घाव अजुनी...

रविवार, २२ मार्च, २००९

स्त्रीवाद : तत्त्वे व स्वरुप

प्रकरण २ रे
प्रस्तावना
आधुनिक मराठी वाङ्मयातील विविध चळवळी व प्रवाहांमध्ये स्त्रीवादी साहित्यप्रवाह हा स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेला एक महत्त्वाचा प्रवाह आहे. स्त्रीवादी साहित्याच्या या मुख्य अभ्यासविषयाच्या विवेचनाची पार्श्वभूमी म्हणून वाङ्मयिन चळवळी व प्रवाहांचा आढावा घेतल्यानंतर त्याचीच पूढची पायरी म्हणून स्त्रीवादी वाङ्मयविचाराची तत्त्वे व स्वरूप यांची ओळख या प्रकरणात करून घ्यावयाची आहे.


मराठी वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यविचार अशी संकल्पना रुजल्यावर तत्पूर्वीच स्त्रीवादी विचाराशी नाते सांगणारे बहूविध स्वरूपाचे लेखन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचे सविस्तर विवेचन प्रस्तूत करण्यावर या प्रकरणात भर देण्यात आला आहे.

स्त्रीवादी लेखन जरी १९४० ते १९५० च्या दशकांदरम्यान होऊ लागले तरी स्त्रीवादाची तात्त्विक बैठक ही मात्र १९७० च्या दशकाच्या आसपास मराठी वाङ्मयात स्विकारली जाऊ लागली. मराठी वाङ्मयातील या स्त्रीवादाच्या तत्त्वांचे विवेचन आणि या तत्त्वांच्या पार्श्वभूमीवर जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादी वाङ्मयविचाराचा आढावा हा या प्रकरणाचा मुख्य गाभा आहे.

मराठी वाङ्मयातील वर्तमानकालिन स्त्रीवादी विचाराला मिळालेली वेगवेगळी वळणे आणी त्या अनुषंगाने मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी गणल्या जाणा-या साहित्याचे स्वरुप या पूढील प्रकरणातील आशयसुत्रांकडच्या प्रवासाला प्रस्तूत प्रकरणातील विवेचनाने दिशादर्शन करणे सुलभ होईल.

२.१ स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा व पार्श्वभूमी.
स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा व पार्श्वभूमीचा विचार करतांना अर्थातच जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यचळवळीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. स्त्रीवादी साहित्य हे भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्याच्या बरोबरीनेच उदयास आलेले आहे. या स्त्रीवादी लिखाणाच्या प्रेरणास्थानी मात्र जगातील स्त्रीवादी विचार होता असे म्हणता येत नाही. या काळात लोकहितवादी, न्या.रानडे, म. फुले, आदींनी केलेले स्त्रीवादी लिखाण हे भारतीय संस्कृतीतील अन्यायी पुरुषप्रधानतेच्या अनुषंगाने केलेले होते. १९६० नंतर मराठीत जे स्त्रीवादी लिखाण झाले त्याची प्रेरणा मात्र भारतीय संस्कृतीला विरोध करण्यातून व त्याचबरोबर जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली दिसून येते. म्हणजेच स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणांचा विचार हा १९६० नंतरच्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा व १८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा अशा दोन अंगांनी या ठिकाणी करणे आवश्यक ठरते.

मराठी वाङ्मयाचा आधुनिक कालखंड साधारणतः १९२० पासून मानला जातो. महाराष्ट्रात जे काही आधुनिक म्हणून आले त्याचे कारण म्हणून आपल्याला अपरीहार्यपणे पून्हा पून्हा इंग्रजी राजवटीकडे निर्देश करावा लागतो. १८५० पासून ते विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत जे काही सुधारणावादी लेखन झाले त्यात प्रामुख्याने हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर टिका करणा-या लेखनाचे प्रमाण अधिक होते. या सर्व समतेचा पुरस्कार करणा-या लेखनाबरोबरच स्त्रीला माणूसपणाची वागणूक दिली जावी अशा आशयाची मागणी करणारे त्याचबरोबर स्त्री ही पुरुषापेक्षा दुय्यम का असा प्रश्न विचारणारे लेखन या कालखंडात काही स्त्री लेखिकांकडून व विशाल विचारसरणीच्या सुधारणावादी पुरुषांकडून लिहिले गेले.

