घाव अजुनी...

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

दाहक

कायम टपून बसलेली ही आठवण तुझी असते
तिच्या धाकापोटी माझे शेड्युल बिझी असते...
.
रडू येते खुप पण कायम डोळ्यात असतो कचरा
डोक्याखाली तिच्या हाताची कारण उशी असते..
.
गळा माझाच कापला जातो फरार मीच होतो
बहूमताची सत्ता असतांना वेळच तशी असते...
.
बदाम तेव्हा आवडायचे नि आता ठेचा भाकर
शेजारणीची वेणी सदैव मोहक जशी असते...
.
दोन चिमणे भिकारी जेव्हा दारी उभे असतात
मग कळते ही भरपेट स्थिती दाहक कशी असते?

***

माती

नकोस खोदू बाई जुन्या गढीची माती
उगाच बोलंल काही जुन्या गढीची माती
.
भरोशाने या धन गाडून घेते निश्चळ
बधणार अशी नाही जुन्या गढीची माती
.
सुन्या गावठाणात अजुनही ती सळसळते
व्यापून दिशा दाही जुन्या गढीची माती
.
पाया खोदत जाता घबाड कसले आता
श्वास गाडते काही जुन्या गढीची माती

***

कणीक

एखादी स्री गप्पा मारेल..
तुमचं ऐकून घेईल..
प्रसंगी तिखट होईल..
हॉटी नॉटी होईल..
वर तुमच्यावर तिची काहीच जबाबदारी नसेल..
मग तुम्ही तुमचं पुरूषत्व
सहज हाताशी लागेल असं बाजुला ठेऊन
अमर्याद उदारही होऊ शकता...
स्रीवादी होउ शकता...
कारण ती तुम्हाला प्रत्यक्षात भेटणारच नसते..
.
फेसबुक वरून बाजुला झाल्यावर
तुम्ही भाजी पूरेशी तिखट नसल्याबद्दल
बायकोवर डाफरता...
झालंच तर तिच्या गालावरच्या खळीतला
ताजेपणा पाहून
मनात किंचित चिंताही करून घेता..
.
दुसऱ्या बाजुला जी कोणी फेसबुकवरून
बाजुला झालेली आहे..
ती पुढच्या काही रिक्वेस्टांकडे दुर्लक्ष करून
एक लांब सुस्कारा सोडते...
.
आणि मग कित्येक स्रीवादी पुरूषांचा पाचोळा
उडून जातो हवेत..
ती उठून स्वयंपाकाला लागते..
नि मळत बसते आपल्या सनातन प्रश्नांची कणीक..

***

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

व्यवहार

जिथे तिथे मी ही असे तोट्याचे व्यवहार केले
तुझ्यापासून दूर झाले नि दोनाचे चार केले....

तू दिलेल्या नकाराचा सूड असा घेतला मी
देणेघेणे नसते तिथे प्रेम अपरंपार केले...

प्राक्तनावर चरफडून मी हात दुसऱ्या हाती दिला
त्यानेही कहर केला, प्रेम मजवर फार केले....

तुझ्या लाघवी प्रेमाने सदैव धडकी भरते उरी
कितिक खुडल्या कळ्या मी कित्येक अंकूर ठार केले...

तुझी जन्माची वैरीण मी अन् तू ही असा खलनायक
कधीच कळले नाही परंतु कोणी अत्याचार केले...

मी, माझा संसार, पिल्ले, घरटे आता काटेकोर
तुला अज्ञात वाटेवरती मी या घराचे दार केले....
***

हाक

लावणी मादक असते घरच्या गाण्याहून
बरसात पोषक असते भरल्या पाण्याहून...

कणगी भरुन असता उपवास पचून जातो
ती भूक दाहक नसते सरल्या दाण्याहून...

ढेकूळ फुटल्यावर ओढा गढूळ वाहतो
मग सपान नितळ फुलते पळत्या पाण्याहून...

लेक सासुराशी बापाचे संचित नेते
उजळ काहीही नसते असल्या सोन्याहून...

हाक थांबली बिनवाटेच्या गावाकडची
मरण त्याचे परवडले फसव्या जाण्याहून...

***

बुधवार, २२ जुलै, २०१५

तुझ्या पदराआड...

तुझ्या पदराआड सुसाट जेव्हा शिरतो
बनते सर्वज्ञ योगी दिवानगी माझी...
 
