घाव अजुनी...

रविवार, २२ मार्च, २००९

वाङ्मयीन चळवळी व प्रवाह

प्रकरण १ ले
प्रस्तावना
मराठी सािहत्यात सर्वसाधारणपणे १८७४ पासून आधूनिक युगास प्रारंभ झाला असे मानले जाते. या व यालगतच्या पूर्वीच्या कालखंडापासून अर्वाचीन काळात वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला आणि या बदलातून साहित्यचळवळी कशा आकारत गेल्या याचे विवेचन प्रस्तूत प्रकरणात प्रामुख्याने करावयाचे आहे.
साहित्यत्व व साहित्याची निर्मिती व आस्वाद प्रक्रीया या संदर्भातले प्राचीन व मध्ययुगीन विचार, तद्नंतर इ.स. १८०० ते १९५० या काळातले सािहत्यविचारातले परिवर्तन यांचा आढावा घेऊन मराठी वाङ्मयातील चळवळींच्या प्रेरणा, पार्श्वभूमी व परिणाम या संदर्भातला नेमक्या व त्रोटक स्वरूपातला विचार मांडणे हे प्रस्तुत प्रकरणात प्रामुख्याने अभिप्रेत आहे.

१.१ अर्वाचीन मराठी वाङ्मयातील साहित्यविचार
वाङ्मयाकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन जुना कसा व अर्वाचीन कसा हा विचार आपल्या साहित्यविचाराच्या कक्षेत प्रामुख्याने येईल. या मार्गाने विचार करतांना वाङ्मयाबद्दल प्राचीन विद्वानांची काय मते होती यावर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक ठरते.

संस्कृत साहित्यविचारात साहित्याला उद्देशून ॓काव्य॔ ही संज्ञा वापरली जात असे. काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांचा अंतर्भाव या ठिकाणी अभिप्रेत होता. साहित्याचे प्रयोजन म्हणून सर्वच प्रमुख संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी पुरूषार्थाला मध्यवर्ती स्थान दिले आहे. धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांची प्राप्ती हे साहित्यकारण भारतीय साहित्यशास्त्रांत सांगितले गेले. या दृष्टीने खालील काही अवतरणे महत्वाची ठरतात.
"धमार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यं कलासुच ।
प्रितिं करोति कीर्तींच साधुकाव्य निबन्धनम् ॥"

(काव्य चार पुरूषार्थांमध्ये आणि कलांमध्ये प्राविण्य मिळवून देते, प्रीती व किर्तीचा लाभ घडविते.)१

"ननु काव्येन क्रियते सरसानामवगम: चतुर्वर्गे ।"२
साहित्यिक साहित्य निर्माण करतो व त्यातून पुरुषार्थ प्राप्त करतो असे एकूण प्राचीन भारतीय सािहत्यशास्त्र सांगते. पुरूषार्थाची प्राप्ती करण्याचा राजमार्ग म्हणून ईश्वरभक्ती ही प्राचीन भारतीय समाजातील अभिजन वर्गाने प्रमाण मानलेली होती. परिणामस्वरूप या काळातील वाङ्मयनिर्मिती ही ईश्वरनिष्ठेचेच आविष्काररूप होती. पंडीती वाङ्मयात, महाकाव्यात शृंगारादी भावनांचे वर्णनही ईश्वररूपी आणि तत्संबधी व्यक्तिरेखांवर आरोपण करून करण्यात आलेले दिसून येते.

साहित्य हे ईश्वरसाधनेचे माध्यम व पुरूषार्थप्राप्तीचे साधन होय या प्राचीन मध्यवर्ती वाङ्मयविचाराला जेथून हादरे बसण्यास सुरूवात झाली तेथून आधूनिक वाङ्मयविचाराची पायाभरणी सुरू झाली असे या ठिकाणी स्पष्ट होते.

साहित्य हे मानवोत्थानाच्या प्रयोजनाने आपले रूप साकारू शकते, नव्हे त्याने ते तसे साकारायला हवे या मताची बीजे प्राचीन वाङ्मयविचारात अत्यल्प प्रमाणात आढळून येतात.

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी वाङ्मय अर्वाचीन स्वरूपात प्रकट झाले. परंतु या काळातील लेखन हे सर्वार्थाने समाजसुधारणेच्या उद्देशाने लिहिले गेलेले बोधवादी स्वरुपाचे होते.

॓ई.स.१८७४ पासून सुरू झालेल्या विष्णुशा चिपळूणकरांच्या निबंधमालेने मराठीत निबंध,चरित्र,समीक्षण ईत्यादी वाङ्मयप्रकार रूढ केले.॔३ साहित्यविचाराच्या संदर्भातील लेखनाचा धांडोळा घेऊ पाहता निबंधमालेत चिपळूणकरांचे या संदर्भातले काही विचार निबंधमालेत विखूरलेल्या स्वरूपात आढळून येतात. मध्यवर्ती स्वरुपात मात्र देशभक्ती, देशसुधारणा व िरव्रस्ती मिशन-यांवर टिका हाच विचार निबंधमालेतून प्रामुख्याने मांडण्यात आला. याच कालावधीत गणेशशास्त्री लेले यांचे ॓साहित्यशास्त्र॔, वा.ब.पटवर्धन यांचे ॓काव्य आणि काव्योदय॔ही साहित्यविचारावरील काही पुस्तके संस्कृत साहित्यशास्त्रालाच सुलभ करून मांडणारी होती.