या काळातील एकूणच स्त्रीवादी म्हणाव्या अशा लेखनाची प्रेरणा ही शिक्षणातून, खुल्या विचारातून आलेली दयाबूध्दीच अधिक होती हे या ठिकाणी स्पष्टपणे नमुद करायला हवे. दलित वर्गाच्या अन्यायाबद्दल खुलेपणाने बोलणे टाळण्याचा दांभिकपणा या काळातील मोठया म्हणवल्या जाणा-या समाजसुधारकांकडून केला गेला. दलितांना शिक्षण देऊन त्यांना बरोबरीची वागणूक देण्याआधी इंग्रजांना देशाबाहेर हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे अधिक महत्त्वाचे असल्याची हाकाटीही या काळात पिटली गेली. ॓शुद्रांना, कुणब्यांना कशाला हवे शिक्षण?॔ असा अप्पलपोटेपणाचा प्रश्न मांडतांना या सुधारकांनी घरातील स्त्रियांना मात्र ज्ञानाचा हा तिसरा डोळा फारशी खळखळ न करता मिळवून दिला. उच्चवर्गातील या स्त्रियांना शिक्षणामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे महात्म्य कळाले आणि त्यांच्या लेखनातून सुरुवातीच्या काळात गा-हाण्यांच्या स्वरुपात स्त्रीची दुःखे मांडली जाऊ लागली. स्त्रीवादी वाङ्मयाची ही मराठी साहित्यातली सुरुवात होती. शेतकरी, कष्टकरी व शुद्र वर्गातील स्त्री जरी या वाङ्मायाच्या विषयाच्या आसपासही नसली तरी मराठीत आज विस्तृतता प्राप्त केलेल्या स्त्रीवादी साहित्याची मुहूर्तमेढ म्हणून या लिखाणाचा विचार करायला हवा.

स्त्री म्हणून मिळालेल्या पशूपातळीवरच्या वागणूकीची परंपरा आणि शिक्षणातून आलेले भान यांच्या संघर्षातून प्रज्वलित झालेली ॓स्व॔ची जाणीव ही या स्त्री साहित्याची मुख्य प्रेरणा होती. प्राचीन काळी मातृसत्ताक पध्दती अस्तित्त्वात होती. या पध्दतीत स्त्रियांचा दर्जा हा पुरुषांपेक्षा वरचा मानला जात असे. मुलाचा पिता कोण यापेक्षा माता कोण याला मातृवंशात महत्त्व होते. पूढील काळात समाज जसजसा प्रगत होत गेला तसतशी कुटूंबभावना, समुहभावना वाढीस लागली. अग्नी व शेतीच्या शोधानंतर मानवी जीवनात स्थिरता आली. पुरूषाकडे शारीरिक कष्टाची, संरक्षणाची कामे व स्त्रीकडे घरकामे अशी विभागणी झाली. यातून पुरुषवर्गाचे वर्चस्व वाढत गेले. स्त्री ही पुरुषाची खाजगी मालमत्ता बनली आणि येथूनच स्त्रीच्या गुलामगिरीचा इतिहास सुरू झाला. आपला वंश शुध्द रहावा म्हणून पुरुषांनी स्त्रीवर अनेक बंधने लादली. अनेक स्त्रियांना पत्नी म्हणून बाळगणे, स्त्रिया पळवणे, त्यांची अब्रू लुटणे या बाबी शौर्याचे लक्षण मानल्या जाऊ लागल्या. पुराणकारांनी अनेक भाकडकथा व दैवतकथा रचून स्त्रीला मानसिक गुलाम बनवले. पुरुषाची दासी म्हणून राहणे यातच स्त्रीजन्माचे सार्थक आहे या विचारातून आजही स्त्री पूर्णतः मुक्त झालेली नाही. स्त्रियांच्या आणि एकूणच भारतीय समाजातील गुलामीच्या या मजबूत तटबंदींला इंग्रजांच्या बरोबरीने आलेल्या आधुनिक शिक्षणाने पहिला हादरा दिला.

