घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

पौराणिक वा आधूनिक सर्वच असले लेखन स्वाभाविक

 'मराठी लिखाण आणि लैंगिकता' या 'मुक्तसुनीत' यांच्या लेखाबदद्ल...
मराठी असो की जगातल्या कोणत्याही वाङ्मयातले साहित्य असो ते त्या त्या स्थलकालपरत्वे अस्तित्वात असलेल्या जनमानसांचे प्रतिबिंब बहूतेकवेळा असते. माणूस हा वेगळेपणाच्या कितीही बढाया मारत असला तरी तो अंतिमतः एक प्राणीच असतो. आणि प्राण्यांच्या स्वाभाविक खोडी त्याच्या अंतरंगात कायम दडून बसलेल्या असतात. वर सांस्कृतिकतेची, माणूसपणाची जाड गोधडी त्यानं पांघरलेली असते. पण मूळ पातळीवर आल्यावर त्यांचे हे पाशवीपण उचल खातेच. विरूद्धलिंगी व्यक्तीबदद्ल असलेले लैंगिक आकर्षण हे वंशवृद्धीच्या आदीम प्रेरणेचे द्योतक मानले गेले आहे. पूराण काळात (आणि आताही) सामान्य माणसाने लैंगिकतेबद्दल बोलणे हे निषिद्ध मानल्या गेल्याने देवदेवतांच्या तसेच पूराणातील इतर नायक नायिकांच्या प्रणयकथा (खरेतर भोगकथा) सविस्तर वर्णन करून सांगितल्या गेल्या. सामान्यांना संस्कृतचे गम्य नसल्यामुळे (आजही ) अक्षरशः दैवी फळांच्या प्राप्तीसाठी आजही या किळस आणणा-या कथांची पारायणे सुरू आहेत. (एक चपखल उदाहरण- गुरूचरित्र पारायण) संस्कृत जर सर्वश्रुत असती तर लोकांनी या पारायणकारांना पिटाळून लावले असते. सारांशाने या पूराणकारांनी किंवा गौरी देशपांडे, मेघना पेठे, विभावरी आदींनी असे कसे काय बुआ लिहीले या वर चर्चा करण्यापेक्षा आपले लक्ष वेधून घेणारे असे त्यात काय आणि का आहे हे निरलसपणे समजून घेतले तर आश्चर्य वाटण्याचे कारणच उरणार नाही. लैंगिकतेवर मुक्त लिहीले जाते म्हणून ना पूराणे वाईट ना आधूनिक मराठी साहित्य वाईट. पूराणे अन्वयार्थाने व आरोपणाच्या माध्यमातून (ब-याचशा छुप्या सामाजिक उद्देशांनी ) मानवाच्या मूलभूत प्रवृत्तींशी भिडली तर आजच्या साहित्याने कुठलीही भीड न बाळगता जे असते ते साहित्यात उतरवले इतकेच.