ई.स. १९२८ साली श्री.व्यं.केतकर यांनी लिहिलेले ॓महाराष्ट्रीयांचे काव्यपरिक्षण॔ आणि का.बा.मराठे यांचा ॓नावल आणि नाटक याविषयीचा निबंध॔ या दोन पुस्तकांच्या लेखनानंतर मराठी वाङ्मयविचार हळूहळू अर्वाचीन रूप धारण करू लागल्याचे दिसते.

मराठी समीक्षेचा हा प्रारंभ अर्वाचीन होता या उल्लेखामागे फक्त कालदृष्ट्याही या विधानाचे महत्व या ठिकाणी आहे. सखाराम गाडगीळ यांचा ॓लिहिण्याची शैली॔ हा लेख (१८६३), म.मो.कुंटे यांनी ॓राजा शिवाजी॔ या काव्याला लिहिलेली प्रस्तावना (१८६९) आणि तद्नंतर का.बा.मराठे व श्री.व्यं.केतकर यांनी केलेली साहित्यविचारांची मांडणी ही प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राच्या कर्मविपाकाधारीत कल्पनांना नकार देऊन होत असलेली दिसून येते. १८८५ साली जोतीराव फुले यांनी आता सामान्य लोक भुलथापांना बळी पडणार नाहीत अशा आशयाचे विचार मांडतांना ॓एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षर बंधुप्रीती वाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकांद्वारे प्रकाशित करावे॔४ असे म्हटले आहे.

आधूनिक वाङ्मयविचारात मानवी वास्तव जीवनाचा आविष्कार वाङ्मयातून करणे क्रमप्राप्त मानण्यास सुरूवात झाली आणि हेच आधूनिक वाङ्मयविचाराचे व्यवच्क्षेदक लक्षण ठरते.

या नव्या साहीत्यविचाराने मानवी सुखदू:खाचे कलात्मक चित्रण हे वाङ्मयाचे प्रयोजन म्हणून मान्य झाले पण हे विचार प्रमाण मानून झालेली साहित्यनिर्मिती ठराविक पांढरपेशा समुहाच्या बाबतीतच मर्यादित ठरली. श्री.म.माटे यांच्या लेखनातून ग्रामीण व नंतर दलित आत्मकथनांमधून उपेक्षीत जीवनाची अभिव्यक्ती चाळीस ते साठच्या दशकात अधिकाधिक वास्तव पातळी गाठू लागली. ताराबाई शिंदे, विभावरी शिरूरकर आदींच्या लेखनाने वाङ्मयविषय म्हणून वास्तवाच्या पातळीवर तोपर्यंत उपेक्षीत असलेल्या स्त्रीवर्गाच्या भावाभिव्यक्तीला वाङ्मयात स्थान मिळाले.

याच काळात कला आणि जीवन यातला वादही हिरीरीने मांडला गेला. ॓ग्रंथाच्या रचनेवर जर नजर द्यावयाची असली तर त्याच्या बीभत्सत्वाचा वगैरे विचार निराळाच ठेवला पाहिजे॔५ असे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सांगून ठेवले होते. अशाच विचारांचे समर्थन करत ना.सी.फडके यांनी ॓कलेसाठी कला॔ या मताचा आग्रह धरला. ॓कलेचे सांस्कृतिक महत्व काडीइतकेही नाही॔६ इथपर्यंत टोकाचा कलावाद मांडला गेला. याच काळात वा.म.जोशी, िव.स.खांडेकर, लालजी पेंडसे व नंतर शरच्चंद्र मुक्तिबोधांनी जीवनसंदर्भ टाळून कलेचा विचार अशक्य असल्याचे आग्रहपुर्वक नमुद केले.
॓मानवी अस्तित्त्वाचा अर्थ काय, या विराट विश्वचक्रात मानवी अस्तित्त्वाचे, मानवी संबंधांचे स्थान काय, हे व असे मानवी जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करणारे प्रश्न समर्थपणे मांडण्याची लेखकाची क्षमता जेवढी मोठी असेल त्या प्रमाणात त्या साहित्यकृतीचे महत्त्व वाढते.॔७ असे मानन्यापर्यंत आज आधूनिक वाङ्मयविचाराचा प्रवास झालेला दिसून येतो.

मराठी वाङ्मयविचाराला सामान्य माणसाच्या जीवनसंदर्भात जसजसे अनुकूल रूप मिळत गेले तसतशा प्रमाणात वाङ्मयाचे त्या संदर्भातले बेगडी व संकुचित रूप उघडे पडत गेले. साहित्याच्या प्रस्थापित शिलेदारांनी सुरूवातीच्या काळात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून या मर्यादित वाङ्मयालाच वैश्विक रूप देण्याचा चालवलेला प्रयत्नही यामूळे स्पष्ट झाला.