इंग्रजी राजवटीच्या काळात समाजसुधारणेच्या चळवळीचे बीज रोवल्या गेले. इंग्रजी भाषेच्या शिक्षणातून इंग्रजीतील पाश्चात्य विचारांचा प्रभाव भारतातील पहिल्या सुशिक्षित पिढीवर पडला. समानतेचा विचार मूळ धरू लागला. अनेक समाजसुधारकांनी शुद्र व कष्टक-यांच्या व्यथांबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली.

सतीच्या चालीविरुध्द आंदोलन करणारे राजाराम मोहनराॅय हे पहिले कृतीशिल स्त्रीवादी विचारवंत म्हणून पुढे आले. सती प्रथेबरोबरच स्त्रियांवर होणा-या सर्वच प्रकारच्या अन्यायाविरुध्द त्यांनी आंदोलन छेडले. मृत पतीच्या मालमत्तेत मुलांसोबत पत्नीलाही वाटा मिळाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. त्यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार केला. समाजातील स्त्रियांची गुलामी ही पुरूषांच्या अहंकारामुळे निर्माण झालेली असुन जोपर्यंत त्या शिक्षण घेत नाहित तोपर्यंत ही गुलामी नष्ट होणार नाही. असे विचार राजाराम मोहनराॅय यांनी मांडले.

गोपाळ हरी देशमुख यांनी सुध्दा आपल्या शतपत्रांमधून स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. लोकहितवादी या नावाने १८४८ ते १८५० या दोन वर्षात त्यांची शतपत्रे प्रभाकर मासिकातून प्रसिध्द झाली. पुरुषांना पुनर्विवाहाची परवानगी असेल, तर स्त्रियांनाही पुनर्विवाहाची परवानगी असली पाहिजे असे लोकहितवादींचे म्हणणे होते. त्यांनी विधवांच्या केशवपन करण्याच्या प्रथेवरही कडाडून टीका केली. काडीमोड करायचा झाल्यास तो पती-पत्नीच्या संमतीनेच झाला पाहिजे. पती जर पत्नीचा छळ करत असेल तर तिला पतीपासून विभक्त होता आले पाहिजे आणि अशा प्रकरणात तिला पोटगी मिळाली पाहिजे, असा विचार लोकहितवादींनी मांडला.

बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३४ मध्ये ॓दर्पण॔नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. आपल्या सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा उपयोग करून घेतला. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रियांवर होणारे अन्याय या विरोधात त्यांनी समाजजागृती केली. ॓बाळशास्त्री जांभेकर यांनी १८४० मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून विधवाविवाहास अनुकूल असे पुस्तक लिहून घेतले होते.॔१

महादेव गोविंद रानडे हे सुधारक विचारवंतही स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या काळी गाजलेल्या रखमाबाई विरुध्द दादाजी ह्या खटल्यात कोर्टाने रखमाबाईने शिक्षा भोगावी किंवा स्वतःच्या मनाविरूध्द नव्या नव-याकडे नांदावे असा पर्याय ठेवला होता. तेव्हा म.गो.रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभेत भाषण देऊन ॓आपला पुरुषार्थ केवळ स्त्रियांशी वागतांनाच दाखवणा-या पुरूषवर्गावर जोरदार टिका केली व स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार केला होता. विवाहयोग्य ठरण्याची मुलामुलींची किमान वयाेमर्यादा कायद्याने ठरवली पाहिजे, सरकारी यंत्रणेने परवानगी दिल्यानंतरच विवाहविधी केले पाहिजेत, वृध्दांनी कुमारीकांशी विवाह करू नये अशी आग्रहाची मागणी करणारे विचार रानडे मांडलेले दिसून येतात.

