घाव अजुनी...

रविवार, २२ मार्च, २००९

स्त्रीवादाचे मराठी वाङ्मयातील वर्तमानकालीन रूप

प्रकरण ३ रे
प्रस्तावना
स्त्रीवादाच्या मराठी वाङ्मयातील वर्तमानकालीन स्वरूपाचे विवेचन हा या प्रकरणाचा मुख्य गाभा आहे. या अंतर्गत मराठी वाङ्मयाच्या अंगाने स्त्रीवादी वाङ्मयविचार कशा त-हेने समकालीन वाङ्मयक्षेत्रात प्रस्तूत केला गेला आहे याचा आढावा घेऊन तद््नंतर सध्याच्या कालखंडातील म्हणजे साधारणतः १९७५ नंतरच्या काळातील स्त्रीवादी या शीर्षकाखाली समाविष्ट होऊ शकणा-या मराठी वाङ्मय स्वरूपाचे कथा, कविता, कादंबरी व आत्मचरीत्रे या अंगाने विवेचन केले गेले जाणार आहे.


प्रकरणाच्या उत्तरार्धात स्त्रीवादावर मराठी वाङ्मयक्षेत्रात नोंदवले गेलेले आक्षेप व या आक्षेपांच्या अनुषंगाने स्त्रीवादाबद्दल असलेल्या मतमतांतरांचा अन्वय लावला जाईल. अभ्यासविषयातील पूढील प्रकरणांच्या विवेचनासाठी सहायक ठरणारे मराठी वाङ्मयातील स्त्रीवादाचे वर्तमानकालीन रूप या प्रकरणातील विवेचनाने सुस्पष्ट होईल.

३.१ मराठी वाङ्मयातील आजचा स्त्रीवादी विचार
स्त्रीवाद ही संकल्पना पाश्चात्त्य देशातून मराठी वाङ्मयात आली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील विविध वाङ्मयीन प्रवाहांमध्ये स्त्रीवादी साहित्य व स्त्रीवादी समीक्षा या संकल्पनाही मराठीत हळूहळू रुजू लागल्या.
पाश्चात्य देशात एखादा प्रवाह वाङ्मयक्षेत्रात उदयास आला व काहीसा स्थिरावला की मग तो मराठी वाङ्मयात अवतरतो. एखादे पुस्तक किंवा एखादया विशिष्ट विषयावरील संशोधन या अशा प्रवाहाला मोकळी वाट करून देेते. परंतु आजच्या संगणकयुगात संपूर्ण जगच एक खेडे बनले आहे. परिणामस्वरूप पाश्चात्य देशात व मराठी वाङमयात एखादी विचारधारा समांतरपणे उदयास येण्याचा प्रकारही घडून येतो. स्त्रीवादी समीक्षेची व स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मांडणी ही अशीच पाश्चात्य देशात व भारतीय वाङ्मयक्षेत्रात काहीशा समांतरपणे घडून आलेली दिसून येते.

मराठी वाङ्मयाला स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मूलभूत व सर्वंकष ओळख करुन देण्याचे पहिले श्रेय डाॅ.अश्विनी धोंगडे यांना द्यावे लागेल. साधारणतः १९९० च्या पूर्वीच्या कालखंडात महायध्दोत्तर काळापासून स्त्रीवादी विचारधारा विकसित होण्याचा कालावधी समाविष्ट करता येईल. १९८५ साली एलेन शोवाल्टर यांनी सर्व स्त्रीवादी मिमांसकांच्या विचारांचा आढावा घेऊन स्त्रीवादी साहित्यशास्त्राची मांडणी केली. मराठी वाङ्मयात ताराबाई शिंदे, शांता किर्लोस्कर आदी लेखिकांनी स्त्रीवादी वाङ्मयाविचाराच्या प्रवाहाशी नाते सांगणारे लेखन केलेले होते.

मराठी वाङ्मयात स्त्रीवादी विचार हा पाश्चात्य स्त्रीवादी विचाराच्या तात्विक मांडणीवरच आधारलेला आहे. मराठी परिघाचा विचार करता त्यात काही नवे दृष्टीकोन अजूनपर्यंत तरी फारसे कुणी मांडलेले दिसत नाहीत. मराठी वाङ्मयाच्या बाबतीत स्त्रीवादी वाङ्मयविचाराची काही वेगळी तत्वे असायला हवीत असा विचारही झालेला आढळत नाही. डाॅ.अश्विनी धाेंगडे यांनी मराठी कवितेचा व कहाण्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून विचार करतांना काही गृिहतके मांडलेली आहेत.१

समीक्षीक्षेत्रात अथवा वाङ्मयविचाराच्या क्षेत्रात एखादा समीक्षक जेव्हा साहित्यविषयाचा धांडोळा घेतो तेव्हा त्या समीक्षकाने कोणत्या प्रकारचा वैचारीक चष्मा लावलेला आहे यावरून त्याच्या अभ्यासाचे निष्कर्ष सामोरे येतात. एकूण साहित्यातले समोरच्या साहित्यविषयाचे स्थान जर त्याला ठरवायचे असेल तर समीक्षक साहित्यविषयाचा आशय, व्यक्तिवैशिष्टये, प्रतिमा, प्रतिके, रसनिष्पत्ती यांचा अभ्यास करतो. परंतु वाङ्मयाची स्त्रीवादी समीक्षा हि मात्र साहित्यिक मूल्यांपेक्षा सामाजिक मूल्यमापनाकडे अधिक झुकणारी असते. साहित्यविषयातून समोर येणारी स्त्रीव्यक्तीरेखा नेमकी कशी आहे. समाजाच्या स्तरीकरणामध्या तिला नेमके कोणत्या पायरीवरचे स्थान दिल्या गेले आहे, तिचा स्त्रीधर्म योग्य आहे का, तिच्या व्यक्तित्वाचे स्वतंत्र असे काही पैलू साहित्यात उमटतात का, समाजधारणेसाठी तिला समाजाने काही अधिकार दिले आहेत का, या दृष्टीकोनातून साहित्याचे वाचन व्हावे असा विचार डाॅ.अश्विनी धोंगडे यांनी मांडला आहे. मराठी वाङ्मयाच्या संदर्भात स्त्रीवादी साहित्यविचारांची मांडणी करतांना पूर्वी वाचलेल्या साहित्याचे ॓स्त्री॔ च्या दृष्टीकोनातून पुनर्वाचन करणी ही स्त्रीवादी समीक्षेची एक दिशा असावी असे मत त्या व्यक्त करतात. पाश्चात्य स्त्रीवादी विचाराच्या मूलभूत संकल्पनेशी सुसंगत असे हे गृहीतक आहे.

मराठी वाङ्मयाचा स्त्रीवादी साहित्याविचाराच्या दृष्टीने विचार करतांना त्य वाङमयात स्त्रीची पारंपरिक प्रतिमा स्त्रीपात्रे िकतपत प्रमाणात आणि कोणत्या कारणांनी नाकारतात याला महत्त्व देणे अपेक्षित आहे. अर्थात हा नकार देणे आणि त्यामागची पार्श्वभूमी ही पाश्चात्या स्त्रीभूमिकेपेक्षा ब-याच प्रमाणात वेगळी ठरते. समाजाने परंपरागत रुढींच्या माध्यमातून स्त्रीच्या काही खास भूमिका ठरवल्या आहेत. या भूमिकांमध्ये स्त्रीही अडकून पडते काय याचा विचार स्त्रीवादाच्या कक्षेत येतो. पत्नी, आई व गृहीणी या खास स्त्रीच्या म्हणून हजारो वर्षे मानल्या गेलेल्या भूमिकांमूळे स्त्रीला कुटुंबात व पर्यायाने समाजात दूय्यमत्वाची भूमिका निभवावी लागते. या पारंपरिक साच्याच्या भूमिका तिच्या नैसर्गिक आशाआकांक्षाना व क्षमतांना मर्यादित करतात, तिच्याकडून ठराविक प्रकारचेच वर्तन अपेक्षित करून तिच्या विश्वाच्या मर्यादा सिमित केल्या जातात. या सर्व भूमिका स्त्री च्या बाई असण्यावर आधारीत पर्यायाने लिंगसापेक्ष असतात. समाजातील विविध परिवर्तने, स्थित्यंतरे यापासून स्त्री या अशा दडपशाहीमूळे दूरावली जाते, तिचा विकास खुंटतो. अशी ही कुंठीत स्त्रीपात्रे या भूमिकांच्या बेडयांना तोडू इच्छिते का याचा शोध घेणे हे स्त्रीवादी वाङ्मयविचाराचे कार्य ठरते. स्त्रीवादात जेव्हा या भूमिका नाकारणारी स्त्री अभिप्रेत मानली जाते याचा अर्थ कुटुंबजीवन नाकारायचे वा उद्ध्वस्त करायचे असा विचार नसून या भूमिका डोळसपणे स्वीकारणे व याच भूमिका हे आपले कार्यक्षेत्र न मानता त्यांच्या पूढे जाऊन व्यक्ती म्हणून सामाजिक क्षेत्रात आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करायचा अशी दूहेरी विधायक भूमिका स्त्रीवादाला अपेक्षित आहे. पारंपरिक भूमिकांमधील मर्यादा, ढोंग यांची जाणीव होणे, या भूमिकांना असलेल्या फाजील महत्त्वाला किंमत न देणे, या भूमिका लादणा-यांचे जोखड भिरकावून देणे, या भूमिकांनी ज्या आदर्शांच्या दांभिक चौकची तयार केल्या त्यांचा तकलादूपणा दाखवून देणे, जुन्या दंतकथांचे नवीन अर्थ लावणे व पारंपरिक स्त्रीप्रतिमा नाकारून व्यक्ती म्हणून आपली नवी प्रतिमा सिध्द करणे इत्यादी अनेक बारीकसारीक अगोपांगातून स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास होणे अपेक्षित आहे.

भारतात वरवर पाहता स्त्रीला घटनेने समान सामाजिक दर्जा दिला असला तरी कुटुंब व समाज या क्षेत्रात स्त्रीला ठिकठिकाणी छुप्या दुय्यम वागणूकीचा सामना कराव लागतो. स्त्रीवादी दृष्टीकोन व्यक्ती म्हणून पुरूषांईतकेच महत्त्वाचे व समान स्थान स्त्रीला सर्वच क्षेत्रात मिळण्याची मागणी करतो. सांसारीक जबाबदारीत महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत, निर्मितीप्रक्रियेत स्त्रीला बरोबरीचे स्थान असणे. घरकाम व आर्थिक जबाबदारीत, मुलांना वाढविण्याच्या कार्यात स्त्री व पुरूषाचे सारखेच योगदान असणे या व अशा मागण्यांमधून स्त्रीला तिचा व्यक्ती म्हणून असलेला दर्जा प्रस्थापित करण्यास मदत मिळेल. मराठी वाङ्मयातील स्त्रीचित्रणाना असलेली सामाजिक पार्श्वभूमी ही पाश्चात्य पार्श्वभूमीपेक्षा वेगळी असल्याने मराठीत स्त्रीवादाची गृहीतके मांडतांना पाश्चात्य स्त्रीवादी वाङ्मयविचार मूलभूत स्थानी ठेवून मराठी वाङ्मयक्षेत्राच्या दृष्टीने स्त्रीवादाचा विचार करण्याचा प्रयत्न डाॅ.अश्विनी धोंगडे यांनी केलेला दिसून येतो.

पाश्चात्य स्त्रीवादी विचाराचा उगम हा अार्थिक स्वावलंबन आणि मतस्वातंत्र्य प्राप्त झाल्यावरच स्त्रीला आपले स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. या विचारातून झालेला दिसून येतो. कला, कायदा, रुढी, संस्था आणि लोकमत या सर्व स्थरांवर स्त्रियांना माणूसपणाचा हक्क प्राप्त होण्यासाठी जाणीवपूर्वक दिली जाणारी राजकीय लढाई अशी ही स्त्रीवादाची संकल्पना आहे. मराठी वाङ्मयात स्त्रीवादाची मांडणी करतांना कायदा व मताधिकार या दृष्टीने स्त्रीला पूर्णतः पुरूषाच्या बरोबरीचा दर्जा दिला गेला आहे ही बाबा लक्षात घ्यावी लागेल. या दृष्टीने डाॅ. विद्युत भागवत स्त्रीवादाचे विवेचन करतांना ॓खाजगी, सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवर होणा-या स्त्रियांच्या दडपणूकी बद्दलची जाणीव होणे/करणे आणि त्याबरोबरच या दडपणूकीविरोधी झगडण्याची तयारी असणे म्हणजे स्त्रीवादाचा अंगिकार करणे होय॔२ अशा शब्दात स्त्रीवादाची व्याप्ती स्पष्ट करतात. भारतीय समाजातील स्त्रीचे शोषण हे प्रामुख्याने सामाजिक संदर्भ असलेले आहे. राजकीय पातळीवर घटनेने समान अधिकार व दर्जा दिला असला तरी निर्णयाच्या अंमलबजावणीचे काम मात्र पूर्णतः पुरूषाच्या हातात असते. हा मुद्दा या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. ख-या अर्थाने लोकशाही विकेंद्रीकरण व्हायचे असेल तर स्त्रीला निर्णयप्रक्रीयेत महत्त्वाचे स्थान द्यायला हवे.