एकूण छोटया परिघातील वर्तुळ विस्तारण्यासाठी वाङ्मयात चळवळी उदयास आल्या, तर जुनेे गडकिल्ले राखण्यासाठी प्रतिचळवळी करण्याचाही प्रयत्न झाला. सारांशरूपाने मराठीतील वाङ्मयीन चळवळींच्या मागे व त्यातून उदयास आलेल्या साहित्यप्रवाहामागे वाङ्मयविचारात झालेला आधूनिक बदल हा कारणीभूत होता असे मला या ठिकाणी आग्रहाने नमुद करावयाचे आहे.

१.२ मराठी वाङ्मयातील चळवळी
मराठी साहित्यात आधुनिक विचारांचे नवे पर्व सुरू झाल्यानंतर मराठी साहित्याचे मराठी जीवनाच्या व एकूणच मानवी समुहाच्या आतापर्यंत दु्र्लक्षित राहिलेल्या अंगाकडे लक्ष गेले. अद्भूतता, एेतिहासिकता व पौराणिकतेच्या काल्पनिक जगाकडून वास्तवाच्या पातळीवरील वाङ्मयीन चित्रणांकडे मराठी साहित्याचा प्रवास सुरू झाला. समाजात बालविवाह, शिक्षण, विधवाविवाह इत्यादी प्रश्नांच्या उलटसुलट चर्चेतून सामाजिक कादंब-यांचे पर्व सुरू झाले. बाबा पदमनजी, हरी नारायण आपटे, नारायण हरी आपटे, वा.म.जोशी, श्री.व्यं.केतकर असा सामाजिक वाङ्मयनिर्मितीचा प्रवास या कालखंडात दिसून येतो. या सामाजिक वाङ्मयनिर्मिती मध्येच पुढील काळात उदयास आलेल्या ग्रामीण,दलित,समाजशाय,मार्क्सवादी व वादी साहित्यचळवळींची बीजे रोवलेली होती.

ना.सी.फडके यांनी कलावादाची मुहूर्तमेढ रोवण्यापुर्वी सावरकर व प्रो.मा.त्र्यं.पटवर्धन यांनी भाषाशुद्धीची चळवळ मराठीत सुरू केली. भाषाशुद्धीच्या चळवळीचा परीघ हा व्यापक असला तरी या चळवळीचा प्रमुख विषय हा तत्कालिन वाङ्मयीन परीवेशासंदर्भातलाच होता.॓आज आपल्या स्वकीय भाषेच्या जीवावरच उठलेल्या इंग्रजी आणि उर्दू या दोघा परकीय भाषांशीच आपले खरे वाङ्मयीन वैर ठाणलेले आहे.॔८ या सावरकरांच्या विधानातून याची प्रचीती येते.

भाषा ही शब्दांच्या देवाणघेवाणीतुनच विकसीत होत असते. प्राकृत, अपभ्रंश, आदी भाषांनी द्राविडी व इतर भारतिय भाषांशी अशी जवळीक साधण्यातूनच मराठी भाषा जन्माला आली. अशा नैसर्गिक व मूलभूत बदलांनाच विरोध करणा-या भाषाशुद्धीच्या चळवळीचा रोख प्रतिगामी ठरला. ॓भाषाशुद्धीची आधुनिक चळवळ ही शिवकालातल्या प्रयत्नांप्रमाणेच कृत्रिम होती आणि त्यामुळेच पटवर्धनांच्या मृत्यूबरोबर ती लय पावली.॔९

कलावादाचे वेगवेगळे आविष्कारच फडके यांच्यापासून मर्ढेकरांपर्यंत झाल्याचे दिसून येते. जर्मन तत्वज्ञ इम्यॅनुअल कांट यांच्या भूमिकेचा आधार घेऊन मराठी वाङ्मयात कलावादी विचार हिरीरीने मांडल्या गेले. वास्तव जीवनातील नैतिक नियमांचा कलेशी संबंध नसतो असा एकूण रोख कलावाद्यांचा होता. आपल्या मतांना पटवून देण्यासाठी पाश्चात्य सौंदर्यविचारातील अनेक संकल्पनांचा हवा तसा अर्थ कलावाद्यांनी लावला व वाङ्मयाला लौकीक जीवनापासून तोडण्याचे प्रयत्न केले.

स्वातंत्र्योत्तर मराठी वाङ्मयातील या कृतकपणाविरूद्ध बंडखोरी करणारे लिखाण होऊ लागले. प्रारंभी या लिखाणाला टिकेचे धनी व्हावे लागले. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या दहा वर्षात कर्त्या पिढीचा होऊ पहात असलेला भ्रमनिरास वाङ्मयातून टोकदारपणे अविष्कृत होऊ लागला. आणि या नवाभिव्यक्तीतून नवसाहीत्याची चळवळ उदयास आली. फडके, खांडेकर यांच्या काव्यमय आभासातून, कल्पनारम्य ध्येयवादातून नवसाहित्याच्या चळवळीने मराठी वाङ्मयाला बाहेर काढले. नवसाहित्याच्या प्रवाहांतर्गत नवकथा, नवकाव्य आणि संज्ञाप्रवाही कादंब-यांच्या माध्यमातून बदलत्या जीवनाच्या संदर्भात अनुभवाभिव्यक्ती घडून आली.

