व विषमतेविषयी पहिल्यांदा काही बाबी स्पष्ट करु. पूढे मी जे काही लिहीतो आहे त्यात सुधारणा करण्यासारखे बरेच काही असू शकेल हे सर्वप्रथम मान्य करतो. समानते विषमतेला शब्दात बसवण्याआधी काही गोष्टी आधी गृहीत धराव्या लागतील त्या म्हणजे.
समाजातले लोक हे स्वतःची योग्यता समजण्याइतपत ज्ञानी आहेत. हे ज्ञान त्यांनी सारासार विचार करून मिळवले आहे. ते कुणाच्या अंधप्रभावाखाली नाहीत. मला माझ्या योग्यतेपेक्षा जास्त मिळवण्याचा अधिकार नाही. जर जास्त मिळवायचे तर माझी योग्यता वाढवणे याशिवाय दूसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्वांना मान्य आहे. प्रत्येकजण योग्यता वाढवत गेला तरी एकापेक्षा दूसऱ्याचे स्थान हे कायम वेगळे असेल आणि लाभांचे वितरण त्या त्या प्रमाणात होईल.
समानता -– माझे कर्तृत्व किती याची मला पूर्णतः जाणीव आहे आणि माझ्या कर्तृत्वास साजेशी संधी आणि योग्यते इतका मोबदला जो की सभोवतालच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत ज्या प्रमाणात मला मिळायला हवा त्या प्रमाणात मला मिळतो आहे असे प्रत्येकाला वाटणे म्हणजे समता असणे.
विषमता -– माझी योग्यता मला पूर्णतः माहित आहे. परंतु माझ्या योग्यतेनुसार मला संधी मिळत नाही. आणि योग्यता नसतांना इतरांना मात्र लायकीपेक्षा जास्त मिळते आहे. अशी भावना काही गटात असणे म्हणजे विषमता.
समानते विषमते विषयी हे लिहितांना त्या आधी कल्पिलेली सामाजिक परिस्थिती ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे. परंतु पूर्णांशाने असा समाज कधीही अस्तित्वात नव्हता मग यापूढे तो तसा होईल का. याचे उत्तर तो अधिकाधिक तसा असणे हे समाजिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते हे समजून घेण्यात आहे. यात माझ्या मनगटात ताकद आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे लोकांना भ्रमित करण्याइतपत चालाखी आहे म्हणून मी जास्त मिळविन असा विचार करणाऱया वृत्ती समाजात कायमस्वरुपी असणार आहेतच किंबहूना याच माझ्या योग्यता मग मला यानुसार जास्त मिळालेच पाहीजे असा अविचारही मांडला जाईल. या विचारांना मर्यादित ठेवणे, त्यांचा इतर समुहावर प्रभाव पडणार नाही याची दक्षता घेणे यासाठी प्रचलित शासनपद्धतीचा आधार घेता येईल.
विषमता हा प्रश्न सुटण्याच्या शक्यतेतला नाहीच असे म्हणून हातपाय गाळून बसणे योग्य ठरणार नाही. या समस्येवर उत्तर आहे. कदाचित मला ते पूर्णांशाने नाही देता आले तरी ते नाहीच असे म्हणून कसे चालेल ?