विभावरी शिरूरकर यांच्या साहित्याचे स्त्रीवादी आकलन करतांना उषा रावसाहेब शिंदे यांनी मराठी वाङ्मयाच्या संदर्भात स्त्रीवादी वाङ्मयविचाराविषयी काही दिशादर्शक मांडणी केलेली आढळून येते. स्त्रीवादी विचारसरणीत स्त्रियांच्या आत्मसन्मानाची तत्त्वे प्रामुख्याने अंतर्भूत आहेत. त्या अनुषंगाने स्त्रियांनी आपल्या साहित्यातून सर्वशरण पत्नी, त्यागी माता अशा चौकटबध्द व्यक्तिरेखा रेखाटू नयेत अशी अपेक्षा उषा शिंदे व्यक्त करतात.३ स्त्रीत्वाचा शोध घेणारी स्त्रीप्रतिमा जर निर्माण करायची असेल तर या पारंपरिक चौकटी झुगारल्याशिवाय पर्याय नाही अशी वाङ्मयीन भूमिका मराठी वाङ्मयात स्त्रीवादाची मांडणी करतांना घेतलेली आढळून येते. परिणामस्वरूप स्त्रियंानी केलेले सर्वच लेखन हे स्त्रीवादी लेखन ठरणार नाही. स्त्रीत्वाची शोध घेणारे व पुरूषी मूल्ये नाकारणारे साहित्य हेच स्त्रीवादी साहित्य ठरेल. केवळ स्त्रीविशिष्ट अनुभव मांडणे म्हणजे स्त्रीवादी साहित्य नव्हे, तर पुरूषसत्ताक चौकटीतून मुक्त होऊन स्त्रीत्वाच्या अस्मितेचा अनुभव संघटीत करणे हे ध्येय ठेऊन लिहिलेले साहित्य स्त्रीवादी साहित्य ठरेल. या विचारांच्या संदर्भाने स्त्रीकेंद्री साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य अशी साहित्याची किमान वर्गवारी करण्यात आलेली आहे.

निखळ स्त्रीनिष्ठ (स्त्रीविशिष्ठ) अनुभव मांडणारे साहित्य हे स्त्रीकेंद्री साहित्य म्हणून ओळखले जाते. आणि स्त्री स्वातंत्र्याच्या राजकीय लढाईचा भाग म्हणून जे साहित्य अवतरेल त्याला स्त्रीवादी साहित्य असे संबोधण्यात यावे.४ आपल्या विवेचनात उषा शिंदे यांनी स्त्रीत्व आणि स्त्रीजात अशी विभागणी करून साहित्याचे वरील वर्ग पाडले आहेत. स्त्रीत्व हे निसर्गाने दिलेले दान असून स्त्रीजात ही मात्र पुरूषप्रधान समाजव्यवस्थेने निर्माण केलेली, घडवलेली आहे. शारीरमानसिक अनुभवनिष्ठता हे स्त्रीत्वाचे अनुभव ठरतात तर लिंगसापेक्षतेने स्त्रीचे समाजिक व सांस्कृतिक स्थान निश्चित केले जाते. त्या स्थानापायी येणारे सामाजिक व सांस्कृतिक अनुभव हे स्त्रीत्व म्हणून नव्हे तर स्त्रीजात म्हणून वाटयाला आलेले असतात. स्त्रीजातीयता ही पितृसत्ताक, पुरूषसत्ताक मूल्यव्यवस्थेतून येणा-या स्त्रीत्वाच्या लक्षणांचा संच म्हणून लक्षात घ्यायला हवी व अशाच पद्धतीने स्त्रीकेंद्री साहित्य व स्त्रीवादी साहित्य या दोन संकल्पनांमध्ये अंतर मानायला हवे. स्त्रीकेंद्री साहित्यातले अनूभव हे स्त्री शरीरविशिष्ट अनुभव मानन्याच्या या भूमिकेत या अनुभवांवरही पुरूषवर्चस्वाचा सुक्ष्म परिणाम असू शकतो हा मुद्दा मात्र नजरेआड केला गेला आहे. स्त्रीची ऋतुप्राप्ती, गरोदरपणा, लैंगिक संबंधातली तिची भूमिका याविषयींचे निरनिराळे प्रवाद व अर्थमिमांसा या पारंपरिक पुरूषवर्चस्वी समाजाने प्रसुत केले आहेत. आणि या सर्वांचा वारंवार स्त्रीमनावर होणारा आघात आणि त्यामूळे स्त्रीची बदललेली मानसिकता यामुळे वरील स्त्रीविशिष्ट अनुभवांबद्दलची स्त्रीविचारांची अिभव्यक्ती सुध्दा सुक्ष्मपणे प्रभावित झालेली असते हे ही या ठिकाणी विचारात घ्यायला हवे.

डाॅ.अंजली सोमण यांनी विभावरी शिरूरकर, गौरी देशपांडे आणि मेघना पेठे यांच्या निवडक वाङ्मयावर स्त्रीवादी दृष्टीकोनातून भाष्य करतांना स्त्रीवादी वाङमयविचाराविषयी आपली काही मते मांडली आहेत. स्त्रीवाद ही विचारसरणी उद््भवण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सामाजिक परिस्थिती हे होय. ॓सामाजिक परिस्थिती जसजशी बदलेले तसतसा स्त्रीवादाचा संकल्पनाव्यूह बदलत जाण्याची शक्यता आहे. या बदलत्या कक्षांनुसार मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारसरणीची प्रतिबिंबेही बदलत जातील.५ असे डाॅ.अंजली सोमण यांना वाटते. समाजरचना शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असुनही स्त्रीवादी विचारसरणीचा उगम मात्र अलिकडच्या काळातच झालेला आढळून येतो. सामाजिक परिस्थितीबरोबरच स्त्रियांना शिक्षणामूळे आलेले भान हे सुध्दा मराठी वाङमयात स्त्रीवादी लिखाण होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. स्त्रीवादी विचारसरणीची तत्वे ही जशी कालपरत्वे बदलत जातील तशीच स्थलपरत्वेही काही नवे दृष्टीकोन धारण करण्याची शक्यता आहे. अमेरीकेतील गौरवर्णीय स्त्रियांचा स्त्रीवाद कृष्णवर्णीय स्त्रियांचा स्त्रीवाद हे अशा बदलाचे एक समर्पक उदाहरण ठरेल.

मंगला वरखेडे यांनी मराठी नवकथेचा स्त्रीवादी दृष्टीने अभ्यास करतांना स्त्रियांनी सांकेतिकता झुगारून खास स्त्रीत्वाच्या अनुभवांची अभिव्यक्ती करण्यासाठी त्यांनी उपलब्ध वाङ्मयप्रकाराचे नवे संघटीत रूप साकार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्त्रीवादी, आदिबंधनिष्ठ व भाषाशास्त्रीय विचारांच्या एकत्रित सहाय्याने वरखेडे यांनी स्त्रीसाहित्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रियांच्या साहित्याचा अभ्यास करतांना त्यांच्या भाषिक अभिव्यक्तीला मध्यवर्ती स्थान दिले पाहिजे. ॓स्त्रियांच्या कथेतील सामाजिक सांस्कृतिक वास्तवाचा वेध भाषिक पुराव्यांच्या आधारे घेण्याचा प्रयत्न केल्यास स्त्रीनिष्ठ सांस्कृतिक वास्तव अधिक नेमकेपणाने स्पष्ट होऊ शकेल.६

पाश्चात्य स्त्रीवादी समीक्षेच्या तात्विक भूमिकेचा आधार घेऊन डाॅ.अश्विनी धोंगडे यांनी फिमेल, फेमिनिन् आणि फेमिनिस्ट अशा तीन बैठकी विशद केल्या आहेत. फिमेल या स्त्रीसमीक्षा वाङ्मयाचा विचार हा फक्त स्त्रियांच्या कोणत्याही लेखनाला आपल्या कक्षेत घेणारा आहे. या लिखाणाचे स्वरूप स्त्रीवादी नसून फक्त स्त्रियांचे लेखन अशा स्वरूपाचे असते. फेमिनिन् या प्रकारात ज्या वाङ्मयातून पुरूषवर्चस्वाखाली दडपल्या गेलेल्या स्त्री समूहाचे हूंकार व्यक्त होतात पण हे हूंकार फक्त स्त्रीवर होणा-या पुरूषसंस्कृतीच्या अन्यायाचे वास्तव चित्रण करण्यापूरतेच मर्यादित असतात. ते पुरूषसंस्कृतीला नाकारण्याच्या अथवा विशिष्ट राजकीय भूमिका घेण्याच्या पातळीपर्यंत पोहचत नाहीत. फेमिनिस्ट हा स्त्रीसाहित्याचा खरा स्त्रीवादी प्रकार मानला जातो. पुरूषसत्ताक पध्दती व लिंगाधारीत समाजरचना या विरूध्द राजकीय भूमिका घेणारे वाङ्मय हे फेमिनिस्ट या प्रकारात मोडते. या तिनही प्रकारांचे वर्णन स्त्रियांचे साहित्य, स्त्रियांविषयीचे साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य अशा शब्दात करता येते.

सारांशाने समकालिन मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यविचारात स्त्रीवादी दृष्टीकोनातून साहित्याकडे पाहतांना साहित्य स्त्रीची प्रतिमा कशी उभी करते, स्त्री व पुरूष या लिंगभिन्नतेबद्दल या साहित्याचा काय दृष्टीकोन आहे, लिंगभेदाचे विवेचन साहित्यकृती कशाप्रकारे करते आणि स्त्री-पूरूष अशी लिंगसापेक्षता व्यर्थ मानून या संबंधी मूद्दयांना टाळते काय अशा चार मार्गांनी कलाकृतीकडे पाहिले जाते. मराठी वाङ्मयातील समकालिन स्त्रीवादी विचार हा त्याच्या मूळ पाश्चात्य स्वरूपात फारशी भर घालू शकलेला नाही हे ही वरील विवेचनातून स्पष्ट होते.

३.२ वर्तमानकालीन स्त्रीवादी साहित्याचे स्वरूप
स्त्रीवादी जाणीव जगात जसजशी प्रसार पावू लागली तसतशी ही जाणीव जगातल्या विविध वाङ्मयावर आपला प्रभाव पाडत विकसित झालेली दिसून येते. या अनुषंगाने मराठी वाङ्मयावरही या स्त्रीवादी विचारसरणीचा प्रभाव सत्तरच्या दशकानंतर लक्षणीयरित्या जाणवू लागला. कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक हे सर्वच वाङ्मयप्रकार स्त्रीवादी जाणीवेचे साहित्य कमीअधिक प्रमाणात प्रसुत करू लागले.

जागतिक वाङ्मयविचाराच्या प्रभावाने मराठीत स्त्रीवादी वाङ्मयविचार हा अलिकडील काही दशकात मांडला जात असल्याने वर्तमानकालीन स्त्रीवादी साहित्याचे स्वरुप मांडतांना १९७५ ते २००० या काळातील स्त्रीवादी ठरणा-या वाङ्मयाचा विचार या ठिकाणी करावयाचा आहे. वर्तमानकालीन या शब्दाची व्याप्ती वरीलप्रकारे ठरविल्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात विभावरी शिरूरकर यांनी केलेल्या लेखनाचा संदर्भ घेणे या ठिकाणी आवश्यक वाटते. स्त्रीवाद विकसित होण्यापूर्वीच स्त्रीवादी ठरुन गेलेल्या विभावरी शिरूरकरांचे साहित्य७ ही मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्याची सुरूवात ठरते.