नाविन्याला आश्रय देणा-या याच काळात प्रस्थापितांना विरोध करणारी अनियतकालिकांची चळवळही याच वातावरणात उदयास आली. प्रस्थापित अभिव्यक्ती व्यासपीठांना नकार देत स्वतःच्या स्वतंत्र व सशक्त वाटेने जाणा-या या लघुअनियतकालीकांच्या चळवळीतून नवसाहित्याच्या स्थिरावण्याला बळ मिळाले.

मराठी वाङ्मयातील चळवळीेंचा विचार करतांना शुध्द वाङ्मयीन संदर्भ असलेल्या चळवळी व सामाजिक संदर्भ असलेल्या चळवळी अशा दोन गटात हा विचार करायला हवा. या दोन गटांचे काटेकोर असे निकष ठरवणे मात्र जिकरीचे ठरेल हे ही या ठिकाणी नमूद करायला हवे. भाषाशुद्धी, कलावाद, नवसाहित्य व लघुअनियतकालीकांची चळवळ या विचारप्रवाहांचा विचार शुद्ध वाङ्मयीन चळवळी म्हणून करता येतो. सारांशाने या चळवळी तांत्रिक, तात्विक आणि सैद्धांतिक पातळीवरच्या तसेच अभिव्यक्ती पद्धतींवर भर देणा-या होत्या हे ही या ठिकाणी स्पष्ट होते.

मराठी साहित्यात स्वातंत्र्याप्राप्तानंतर विशेषत: १९६० नंतर ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी साहित्याचे सामाजिक संदर्भ असलेले साहित्यप्रवाह ठळकपणे उदयास आले. स्त्रीवादी साहित्यचळवळीचा मुख्य अभ्यासविषय म्हणून पुढे सविस्तर विचार करण्यात येणार आहे. मराठी वाङ्मयातील प्रवाहांचा विचार करतांना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन असे बहूस्तरीय संदर्भ असणा-या या तीन विचारप्रवाहांचा आढावा घेणे अधिक महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने प्रेरणा, पार्श्वभूमी आणि परिणाम या पातळीवर ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी साहित्य प्रवाहांचा मध्यवर्ती विचार प्रस्तुत लिखाणात केला गेला अाहे.

१.३ साहित्यप्रवाहांच्या प्रेरणा व पार्श्वभूमी
साहित्यचळवळींच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा मूलभूत विचार करतांना स्त्रीवादी साहित्य चळवळीबद्दलचे विवेचन मुख्य विषयात येईल. त्या अनुषंगाने पूर्वी िनर्देशित मुद्दयांतर्गत ग्रामीण आणि दलित साहित्यचळवळींच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा मुख्यत्वाने विचार करू. ग्रामीण आणि त्यानंतर दलित असा क्रम हा आधुनिक कालखंडात ग्रामीण व दलित साहित्यच्या निकषांखाली बहूतकरून मान्य झालेल्या साहित्यनिर्मितीच्या कालखंडाला गृहीत धरून मानन्यात आला आहे.

ग्रामीण साहित्याचा विचार करतांना साधारणतः १९२० नंतरच्या मराठी साहित्याचाच विचार केला गेलेला दिसून येतो. मूळातच ग्रामीण साहित्याची चळवळही आधूनिक साहित्यविचाराचाच परिपाक असल्याच्या निष्कर्षाप्रत आपण यापूर्वीच आलो आहोत. त्याच संदर्भात ग्रामीण साहित्याचा विचार हा आधूनिक मराठी साहित्याच्या उगमानंतर होणे साहजिक आहे.

इ.स.१९२० पुर्वीच्या मराठी साहित्यात ग्रामीणतेची प्रेरणा ठरणारी काही बीजे आढळतात. या काही अंशाने का होईना पण स्पष्टपणे आढळणा-या ग्रामीण जाणीवांचा विचार ग्रामीण साहित्यचळवळीच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा विचार करतांना अगत्याने करावा लागेल. ॓काळ तर मोठा कठीण आला॔ या हरीभाऊ आपटे यांनी लिहीलेल्या कथेचा उल्लेख ग्रामीण जाणीवेच्या संदर्भात केला जातो. डाॅ.आनंद यादवांनी मात्र या कथेची ॓एक वाङ्मयीन अपघात॔ अशी संभावना करुन अपवाद मानले आहे. परंतु बारकाईने विचार केल्यास आधुनिक मराठी वाङ्मयाच्या उदयाबरोबरच ग्रामीण, दलित व स्त्रीवादी या तीनही मुख्य वाङ्मयीन चळवळींना आधार देणारे लिखाण केले जाऊ लागल्याचे लक्षात येते. या संदर्भात खालील लिखाणांचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
लोकहितवादी यांनी स्त्री पुरूषांना समान अधिकार असावेत असे विचार आपल्या शतपत्रांमधून मांडले. महात्मा फुले यांनी ब्राम्हणांचे कसब, शेतक-याचा आसूड या लिखाणातून व तृतीयरत्न या नाटकातून तसेच अखंडादी काव्यरचनेतून धर्म व परंपरेच्या नावाखाली शेतकरी कसा लुबाडला जातो याचे चित्रण केले आहे. म.फुले यांनी स्त्रीविषयक विचार मांडतांना स्त्रीदास्यत्वाची निर्भत्सना केली आहे. दलितांच्याही वेदनांना वाचा फोडली आहे.

