घाव अजुनी...

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

मराठीत इंग्रजी अशी नको

खरे तर महाराष्ट्रातल्या प्रमाणीकरण करणाऱ्या वर्गाने मराठी भाषा म्हणून आजपर्यंत जो घोशा लावला आहे तो ते जी तथाकथित प्रमाण भाषा बोलतात त्या भाषेपायीच आहे. इंग्रजी शब्दांचा आधार घेत सोवळेपणा जपतांना जी भाषा बोलली जाते ती सुध्दा मराठीच असल्याचा दावा ही मंडळी सहज करु शकतात (उदा.मला तरी दुसर्‍या भाषेतील शब्दांचा आधार घेण्यात काहीच गैर वाटत नाही. ) परंतु यातून एकच जाणीव स्पष्ट होते ती म्हणजे ग्राम्य म्हणून किंवा लोकभाषा म्हणून जी भाषा बोलली जाते ती मराठी मराठी भाषा जंतूसंसर्ग झालेली आहे. (दुसऱ्या भाषेचे रबरी ग्लोव्ह घालून निर्जंतूक करता येतं. ) आपल्याच भाषेतल्या या शब्दसामर्थ्याला आपण संसर्गासारखे टाळत असू आणि त्याहूनही त्यासाठी दूसऱ्या अर्थात प्यूअर भाषेचा आधार घेत असू तर आपण आपल्या भाषेवर अन्यायच करतो. आजकाल नाकाला शेंबूड आला असे न म्हणता नाक आले असे म्हणण्याची पद्धत होते आहे.


चला काही शब्द वाटत असतील आज लाजिरवाणे पण म्हणून मराठीतच त्याला सरळ सोपा पर्याय का शोधू नये. त्यासाठी प्यूअर भाषेचा आधार कशाला. ग्रामीण भागातच वापरले जाणारे पर्याय पहा.

संडासला जाणे - परसाकडे जाणे

साप चावला - पान लागलं

मासिक पाळी असणे - शिवायचे नाही.



अवांतर - जेव्हा एखाद्या परकीय वस्तूसाठी अथवा घटना प्रयोगासंबंधी आपण शब्दप्रयोग करतो तेव्हा तो ओढूनताणून मराठीत करायची आवश्यकता नसावी. कॉम्प्यूटर, रेल्वे, कॅलक्यूलेटर, टेलिफोन हे शब्द परकीय उपकरणांचे आहेत. त्यांच्या शोधकर्त्यांनी त्यांना तसे संबोधले मग आपण ते शब्दच मराठी म्हणून (उदा. कॅलक्यूलेटर हाच शब्द मराठी शब्द) वापरायला हवे. ऑक्सफर्ड च्या शब्दकोशात गंगा, कृष्ण हे शब्दच इंग्रजी शब्द म्हणून समाविष्ट झाले आहेत.

या अशा वापराने मूळ मराठी ही नामशेष न होता अधिक विस्तार पावेल.लवचिकता हा भाषा अस्तित्व टिकण्यातला महत्त्वाचा भाग ठरतो. एरव्ही ज्ञानेश्वरी व गाथेतली भाषा आजच्या भाषकांच्या निरुपणाशिवाय पचनी पडत नाही . परंतु तरीही तीही मराठीच होती आणि आजची भाषाही मराठीच आहे. उद्याची कदाचित इंग्रजी शब्दांनी समृद्ध असेल पण तरीही मराठीच असेल. एखादी भाषा ही तिच्या व्याकरणीक व स्वरसंरचनेच्या स्वरुपात मूलभूत स्वरुपात अस्तित्वात असते. उदा. माझे सरनेम जाधव आहे. हे मराठी वाक्य झाले. माझे आडनाव आहे जाधव. हे इंग्रजी .