विभावरी शिरूरकरांनी प्रौढ स्त्रियांच्या मनातील ताणतणावांना घेऊन कथा लिहिल्या. स्त्रियांचा कोंडमारा करणा-या प्रथा परंपरांवर प्रहार करणा-या विषयांमधून त्यांनी आपल्या कथा साहित्याची मांडणी केली. स्वजातीतील वर मिळत नसेल तर परजातीतील वर स्वीकारण्याची तयारी विभावरींच्या कथेतील नायिका दाखवते. तत्कालिन संदर्भाच्या अनुषंगाने व समाजपरिस्थितीच्या मानाने नायिकेचे हे बंडखोर वर्तन लक्षणीय ठरते. वारंवार मुली दाखवण्याच्या कार्यक्रमांमुळे उपवर मुलींच्या मनावर येणारे मानसिक दडपणही विभावरींच्या कथेमधून प्रकट होते. विभावरी शिरूरकर स्वतः नवशिक्षित, नोकरी करणा-या तरुणी होत्या. समाजाकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. स्त्रियांना जे वाटते ते साहित्यामध्ये येत नाही असे त्यांना प्रकर्षाने जाणवले. म्हणून त्यांनी स्त्रियांचे खास अनुभव आपल्या साहित्यामधून मांडले व स्त्रीजीवनातील प्रश्नांची एक नवी बाजू समाजापूढे आणली.

स्त्रीवादी साहित्यामध्ये कथांचा विचार करू पाहता स्त्रियांनी कथालेखनास विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच सुरूवात कलेली जरी आढळून येत असली तरी हे सर्व लेखन फिमेल रायटींग आणि काही प्रमाणात फेमिनिन् रायटींग अशा प्रकारातलेच असल्याचे आढळून येते. विजया राजाध्यक्ष, सुमा करंदीकर, दिपा गोवारीकर, पद्मिनी बिनीवाले, सरीता पदकी, सानिया, आशा बगे, प्रतिमा इंगोले, गौरी देशपांडे, कमल देसाई आदी स्त्रीलेखिकांनी १९७५ ते आजपर्यंतचा कथा साहित्यप्रकार प्रामुख्याने हाताळलेला दिसतो. स्त्रियांच्या या कथा प्रामुख्याने काही विशिष्ट विषयांभोवती फिरत असलेल्या दिसून येतात. त्यामध्ये लग्न, स्त्रीशरीर, स्त्रियांचे मन आणि त्यांची नोकरी या विषयीच्या आशयाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. बालविवाह, विधवाविवाह, पुनर्विवाह, परित्यक्ता, विधवा, निसंतान स्त्रियांचे दुःख, वर निवडण्याचे स्वातंत्र्य नसणे, नावडता पती मिळणे, जुलमी पती मिळणे, अरसिक पती मिळणे, पतीचे विवाहबाह्य संबंध असणे, माहेरची ओढ, सासुरवास अशा विषयांना घेऊन या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. स्त्रियांच्या कथा साहित्यात येणा-या पुरूषपात्रांमध्ये पतीबरोबरच मित्र, प्रियकर, प्रेम, निखळ मैत्री, विवाहबाह्य संबंध, लैंगिक सुख आदी विषयही तुरळकपणे हाताळले गेलेले दिसून येतात.

फक्त स्त्रियांनी लिहिलेले आणि समाजातील पुरूषवर्चस्वाबद्दल यत्किंचितही आक्षेप नसलेले साहित्य फिमेल रायटिंग या प्रकारात मोडते. वरील कथासाहित्यातही कथारंजकतेची पारंपरिक तंत्रे वापरून लिहिलेल्या कथासाहित्याचा भरणा अधिक असलेला दिसून येतो. स्त्रियांनी स्त्रियांच्या दुःखांविषयी, त्यांच्या भावभावनांविषयी व त्यांच्या समाजातील स्थानाविषयी तटस्थपणे केलेले लेखन हे फेमिनिन् रायटिंग या प्रकारात मोडते. मराठी वाङ्मयातील वर्तमानकालीन कथासाहित्यात असे फेमिनिन् प्रकारात मोडणारे साहित्यही ब-याच प्रमाणात आढळून येते. जे साहित्य स्त्रियांच्या दुय्यमतेचे चित्रण करून थांबत नाही तर पुरूषसत्ताक पध्दतीला नकार देण्याचे धारिष्टय दाखवते ते साहित्य फेमिनिस्ट रायटिंग अर्थात स्त्रीवादी साहित्य या प्रकारात येते. वर्तमानकालीन मराठी कथा साहित्यामध्ये फेमिनिस्ट म्हणता येईल असे लेखन विभावरी शिरुरकरांच्या स्वातंत्र्यपूर्वकालिन लेखनानंतर थेट गौरी देशपांडे, मेघना पेठे, कमल देसाई व काही प्रमाणात सानिया यांच्या कथासाहित्यात आढळून येते.

स्त्रीवादी साहित्यविचाराच्या प्रसाराबरोबरच स्त्रीमुक्ती म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य, विशेषतः लैंगिक स्वातंत्र्य अशी एक गैरसमजुत जनमानसात किंवा स्त्रीवादाच्या विरोधकांत रुढ झाली होती. स्त्रीवाद हा मुक्तीच्या संकल्पनेवर आधारलेला असल्याने त्यात बेबंद स्वातंत्र्य येणारच असे माननारा वर्ग आजही आहे. गौरी देशपांडे यांच्या कथावाङ्मयात मात्र स्वातंत्र्य आणि जबाबदा-या यांचा समतोल राखणारी पात्रे रंगवली गेली आहेत. गौरी देशपांडे जेव्हा लिहू लागल्या तेव्हा स्त्रीवादी विचार जगभर पसरू लागला होता. परिणामस्वरूप गौरी देशपांडेंच्या लेखनात स्त्रीवादी जाणीव अधिक स्पष्टपणे आलेली दिसून येते. गौरी देशपांडयांच्या कथांमधील या निवेदिका स्त्रीवादी जाणिवांमधून जीवनाचा वेध घेतात. ॓आता कुठं जाशील टोळंभट्टा? या कथेत स्त्रीवादाचा पुरस्कार अधिक स्पष्टपणे परंतु उपरोधिक शैलीत गौरी देशपांडे यांनी केलेला आहे. शिक्षण संपल की मुलीनं लग्न करायचं आणि नव-याचं स्वयंपाकपाणी सांभाळण्यासाठी त्याच्या मागोमाग त्याच्या गावी जायचं ही समाजमान्या रीत आहे. ॓आता कुठं जाशील टोळंभट्टा? या कथेत गौरी देशपांडे यांनी संपूर्ण लग्नव्यवस्थेचीच टींगल उडवली आहे. ॓लग्न झाल्यावर काही दिवसांतच त्याची बदली झाली आणि मी पतिव्रता स्त्री प्रमाणे आपली नोकरी सोडून त्याला ॓करून घालायला॔ त्याच्या मागे ईथे आले.॔८ अशा वाक्यांमध्ये कालबाह्य भारतीय संस्कारांची गौरी देशपांडे यांनी टिंगल उडवली आहे. लग्न करून स्त्रीला अन्नाला लावणारी संस्कृती स्त्री च्या स्वातंत्र्याची, तिच्या व्यक्तिमत्त्वाची आणि तिच्या आकांक्षांची जाणीव ठेवणारी नाही. अशा या संस्कृतीबद्दल समकालिन स्त्रीवादी कथासाहित्य चीड व्यक्त करते. या कथांमध्ये व्यवस्थापरिवर्तनाची मागणी करणारी पात्रे गौरी देशपांडे यांनी रंगवली आहेत. स्त्रीच्या शरीरावर पहिला अधिकार स्त्रीचा आहे, हा विचारही त्यांच्या कथेमधून आलेला आहे. पुरूषांची जाणीव न बदलल्यामूळे स्त्री ने पतीएेवजी प्रियकराबरोबर रमायचा प्रयत्न केला तरी तिला नेहमीचे, ठराविक पुरूषी अनुभवच प्रियकराकडूनही येतील आणि आता कुठे जावे असा प्रश्न पडेल असा कथेचा उपरोधिक शेवट गौरी देशपांडे करतात. त्यांच्या या व अशा अनेक ईतर कथांमधून स्त्रीला झालेल्या हक्कांच्या जाणिवांची प्रचिती येते. त्यांच्या कथांमधून प्रथमपुरूषी स्वगत असल्यामूळे, निवेदन येत असल्यामूळे अनेकदा कथेतील पात्र बोलत नसून स्वतः लेखिकाच आपले स्वानुभव, आत्मगत सांगते आहे असे वाटते. तेव्हा त्यांची कथाही अधिक ठाशीवपणे स्त्रीवादी आशय व्यक्त करत मनावर ठसत जाते.

एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या धीट शैलीच्या कथालेखिका म्हणून मेघना पेठे यांचा उल्लेख स्त्रीवादी कथासाहित्यच्या संदर्भात केला जातो. एका स्त्रीने इतके स्पष्ट व सरळ भिडणारे स्त्री-पुरूष संबंधांचे स्त्रीच्या दृष्टीकोनातून येणारे वर्णन मराठी कथेत नव्यानेच आल्याचा अनूभव मेघना पेठे यांचे कथासाहित्य देऊन जाते. स्त्रीच्या मनोविश्वातला एकाकीपणा, तुटलेपणा, परकेपणा त्यांच्या कथांमधील पात्रांमधून जाणवत रहाताे. ॓समुद्री चहूकडे पाणी॔ या कथेतून मेघना पेठे यांनी तथाकथित नितीमान लोकांच्या दांभिक पावित्र्याच्या संकल्पनांना गोंजारणारे वातावरण चितारले आहे.९ चौकटीत जगण्याचं ढोंग करणा-या समाजमान्य नितीनियमांत जगत असल्याचा देखावा उत्पन्न करणा-या लोकांचे कळप आपल्या समाजात चालतात कारण ते सर्व प्रतिष्ठीत लोकांचे कळप असतात. पण एका असहाय अपरिहार्य गरजेपोटी उघडपणे चौकटीबाहेरचं वर्तन करणारी माणसे खास करून स्त्रिया या कळपाच्या लेखी गुन्हेगार असतात. आणि तो कळप अशा गुन्हेगारांना दांभिकपणे शिक्षाही सुनावतोे. अत्यंत बेजबाबदार, दुस-याची फसवणूक करत, भ्रष्टाचारी जीवन जगणा-या माणसांना नेहमी संस्कृतीची चिंता अधिक असते. दूबळ्या लोकांना चारचौघांसमोर उघडे पाडून त्यांना शिक्षा करून संस्कृती रक्षणाची एक मोठी कामगिरी आव अशी माणसे आणत असतात. आपल्याकडे संस्कृतीचा सगळा प्रश्न स्त्रीच्या कृतीउक्तीशी निगडीत असतो. तेव्हा संस्कृती धोक्यात आणणा-या स्त्रीला सभ्य माणसांच्या वसाहतीत जागा रहात नाही.