॓फुले यांनी आपल्या लेखनातून इथल्या विषम समाजव्यवस्थेची उपपत्ती सांगून तिची तर्कदूष्टता स्पष्ट केली आहे. माणसाचे माणूस म्हणून असलेले हक्क त्याला कोणीही, कधीही व कुठेही नाकारू शकत नाही, ही भूमिका त्यांनी मांडली. जातीभेदनिराकरण, अस्पृश्यतानिवारण आणि स्त्रीपुरूष समतेचा साक्षेपी पाठपूरावा केला.॔१० एकंदरीत त्यांच्या लेखनकार्यातून ग्रामीण, दलित व स्त्रीवादी अशा तीनही मुख्य साहित्यचळवळींचे बीजारोपण झाल्याचे दिसून येते.

ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा विचार करतांना गांधीजींनी केलेल्या ग्रामोध्दाराच्या कार्याचेही योगदान स्पष्ट करणे आवश्यक गरजेचे आहे. ॓खेडयात आपले खरे भारतीय जीवन आहे. तेथील लोकांचा उध्दार झाला पाहिजे. त्यांच्या जीवनातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, परंपराप्रियता नाहिशी झाली पाहिजे. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकिय जाणिवांनी ॓प्रादेशिक साहित्य॔ या नावानिशी ग्रामीण वाङ्मय निर्माण होऊ लागले.॔

महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्या लेखनकार्याबरोबरच कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील यांचे लेखन ग्रामीण साहित्याला चालना देणारे ठरले.

ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा विचार करतांना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ललित व वैचारीक लेखनकार्याचाही आवर्जून संदर्भ घ्यावा लागेल. विठ्ठल रामजी शिंदे यांनी ॓रोजनिशी॔,॓माझ्या आठवणी व अनुभव॔ हे आत्मचरीत्रपर स्वरुपाचे लेखन आणि प्रवासवर्णने या स्वरुपाचे ललित लेखन केले.

॓शेतक-यांच्या हिताचा शत्रू केवळ परकीय नाही. त्यांच्या दाराशीच उभा असणारा खेडयातला जमीनदार असो किंवा शहरातला गिरणीवाला असो, सावकाराच्या (भांडवलदाराच्या)रूपाने तो शेतक-याचे शोषण करीत आहे आणि उलट त्यालाच सरकार आणि संस्थानिकांचे लष्कर आणि पोलिस मिंधे झाले आहेत॔११ या वि.रा.शिंदे यांच्या निरीक्षणात मूलगामित्व व प्रखर वास्तवता दिसून येते. त्यांच्या व अशा लेखनाने ग्रामीण साहित्यचळवळीला प्रेरणा मिळाली आहे.

राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आदी सुजाण संस्थानिकांच्या विचार व कार्यातूनही ग्रामीण साहित्यप्रवाहाला पाठबळ मिळाल्याचे दिसून येते. बडोदे येथील गुजराती साहित्य परीषदेतील सयाजीराव गायकवाड यांचे पूढील विचार ग्रामीण साहित्याच्या प्रेरणेच्या दृष्टीने लक्षणीय आहेत.॓आपल्या भोवती राहणारे लोक व त्यांचे जीवन आपल्या वाङ्मयाचा उत्कृष्ट विषय होण्यासारखे आहेत, म्हणून माझे आपणास सांगणे आहे की, आपल्या भोवतालच्या जीवनाचे आपण निरीक्षण करावे, त्याचे मनन करावे, त्यासंबंधी लेखन करावे व लोकांचे जीवन सुधारण्याचा मार्ग शोधून काढावा.॔१२

सारांशाने महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी आदींनी केलेले ललित व वैचारीक स्वरूपाचे लेखन म्हणजे ग्रामीण सािहत्यप्रवाहाचा मूलभूत आधारच म्हटला पाहिजे.

१९६० नंतर मराठी वाङ्मयाला समृध्द रूप देणा-या दलित साहित्याप्रवाहाच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा शोध भारताच्या एकूणच समाजजीवनाच्या बहूस्तरीय वाटचालीत घ्यावा लागतो, स्वातंत्र्यानंतर वेगाने घडत गेलेल्या समाजजीवनातील परीवर्तनाची सुरूवात ही ब्रिटीशांच्या आगमनकाळापासूनच झाली होती. आणि त्याच अनुषंगाने दलित साहित्याची प्रेरणा व पार्श्वभूमी समजून घेतांना गेल्या दिडशे ते पावणेदोनशे वर्षातील सामाजिक स्थित्यंतरांचा विचार करणे प्रस्तुत ठरते.

इंग्रज राजवटीच्या आगमनाबरोबर आलेले नवे व्यवसाय, उद्याेग, शेतीव्यवस्थेत झालेले बदल आणि स्वार्थापोटी का होईना पण इंग्रजांनी शिक्षणचळवळीला दिलेले पाठबळ यातून समाजजीवन ढवळून निघाले. इंग्रजांनी नोक-या देतांना जात पात भेद न मानता क्षमता महत्वाची मानली. जन्मावर आधारलेले व्यवसाय बदलू लागले आणि प्रस्थापित समाजवव्यस्थेला हादरे बसण्यास सुरूवात झाली.

