घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

एका सुंदर कलेचा अस्तकाल...अपरिहार्य.

सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे पण आजकाल दागिने कोण घालतो हे ही तितकेच खरे. बाकी ज्यांचे अक्षर सुंदर असते त्यांचा स्वभावही टापटीप आवडणाराअसतो असे माझेही निरीक्षण आहे. मुळात टापटीप आवडण्यातूनच सुंदर हस्ताक्षर आपसूक अंगी बाणले जात असावे असे वाटते. आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या. कारण आता यांत्रिकी करणामूळे विनासायास जर सफाईदार अक्षर लिहीणे (आणि अर्थात शेवाया करणे) जमत असेल तर जून्या कलांना जोपासण्याचा अट्टहास धरणे हे नॉस्टाल्जिकच (गतकालरमणीय ??) म्हणावे लागेल. मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे. अगदी अलिकडे ही सुंदर मराठी अक्षर पाहीले की लोक आनंदाची (आणि आश्चर्याचीही) प्रतिक्रीया देतात. बऱ्याचदा अर्ज वगैरे लिहीतांना मी मुद्दाम हस्ताक्षरात देत असे. कारण टंकलेखन किंवा संगणकावरून अर्ज तयार करणाऱ्यांचे अक्षरच मूळात चांगले नसते असा माझा समज होता. पण संगणकाच्या युगात हस्ताक्षराने अर्ज लिहून वेळ व श्रम वाया घालवणे हे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे बोधामृत प्राशन केल्यावर मी हस्तलिखिताच्या अट्टहासातून (आणि सुंदर हस्ताक्षराच्या गर्वातून) बाहेर आलो. आज शतकी बेरजा व वजाबाक्या करणे आपल्याला कैलक्यूलेटर शिवाय जमत नाही. आणि विसाच्या पूढचे पाढे पाठ करणे हे तर आदीमपणाचेच लक्षण ठरेल. (पावकी , सवाकी, दिडकी आठवल्या...) त्यामूळे आता लिहीण्याची बाब ही संगणकीय झाली आहे. काहीबाही सटरफटर नोंदी पूरत्या उरलेल्या हस्ताक्षरलेखनालाही आता जड अंतःकरणाने का होईना निरोप द्यायलाच हवा.

2 comments:

धनंजयुगाच म्हणाले...

नमस्कार..

उत्तम लेख...

मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे........
---------------------------------

..माझ्या बाबतीतही कालपरवा पर्यंत असेच कौतुक वाट्याला आले. आंतरदेशीय पत्रे, सहकारी संस्थेची कामे किंवा मित्रांचे नोकरीसंदर्भातील अर्ज अशा सर्व हस्तलिखित कामांची पूर्तता माझ्याच हस्ताक्षराने व्हायची. पण आता संगणकामुळे हस्ताक्षर खराब झाले असे वाटतेय. सध्या सर्व कामे कळफलकावर होत आहेत. आता तर सहीही डिजिटल करावी लागतेय.
त्यामुळे आधुनुकी/संगणकीकरणामुळे हस्ताक्षराला रामराम ठोकला गेलाय.

बाबासाहेब जगताप म्हणाले...

धनंजयजी...
स.न.
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
.
शुभेच्छा..
.
बाबासाहेब जगताप