मेघना पेठेंच्या कथेचा विशेष हा की कथेची निवेदिका मनाच्या, शरीराच्या हाका निःसंकोचपणे मान्य करते. खोटयानाटयाचे बहाणे करीत नाही, लपवाछपवी करीत नाही की कसला दांभिकपणाचा आवही आणित नाही. या निवेदिकेला तसे फारसे कुणाशी बांधून घ्यायचे नाहीय पण तरीही आजारात आपले कुणी नाही या जाणीवेने ती उन्मळून रडतेही. पुरूषाविषयी वाटणा-या पाशवी आकर्षणातून स्त्रीलाही लग्न, संसार, मुलं या बंधनात न अडकता एखादा पुरूष मिळाला तर हवा असतो हे ती व्यक्त करते. आसक्ती, तिरस्कार याचा रोखठोक प्रत्यय देते. पुरूषाच्या शरीराला स्त्रीच्या शरीराची गरज असते, ती नैसर्गिक असते आणि त्या गरजेच्या पूर्तीसाठी पुरूष नेहमी स्त्रीच्या शोधात असतो असे चित्रण आपल्याला साहित्यात दिसते. नैसर्गिक म्हणून स्त्रीच्याही शरीरात तशा उर्मी असू शकतात हा पुसट विचारही आपल्या साहित्यात नाही. स्त्रीलाही पुरूषदेहाविषयी अशा आकर्षणाची हाक पडू शकते त्याचे वास्तवपूर्ण चित्रण मेघना पेठे आपल्या कथेच्या निवेदिकेच्या माध्यमातून करतात. ॓स्त्रीला सुध्दा कुठल्याही पाशात न अडकता शारीरिक गरज भागवावीशी वाटत नसेल काय?॔ अशा त-हेच्या शक्यतेचा विचार मेघना पेठेंच्या कथेच्या निमित्ताने मराठी साहित्यात नव्याने दाखल झालेला दिसतो असे मंगला आठलेकर म्हणतात.१०

मेघना पेठे यांच्या कथालेखनामागील दृष्टी ही आधुनिक आहे. तिच्यात स्त्रीवादी जाणीव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मेघना पेठे यांच्या कथा फक्त स्त्रीदृष्टकोनापूरत्या मर्यादित मानने म्हणजे खरेतर त्यांच्यावर अन्याय ठरेल. मेघना पेठे यांच्या कथा या समग्र जीवनव्यवहाराचे चित्रण करतात. त्याच बरोबर पुरुषप्रधान समाजव्यवस्था असलेल्या समाजातील ढोंग, कौर्य आणि दुःख यांचे चित्रण करतात. ॓मेघना पेठे यांच्या कथेत स्त्रीवादी जाणीवा आहेतच, पण ही कथा एक पाऊल पूढे जाऊन संपूर्ण समाजव्यवस्थेला निरीक्षणाचे लक्ष्य बनवते. समाजव्यवस्थेचा उभा-आडवा अंतर्मुख करणारा छेद घेत राहते.११

नौकरी करणा-या कुमारीकांचे भावविश्व व विचारविश्व कमल देसाई यांच्या ॓रंग॔, सुनीती आफळे यांच्या ॓तिढा॔ या कथांमधून व्यक्त झालेले आहेत. सानिया यांच्या कथांमधून घरकामात मदत करणारे पती भेटतात. मुलांच्या संगोपनाच्या प्रश्नाला घेऊन विजया राज्याध्यक्षांनी ॓विसंवाद॔ सारखी कथा लिहिली आहे. उर्मिला पवार, प्रज्ञा लोखंडे ह्यांच्या कथांमध्ये दलित स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडलेली दिसते. अनिता काळे यांच्या कथांमधून लैंगिक अनूभव, कुमारीमाता, कुटुंबनियोजनांच्या साधनांचा वापर असे विषय येतात. एकूणच समकालिन मराठी कथावाङ्मयात स्त्रीवादी वाङ्मयाच्या अंगाने विपूल लेखनात (फिमेल रायटिंग) काही स्त्रीवादी (फेमिनिस्ट) लेखनकृतीही आढळून येतात.

मराठी कवितेच्या संदर्भात शोध घेतला असता बहूतांश स्त्रियांची समकालिन मराठी कविता ही प्रेमविषयक व कौटुंबिक नात्यांची भलावण करणारी असलेली आढळून येते. ब-याच कविता पुर्वायूष्यातील प्रेम व प्रियकर उघडकीस येऊ नये म्हणून पुरूषी निवेदनाचा आधार घेऊन लिहिलेल्या आढळतात. कुठल्याही साहित्याची कलात्मक उंची ही कलावंताच्या अभिव्यक्ती मधील प्रामाणिकपणावरच अवलंबून असते. त्यामूळे अशा कविता स्वत्वहीन व निकृष्ठ दर्जाच्या ठरलेल्या दिसून येतात. तरीही आधूनिक जीवनात वेगाने घडून येणा-या बदलांमूळे व जगभरातील स्त्रीवादी साहित्याचा व विचारांचा प्रभाव पडून मराठीत काही कवियत्री स्त्रीवादी जाणिवा प्रकट करतांना दिसून येतात. ॓आणि आता मी तुझ्याशी/ फटकून वागायचे/ ठरवले आहे./ जसजशी तुझी/ सावली धरून चालते/ तसतशी ती फैलावते आहे/ सायंकाळी सारखी/ तुझ्या लेखी/ अंगवस्त्राईतकेही तुझ्या/ मला अस्तित्व नाहीय/ मग मी तुझ्याकडूनच/ माझे अस्तित्व/ का ठरवायचे?/ आता मी ठरविलेय/ माझ्या लेखी असलेले/ तुझे अस्तित्व नाकारण्याचे!.॔ निरजा यांच्या या कवितेतून स्त्री फक्त स्त्रीबद्दल बोलत नसून ती पुरूषवर्चस्व नाकारण्याची भाषा करते आहे. ज्या पुरूषाची मुलगी, बहिण, पत्नी, आई म्हणून आयूष्य पणाला लावूनही त्याच्या लेखी स्वतःची काही किंमत नसल्याचे लक्षात आल्यावर पिळवटूण टाकणा-या शब्दप्रतिमांनी आपले दुःख चितारण्यापेक्षा त्या पुरूषाच्या वर्चस्वालाच नाकारून स्वतःच स्वतःचे अस्तित्व ठरविण्याची स्वत्वाची भाषा या कवितेत येते. आणि हीच या कवितेतून व्यक्त झालेली स्त्रीवादी जाणीव ठरते.

बदलत्या काळात होणा-या स्थित्यंतरांचा, आर्थिक, सामाजिक, राजकीय बदलांकडे बघण्याचा स्त्रियांच्या कवितेमधील दृष्टीकोन स्त्रीवादी वाङ्मयविचारसरणीशी अधूनमधून नाते सांगतांना दिसून येतो. प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, सुशीला मराठे अशा कवियत्रिंनी प्रामुख्याने स्त्रीवादाशी नाते सांगणा-या रचना केलेल्या आढळून येतात. या रचनांमधूनही पुरूषसत्तेविरूध्द बंड करण्याची भाषा मात्र फारच क्षीण स्वरूपात जाणवते.

स्त्री म्हणून साहित्यविश्वात कशी वागणूक मिळाली? या मुलाखतीतल्या प्रश्नाला संजीवनी मराठे यांनी दिलेले पुढील उत्तर पहा, ॓एक स्त्री म्हणून वागणूक म्हणाल तर- माझ्या कवित्वाच्या लायकीप्रमाणे मला मिळाली असे मला वाटते. पण स्त्री म्हणून जगतांना मध्यमवर्गीय गृहीणींच्या अनुभवांची मर्यादित कक्षा आणि औचित्याचे भान या गोष्टींची जाणीव ठेवावीच लागली. आपले हात काव्य कवळायला तोकडे आहेत असं मला जाणवतं॔१२ संजीवनी मराठे यांच्या या उत्तरातच समकालिन स्त्रीकविता ही स्त्रीवादी होण्यापेक्षा दुःखाचा पाढा वाचणारी, वैफल्यग्रस्त व आगतिकता जोपासणारी का झाली आहे या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. ॓बंद आेठ/ बंद कान/ मीट डोळे/ झुकव मान/ एक दिवस बाप तुझा/ एक बाप्या घेऊन येईल/ म्हणेल ॓जोडा बेस दिसंल॔/ दारात आई डोळे पुसंल...॔ ही ॓गाथा॔ या काव्यसंग्रहातली सुहासिनी ईर्लेकरांची कविता, ॓रजस्वला, संभोग, बाळांतपण/ शरीराभोवती फिरलेलं/ अायुष्यासकट माणसाचं चक्र/ मुक्या वेदनांचं गाठोडं॔ ही ॓वाळूचा प्रियकर॔ मधली मलिका अमरशेख यांंची कविता अशा कवितांमधून स्त्रीच्या दुःखाचे वर्णन, सोशिकपणाचे संदर्भच प्रामुख्याने आढळून येतात. समकालिन मराठी कवितांमध्ये बंडखोर स्त्रीवादी विचारसरणीचे आशयही अलिकडे प्रखरपणे व्यक्त होत आहेत.

कादंबरी प्रकाराबाबत शोध घेतला असता स्त्रीवादी वाङ्मयजाणीव ही कादंबरीमध्ये कथा कवितेपेक्षा काहीशा अधिक्याने व्यक्त झालेली आढळून येते. स्त्रियांचे कादंबरी लेखन हे स्त्रीसुधारणेकडून स्त्रीस्वातंत्र्याकडे विकसित होतांना जाणवते. आजवर दडपून टाकलेली लैंगिक भावना स्वातंत्र्योत्तर काळातल्या लेखनात धाडसीपणाने व्यक्त होतांना दिसते.

कमल देसाई, गौरी देशपांडे, आशा बगे, अंबिका सरकार, सानिया, शांता गोखले, कविता महाजन या समकालिन मराठी वाङ्मयात स्त्रीवादी अंगाने कादंबरीलेखन करणा-या लेखिका आहेत. कमल देसाई यांच्या ॓रात्रंदिन आम्हा॔ आणि ॓काळा सुर्य व हॅट घालणारी बाई॔ या दोन कादंब-या स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या संदर्भापेक्षा ॓नवसाहित्य॔ म्हणून, त्यांच्यातील संज्ञाप्रवाही लेखनशैलीच्या अनुषंगाने अधिक चर्चिल्या गेल्या.

स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणामूळे, राजकीय हक्कांमूळे स्त्रीची पारंपरिक प्रतिमा बदलून जागतिक पातळीवर स्त्रियांचे हक्क आणि अधिकार यांची सकारात्मक चर्चा होत आहे. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्री-पुरूष विषमता, पुरूषसत्ताक मूल्ये यावर हल्ला करत असतांनाच स्त्री स्वतःकडे एक व्यक्ती म्हणून पाहण्याचा प्रयत्न करते आहे. ह्यातून स्त्री-पुरूष संबंधातली नवी नाती जन्माला येत आहेत. स्त्री-पुरूष संबंधातली विषमता नाकारून हे संबंध समतेवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो आहे. ही नवी व्यवस्था अस्तित्वात येतांना जुनी व्यवस्था हादरून जात आहे. जुनी मूल्ये तकलादू ठरत आहेत. ह्याचे साद-पडसाद स्त्रीवादी कादंब-यांमधून उमटतांना दिसतात.

आशा बगे यांच्या ॓त्रिदल॔ मधील मंजू-शारदा, सानिया यांच्या ॓आवर्तन॔ मधील इला-सुरूची, त्यांच्याच ॓स्थलांतर॔ मधील रिनी-नंदू, शांता गोखले यांच्या ॓रिटा वेलिणकर॔ मधील रिटा-सरस्वती, गौरी देशपांडे यांच्या ॓निरगाठी॔ मधील रंजू-जानकी ह्या स्त्रियांमधील नाते हे पारंपरिक स्त्रियांमधील नातेसंबंधांपेक्षा, मैत्रीपेक्षा वेगळ्या व अधिकाधिक विस्तारशील अशा नातेसंबंधात बदलणारे आहे. स्त्री-पुरुष प्रेमाची विविध रुपे गौरी देशपांडे यांच्या कादंब-यांमधून प्रकट झालेली दिसतात. त्यांच्या ॓कारावासातून पत्रे॔, ॓मध्य लटपटीत॔, ॓एकेक पान गळावया॔, ॓ते रुओ॔, ॓काही दूरपर्यंत॔, ॓निरगाठी॔, ॓चंद्रिके गं सारीके गं॔, ॓दुस्तर हा घाट॔, ॓थांग॔ कविता महाजन यांच्या ॓ब्र॔ या कादंब-यांमधून आधूनिक स्त्रीचे चित्रण आलेले आहे. या कादंब-यांमधील नायिका स्त्रियांच्या मानसिक व शारीरिक इच्छांची सहज मांडणी करण्याबरोबरच पुरूषाची सावली नाकारणा-या व नव्या वाटेने जाणा-या आहेत. आशा बगे यांच्या ॓त्रिदल॔, सानिया यांच्या ॓स्थलांतर॔, ॓आवर्तन॔, अंबिका सरकार यांच्या ॓एका श्वासाचं अंतर॔ व ॓चाहूल॔ या कादंब-यांमधली स्त्री ही स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी व त्याच्या परिणामांनाही स्वतः सामोरी जाणारी आहे. या कादंब-यांमधल्या नायिका पारंपरिक पावित्र्याच्या संकल्पनांना धूडकावून लावतांना एका ॓स्त्री॔ पेक्षा एक ॓माणूस॔ म्हणून अधिकाधिक स्वत्वाचे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे कांदंबरीवाङ्मय स्त्रीवादी ठरते.