महात्मा फुले यांच्या विचार कार्याने दलित अस्मितेच्या जागृतीचे बीजारोपण होण्यास पुर्ण हातभार लागला. ॓आर्यभटांनी नीच मानलेल्या सर्व शुद्रांनी अतिशुद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे मानव बांधवांनी आपापल्या कन्यापूत्रांस शाळेमधून पाठवून त्या सर्वांस सत्याज्ञान शिकवण्यास प्रारंभ करावा.॔१३ या व अशा वैचारीक व ललित लिखाणांतून महात्मा फुले यानी दलित साहित्यचळवळीला बळ दिल्याचे स्पष्ट होते.

स्वातंत्र्यचळवळीसाठी सर्व भारतीय समाज एकजूट करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी यांनी अस्पृश्योध्दाराचे कार्य हाती घेतले. त्यांच्या या कार्यानेही दलित साहित्यचळवळींसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे काम केले.

याच काळात राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी समाजसुधारणेला दिलेल्या पाठबळानंतरही दलित अस्मिता साकारली गेली. महर्षी वि.रा.शिंदे यांनी दिलेल्या व नंतर ॓बहीष्कृत भारत॔ या शीर्षकाखाली प्रसिध्द झालेल्या व्याखानात भारतामध्ये पाळली जाणारी अस्पृश्यता म्हणजे एक भयंकर स्वरुपाचा बहिष्कार असुन एकंदर लोकसंख्येचा सहावा हिस्सा असणा-या अस्पृश्य वर्गाचे वर्णन त्यांनी ॓बहिष्कृत भारत॔असे केले आहे.१४ महात्मा फुले, वि.रा.शिंदे यांच्या समकालिन, संत कबीरांच्या मध्ययुगीन व भगवान गौतम बुध्दांच्या प्राचीन विचारविश्वापासून प्रेरणा घेऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले लेखन व कार्य ही पूढे दलित साहित्यचळवळीची मुख्य व मूलभूत प्रेरणा ठरली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या आड येणा-या प्रतिगामी समाजव्यवस्थेवर हल्ला केला. त्यांच्या या कार्याचा दलित साहित्यचळवळीच्या उगमात मूलभूत वाटा असल्याचे दिसून येते.॓शूद्र पूर्वी कोण होते.॔या ग्रंथाच्या लिखाणातून त्यांनी दलित अस्मिता जागृत केली. आपल्या वैचारीक व अभ्यासपूर्ण लेखनातून हिंदू धर्माच्या तात्विकतेची व दांभिकतेची चिरफाड केली. त्यांनी केलेली मंदीरप्रवेशाची चळवळ, चवदार तळ्याचा सत्याग्रह आदी सामाजिक बंडातूनही दलित साहित्याच्या निर्मीतीला प्रेरणा मिळत गेली.

महात्मा फुले, वि.रा.शिंदे, महात्मा गांधी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजसुधारणा चळवळीला समकालिन ठरलेल्या स्वातंत्र्यचळवळीचाही दलित साहित्याच्या प्रेरणांमध्ये वाटा आहे. स्वातंत्र्याकडून, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलगामी विचारांतून साकार झालेल्या राज्यघटनेकडून दलितांच्या नव्या ज्या अपेक्षा होत्या त्यांचा मानभंग स्वातंत्र्याेत्तर पहिल्या दशकात झाला. आणि त्यातूनच भावनांचा अंतःस्फोट होऊन दलित साहित्य चळवळ प्रकट झाली.

सारांशाने साहित्यात निर्माण झालेल्या विविध साहित्यप्रवांहामागे दिर्घकाळात समाजमनात विविध स्तरांवर सुरू असलेली परिवर्तने आणि आधुनिकता, शिक्षण या कारणांनी जागृत झालेली नवी जाणीव हिच प्रामुख्याने कारण ठरलेली दिसून येते.

१.४ साहित्यप्रवाहांचा परिणाम.
ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी या सामाजिक संदर्भ असलेल्या वाङ्मयीन चळवळींनी मराठी वाङ्मयाला नवी दिशा देण्याचे व समृध्द करण्याचे कार्य केल्याचे दिसून येते. बहूस्तरीय प्रेरणांमधून व सामाजिक परिवर्तनांच्या पार्श्वभूमीतून उदयास आलेल्या या तीनही मुख्य साहित्यप्रवाहांनी मराठी साहित्यात दिसणारे अनेक व काही ठोस मूलभूत बदल घडवून आणले. ग्रामीण, दलित आणि अशा क्रमाने या प्रवाहांच्या परिणामांचा नेमका विचार या ठिकाणी पस्तूत मुद्याचे विवेचन करतांना करावयाचा आहे.