गोपाळ गणेश आगरकरांनी १८८८ मध्ये सुधारक हे वर्तमानपत्र काढले. ॓सुधारकात लिहिलेल्या स्वयंवर, विवाहनिराकरण(घटस्फोट), प्रियाराधना अशा निंबंधांमधून स्त्रीजीवनीसंबंधी सुधारणा आगरकरांनी सुचविल्या आहेत.॔२ त्यांनी बालविवाहाची चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले. स्वयंवर पध्दतीनेच विवाह व्हावा असा त्यांचा आग्रह होता. स्त्री पुरुषांच्या समान स्वातंत्र्याची व समान संधींची मागणी आगरकरांनी केली होती.

या सर्व सुधारकांच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतीराव फुले यांचे विचारकार्य स्त्रियांच्या आत्मसन्मानाला जागृत करणारे आणि तत्कालिन स्त्रीसाहित्याला प्रेरणा देणारे ठरलेले दिसून येते. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पत्ना सावित्रीबाई यांना घरी शिकवून शिक्षिका बनवले. स्त्रीशिक्षण म्हणजे अनैतिकता व सामाजिक अनाचाराला निमंत्रण आहे. असा दांभिक तत्कालिन सनातनी वर्गाने केला. त्यांनी सावित्रीबाईंना दगड व शेण फेकून मारले. जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणून त्यांनी जोतीबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यास भाग पाडले. पण जोतीरावांनी सर्व विरोधांवर मात करुन मुलींसाठी आणखी शाळा काढल्या. शिक्षण मिळाल्याने कशी जागृती येते याचे प्रत्यंतर जोतीरावांच्या शाळेत शिकणा-या मुक्ता नावाच्या मांग समाजाच्या मुलीने वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेल्या (इ.स.१८५५) एका निबंधातून मिळते. हा निबंध अहमदनगर येथून प्रकाशित होणा-य ज्ञानोदय पत्राने छापला होता. त्यात ती म्हणते, ॓ब्राह्मण लोक म्हणतात, की इतर जातींनी वेद वाचू नयेत याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही. इंग्रजी राज्यापूर्वी उच्चवर्गातील लोकांचा अपराध केला असता महार व मांगांचे डोके मारीत असत. गुलटेकडीच्या बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती, ती आता मिळाली.॔ या देशातील स्त्रीमुक्तीचा हा पहिला उद्गार होता.३