समकालीन मराठी वाङ्मयामध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांधूनही स्त्रीवादी जाणीवांचा परिपोष झाला आहे काय याचा शोध घेतला असता बहूतांश आत्मचरित्रे ही स्त्रियांच्या दुःखाचा पाढा वाचणारी असल्याचे लक्षात येते. स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करणा-या आत्मचरित्रांमध्ये मलिका अमरशेख यांचे ॓मला उद्ध्वस्त व्हायचंय॔ हे आत्मचरित्र आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी आणि आकांक्षेसाठीही वेदना व विद्रोह व्यक्त करतांना दिसते. ॓नाच गं घुमा॔ या आत्मचरित्रामधून माधवी देसाई स्त्रीमनातील व स्त्रीजीवनातील असहायतेचे चित्रण करतात.

कुमुद पावडे यांचे ॓अंतःस्फोट॔ हे आत्मचरित्र प्रसिध्द झाल्यावर दलित स्त्रियांच्या आत्मकथनांची चर्चा सुरू झाली. शांताबाई कांबळे ह्यांचे ॓माझ्या जल्माची चित्तरकथा॔ आणि बेबी कांबळे ह्यांचे ॓जीणं आमुचं॔ ही आत्मचरित्रे प्रकाशित झाली. ह्या आत्मचरित्रांमधून दलित स्त्रियांची वेदना व्यक्त झालेली दिसते. परंतु मलिका अमरशेख व काही प्रमाणात माधवी देसाईंचा अपवाद वगळता सर्वच आत्मचरित्रांत्मक लिखाणांमध्ये विद्रोहापेक्षा दुःखावेगच जास्त असल्याचे दिसून येते. ॓दलित आत्मकथनांमधूनही दलित लेखिकांनी ॓स्व॔त्वाविषयी किंवा तिच्या बदललेल्या स्त्री मानसिकतेतून फारसं कथन केलेलं नाही.१३

पुरूषी समाजव्यवस्थेला नकार देऊन समताधिष्ठीत समाजव्यवस्थेसाठी झगडणारे लेखन हे ख-या अर्थाने स्त्रीवादी ठरते. मराठी वाङ्मयातील एकूणच स्त्रीवाङ्मयाचे स्वरुप या दिशेने प्रवास करतांना दिसते आहे. परंतु पूढच्या प्रवासासाठी ॓केवळ आत्मविलाप आणि आत्मस्तुती करून चालणार नाही तर एकूणच स्त्रियांच्या लिखाणासंदर्भात वेळ पडल्यास आत्मटिकेचं शस्त्र घेऊनच पूढे जावे लागणार आहे.॔१४ समकालीन स्त्रीवादी मराठी वाङ्मयाची स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रक्रीया यातूनच पूर्णत्वाला जाणार आहे.

३.३ स्त्रीवादावरील आक्षेप
वाङ्मयाच्या क्षेत्रातील स्त्रीवाद हा वाङ्मय अभ्यासाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, समीक्षादृष्टीला व खास करून स्त्रीलेखिकांच्या साहित्यनिर्मितीला एक नवा दृष्टीकोन देणारा ठरला आहे. असे असतांनाही स्त्रीवादाच्या अपु-या अभ्यासातून वाङ्मयक्षेत्रात स्त्रीवादाविषयी काही वेळा अगदीच टोकाच्या भूमिका घेतल्या गेलेल्या आढळून येतात. स्त्रीवादी वाङ्मयविचार हा स्त्रीमुक्ती चळवळीच्या आश्रयाने विकसित झालेला एक वाङ्मयीन दृष्टीकोन आहे. स्त्रीमुक्तीच्या तत्वांना पाठीशी घेऊन वाङ्मयव्यवहारातील काही पारंपरिक संकल्पनांना विरोध करण्याचे कार्यही स्त्रीवादाने केले आहे. परिणामस्वरुप स्त्रीवादावर काही गंभीर आक्षेप घेण्यात आलेले दिसून येतात. या आक्षेपांचे विवेचन करतांना स्त्रीवादावरील आक्षेप या उपरोक्त शीर्षकाखाली या ठिकाणी स्त्रीवादाविषयी व्यक्त केल्या गेलेल्या प्रतिकूल मतांचा आढावा या ठिकाणी घेतला जाईल. या मतमतांतरांच्या अन्वयाचे विवेचन पूढील मुद्यात केले जाईल.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हा पुरूषविरोधी आहे. कारण ते पुरूषविरोधाचे तत्व सांगणा-या स्त्रीमुक्ती चळवळीपासून उदयास आलेला आहे. असा आक्षेप सुरूवातीलाच स्त्रीवादावर घेतला जातो. ॓स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला मुक्त म्हणजे स्वैराचारी बनवणारी, पुरूषाचे वर्चस्व नाकारणारी, म्हणजेच विवाहसंस्था व कुटुंबसंस्थेला नाकारणारी विचारसरणी॔ असे आपल्याकडे मत झाले आहे. स्त्रीवादी विचारसरणीला आपल्याकडे एकतर कडवा विरोध झाला किंवा तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करण्यात आले. कदाचित याचा परिणाम म्हणूनही असेल, एकेकाळी स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेणा-या स्त्रियाही आपण स्त्रीवादी नाही असे सांगू लागल्या.१५ स्त्रीवादावरच्या आक्षेपांमुळे स्त्रियांनी उचललेले हे पाऊल मराठीवाङ्मय व्यवहाराची एक बाजू दर्शविणारे ठरते.

स्त्रियांचे म्हणून काही खास अनुभव असतात आणि ते साहित्यात आले नाहीत तर साहित्य एकांगी व अपूरे ठरेल हे म्हणणे चिकित्सेच्या कसोटीवर टिकणारे नाही. असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले आहे. याच भूमिकेच्या अनुषंगानेे बाळकृष्ण कवठेकर यांनी स्त्रीवादी साहित्याची संकल्पनाच अनावश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे. स्त्रीवादी वाङ्मय या संकल्पनेलाच नकार देण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन करतांना त्यांनी बदलत्या काळाचा संदर्भ देऊन स्त्री-पुरूष हा भेदच संपुष्टात येत असल्याचे म्हटले आहे. ॓यंत्र आणि विज्ञान यांनी काळ ईतका बदलून टाकला आहे, की स्त्री आणि पुरूष यांच्या अनुभवविश्वात आज कसलाही फरक राहिलेला नाही. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात स्त्रीला केवळ स्त्री म्हणून आज मज्जाव राहिलेला नाही. त्यामुळे स्त्री आणि पुरूष यांच्यातील फरक हा फक्त शारीरभिन्नतेपुरताच राहिलेला आहे. म्हणून गर्भधारणा आणि प्रसूती हे दोन अनुभव सोडले तर स्त्री आणि पुरूष यांच्या अनुभवात आज कुठलाही फरक राहिलेला दिसत नाही. तेव्हा स्त्रियांच्या दृष्टीतून जीवनानुभव घडवणारे साहित्य ही कल्पनाच अवास्तव ठरते.१६ वाङ्मयीन अभिव्यक्ती ही स्त्री आणि पुरूष अशा वेगवेगळ्या दृष्टीतून होऊ शकते या बाबीलाच बाळकृष्ण कवठेकर यांनी नकार दिलेला आहे.

स्त्रीवाद हि संकल्पना राजकीय आहे. वाङ्मयात विचारांशी इतक्या घट्टपणे बांधून घेणे ही कृतीच अवाङ्मयीन मानली जाते. परिणामस्वरूप स्त्रीवादाचे वाङ्मयीन प्रांतात फारसे काही महत्त्व असू शकत नाही असाही एक आक्षेप स्त्रीवादावर घेतला जातो.

स्त्रीलेखिकांना अनैतिकतेचा परवाना मिळवून देणारा वाङ्मयविचार म्हणूनही स्त्रीवादाची संभावना केली जाते. स्त्रीवादी विचार हा वाङ्मयातून स्त्रियांचे विवाहबाह्य संबंध, लैंगिकता, स्त्रियांचे मद्यपान आदी बाबींचे चित्रण करण्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम करतो. पुरूषांच्या स्वैरपणाचे आकर्षण वाटून, त्याविषयीच्या मत्सरभावातून स्त्रीवाद उदयास आलेला आहे. एका अर्थाने स्त्रियांचा पुरूष होण्यासाठीचा अट्टहास पूरा करण्याची ही खटपट असल्याचा आक्षेप स्त्रीवादावर घेतला गेला आहे.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हा वाङ्मयीन मूल्यांशी, कलामूल्यांशी प्रतारणा करणारा आहे अशा आशयाची टिकाही स्त्रीवादावर झालेली आढळून येते. कलाक्षेत्राचा विचार करतांना लेखन स्त्रीवादी नाही म्हणून गौण आणि स्त्रीवादी असले तरच श्रेष्ठ ही भूमिका अप्रस्तुत ठरते. ॓मी स्त्रीवादी लिहिणार या अभिनिवेशातून झालेले लेखनही कलामूल्याच्या दृष्टीने डागाळते. स्त्रीवाद हा आशयाभिव्यक्तीच्या अनुषंगाने सेंद्रीयत्वाने साहित्यातून सहजपणे प्रकट होत नाही. परिणामस्वरूप स्त्रीवादी होण्याच्या अट्टहासातून झालेले लेखन हे बोधात्मक होऊन साहित्यकृतीचे कलामूल्या उणावते.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हे पुरुषी समीक्षापध्दतीला नकार देणारे आहेत. प्रचलित समीक्षाव्यवहाराला नकार दिल्याने हे वाङ्मय समीक्षेतून वगळले जाण्याचा संभव आहे. अशाप्रकारे जर स्त्रीवादी अंगाने वाङ्मयाचे समीक्षण झाले नाही तर हा विचार दुर्लक्षित राहिल व त्याचे अस्तित्व संपूष्टात येईल.

कडव्या स्त्रीवादी अमेरिकन लेखिकांनी जाणीवपूर्वक पत्रकारीता, आरोग्य, शिक्षण, कायदा, कला, व्यापार अशा सर्वच क्षेत्रांमधील पुरूषवर्चस्वाचे जोखड फेकून देणा-या स्त्रीची प्रतिमा आपल्या वाङ्मयातून निर्माण करतांना वास्तवाशी फारकत घेणारे, अतिअद््भूततेने भरलेले लिखाण केले आहे. स्त्रीवादी चळवळीमूळे अशा पुरूषसत्ताक संस्कृतीविरूध्द आक्रस्ताळेपणाने उभी राहणारी एक नवीच व्यासपीठीय साहित्यसंस्कृती उभी राहते आहे.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हा अवास्तव रुपाचे विचार मांडणारा साहित्यविचार असल्याचा आक्षेपही घेतला जातो. एलेन शोवाल्टरने सध्याचा भाषेचा वापरच झिडकारण्याचे केलेले आवाहन या संदर्भात निर्देशित केले जाते. पुरूषप्रधान संस्कृतीत भाषा ही पुरूषाला केंद्रवर्ती म्हणून वापरली जाते. पुरूषाच्या या जोखडातून मुक्त होणे हे तर स्त्रीसाहित्याचे ध्येय आहे. किंबहूना पुरूषप्रधान भाषेचा नाईलाजाने वापर करीत राहण्याचे बंधन हाच स्त्रियांच्या वाङमयनिर्मितीतील मुख्य अडथळा आहे. त्यासाठी दूस-यावर जुलूम न करणारी आणि स्त्रीत्वाचे दर्शन घडविणारी भाषा ही स्त्रीप्रधान मानली जाते. एलेन शोवाल्टर यांनी मोनिका विटींगचे अवतरण उद््धृत करुन या विचाराचे समर्थन केले आहे. मोनिका विटींग भाषा नाकारण्याचा आपला विचार मांडतांना म्हणतात, ॓जी भाषा तुम्ही बोलता, ती तुमच्या घशाला, जीभेला, टाळूला, ओठांना विष लावते. ती तुम्हाला नष्ट करणा-या शब्दांची बनली आहे. ती अशा खुणा-चिन्हांची बनवली आहे की त्यांचा उच्चार केला असता पुरुषांना अभिप्रेत असलेल्या संकेतांनाच खरोखर व्यक्त केले जाते, वर्चस्व मिळविण्याच्या प्रवृत्तीची ही भाषा स्त्रीवादी वाङ्मयाच्या उपयोगाची नाही. ज्यांना स्पर्श करावयाचा आहे, मिसळायचे आहे, विलीन व्हावयाचे आहे, स्वतःच्या आणि ईतरांच्या अस्तित्वात आनंदित व्हायचे आहे त्यांच्या बाबतीत ती भाषा अधिक प्रवाही व लवचिक व्हायला अवसरच देत नाही.१७ स्त्रीवादी विचाराची मांडणी करतांना भाषेबाबत घेतली गेलेली ही भूमिका अवास्तव असल्याचा आक्षेप घेतला जातो. ॓खास स्त्रीच्या भाषेचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे कारण केवळ लिंगभेदामूळे भाषिक वेगळेपणा येईल हे म्हणणे तितकेसे शास्त्रीय नाही असा एक विचारप्रवाह आहे. स्त्रीच्या भाषेतील आरोह-अवरोह किंवा अभिव्यक्तीची धाटणी ही केवळ लिंगभेदामूळे वेगळी ठरते हे शास्त्रीयदृष्टया योग्य दिसत नाही॔१८

स्त्रीवादी विचार हा स्त्रीच्या मुक्त लैंगिक स्वातंत्र्याच्या मागणीशी संबंधित असल्याचाही आरोप केला जातो. या आरोपाचा उगम स्त्रीमुक्ती चळवळीला ॓ब्रा बर्निंग मुवमेंट॔ म्हणण्याच्या प्रकारातून झालेला दिसतो. १९६९ साली विश्वसुंदरी स्पर्धांच्या वेळी ठीकठीकाणी स्त्रियांच्या संघटनांनी जी निदर्शने केली त्यातून स्त्रियांनी कंचुक्या (ब्रा) जाळल्या. याचा अर्थ स्त्रिया स्वैराचाराला तयार झाल्या असा घेऊन स्त्रीवादी विचारांना लक्ष्य केले गेले.