१९४५ ते १९६० या काळात ग्रामीण साहित्य ही संकल्पना ठळकपणे उदयास आली. या चळवळीची तात्विक मांडणी करण्याचे काम डाॅ.आनंद यादव, रा.रं बोराडे, वासूदेव मुलाटे, नागनाथ कोत्तापल्ले आदी ग्रामीण समीक्षकांनी केले. ग्रामीण साहित्यप्रवाहाचा ठोस परिणाम म्हणून ग्रामीण साहित्याच्या अभिव्यक्तित वास्तवचित्रणाला जे महत्व प्राप्त झाले त्याचा निर्देश करावा लागेल. यातून तद्नंतर झालेली ग्रामीण साहित्यनिर्मीती ही अधिकाधिक वास्तवस्पर्शी झाली. ग्रामीण साहित्यनिर्मितीत निवेदन हे नागर भाषेत करण्याची पूर्वीची रीत काही प्रमाणात मोडीत निघून संपूर्ण अभिव्यक्ती ग्रामीण बोलीभाषेत करण्याची प्रथा रुढ झाली. रा.रं बोराडे यांनी आपल्या ॓पाचोळा॔ व आनंद यादव यांनी आपल्या ॓गोतावळा॔ या कादंबरीत निवेदन व संवाद अशा सर्वच पातळ्यांवर संपूर्ण ग्रामीण बोलीचा वापर केला.

ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या परिणामस्वरूप साधारणतः १९४५ पूर्वी लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यातील ग्रामीण जीवनाच्या चित्रणातला खोटेपणा उघडा पडला. वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, कवी यशवंत, माधव ज्यूलियन आदी साहित्यिकांनी ग्रामीण जीवनाच्या केलेल्या चित्रणातील रंजनवाद, भडकपणा व अवास्तवता नव्या ग्रामीण साहित्य समीक्षकांनी उघडकीस आणली. ग्रामीण साहित्यप्रवाहाचा परीपाक म्हणून मराठी साहित्य समीक्षेला नवे निकष मिळाले. साहित्याच्या कलात्मकतेला ग्रामीण समीक्षकांनी सुरूवातीलाच मान्यता देऊन मुख्य साहित्यसमीक्षेशी जुळवून घेण्याचे धोरण स्विकारले. तरीही ग्रामीण साहित्याची समीक्षा होत असतांना बोली भाषेचे सौंदर्य, कृषीसन्मुखता, प्रादेशिकत्व अशा मराठी साहित्याला नवीन असणा-या निकषांचा वापर होऊ लागला.

ग्रामीण साहित्याच्या चळवळीची भाषा सुरू झाल्यावर प्रस्थापित समीक्षकांकडून विरोधाचा सूर आळवला जाऊ लागला. ग्रामीण साहित्य हे बहूजनांचे साहित्य आहे त्यामूळे तोच साहित्याचा मुख्य प्रवाह आहे या विचाराला आक्षेप घेउन ग्रामीण साहित्याची चळवळ म्हणजे या साहित्याला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे प्रयत्न आहेत असा आरोप साहित्य चळवळीवर केला गेला. ग्रामीण साहित्याच्याच कक्षेत दलित साहित्यही समाविष्ठ मानल्या गेल्याने ग्रामीण साहित्य चळवळ ही दलित साहित्य चळवळीच्या अनुकरणातून व दलित साहित्य चळवळीला शह देण्याच्या प्रयत्नातून उदयास आल्याचा कांगावा ग्रामीण साहित्यप्रवाहाच्या परिणामस्वरूप केला गेला.

एकंदरीत ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या परिणामस्वरूप मराठी वाङ्मय हे अधिकाधिक वास्तवाप्रत पोचल्याचे दिसून येते. या साहित्यप्रवाहने कथा, कादंबरी व समीक्षा या तीनही प्रांतात मराठी साहित्याला अधिकाधिक विस्तारीत व समृध्द केले.

दलित साहित्याच्या प्रवाहानेही मराठी वाङ्मयावर लक्षणीय प्रभाव पाडला. सुरूवातीच्या काळात दलित साहित्याकडे मुख्य साहित्यप्रवाहातील धूरीणांनी दूर्लक्ष केले. परंतु नंतर या विस्फोटक अभिव्यक्तीच्या परिणामांचा त्यांना अटळपणे स्वीकार करावा लागला. दलित साहित्यप्रवाह अवतरण्यापूर्वीच्या दलित साहित्याचेही नव्याने मूल्यमापन या प्रवाहामूळे झाले. दलित वाङ्मयाचे वेगळेपण अधोरेखित करतांना शंकरराव खरात यांनी केलेले पूढील विवेचन महत्त्वाचे आहे. ॓दलितांचे दुःख व व्यक्ती अलग नाही, व्यक्ती म्हणजे दुःख व दुःख म्हणजे व्यक्ती, तसेच समाज व दुःख हे अलग नाही. दुःख म्हणजे समाज व समाज म्हणजे दुःख असेच हे नाते आहे. म्हणून दलित वाङ्मयात दुःखालाच व्यक्तीत्व आलेले आहे. दुःख, वेदना व त्यांचे हे प्रश्न व्यक्तीत्वात सामील झालेले आहेत, हे मराठी पांढरपेशी साहित्यापेक्षा मूलभूत असे वेगळेपण आहे.॔१५

दलित वाङ्मयाच्या परिणामस्वरूप मराठी साहित्याच्या पारंपरिक समीक्षाविश्वला हादरे बसले. ॓दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी मराठी समीक्षा अपूरी आहे.॔ असे विधान केशव मेश्राम यांनी केले आहे. यशवंत मनोहर यांनी दलित साहित्याच्या समीक्षेसाठी ॓नवे साहित्यशास्त्र॔ लिहीले.