महात्मा फुले यांनी १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून मोठमोठाली पोस्टरे गावभर सर्वत्र लावली. अडचणीत सापडलेल्या विधवांनी तेथे यावे आपल्या मुलांना जन्म द्यावा. त्यांची नावे जाहीर होणार नाहित. जातांना त्यांनी मुल घेऊन जावे किंवा ठेऊन जावे. अनाथाश्रमात त्यांच्या मुलांचे संगोपन केले जाईल अशी सोय जोतीरावांनी केली होती.४ विधवांचे केशवपन होऊ नये म्हणून त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला. लग्नाला अनेक वर्षे होऊनही त्यांना मुलबाळ नव्हते तेव्हा वडीलधा-यांनी त्यांना दूसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. पण जोतीरावांनी त्याला ठाम नकार दिला. स्त्रीला जर अपत्यप्राप्तीसाठी दुसरा नवरा करता येत नाही तर पुरुषाला तरी दुसरी पत्नी करण्याचा अधिकार का असावा? असा प्रश्न त्यांनी केला.५ या व अशा अनेक मूलभूत पातळीवरच्या सारासार विचारातून जोतीबी फुले यांनी स्त्री पुरूष समतेचा पुरस्कार केला. तत्कालिन स्त्रीलेखिका मागे उल्लेख आल्याप्रमाणे जरी फक्त उच्चवर्गातून आलेल्या व उच्चवर्गातील स्त्रियांचे प्रश्न मांडणा-या होत्या तरीसुध्दा त्यांनाही आप्तस्वकीयांच्याच प्रखर रोषाला सामोरे जावे लागले. या स्त्रीवादी साहित्याच्या पहिल्या हूंकाराच्या पाठीशी आपल्या विचाराचे पाठबळ समर्थपणे उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य जोतीबांनी केले. ॓विख्यात विदूषी पंडीता रमाबाईंना मराठी पत्रकर्त्यांनी दिलेली दुषणे खोडून टाकण्यासाठी, तसेच बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या स्त्री पुरूष तुलना नामक पुस्तकावरील ॓पुरुषी॔ पुर्वग्रहदुषित टिका परतून लावण्यासाठी ॓सत्सार॔या आपल्या अनियतकालिकाचा विशेष अंक जोतीरावांनी काढला आणि संवादरूपाने त्यांनी त्यातून स्त्रीमुक्तीचा संदेश सांगितला॔६ सारांशाने १८८५ ते १९५० या काळात मराठी वाङ्मयात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी साहित्याची प्रमुख प्रेरणा म्हणून जोतीबा फुले यांच्या विचारकार्याचा मोठा वाटा आहे.

महात्मा जोतीबा फुले यांच्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला महात्मा गांधी यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाची ठेवलेली जाणीव ही या काळातील स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा म्हणून निर्देशित करावी लागेल. आॅल इंडीया वुमेन्स काॅन्फरन्सला पाठविलेल्या आपल्या संदेशात महात्मा गांधी म्हणतात, ॓जिला आपण अबला म्हणतो ती स्त्री ज्या क्षणी सबला होईल त्या क्षणी जे कोणी असहाय आहेत ते सर्व शक्तिमान होतील.॔७ गांधीजींनी या विचारधारेला अनुसरूनच स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसबलीकरणाचा पुरस्कार केला. विनोबा भावे, महर्षी कर्वे यांनीही स्त्रीमुक्तीचा पुरस्कार केला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रीला हिंदू पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून ॓हिंदू कोड बील॔ तयार केले होते. या बीलाचा आग्रह नाकारल्या गेल्याने त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दलित स्त्रियांनी आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. डाॅ. धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेबरोबर विवाह केला आणि तिला स्त्रीशिक्षणाच्या कार्यात सहभागी करुन घेतले. १९०६ साली त्यांनी महिला महाविद्यालय सुरू केले. १९१६ साली महिलांसाठी महिलांसाठी भारतवर्षीय महिला विद्यापीठ सुरू केले.

महात्मा फुले यांच्यानंतर स्त्रीवादी साहित्याला प्रेरणा ठरणारे विचारकार्य करणा-यांमध्या विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता. आपल्या व्याख्यानांमधून, वेळोवेळी केलेल्या लिखाणांमधून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एकंदरीत मानवी विकासक्रमात स्त्रीचे असलेले महत्त्वाचे स्थान त्यांनी अतिशय सखोल अशा चिंतनातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यामध्ये मानवी जगाच्या इतिहासाच्या आरंभी घरात व समाजातही स्त्रीला अधिकाराचे राज्य होते. त्या काळी स्त्रीसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. त्या काळात स्त्रीजवळ आजच्या प्रमाणे असलेल्या भावनांसोबतच उपजत बुध्दी, विवेचक बुध्दी व प्रयत्नशक्ती असली पाहिजे. नंतरच्या काळात घडत गेलेल्या सामाजिक स्थित्यंतरांमुळे स्त्रीसत्ताक पध्दती लयास जाऊन पुरूषवर्चस्व निर्माण झाले. आणि पुरूषप्रधानतेमुळे स्त्रीच्या ठायी विवेचक बूध्दीचे आणि प्रयत्नसामर्थ्याचे खच्चीकरण होऊन स्त्रियांनी पुरूषांपूढे गौणत्व स्वीकारले असावे. असे असले तरी फक्त पाळण्याचीच नव्हे तर घरगुती राज्याची दोरी स्त्रीच्याच हाती आहे. स्त्रीला केवळ शिष्टाचारयुक्त वागण्यात मान दिल्याने स्त्रीला समानतेने वागवले असा त्याचा अर्थ होत नाही. स्त्रीच्या विवेचक बुध्दीत म्हणजेच विचारशक्तीत वाढ घडवून सामाजिक जडणघडणीत तिला क्रियाशील बनवायचे असेल तर तिला खरेखुरे स्वातंत्र्य द्यायला हवे असे आग्रहाचे प्रतिपादन वि.रा. शिंदे यांनी केले.