वाङ्मयीन क्षेत्रात स्त्रीवादाची मांडणी होत असतांना स्त्रीवादी वाङ्मयविचार हा कलावादी आहे की जीवनवादी आहे याचे स्पष्टीकरण स्त्रीवादाची मांडणी करणा-यांकडून केले गेले नाही याकडे यशवंत मनोहर यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते स्त्रीवादी समीक्षेने आपले जीवनविषयक तत्वज्ञान अजून स्पष्ट केलेले नाही. धर्म, ईश्वर यांविषयीची भूमिका स्पष्टपणे घेतलेली नाही. सौंदर्यमूल्ये आणि जीवनमूल्ये यांंंंंंची आणि त्यांच्यातील सेंद्रीयत्व वा विभेदकता याबद्दलची स्पष्ट तत्वे ही समीक्षा जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत या समीक्षाविचाराला पूर्णत्व येऊ शकत नाही.१९ एकंदरीत स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या मांडणीतच काही मूद्द्यांच्या बाबतीत अपूरेपणा असल्याचा आक्षेप या ठिकाणी स्त्रीवादावर घेण्यात आलेला दिसून येतो.

॓लेखकपणाचे फार मोठे सामर्थ्य असणा-या व कथा वाङ्मयप्रकाराला वेगळे रुप देण्याची क्षमता असणा-या विभावरीबाईंनी केवळ स्त्रियांच्या समस्यांपूरतीच कथा मर्यादित केली आहे.॔२० अशा शब्दात गो.मा.पवार यांनी स्त्रीवादामूळे स्त्रियांचे लेखनसामर्थ्य मर्यादित रहाते असा आक्षेप विभावरी शिरूरकरांच्या कथेच्या बाबतीत नोंदवला आहे.

स्त्रीवादी साहित्यविचार हा परकीय संस्कृतीतला, पाश्चात्य विचारातून उगम पावलेला असल्याने तो भारतीय संस्कृतीच्या संदर्भात अनाठायी ठरतो असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. संस्कृतीसंपर्काच्या बाबत डाॅ.सुधीर रसाळ म्हणतात, ॓जेव्हा दोन संस्कृती एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यात देवाण घेवाण सुरू होते. प्रत्येक संस्कृतीत काही त्रुटी, काही उणिवा, काही समस्या असतात. परसंस्कृतीतील काही गोष्टींच्या स्वीकारामूळे जर त्या नाहिशा होणार असतील तर त्या गोष्टींचा स्वीकार त्या संस्कृतीकडून केला जातो. हा स्वीकार अर्थातच सरळसरळ होत नसतो. संस्कृतीच्या मूळ घटकात आणि व्यवस्थांत टाकलेली ती केवळ भर नसते. या स्वीकृतीत परक्या घटकांना आणि व्यवस्थांना पूर्ण सामावून घेतले जाते. ही प्रक्रीया अन्नपचनासारखीच असते. अन्न पचले की ते अन्न रहात नाही ते आपल्या शरीराचा भाग बनून जाते. तसेच हे समाविष्टीकरण असते. या समाविष्टीकरणात संस्कृतीच्या मूल्यव्यवस्थेतही अनेक बदल होतात. त्यातून बदललेली, नव्याने सुसंगत बनलेली व्यवस्था अस्तित्वात येऊन ती स्थिरावते.॔२१

नव्या काळाच्या संदर्भात तद्दन आकर्षणापोटी काही पाश्चात्यविचार आपल्याकडे आयात होत असतांना िदसतात. या नव्या गोष्टींचे आकर्षण, कुतूहल या अाणि यासारख्या कारणांनी अनेकदा आपल्या व्यवस्थेशी संवादी, अनुरूप नसलेले, आपल्या संस्कृतीच्या संरचनेत कार्य नसलेले घटकही संस्कृती स्वीकारते. परंतु असे घटक हे उपरे राहातात व कालांतराने बाहेर फेकले जातात. काही कारणांमूळे असे हे विसंवादी विचार टिकवून धरण्याचा अट्टहास धरला तर मूळच्या विचारव्यूहात अनेक विसंगती, अनेक परस्परविरोध निर्माण होतात. त्या संस्कृतीची प्रस्थापित व्यवस्था ढासळून पडायला लागते. अशा विसंवादी परक्या घटकांची संख्या जर वाढत गेली तर त्या संस्कृतीचा मूळचा चेहराही पुसला जातो. ज्यांच्यात कसलीही सुसंगतता नाही अशा अनेक घटकांचा ढीग असे स्वरूप त्या विचाराला प्राप्त होते. पाश्चात्य विचारधारेकडून आपण स्वीकारलेल्या अनेक वाङ्मयीन विचारधारांच्या संदर्भात डॉ.सुधीर रसाळांनी हे विचार मांडलेले आहेत. स्त्रीवादी वाङ्मयविचार हाही पाश्चात्य विचारधारेतून मराठी वाङ्मय संस्कृतीत आला असल्याने तो या ठिकाणी एकरूप न ठरता उपरा ठरतो असा विचार स्त्रीवादाच्या संदर्भात मांडला जातो.

स्त्रीवादी साहित्यचळवळ ही फक्त उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांपूरती मर्यादित असून संपूर्ण वाङ्मयातल्या स्त्रीसाहित्याला कवेत घेण्याची क्षमता या विचारधारेची नाही असे स्त्रीवादाच्या बाबतीत म्हटले जाते. स्त्रीवादी साहित्य हे पुरूषवर्चस्वाला नाकारणारे असतांनाही पुरुषवर्चस्वामूळेच स्त्रीमध्ये रुजलेल्या सामाजिक भेदांच्या संकल्पनांना मात्र नकार देऊ शकत नाही.

फक्त स्त्रियांचे वाङ्मय हे स्त्रीवादी असते या स्त्रीवादाच्या भूमिकेवरही अनेक विचारवंतांनी आक्षेप घेतलेला दिसून येतो. स्त्रियांबरोबरच पुरुषांचे साहित्यही स्त्रीवादी असू शकते ही संकल्पना स्त्रीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण स्त्री असणे हेच असू शकते या विचाराला धक्का देणारी ठरते. म्हणून स्त्रीच फक्त स्त्रीवादी लिहू शकते असे स्त्रीवादी वाङमयविचारात सांगितले गेले. मात्र स्त्रियांपूरतेच स्त्रीवादाला मर्यादित करण्यावर आक्षेप घेतला जातो.

एकंदरीत स्त्रीवादावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांचा असा आढावा घेतल्यानंतर या मतमतांतरांचा अन्वयाच्या अनुषंगाने पूढील मुद्यात विवेचन करावयाचे आहे. यातून स्त्रीवादी वाङ्मयाची संकल्पना अधिकाधिक सुस्पष्ट होईल.

३.४ स्त्रीवादावरील मतमतांतरांचा अन्वय
स्त्रीवादावरील आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर या प्रत्येक आक्षेपाविषयी क्रमवार मांडणी करून स्त्रीवादी विचारधारेच्या अधिक सुस्पष्ट चित्रापर्यंत आपणास पोहचायचे आहे.

पुरुषविरोध हा स्त्रीवादाचा पाया असल्याने स्त्रीच्या पुरुषासारखे होण्याच्या ईच्छेतूनच हा विचार अस्तित्वात आल्याचा व स्त्रीवाद हा कुटुंबव्यवस्था नाकारणारा विचार असल्याच्या आक्षेपाचा सर्वप्रथम विचार करू. स्त्रीवादी वाङ्मय कुटुंबव्यवस्था नाकारणारेच असले पाहिजे असे स्त्रीवादी विचाराचे म्हणणे नाही. मूळातच फक्त पुरूषवर्चस्वाला नकार देणे हा स्त्रीवादातला मूलभूत विचार असल्याने भारतीय संस्कृतीत पुरुषवर्चस्वाचे प्रतिक असलेले कुटुंब व कुटुंबव्यवस्था ही सुरुवातीला स्त्रीवाद्यांंच्या टिकेचे लक्ष्य ठरली. कुटुंब हा भारतीय सामाजिक संरचनेतला एक महत्त्वाचा भाग असल्याने त्याची मोडतोड करण्यात हशील नाही. परंतु ही व्यवस्था टिकविण्यासाठी जो त्याग फक्त स्त्रीला करावा लागतो, जे दुय्यम स्थान स्त्रीला स्वीकारावे लागते त्यावर स्त्रीवादाचा मुख्य आक्षेप आहे. स्त्रिया या कुटुंबातील क्षुद्र प्राणी नसून त्यांचा दर्जा समानतेचा आहे व मिळकतीत पुरुषांप्रमाणे त्यांनाही हक्क असले पािहजेत, अशी भूमिका घेऊन विभावरी शिरूरकरांनी स्त्रियांच्या स्वराज्याची मागणी केली होती.

एकंदरीत स्त्रीवादी भूमिका ही कुटुंबव्यवस्था नाकारणारी नाही तर त्यातील स्त्रीशोषण व पुरुषवर्चस्व नाकारणारी आहे. आधूनिक मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी म्हणवल्या जाणा-या लेखिकांच्या वाङ्मयात कुटुंब आहेच. परंतु या कुटुंबातील स्त्री ही स्वाभिमानाने जगणारी, कमावणारी आहे. कुटुंबातील पुरुष स्वतःची कामे करण्याबरोबरच घरातली कामे करण्यात व मुलांचे संगोपन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतांना दिसतात. स्त्रीवादाच्या सर्वसमावेशक अशा भूमिकेचा अनुभव या वाङ्मयातील कुटुंबचित्रणांमधून दिसून येतो.

स्त्री-पुरूषांच्या अनुभवक्षेत्रांमध्ये बदलत्या काळात फारसा फरक राहिला नसल्याने स्त्रियांचे काही खास अनुभवविश्व असू शकत नाही अशी भूमिका बाळकृष्ण कवठेकर यांनी घेतलेली आहे. या भूमिकेचा विचार करतांना सर्वच क्षेत्रात वावणारी आधूनिक स्त्री डोळ्यासमोर उभी रहाते. स्त्री जरी सर्वच क्षेत्रात वावरत असली तरी तिला मिळणारी सर्व क्षेत्रांमधली वागणूक ही माणूस म्हणून न मिळता स्त्री म्हणून मिळते. परिणामस्वरूप आधुनिक काळातही तिची कुजंबणा होतेच. आणि ती तिच्या भावविश्वाला नवे कंगोरे प्राप्त करुन देणारी ठरते. परिणामस्वरूप स्त्रीवादी साहित्य ही संकल्पनाच अवास्तव मानने हे अन्यायकारक ठरेल.