तुझ्या पदराआड उगाच जेव्हा हरतो
शत्रुस फितुर असते परवानगी माझी...

तुझ्या पदराआड ढसास जेव्हा रडतो
तेव्हा मला गवसते मर्दानगी माझी...

तुझ्या पदराआड असाच जेव्हा लपतो
कुशीत आईच्या मग रवानगी माझी...

***

सोमवार, १५ जून, २०१५

ढग...

अमुक तमुक विद्यालयाची
१००टक्के निकालाची परंपरा सलग १० व्या वर्षी कायम...
.
दणकट रूबाबदार
संस्थाचालक कम मुख्याध्यापकांच्या
फोटो शेजारची जाडजुड अक्षरं तिने वाचली...
.
पोस्टर मधल्या तिच्या चिमण्या मैत्रिणी
वाटत होत्या परक्या..
.
कालपासुन एकाच विचारानं
तिचा जीव पाणी पाणी व्हायचा....
.
जर आपल्याला गणितात
दोन मार्क कमी पडले असते तर....
.
पुन्हा तिच्या मनात कालवाकालव झाली...
हातातलं गुणपत्रक
पून्हा पाहीलं तिनं नजर भरून..
.
गणित विषयाच्या रकान्यातल्या
३५ मार्कांवर पुन्हा दाटले ढग...

****

शनिवार, १६ मे, २०१५

पडदा...

तू भेटशील तेव्हा..

माझ्या अंगप्रत्यांगातून
जागणाऱ्या

तुझ्या अस्तित्वाच्या
खाणाखुणांची अडगळ

मी झाकून टाकीन
एक बऱ्यापैकी
हलक्या रंगाचा
पडदा लावून...

आणि त्यावर
चिकटवून देईन

माझ्या नवऱ्यासोबतचा
माझा
एकूलता एक हसरा फोटो...

आणि मग
आताही तुला
नाहीच कळणार
पडद्यामागे काय चाल्लंय ते!

****

घाव बसला...

घाव बसला भाकरीचा...
डाव जमला चाकरीचा...

डिग-या मज पुसती पुन्हा...
भाव किती रं नोकरीचा...

यार पहाडी ढासळला...
डाव डसला छोकरीचा...

जहर कडवट प्यालो जरी...
महाल केला साखरीचा...

नांग्या फुटल्या मेंदूला...
रस्ता झाला ठोकरीचा...


***

नंतर...

अचानक तुझी
चप्पल तुटली रस्त्यातच...
आणि
लगेचच सापडावी
एखादी सेफ्टी पिन!
.
तसा भेटलो मी तुला...
.
कित्ती खुश झाली होतीस तू..
आणि
मी ही गेलो होतो हरखून..
उगाचच !
.
कसला धांदरट होतो ना मी!!!
.
हम्मम्....
.
नंतर तू चपलांचा
नवा कोरा जोड विकत घेतलास...

******

जर.. तर...

काळजाचा अता पत्थर करते...
अन् रस्ता तुझा हा खडतर करते...
.
वाट अशी का.. ही चुकू पहाते...?
नि घाट जीण्याचा दुस्तर करते...
.
हेवा तुला.. माझ्या कुंकवाचा...
मी तुझ्या मळ्याचा मत्सर करते...
.
अवघडलेले.. हे रंग दडवण्या...
या अजाणतेचे.. अस्तर करते...
.
पतंग म्हणतो.. भस्म होऊ दे...
पण ज्योत ही उगा.. जर तर करते..


****

भर दूपारी....

आणि भर दूपारी
शेठ यायचे गोणी घेऊन..
तांबूस चेह-यावरचा
घाम पूसत
सगळे चणे फुटाणे पसरवून
द्यायचे चौकात...
मग कबुतरांचा
झेपावणारा थवा बघतांना
हरखुन जायचे...
शेठ जवळ
एक लांब काठीही होती..
चणे गोळा करून
अधाशीपणे खाणा-या
क्रूर हडकुळ्या पोरांना
हूसकावून लावण्यासाठी....

***

बरं झालं....