१९२० मध्ये मुंबई इलाख्यातील निवडणूक लढवितांना शिंदे यांनी आपला जाहिरनामा प्रसिध्द केला. या जाहिनाम्यात विद्याबळ, द्रव्यबळ व अधिकारबळ नसलेल्या व म्हणून मागास राहिलेल्या वर्गामध्ये त्यांनी स्त्रीवर्गाचा समावेश केला. स्त्रीवर्गाच्या हिताची कळकळ व स्त्रीवर्गाचे महत्त्व नमूद करतांना त्यांनी जाहिरनाम्यात म्हटले आहे, की ॓चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहिच लागले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणारांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्री वर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्याची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही पूर्णपणे जाणून आहो.॔८

सारांशाने इंग्रजी राजवटीमूळे झालेली आधुनिक जाणीव, शिक्षणाने व नव्या विचाराने जागृत झालेला आत्मसन्मान आणि वरील सर्व समाजसुधारकांच्या विचारकार्याच्या पाठबळाने स्त्रियांच्या व पुरुषांच्याही स्त्रीवादी लेखनाला चालना मिळाली. रमाबाई रानडे, पार्वतीबाई आठवले, लक्ष्मीबाई टिळक, संजीवनी मराठे, शांता अापटे, आनंदीबाई कर्वे, लिलाबाई पटवर्धन, अन्नपूर्णाबाई रानडे, इंदिरा भागवत आदी स्त्रियांनी प्रामुख्याने आत्मचरित्र, कथा व स्फुट लेखनातून स्त्रियांचे भावविश्व उलगडले. स्त्रीवादी विचाराचे लेखन करण्यात सुधारक विचारवंत पुरूषांनी जे धाडस दाखवले ते धाडस दाखवणे साहित्यिक वर्तुळातल्या पुरुषांना मात्र अपवादानेच जमल्याचे आढळून येते. गाे.ब.देवल (संगीतशारदा), प्र.के.अत्रे (घराबाहेर), कृ.प.खाडीलकर(मेनका) अशा काही नाटककारांनी स्त्रीवादी विचारांची नाटयरचना केली. ॓कृ.प.खाडीलकर यांच्या मेनका या नाटकात स्त्रीच्या मातृत्वाच्या हक्काचा प्रश्न चर्चिला गेला आहे. पण खाडीलकर स्त्रीच्या मातृत्वाच्या अधिकाराची मांडणी देशकार्याच्या पूर्तीच्या उद्दीष्टांशी जोडून करतात.९