दलित साहित्याच्या परिणामांतून आपल्या समूहाच्या वेदनांचा आविष्कार करण्याच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या समुहांचे व विचारविश्वांचे साहित्य उदयास आलेले दिसते. कामगारवर्गाने, मजूरवर्गाने शोषणाविरूध्द केलेला विद्रोह साहित्यातून अभिव्यक्त होण्याचा काळ आणि दलित साहित्य प्रवाहाच्या उदयाचा काळ एकच होता ही बाबही या ठिकाणी लक्षणीय ठरते.

सारांशाने सामाजिक परिवर्तनांतून व जाणीवांच्या प्रगल्भतेतून आलेले नवे आत्मभान ग्रामीण, दलित व स्त्रीवादी चळवळीची प्रेरणा ठरले. आणि याच चळवळीचा परिणाम म्हणून नव्या टोकदार अभिव्यक्तीला साकार करणारे ठरले. स्त्रीवादी साहित्य चळवळीच्या मुख्य विषयाला स्पर्श करण्यापूर्वी मराठी वाङ्मयातील विविध वाङ्मयप्रवाह व चळवळींचा इथपर्यंत घेण्यात आलेला आढावा हा पुढे स्त्रीवादी साहित्य चळवळीच्या प्रेरणा व पार्श्वभूमी, स्वरूप व तत्संबंधी मतमतांतरांच्या विवेचनाला दिशा देणारा ठरेल. एकूण मराठी वाङ्मयविषयातील या वरकरणी वेगळ्या वाटणा-या प्रवाहांच्या वाटचालीतला समानधर्मी अंतःसंबंध उलगडण्यास इथपर्यंतच्या विवेचनाचा आधार मिळेल असे मला वाटते.

१.५ निष्कर्ष
१) ब्रिटीशांच्या आगमनानंतर समाजव्यवस्थेतील परिवर्तनांना चालना मिळाली. या सामाजिक परिवर्तनांबरोबरच आधुनिक मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. आधूनिक मराठी साहित्य हे नव्या समाजसापेक्ष साहित्यविचारालाही चालना देणारे ठरले.

२) वाङ्मयविचारात झालेल्या आधूनिक बदलामूळे सामाजिक परिवर्तनांबरोेबरच विविध वाङ्मयप्रवाह उदयास आले.

३) सामाजिक संदर्भ असलेल्या ग्रामीण, दलित व स्त्रीवादी या मुख्य प्रवाहांमागे नवी शैक्षणिक जाणीव व महात्मा फुले, वि.रा. शिंदे, महात्मा गांधी., डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा व पार्श्वभूमी होती.


४) वेगवेगळ्या साहित्यप्रवाहांमुळे मराठी वाङ्मय हे अधिकाधिक वास्तवदर्शी, समृद्ध व समावेशक झाले. नव्या साहित्यप्रवाहांमूळे मराठी वाङ्मयाच्या समीक्षादृष्टीतही महत्त्वाचे बदल घडून आले. मराठी वाङ्मयाचा तत्पूर्वीचा संकुचीतपणा उघडकीस येऊन मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम या साहित्यप्रवाहांनी केले.

१.६ संदर्भ व टिपा.
१. मनोहर डाॅ. यशवंत, नवे साहित्यशास्त्र, विजय प्रकाशन, नागपूर, पृ. ३६ वरून उदधृत.

२. तत्रैव, पृ.३६.

३. बिरादार डाॅ. वसंत, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद., पृ. ३०.

४. फुले जोतीराव, म. फुले समग्र वाङ्मय, सं.य.दि.फडके, म.रा.सा.सं.मंडळ मुंबई, पृ.३४४.

५. वासमकर वि.दा., कलासापेक्ष वाङ्मयीन मूल्यनिकष (लेख), मूल्यसंकल्पना व साहित्यविचार, संपा. प्रकाश मेदककर, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, पृ. ५०.

६. मर्ढेकर बा.सी., सौदर्य आणि साहित्य, मौज प्रकाशन, मुंबई, पृ.५२.

७. सावरकर बॅ.वि.दा.,भाषाशुध्दीची सुत्रे आणि प्रत्त्युत्तरे (लेख), साह्याद्री मासिक, आॅग.१९३६, पृ.६८४-६८५.

८. परचुरे श्री.दी., मराठी गद्यलेखनशैलीचा उद्गम आणि विकास, पृ.१२२.

९. कित्ता.

१०. भोळे भा.ल., म.फुले वारसा आणि वसा, पृ.१००.

११. पवार गो.मा., भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे, साहित्य अकादमी, पृ.५५.

१२. कुळकर्णी मदन(संपा.), साहित्य-ग्रामीण आणि दलित, पृ.१२२.

१३. फुले जोतीराव, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, पृ.

१४. पवार गाे.मा., उ.नि., पृ.५०.

१५. खरात शंकरराव, दलित वाङ्मय:प्रेरणा व प्रवृत्ती, पृ.१२१.
***