समाजातील विविध पातळ्यांवर पुरुष हा स्त्रीला दूय्यम लेखून तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. कायदयाने स्त्रीला शिक्षण मिळते, मतदानाचे व राजकीय अधिकार मिळतात. पण घटनेच्या या अधिकाराने निवडून येणा-या व बदलत्या काळानुसार पुरूषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रात वावरणा-या स्त्रिया या ख-या अर्थाने राजकीय काम करतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एवढेच काय चांगल्या सुशिक्षित स्त्रीच्या विचारातही राजकीय मतांना काही स्थान नसलेले बहूतांशी आढळून येते. अशाप्रकारे राजकारण, समाजकारण, नोकरी, खेळ, चित्रपट, सांस्कृतिक विश्व आदी क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने अनुभव घेत असली तरी तिला ते अनुभव पुरुषवर्चस्वाच्या अनुषंगाने एक स्त्री म्हणून घ्यावे लागतात. परिमामस्वरूपी तिचे अनुभवविश्व वेगळे ठरते व त्याच्या अभिव्यक्तीने स्त्रीवादी साहित्याचे दालन आकारास येत आहे हे या ठिकाणी मान्य करावे लागेल.

स्त्रीवादाची संकल्पना ही राजकीय विचारधारेशी बांधील असल्याने ती अवाङ्मयीन ठरते हा आक्षेपही वरवरचा ठरतो. मूळात जीवनाचे काही असे तत्वज्ञान मान्य केल्याशिवाय वाङ्मयक्षेत्रात प्रविष्ठ होता येते काय हाच या ठिकाणी चर्चेचा विषय ठरतो. स्त्रीवादी साहित्य हे स्त्रीवादी िवचारातून लिहिलेले साहित्य असे मानन्यापेक्षा स्त्रीवादी मूल्यदृष्टी ज्या वाङ्मयातून प्रतीत होते ते वाङ्मय म्हणजे स्त्रीवादी वाङ्मय होय अशी भूमिका मान्य केल्यास स्त्रीवादावरील हा आक्षेप निकाली निघतो.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हा लेखिकांना लैंगिकतेचा खुला परवाना देतो हा आक्षेप स्त्रीवादावर येण्यास स्त्रियांचे अभिनिवेशयुक्त लेखन प्रामुख्याने कारणीभूत ठरलेले दिसून येते. आधूनिक स्त्री चुकीच्या अर्थाने रंगवण्याचे काम असे वाङ्मय करते. विवाहबाह्य संबंधांचे खोटे समर्थन, स्त्रीस्वातंत्र्याचा चुकीचा लावलेला अर्थ, अत्यंत सनसनाटी अशी लैंगिक संभोगाची वर्णने असलेले असे लेखन म्हणजे सामान्य पूरूष लेखकांनी घालून दिलेल्या चाकोरीतून, पण स्त्री म्हणून आपण काही क्रांतीकारी विचार कादंबरीतून मांडत आहोत अशा अविर्भावातून केलेले लेखन असते. स्त्रीवादाच्या मूलभूत विचारधारेशी त्याचा दूरान्वयेही संबंध नसतो. वाङ्मयात स्त्रियांचे लैंगिक अनुभव हे स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे निदर्शक म्हणून जेव्हा येतात तेव्हाच ते स्त्रीवादी ठरतात. पारंपरिक विचारधारेत स्त्रीने पुरूषासाठी केव्हाही ॓तयार॔ असायला हवे असा एकांगी विचार मांडला जातो. पुरूषालाच स्त्रीविषयी आकर्षण वाटते व त्यासाठीच स्त्रीचे शरीर निर्माण झाले आहे अशा विचारांचा प्रतिवाद करून स्त्रीच्या अंगाने स्त्रीचे अनुभवविश्व एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्त्रीकडून मांडले जाणे हे स्त्रीवादाला अपेक्षित आहे. पारंपरिक पुरूषी दृष्टीने केली जाणारी भडक शृंगारवर्णने ही स्त्रीवादी नव्हे तर लोकप्रियतावादी व बाजारू स्वरूपाचीच ठरणारी असतात.

कलामूल्यांशी प्रतारणा करून स्त्रीवादाची मांडणी करण्यात आली असल्याच्या आक्षेपाचा आता विचार करू. साहित्य ही एक कला आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ॓हेतूरहीत हेतूपूर्णता॔ हे तत्व साहित्याला लावले जाते. साहित्यकलेची ही अशी स्वायत्तता ही वाङ्मयात मंथनाचा विषय आहे. स्त्रीवादी वाङ्मय हे कलामूल्यांशी विरोध करण्यापेक्षा कलामिमांसेतील पुरूषवर्चस्वाच्या निदर्शक मुद्दयांचा फक्त प्रतिवाद करते. साहित्यमिमांसे मधील पुरूषवर्चस्व नेमके कुठे व कशा स्वरूपात दडलेले आहे याचा शोध घेणे हे स्त्रीवादाला अपेक्षित आहे. म्हणजेच स्त्रीवादी विचारसरणीचा विरोध हा फक्त कलाविचारक्षेत्रातल्या पुरूषवर्चस्वाला असून ही विचारसरणी या क्षेत्रातही स्त्रीला समान वागणूकीची अपेक्षा करते. यात कलामूल्यांशी प्रतारणा करणे अभिप्रेत नाही.

प्रचलित समीक्षाव्यवहाराला नकार दिल्याने स्त्रीवादी वाङ्मय हे समीक्षेच्या कक्षेबाहेर राहून दुर्लक्षित राहील हा आक्षेपही स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या अपू-या अभ्यासातून घेतला गेलेला दिसून येतो. समकालिन समीक्षेतील संदर्भांच्या चौकटी या पुरूषी आहेत. परिणामस्वरूप स्त्रियांच्या वाङ्मयाचे या चौकटीतून होणारे समीक्षण हे चूकीच्या व विकृत निकषांच्या मदतीने केले जाते. असे पुरूषी दृष्टीकोनातून केले जाणारे स्त्रियांच्या लेखनाचे समीक्षण स्त्रीवादाला मान्य नाही. आर्थिक आणि सामाजिक परंपरेप्रमाणे वाङ्मयीन संस्कृतीच्या परंपरेत पुरूषी मानकांचा वापर करून स्त्रियांच्या विद्वत्तेला व लिखाणाला वगळण्यात येते वा दूय्यम स्थान दिले जाते. स्त्रियांच्या विशिष्ट घाटाच्या लिखाणाला स्त्रीसुलभ वगैरे किताबांनी गौरविणे म्हणजेच एकप्रकारे त्यांचे हीनत्व दाखवणेच आहे. सौंदर्यवादी िनकषांचा वापर करून जगभरातील समीक्षाविचारात परात्मता आणि अस्तित्ववाद यावर समकालीन समीक्षेत मुख्य भर दिला गेला. यात वाङ्मयाबद्दलच्या पुरूषी दृष्टीकोनाचेच महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अशा या पुरूषप्रधानतेला स्त्रीवादाचा विरोध आहे.

समीक्षेच्या पुरूषप्रधान अथवा पारंपरिक सर्वच समीक्षा चुकीच्या आहेत असे स्त्रीवादाला वाटत नाही. परंतु त्यांची मांडणी ही मात्र पुरूषनिरपेक्ष चौकटीत केली गेली पाहीजे. या अनुषंगाने विचार करू पाहता स्त्रीवाद हा प्रचलित समीक्षाव्यवहाराला सर्वंकष नकार देत नाही हे स्पष्ट होते. परिणामस्वरुप स्त्रीवादी म्हणवल्या जाणा-या साहित्याकडे समीक्षेच्या दृष्टीकोनातून दुर्लक्ष होईल असे वाटत नाही.

स्त्रीवादी साहित्य म्हणजे आक्रस्ताळेपणाने व्यक्त होणारी एक नवी व्यासपिठीय साहित्यसंस्कृती आहे असे स्त्रीवादाबद्दल म्हटले जाते. स्त्रीवादाच्या सुरूवातीच्या काळात जरी स्त्रीवादी वाङ्मयाचे स्वरूप हे आक्रस्ताळे राहीले असले तरी स्त्रीवादच्या बदलत्या संदर्भात वाङ्मयाच्या या स्वरूपात बदलाची अपेक्षा केली गेली आहे. ॓एकांगी विचार करणा-या कडव्या स्त्रीमुक्तीवादी साहित्यिक स्त्रियांना अभिप्रेत असणा-या लिंगभेद विरहीत, स्वच्छंद, एकसूरी साहित्यापेक्षा, ॓गर्जणा-या समुद्रापेक्षा॔, स्त्रीविशिष्ट अनुभवांचा वाङ्मयीन उद््गार व्यक्त करणारा, स्त्रीविशिष्ट अनुभवांनी ॓हिंदोळत राहणारा साहित्य सागर॔ अधिक चांगला आहे असे वाटते. स्त्रीवादी साहित्यचळवळीच्या नावाखाली सहानुभूती दाखवणारे वा पुरूषसत्ताक संस्कृतीविरूध्द आक्रस्ताळेपणाने उभे राहणारे व्यासपिठीय साहित्य इथे अभिप्रेत नसून स्त्रीनिष्ठ अनुभवसृष्टीचे आस्थापूर्वक चित्रण करणारी कलात्मक भान असलेली स्त्रीसर्जक वाङ्मयसंस्कृती इथे अभिप्रेत आहे.२२ या विचारातूनच सुरूवातीचे स्त्रीवादी साहित्य हे जरी अवास्तव, भडक पुरूषविरोधाला तितक्याच भडकपणे अभिव्यक्त करत असले तरी तशीच दिशा ही स्त्रीवादाला अपेक्षित नसल्याचे स्पष्ट होते.

भाषेलाच नकार देण्याच्या विचारातून स्त्रीवाद हा अवास्तविक स्वरुपात विचारांची मांडणी करतो या आक्षेपाचा आता विचार करु. भाषा ही लिंगसापेक्ष असते हा विचार जरी अशास्त्रीय वाटत असला तरी भाषा ही व्यक्तीमत्त्वाला अभिव्यक्त करणारे एक माध्यम म्हणून जर आपण तिला मान्यता देत असू तर स्त्रीव्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात भाषेचा वेगळा विचार करणे हे निश्चितच गैर ठरणार नाही. भाषेला नकार हा ही भाषेतील पुरूषवर्चस्वी स्थानांना नकार अशा अर्थानेच घेणे योग्य ठरेल. विद्यमान भाषा ही पुरूषांनी बनवलेली असून पुरूषकेंद्री निकषांवरील या भाषेचा वापर स्त्रियांना करावा लागतो. स्त्रियांना आपल्या अनुभव घेण्याच्या पध्दतीला अनुरूप अशा नव्या भाषेची गरज वाटते. स्त्रियांची आपपासात संवाद साधण्याची एक विशिष्ट भाषा असते आणि ती उघडउघड बोलल्या जाणा-या पुरूषी भाषेपेक्षा निश्चितच वेगळी आहे. लोककथा व लोकगीते या मध्ये स्त्रियांच्या या वैशिष्टयपूर्ण भाषेची वेगळी झलक जाणवते. या भाषेत स्त्रीसंबंधित अशी अर्थपूर्णता असते. आपल्या स्त्रीविशिष्ट गुढ अनुभवांची अभिव्यक्ती करण्यासाठी स्वतंत्र प्रतिमासृष्टी निर्माण करून स्त्रीविशिष्ट शैलीची निर्मिती करता येऊ शकते. अशा नव्या भाषेची मागणी याचा अर्थ जुन्या भाषेला सर्वार्थाने नकार असा होत नाही. हा नकार फक्त पुरूषवर्चस्वी व स्त्रीला दूय्यम लेखना-या भाषिक वैशिष्टयांपूरताच संबधित मानायला हवा.

