घाव अजुनी...

रविवार, २२ मार्च, २००९

मराठी स्रीवादी साहित्याची परभृतता- उपसंहार

स्त्रीवादी साहित्याच्या भारतीय पार्श्वभूमी व पाश्चात्य तत्वे तसेच मराठी वाङ्मयातील या विचाराच्या यशापयशाबद्दल विवेचन करणारा हा अभ्यासविषय पूर्णत्वाला गेला आहे. स्त्रीवादी साहित्यविचाराच्या संदर्भात यात सर्वप्रथम मराठी वाङ्मयातील वाङ्मयीन प्रवाह व चळवळींच्या प्रेरणा, पार्श्वभूमी व परिणाम या अंगाने विचार करण्यात आला.
 एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठी वाङ्मयाने अनेक छोटया मोठया स्थित्यंतरांमधून आपले आधूनिक रुप साकार केल्याचे या अभ्यासातून नव्याने निदर्शनास आले.

मराठी वाङ्मयाचे आधूनिक रुप अविष्कृत होत असतांनाच भारतात समाजसुधारणांच्या चळवळींचे पर्वही आकाराला येत होते. नवी सामाजिक जाणीव, मानवतामूल्याची ओळख आणि शिक्षणाने दिलेली नवी दृष्टी या कारणांनी राजराम मोहन राॅय, गो.ग.आगरकर, महात्मा फुले, लोकहितवादी आदी समाजसुधारकांनी जुन्या वाईट प्रथापरंपरांवर हल्ले चढवले.महात्मा गांधी, वि.रा.शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या समाजसुधारणेच्या चळवळींचा मराठी वाङ्मयावर परिणाम झाला. ठराविक परीक्षेत्रात बंदिस्त राहिलेली वाङ्मयीन अभिव्यक्ती हळूहळू विस्तृत सामाजिक आशयाच्या अंगाने बहरू लागली.

स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सुशिक्षित ग्रामीण व दलित समाजातील पिढीने मराठी वाङ्मयाची ही कोंडी फोडली आणि दलित व ग्रामीण साहित्यप्रवाह उदयास आले. जागतिक वाङ्मयविचाराच्या प्रभावातून मार्क्सवादी व स्त्रीवादी वाङ्मयदृष्टीही मराठी वाङ्मयाला प्राप्त झाली.

नव्या साहित्यविचारामूळे मराठीतील सुरुवातीपासूनच्या स्त्रीसाहित्याची मिमांसा स्त्रीवादी दृष्टीकोनातून होण्यास सुरूवात झाली. नवसुशिक्षित जाणीव व राजाराम मोहन राॅय, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, महात्मा फुले आदी समाजसुधारकांचे स्त्रीसुधारणाविषयक खुले विचार सुरुवातीला स्त्रीसाहित्याची प्रेरणा होते. स्त्रीसाहित्याचे स्वातंत्र्यपूर्व काळातील हे स्वरुप अपवाद वगळता पारंपरिकच होते.

मराठी वाङ्मयाच्या स्त्रीवादी साहित्याच्या स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदींचे विचार कार्य, ताराबाई शिंदे, विभावरी शिरुरकर यांचे प्रकाशित निर्भीड व सडेतोड तसेच काळाच्या कक्षा ओलांडणारे लिखाण तसेच मार्क्सवादी, दलित व ग्रामीण साहित्यचळवळीतील विचार यांच्या प्रभावाचा वाटा लक्षणीयरीत्या दिसून येतो.

भारतातील स्त्रीवादी विचारांच्या तत्वांच्या मूळाशी भारतीय समाजात स्त्रीला परंपरेने दिलेले दूय्यम स्थान कारण म्हणून आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीमुक्तीच्या विचारांनी प्रभावित होऊन स्त्रीला तिचा आत्मसन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतात स्त्रीवादी विचारांची मांडणी झाली. स्त्रीमुक्ती चळवळीच्या अनुषंगाने पाश्चात्य साहित्यविश्वात स्त्रीवादी साहित्यशास्त्राची मांडणी करण्यात आली.

जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादीसाहित्यविचाराच्या अनुकरणातून मराठी वाङ्मयालाही या दृष्टीने जोखले जाऊ लागले. साहित्यात रेखाटली जाणारी स्त्री ही तिला दूय्यम मानून रेखाटली जाते काय याचा शोध घेतला जाऊ लागला. स्त्रियांचे वैशिष्टयपूर्ण शरीरनिष्ठ अनुभव, भावविश्व, दुःख, वेदना आणि चीड साहित्यातून अविष्कृत होऊ लागली. मेघना पेठे, कमल देसाई, गौरी देशपांडे, प्रज्ञा लोखंडे, सानिया, आशा बगे, अनुराधा पाटील, नीरजा आदींच्या वाङ्मयातून पुरुषवर्चस्वाशी विद्रोह करणा-या, समानतेची मागणी करणा-या स्त्रीवादी जाणीवांचा अविष्कार झालेला दिसून येतो.

दरम्यानच्या काळात स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या मर्यादितपणावर, पाश्चात्यपणावर आरोप झाले. स्त्रियांच्या वाङ्मयीन अभिव्यक्तीला स्वैराचारी वळण देणारा हा विचार असल्याचा आक्षेप घेतल्या गेला. स्त्रीवादी वाङ्मयविचार मात्र या दृष्टीने मराठी वाङ्मयाला अधिक व्यापकता देणाराच ठरतांना दिसून येतो.

भारतीय पार्श्वभूमीवर स्त्रीवादाचा विचार मात्र त्याच्या आत्यंतिक परकीयपणामूळे काही बाबतीत विसंगत ठरतो. कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, जातीप्रथा, धार्मिक वैविध्य, आर्थिक वर्ग आदी पातळ्यांवर स्त्रीवादी विचारधारेत वेगळा विचार केला गेला नाही. परिणामी स्त्रियांची परंपराप्रियता, कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीचे स्थान व स्त्रीच्या आयुष्यातील कुटुंबाचे स्थान, दलित, ग्रामीण व नागरी स्त्रियांचे वेगळेपण आदी पातळ्यांवर स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या परकीयपणातून त्यात आलेला एकांगीपणा या अभ्यासातून सिध्द झाला आहे.

मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यचळवळीच्या यशापयशाबद्दल शोध घेतला असता पारंपरिक वाङ्मयविषयातील स्त्रीचित्रणांचा आशय बदलण्यात तसेच स्त्रीवादी समीक्षाविचाराच्या माध्यमातून साहित्याचे नव्या अंगांनी आकलन करण्यात या साहित्यविचाराला यश मिळालेले दिसून येते.

स्त्रीला कमी लेखना-या सांस्कृतिक मतांवर परखडपणे भाष्य करण्यात मात्र स्त्रीवाद हा साहित्यनिर्मीती, समीक्षा व तात्विक मांडणी या तीनही पातळ्यांवर अपयशी ठरला आहे. ठराविक आर्थिक व सामाजिक वर्गातील स्त्रियांच्या भावविश्वातच मर्यादित राहिल्याने या साहित्यविचाराच्या अयशस्वीतेत भर पडलेली दिसून येते.

समाजातील सर्व स्तरांच्या स्त्रियांना साहित्यातून अविष्कृत करण्यातून तसेच समीक्षेची कक्षा सर्वच पातळीवरील वाङ्मयाला कवेत घेण्याइतकी विस्तारीत करण्यातून स्त्रीवादाला ठोस वाटचाल करता येईल. विस्तृत आशयावकाश धारण करणा-या, परंपरांना चिकित्सा व अभ्यासातून ठोस नकार देणा-या नव्या दृष्टीकोनाच्या स्विकारातून स्त्रीवादी साहित्याला मराठी वाङ्मयात यशस्वी होता येईल या निष्कर्षांप्रत या अभ्यासविषयाचे विवेचन पोचले आहे.
***