घाव अजुनी...

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

तू नसतांना

तू नसताना
मनात हुरहुर
आठवणींचा पूर अनावर,
एकटेपणा दूरदूर
गहीवराचे ओझे मनावर.

तू नसताना
जीवाची तगमग
सभोवताली तुझ्याच प्रतिमा,
विरोधात हे सारे जग
अन् दुःखाला नसते सीमा.

तू नसताना
कडवटलेले सारे घास
जाहलेला जीव निशाचर,
झाडापानात तुझेच भास
स्पर्शभ्रम ते अन् अंगावर.

तू नसताना
सोबत असते तुझी आस
काट मारलेल्या तारखा,
तुझ्या येण्याचा घेऊन ध्यास
उत्सुक होतो मी सारखा.

तू नसताना
स्वप्न उराशी वेडेभोळे
येऊन गुपचूप पाठीमागून,
झाकशील तू माझे डोळे
हसशील कानाशी लागून.
***

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

गृहीत

ओझे सावरत
काळजीपूर्वक चालत
आर्तपणाने हसत.
नेहमीच पाणावल्या
वाटणाऱ्या डोळ्यांनी,
तू उतरतेस माझ्या आत
आता वेगळ्याच वाटांनी.

मी आतून पोखरलेला
भांबावून गेलेला
दाटून आलेला.
घट्ट करतो
माझं आक्रंदणारं मन,
दबता दबत नाहीत
तुझ्यासोबत जगलेले क्षण.

बरे होतो दोघेच
दोघांच्या दुनियेत
आनंदात.
मायबाप होण्याच्या ओढीने
या वाटांवर,
विलगणार तर नाहीत ना नावा
या अवघडल्या लाटांवर.
...

स्वच्छ नितळ मन
थोडेसे तरंगलेपण
गाठतो माहेर तुझे हवेवर स्वार होऊन.
अन धरून घेतो गृहीत
'तू कशी आहेस, '
किरकिरणाऱ्या आवाजाची
'ती कशी आहे? '
***

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

अगतिक

डांबरी सडकेला सोडून बाजूला कच्च्या रस्त्याने थोडं आत गुपचूप गाव माझं,
सावत्र वस्ती, पडके देऊळ, मोडकी वेस, आतून पोखरलेल्या माड्यांचं ओझं.

रांगणारे पाय घेऊन परागंदा झालेला दाही दिशांना झेपावलेला हा जीव,
का डोळ्यांनी, कानांनी आणि रंध्रारंध्राने आतूर होतो जवळ आल्यावर शीव.

ओल्या डोळ्यांसोबत गहिवरलेले चेहरे थरथरते हात चेहऱ्यावर फिरणारे,
काळवंडलेले घरटे माझे करकरणाऱ्या दारांसोबत पाखरांसाठी झुरणारे.

थकलेल्या पायांचे ठणकणाऱ्या गुडघ्यांचे गाऱ्हाणे आभाळाला सांगणारे वाडे,
इतक्या काळाचे लिंपण तरीही दुभंग मिरवणारे आडवेतिडवे तडे.

मला निर्वासित बनवणारा भिरभिरवणारा इथल्या मातीचाच होता गुन्हा,
तरीही पंख वितळल्यावर उंची ओसरल्यावर मी होईन इथलाच पुन्हा.

सगळ्या तडफडीला थंड करून इथे खेचणाऱ्या रक्तापूढे मी अगतिक,
पाय पुढे टाकत टाकत मागची वाट चालणारा नि केविलवाणा पथिक.

***

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

ओढणी

गव्हाळ मानेवरी
लव सोनेरी,
तुझी नित्य असे
पखरण तीवरी.

गोऱ्या गालावरती
नित्य खळीचे पडणे,
तिच्याशी तुझे
लाघवी भिडणे.

नाजूक बोटांची
स्पर्श पारायणे,
त्यासाठीच तुझे
पुनःपुन्हा घसरणे.

वक्षकमानींवरले
तू एकरंगी इंद्रधनू,
विरळल्या ढगांआड
दूहेरी चंद्रतनू.

कमरेला कधी तुझी
करकच्चून मिठी,
झुरणारे जीव कितिक
तुझा जन्म घेण्यासाठी.
000

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

बंद आता....

बंद आता नाचणे
बंद आता हासणे.

बंद आता दरवळ
बंद आता बोचणे.

धागेदोरे शुन्य
बंद आता काचणे.

मंदावले अश्रू
बंद आता साचणे.

तूही काटा मीही काटा
बंद आता टोचणे.
000

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

ओल्या मेंदीवरले घाव..

स्वप्नाळल्या डोळ्यांवर
लालभडक लकाकी
नि खडबडून उठले
सकाळी सकाळी.

डोळ्यावरले उन
भींती सभोवतालच्या
उलगडल्या हळूहळू
खुणा अस्तित्वाच्या.

आठवल्या रात्रीच्या
खिदळणाऱ्या मैत्रीणी
मग मेंदी धूण्यासाठी
शोधत गेले पाणी.

गोऱ्यापान तळव्यावर
रेखाटलेली कलाकुसर
मात्र विस्कटून गेलेली
मेंदी एका कोपऱ्यावर.

ओल्या मेंदीवरले घाव
रंगीतपणात राहिलेले
स्वप्न जरासे भंगलेले
काल रात्री पाहीलेले.

उफाळून आठवली तुझी मिठी
पाणावल्या डोळ्यांनिशी
जिंदगी खुप रंगली रे
पण खंत राहीली उराशी...
000

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

कासावीस

उदास उन्हाचं रुप घेऊन
पांघरलेली सर्वत्र उदासी
दबकत वावरणारा वारा
झाडाझाडांच्या पायथ्याशी.

अंतहीन लांबलचक रस्ते
ओकाबोका आसमंत
पाचोळ्याची हालचाल अन्
झुडुपांचेही झुलणे संथ.

आठवणींची मनात गर्दी
दाटलेले हे अंतःकरण
कुठल्या कसल्या दुःखाला हे
चढलेले अवचित स्फुरण.

जडावलेले पाय आता
लागेल जणू केव्हाही ठेच
ह्रदयाला विदीर्ण करते
पोकळपणाची ही बोच.

रस्त्यावरल्या वाटसरुच्या
मनात असले विचार भयाण
पोचतील ना घरापर्यंत
कासावीस हे माझे प्राण?