स्त्रियांच्या मुक्त लैंगिक आयुष्याच्या मागणीशी स्त्रीवादाला जोडले जाते. मूळात स्त्रीवाद हा स्त्रीला स्वैराचारी बनवण्याचे समर्थन करतो ही भूमिका गैरसमजातून निर्माण झालेली आहे. ॓ब्रा बर्निंग॔ या कृतीचा अर्थ विपर्यस्तपणे घेतला गेला. जागतिक व राष्ट्रीय पातळीवर होणा-या स्त्रीसौंदर्य स्पर्धा या स्त्रीला सुंदर व उपभोग्य वस्तू मानना-या पुरूषी वृत्तीच्या निदर्शक आहेत. या स्पर्धांमध्ये स्त्रियांच्या वक्षस्थळांची मोजमापे, उभारी यांना सौंदर्याचे निकष म्हणून महत्त्व देण्यात येते. ॓ब्रा॔ हे अंतर्वस्त्र ही उभारी आणण्यासाठी वापरले जाते. म्हणून या स्पर्धांचा निषेध करण्यासाठी पुरुषी दृष्टीने स्त्रियांचे सौंदर्य तथाकथितपणे वाढवणारे हे वस्त्र जाळून पुरुषी वर्चस्वाचा निषेध करण्यात आला. परंतु याचा अर्थ स्त्रिया स्वैराचारी झाल्या असा नव्हे. स्त्रीच्या सौंदर्यात पुरूष मानतात त्याप्रमाणे फक्त शारीरिकतेला महत्त्व नाही तर स्त्रीला एक माणूस मानून तिला समानतेची वागणूक देण्यासाठीच हे आंदोलन केले गेले.

कलावाद आणि जीवनवाद या वादात स्त्रीवाद कुठल्या बाजूने उभा राहतो हा प्रश्न मनोहरांनी विचारला आहे. मूळात वाङ्मयीन महत्ता ही वरीलपैकी नेमक्या कुठल्या निकषाने ठरते यावर साहित्यविश्वात मतभेद आहेत. कलावादी मूल्ये स्त्रीच्या माणूसपणाला मान्यता देतांना तिला लिंगसापेक्ष वागणूक देणे टाळतात काय याचा विचार होणे आवश्यक आहे. जीवनवादात जे जीवन अंतर्भूत मानले आहे त्या जीवनात स्त्रीला जोपर्यंत समानतेची वागणूक मिळत नाही तो जीवनवाद फक्त पुरूषी ठरतो. पुरूषी अहंपणाची पूटे जोपर्यंत एखाद्या विचारसरणीवर चढलेली आहेत तोपर्यंत अशी कोणतीही विचारसरणी स्त्रीवादाला जवळची ठरणार नाही.

फक्त स्त्री या भूमिकेतून लिहिण्याच्या अट्टहासापायी सक्षम जाणीवा व्यक्त करण्याची वाङ्मयीन क्षमता असूनही काही स्त्री लेखिकांचे अभिव्यक्तीरूप हे मर्यादित ठरते असा आरोप काही स्त्रीवादी लेखिकांच्या लेखनासंदर्भात केला गेला आहे. कुठल्याही लेखकाच्या अभिव्यक्तीचे वाङ्मयीन मूल्य त्या लेखकाने गहन जीवनाच्या सर्वस्पर्शी अंतरंगांना किती प्रमाणात न्याय दिला आहे या वरून ठरवले जाते. स्त्रीवादी लेखिकेने स्त्री म्हणूनच लिखाण करायला हवे असा स्त्रीवादाचा अट्टहास नाही. परंतु स्त्री म्हणून समाजपरिस्थितीने लादलेले जीवनानुभवच तेवढे स्त्रियांच्या लेखनातून व्यक्त होत असतील तर स्त्री भोवतालच्या सांस्कृतिक व सामाजिक परिवेशाचा तो परिणाम मानायला हवा. फक्त स्त्रीवादी म्हणूनच व्यक्त व्हायचे अशा अट्टहासातून कुठली लेखिका अभिव्यक्तीभोवती कुंपणे घालून घेईल असे वाटत नाही. आजच्या बदलत्या काळाच्या संदर्भात एक सर्वस्पर्शी सृजनकर्ती (॓सृजनकर्ता॔ हाच शब्द रुढ) म्हणून अभिव्यक्त होतांना काही लेखिका दिसून येतात. मेघना पेठे यांच्या कथेवर भाष्य करतांना आल्हाद गोडबोले म्हणतात, ॓या कथेवर ॓स्त्रीवादी॔ किंवा ॓स्त्रीकेंद्री॔ असा शिक्का मारणेही अन्यायाचे ठरेल, कारण ती स्त्रीइतकेच पुरूषाचे अंतरंगही लोहचुंबकाप्रमाणे भेदभाव न करता आपल्या कवेत घेऊन वाचकांपूढे उलगडत नेते. ती सर्वस्पर्शी आहे. बहुमित आहे. तिचा आवाकाच खूप मोठा आहे. तिच्या शब्दांमध्ये पोकळपणा नाही, तशी पात्रांमध्ये धुसरताही नाही.॔२३ हे विश्लेषण स्त्रीवादामुळे स्त्रियांचे लेखन मर्यादित राहील या आक्षेपाला उत्तर देणारे आहे.

स्त्रीवादी साहित्यविचार हा पाश्चात्य असल्याने तो भारतीय संस्कृतीच्या बाबतीत उपरा ठरतो हा आक्षेप अंशतः खरा असला तरी जगभरातील पुरूषसत्ताक पध्दती ही भारतातही अस्तित्वात आहेच. परिणामस्वरुप स्त्रीवादी विचार हा भारतातही गरजेचा ठरतो. स्त्रीवादाच्या पाश्चात्यपणावर टिका करणारे विचारवंत सगळे आधूनिक वाङ्मयच परभृत असल्याच्या घटनेकडे मात्र डोळेझाक करतात. एकूणच संस्कृतीभेदाच्या नावाखाली स्त्रीवादाला सर्वार्थाने नाकारण्यापेक्षा त्यावर भारतीय परीवेशाच्या संदर्भात योग्य ते संस्कार व्हायला हवेत. स्त्रीवादी विचारधारा ही मराठी वाङ्मयाच्या कोतेपणाला निष्प्रभ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

स्त्रीवादावरील या आक्षेपांचे अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी विवेचन केल्यानंतर स्त्रीवादाची तात्विक बैठक सुस्पष्ट झालेली दिसून येते. अभ्यासविषयाचे यापूढील विवेचन हे स्त्रीवादाची परभृतता आणि स्त्रीवादाच्य यशापयशाची स्वतंत्र अंगाने चर्चा करणारे असेल.

३.५ निष्कर्ष
१. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारांची मांडणी ही पाश्चात्य साहित्यातील स्त्रीवादी साहित्यविचारांच्या मूलभूत तत्वानुसारच झाली आहे. मराठी वाङ्मयक्षेत्रातून स्थलसापेक्ष अशी वेगळी बाजू या विचाराच्या बाबतीत मांडली गेलेली आढळून येत नाही.

२. साहित्यात रेखाटली जाणारी स्त्रीप्रतिमा ही तिच्या नैसर्गिक क्षमता व सामर्थ्यांना मर्यादित करु पाहणारी रेखाटली जाते काय? तद््वतच पारंपरिक प्रतिमांना नाकारणा-या, आदर्शांच्या दांभिक चौकटी भेदणा-या आणि समान दर्जाची मागणी करणा-या स्त्री पात्रांना वाङ्मयात कितपत अवकाश उपलब्ध आहे यावरून वाङ्मयाचा कस ठरवला जावा असे स्त्रीवादी वाङ्मयविचाराला अभिप्रेत आहे.

३. वर्तमानकालीन स्त्रीवादी मराठी वाङ्मय हे प्रामुख्याने स्त्रियांनी स्त्रियांच्या दुःखांविषयी, त्यांच्या भावभावनांविषयी व त्यांच्या समाजातील स्थानाविषयी तटस्थपणे केलेले फेमिनिन् या प्रकारात मोडणारे आहे.

४. स्त्रियांच्या दूय्यमतेचे चित्रण करण्याबरोबरच पुरुषवर्चस्वाशी विद्रोह करणा-या स्त्रीवादी साहित्याची लक्षणे मराठी वाङ्मयक्षेत्रातील मेघना पेठे, कमल देसाई, गौरी देशपांडे, प्रज्ञा लोखंडे, सानिया, आशा बगे, अनुराधा पाटील, नीरजा यांच्या कथा व काव्यवाङ्मयात आढळून येतात.

५. स्त्रीवाद हा स्त्रीचे मुक्त स्वैराचारी चित्रण करण्याचा परवाना असून मूळात स्त्रीमुक्ती ही राजकीय तसेच अवाङ्मयीन चळवळ असल्याचा आक्षेप घेतला जातो. स्त्रीवादावर अवास्तव, कलामूल्यांशी प्रतारणा करणारा, उपरा, उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांपूरता मर्यादित असल्याचेही आरोप केले गेले आहेत.

६. सखोल विचार करु पाहता स्त्रीवादी वाङ्मयविचार हा वाङ्मयातील एकांगीपणा दूर करणारा तसेच स्त्रीविश्वातील अनभिज्ञ बाजू समोर आणणारा व मराठी समीक्षेच्या कक्षा रुंदावणारा असल्याचे लक्षात येते. स्त्रीवादातील वर्गवाद, परभृतता हे आक्षेप मात्र पूर्णतः नाकारता येत नाहीत.

३.६ संदर्भ व टिपा
१. धोंगडे डॉ.अश्विनी, स्त्रीवादी समीक्षा स्वरुप आणि उपयोजन, दिलिपराज प्रकाशन प्रा.लि. पुणे, प्रथमावृत्ती, १९९३, पृ.७६.

२. भागवत विद्युत, महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चळवळींचा आढावा, परामर्श, खंड १, मे १९८९, पृ.३७.

३. शिंदे उषा रावसाहेब, विभावरी शिरुरकर यांंचे वाङ्मय- स्त्रीवादी आकलन, अमृत प्रकाशन, कळवण, प्रथमावृत्ती, १९९५, पृ.२४.

४. तत्रैव, पृ.२५.

५. सोमण डॉ.अंजली, स्त्रीवादी मूल्यदृष्टी आणि साहित्य (लेख), मूल्यसंकल्पना आणि साहित्यविचार, डॉ.बाळकृष्ण कवठेकर गौरवग्रंथ (संपा. प्रकाश मेदककर), कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, पृ.२२२.

६. वरखेडे मंगला, स्त्रियांची नवकथा- वाटा आणि वळणे, पृ.२६.

७. सोमण डॉ.अंजली, उनि., पृ.२१७.

८. देशपांडे गौरी, आहे हे असं आहे, मौज प्रकाशन गृह, मुंबई, तिसरी आवृत्ती, २०००, पृ.१५९-१६७.

९. पेठे मेघना, हंस अकेला, राजहंस प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, २००२, पृ.१-२३.

१०. आठलेकर मंगला, अंतर्नाद, उर्मी प्रकाशन, जुलै, १९९८.

११. सोमण डॉ.अंजली, उनि., पृ.२२२.

१२. मराठे संजीवनी यांची सरीता पदकी यांनी घेतलेली मुलाखत, कवितारती, जाने./फेब्रु.९१.

१३. गरुड डॉ.श्यामल, साठोत्तर स्त्रीआत्मचरित्र(लेख), स्त्रीसाहित्य आणि समरसता, समरसता साहित्य परिषद, मुंबई, प्रथमावृत्ती, २००३, पृ.७६.

१४. तत्रैव, पृ.८०.

१५. गणोरकर डॉ.प्रभा, अध्यक्षीय भाषण, ५वे समरसता साहित्य संमेलन, विषय- स्त्रीसाहित्य आणि समरसता, समरसता साहित्य परिषद, मुंबई, प्रथमावृत्ती, २००३, पृ.४१-४२.

१६. कवठेकर प्रा.बाळकृष्ण, वाङ्मयीन चर्चा आणि चिकित्सा, नवसाहित्य प्रकाशन, बेळगाव, १९७८, पृ.६१/६२.

१७. वरखेडे मंगला, उनि., पृ.१६-१७.

१८. कित्ता.

१९. मनोहर डॉ.यशवंत, नवे साहित्यशास्त्र, विजय प्रकाशन, नागपूर.

२०. पवार गो.मा., मराठी नवकथा आणि त्यानंतरची कथा, प्रतिष्ठान, मार्च/एप्रिल, १९९२, पृ.६.

२१. रसाळ डॉ.सुधीर, अध्यक्षीय भाषण, दिंडी (स्मरणिका), २४वे मराठवाडा साहित्य संमेलन, लातूर, जाने.२००३.

२२. वरखेडे मंगला, उनि., पृ.२३.

२३. गोडबोले आल्हाद, महाराष्ट्र टाईम्स, १६ अॉग. १९९८.
***

1 comments:

Unknown म्हणाले...

great work sir.......salam 1ka utkrushth lekhkala.....I can't say in word....