घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

एक स्वप्न

सकाळी सकाळी जाग आली. अंथरुणावर उठून बसल्याबसल्या जांभई दिली. पुन्हा स्टाइलिशपणे एक चुटकीही तोंडासमोर वाजवली. आणि पाचर बसल्यासारखे तोंड उघडेच राहीले. काही केल्या बंद होईना.अंगाचा थरकाप उडाला. आरशासमोर जाऊन उभा राहिलो. माझी ती केविलवाणी अवस्था बघून डोळ्यातून आसवे ओघळली. आता काय करावे. तशास अवस्थेत कसेबसे कपडे घातले आणि तोंडाला हात लावून बाहेर आलो. रस्त्याच्या पूढच्याच वळणावर एक हॉस्पिटल होते. तिथे गेलो. लोक विचित्र नजरेने पहात होते. वेटींगरुम मध्ये दोनजण आधीच होते. तोंडाला हात लावलेल्या अवस्थेत तिथे बसलो. एकेक क्षण युगासारखा वाटत होता. तेवढ्यात डॉक्टरांनी आत बोलावले. तोंडाला चार वेळा हाताने इकडून तिकडून तपासले. मग म्हणाले, "उशीर केलात. लवकर आला असतात तर काही करू शकलो असतो." सगळे ब्रम्हांड आठवत होते. आईवडील, भाऊबहीण, माझे कॉलेजचे मित्र. आता आपलं कसं होईल. हॉस्पिटल बाहेर आलो. सैरभैर.............................. जाग आली तेव्हा अंग घामाने थबथबलेले होत. हे स्वप्न होतं या आनंदाने हरखुन गेलो. आरशापूढे जाऊन तोंड हवे तसे उघडून मिटून बघितले. आयुष्यातल्या पूढच्या प्रत्येक जांभईच्यावेळी हे स्वप्न मला वाकूल्या दाखवून जाते. अगदी आजतागायत.
स्वप्नांचा जसा आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांशी संबंध असतो तशीच ती बहूतेकवेळा अतर्क्य असतात. एखादे स्वप्न पडतांनाच हे स्वप्न आहे व हे आपल्याला आगोदर पडले होते याची जाणीव ही काही वेळा होत असते. स्वप्नात काही कारणाने जाग आली तर पून्हा लगेच झोपल्यावर त्या स्वप्नाची लिंक पून्हा जुळते याचा ही अनुभव ब-याच जणांनी घेतला असेल. एकूण काय तर जाणीवेच्या कक्षेबाहेर धावू पाहणारा हा विषय चर्चेला भरपूर अवकाश देणारा आहे. माझे स्वप्न खुपच अतार्कीक. असे वाटणा-यांनी आपली अशी स्वप्ने (अर्थात खरीखुरी) शेअर करायला हे चांगले निमित्त ठऱावे.