घाव अजुनी...

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

पत्र

मी तुला एक पत्र पाठवलं..
.
आणि 
तुझ्या प्रतिसादाची
वाट बघत बसलो..!
.
पत्र लिहितांना
मनोमन ठरवलं होतं की
तू जर उत्तर दिलं नाहीस
तर जगायचंच नाही..
.
मरून जायचं..!
.
तर मग
बघत बसलो
तुझ्या उत्तराची वाट..!
.
दिवस, महिने, वर्षे
उलटून गेली..!
.
मग एक दिवस कंटाळून
मीच गेलो तुझ्या पत्त्यावर..
अन्
मीच मला लिहून टाकलं
माझ्याच पत्राचं उत्तर..!
.
हो..!
मीच..!!
.
आणि पुन्हा घरी येऊन,
तुझ्या पत्त्यावरून आलेलं
ते पत्र वाचून घेतलं..!
.
पण मी मेलो नाही..!
.
माझ्यासारखा निर्लज्ज माणूस
जगाच्या पाठीवर कोणीच नसेल..!
अन् तुझ्यासारखी
दुर्लक्ष करणारी बाई तर नाहीच्चै..!!

****

शुक्रवार, ४ मे, २०१८

ज्योत

.
वहिनी आहेत
बहिणी आहेत
भाऊ आहेत
भाऊजी आहेत..
.
आई-बाबा
बाई-दादा
टिल्लु-कल्लु
चिल्लु-पिल्लु
.
सगळेच एकत्र
जेवत असतांना
परिपूर्णतेची ज्योत
नेमकी तेवत असतांना..
.
मला उचकी लागते
अन् तुला ठसका..
.
कोण झुरतंय
कोण हूरहूरतंय..
तुझ्या डोक्यात संशय
माझ्या डोक्यात तिडीक..
.
हम्मम्..
ज्योत
काजळीसह तेवत राहील
जग निवांत जेवत राहील..
****

गुरुवार, ३ मे, २०१८

फॉरमॕट

.
तेव्हा
'वाचून फाडून टाक'
असं म्हणून
तू लिहिलेली पत्रं
लैमिनेशन करून
कपाटात जपून ठेवली होती..
.
आणि 
'बघून डिलीट करून टाक'
असं म्हणून
तू पाठवलेल्या
मैसेजचे स्क्रीनशॉट्स
ड्राईव्हवर लपवून ठेवले होते..
.
कपाट 
केव्हाच भंगारात विकलंय
अन् आज सकाळीच
ड्राईव्हचा पासवर्डही विसरलोय..
.
मी,
'तू सांगितल्याप्रमाणे 
वागलो नाही' म्हणून
तू ही सोडून गेलीआहेस..
.
पुन्हापुन्हा
मेमरी फॉरमैट करतोय..
पण
ही एक फाईल 
काहीकेल्या डिलीट होत नाहीये..!
****

फक्त

.
मला 
अजिबात आठवत नाही
तुझी तुकतुकीत त्वचा..
.
मला आठवत नाही
तुझ्या ओठांवरली लव..
.
मला आठवत नाहीत
तुझे आकार नि विकार
.
मला 
फक्त तू आठवतेस..
.
लोक म्हणायचे,
'माझं तुझ्यावर प्रेम आहे'
.
मला फक्त
इतकंच आठवतं..
धूसर.. धूसर...!
***

निश्चय

.
आज तुझ्याबद्दल
काहीच लिहायचं नाही
असा निश्चय केला होता..!
.
त्या नादात बरंच काही
इकडचं तिकडचं लिहून टाकलंय..
.
मला पोहता येत नाही..
.
पण
माझे पाय एकसारखे तळ नसलेल्या
तुडुंब डोहाकडे खेचले जाताहेत..
.
तू डोहात आहेस की
डोहापल्याड..?
***