बरं झालं!
तुझ्या डॉगीचं डॉगफुड संपलं तेव्हा
माझी पोरं गेली होती गावाला...
.
नाहीतर
पर्याय म्हणून तू आणलेल्या
पारले बिस्किटांकडे
ती पहात बसली असती
आशाळभूतपणे...
.
आणि मी पुन्हा
तणतणत निघून गेलो असतो बाहेर...
.
पोरांसाठी पारले बिस्किटांपेक्षा
काहीतरी स्टैंडर्ड
खाऊ आणायला...
.
*****

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उमर कोवळी

जग बोंबलते माजले होते...
जीव जरी ते लाजले होते...
.
उमर कोवळी होती आपुली...
ओठ तरीपण भाजले होते...
.
बंद का होती खिडक्या दारे...?
लग्न कुणाचे वाजले होते...?
.
व्याधी मिटल्या रोगही टिकला...
औषध कुठले पाजले होते..?
.
भेटलो होतो डोळे मिटून...
नाव तरी का गाजले होते...?
***

रविवार, १९ एप्रिल, २०१५

पिसाट वारा

पिसाट वारा सुटला आता...
मनास थारा कुठला आता...
.
माय अशी ही उजाड झाली...
पिलास चारा कुठला आता...
.
चकार शब्द तु बोलत नाही...
तुझा मशवरा पटला आता...
.
स्वप्ने धावती रानोमाळ...
पतंग अखेर कटला आता...
.
दारु नाही झिंगही नाही...
तोल खरेतर सुटला आता...
.
बोलुन गेलो सुसाट मी अन्...
ओठ तुझा का मिटला आता...
****

सोमवार, २३ मार्च, २०१५

नागीण

तु सुखी रहाविस आस ही अनंत आहे
तु सुखी आहेस ही आजही खंत आहे...
.
चिंब चिंब भिजलोय, आसमंत धुंद दिसे
पण सखे खरे तर पाणी गळ्यापर्यंत आहे...
.
रातराणी फुलते, निःशब्द नि गळून जाते
चांदण्यात गुंतल्या वा-यास ना उसंत आहे...
.
थरारलेले ओठ प्रिये, रोमहर्षी ही मिठी
मात्र दिवान्यास या गळफास तो पसंत आहे...
.
लाख ठेचला सखे, मी फणा हा विखारी
पण तव प्रितीची नागीण ही जिवंत आहे...


***

आगतिक

समुहातलाच एक मी ठरतो तेव्हा
नुसताच आगतिक मी उरतो तेव्हा...
.
पदर तुझा सावरते भुवई माझी
पुन्हा एकदा सनातन ठरतो तेव्हा...
.
दुर्दम्य बढाया या भरात येती
मी ओंजळीने सागर भरतो तेव्हा...
.
शोधतो तव नयनी पाणावलेपण
अविरत आंतरिक मी झरतो तेव्हा...
.
अजाण वाटेने तू चालत जाशी
माय हरवल्यागत भिरभिरतो तेव्हा...
.

****

बुधवार, १८ मार्च, २०१५

कैदी

शब्दांना पॅरालिसिस नि लुळे जाहले अर्थ 
मौनाचे डायालिसिसही पुन्हा ठरे निरर्थ...
.
धूरकट प्रतिमा सा-या नाती सारी लख्ख
मळकट लालिमा लेउन सांजवेळ ही मख्ख...
.
गढूळल्या लाटांच्या खडकांशी लोचट धडका
हुळहूळल्या आकांशांची चिता घेतसे भडका...
.
झगमगत्या वारूळांशी मुंग्यांचा व्याभिचार
तगमगत्या अंतर्मनाला खुणावतो अविचार...
.
धमन्यातून धावे रक्त जणु दंगल सैरावैरा
हृदयातून होऊ पाही हा कैदी अता फरारा...
***

धोका


धोका दिलास बाई
मौका मिला न कोई...
.
एकजात हे मवाली
इनमे भला न कोई...
.
थापा मारते गर्दी
तनहा मिला न कोई...
.
नाटकबाजी सगळी
परदा खुला न कोई...
.
हसणे उधार माझे
धंदा चला न कोई...

***

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

घाव अजुनी....


घाव अजुनी उरात आहे
चेव अजुनी सुरात आहे..

पान पिकुनी पिचून गेले
भाव अजुनी भरात आहे..

आव कशाला अताच मोठा
नाव अजुनी पुरात आहे..

गाव उद्ध्वस्त विराण झाले
ठाव अजुनी घरात आहे..

नाव तुझे का गर्जुन गेले
धाव अजुनी धुरात आहे..

साव असा मी उगाच प्रिये
डाव साधते वरात आहे..
***