घाव अजुनी...

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

व्यवहार

जिथे तिथे मी ही असे तोट्याचे व्यवहार केले
तुझ्यापासून दूर झाले नि दोनाचे चार केले....

तू दिलेल्या नकाराचा सूड असा घेतला मी
देणेघेणे नसते तिथे प्रेम अपरंपार केले...

प्राक्तनावर चरफडून मी हात दुसऱ्या हाती दिला
त्यानेही कहर केला, प्रेम मजवर फार केले....

तुझ्या लाघवी प्रेमाने सदैव धडकी भरते उरी
कितिक खुडल्या कळ्या मी कित्येक अंकूर ठार केले...

तुझी जन्माची वैरीण मी अन् तू ही असा खलनायक
कधीच कळले नाही परंतु कोणी अत्याचार केले...

मी, माझा संसार, पिल्ले, घरटे आता काटेकोर
तुला अज्ञात वाटेवरती मी या घराचे दार केले....
***

हाक

लावणी मादक असते घरच्या गाण्याहून
बरसात पोषक असते भरल्या पाण्याहून...

कणगी भरुन असता उपवास पचून जातो
ती भूक दाहक नसते सरल्या दाण्याहून...

ढेकूळ फुटल्यावर ओढा गढूळ वाहतो
मग सपान नितळ फुलते पळत्या पाण्याहून...

लेक सासुराशी बापाचे संचित नेते
उजळ काहीही नसते असल्या सोन्याहून...

हाक थांबली बिनवाटेच्या गावाकडची
मरण त्याचे परवडले फसव्या जाण्याहून...

***