पुरूष समाजसुधारक आणि पूरोगामी साहित्यिक यांचा स्त्रियांच्या प्रश्नावर लढा सुरू असतांनाच स्त्रियांनीही आपल्या प्रश्नांवर लेखन करण्यास सुरूवात केली. शिक्षणामुळे आलेले आत्मभान आणि याच काळात महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत घेतलेला स्त्रियांचा सहभाग यातून स्त्री लेखिकांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. स्त्रियांनी कथालेखनाच्या माध्यमातून आपल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त केले. स्त्रियांनी आत्मचरीत्र हा प्रकारही विपूल प्रमाणात हाताळला. स्त्रियांनी लिहिलेल्या आरंभीच्या आत्मचरीत्रांमध्ये पारंपरिक स्वरुपाचेच विचार मांडलेले दिसून येतात. हौस म्हणून किंवा दुःख विसरण्याचा मार्ग म्हणून बहूतांशी उच्चमध्यम वर्गातील स्त्रियांनी ही आत्मचरीत्रे लिहिली.

ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्रीपूरूषतुलना या पुस्तिकेतील लिखाणातून काळाच्या मानाने अतिशय परखडपणे आपले विचार व्यक्त केले. ताराबाई शिंदे यांनी स्त्रीचे विविध स्तरावर होणारे शोषण, पुरुषसंस्कृतीची वर्चस्व राखण्याची रानटी वृत्ती यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रहार केले. ॓नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानुन कोण बरे वागेल ?॔ असा सवाल ताराबाई शिंदे यांनी आपल्या लेखनातून केला आहे.१०
१९५० पर्यंतच्या मराठी वाङ्मयात स्त्रीवादी विचारांची पात्रे परखडपणे चित्रीत करण्याचे धाडस विभावरी शिरुरकर यांनी सर्वप्रथम केले. विभावरी शिरुरकर यांचा ॓कळ्यांचे निःश्वास॔ हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्य लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. ॓कळ्यांचे निःश्वास॔ कथासंग्रहातील ॓हिंदोळ्यावर॔ या कादंबरीतील नायिका या व्यक्तीस्वातंत्र्याच्या प्रखर जाणीवांचा आविष्कार करतात. ॓व्यक्तीस्वातंत्र्य + वास्तववाद अशा प्रेरणा एकत्रीत जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या.११ विभावरींचे हे लेखन पुढे जागतिक वाङ्मयाच्या प्रेरणेतून १९६० नंतर मराठी वाङ्मयात उदयास आलेल्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहाच्या प्रेरणांमध्ये विभावरींच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

१९६० नंतर जागतिक वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यविचाराने जोर धरला. मराठीतही त्यामानाने ब-याच लवकर साधारणतः १९७० च्या दशकात जागतिक स्त्रीवादी वाङ्मयविचाराने प्रेरीत होऊन स्त्रीवादी लेखन होऊ लागले. भारतीय समाजसुधारक, १९५० पर्यंतचे विभावरी शिरूरकर, ताराबाई शिंदे आदींचे लेखन व विचारकार्य आधुनिक युगाचा मूळधर्म ठरलेला वास्तववाद, मार्क्सवादी विचारधारा, दलित साहित्याची चळवळ, साक्षरता मोहीम, स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण अशा अनेक विचार व घटनाक्रमांच्या प्रेरणेने मराठी वाङ्मयात नवा स्त्रीवाद अवतरला.

२.२ स्त्रीवादाची तत्त्वे
भारतातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या विचारमंथनातून स्त्रीवादी विचार हळूहळू साकार झालेला दिसून येतो. जोतीबा फुले, कर्वे यासारखे काही मोजके समाजसुधारक अपवाद केले असता इतरांनी स्त्रीवादी विचार हा काहिसा भिडस्तपणाने, पारंपरिक विचाराची फारशी मोडतोड न करता याची दांभिक दक्षता घेत मांडलेला दिसून येतो.

आपल्या देशातील स्त्रीवाद ख-या अर्थाने स्वातंत्र्याेत्तर काळात आणि त्यातल्या त्यात सत्तरच्या दशकानंतर उदयास आलेला दिसून येतो. इंदिरी गांधी भारताच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्याची एक लक्षणीय राजकीय घटना या काळात घडून आली. या घटनेतही इंदिरा गांधींमधले नेतृत्वगुण, मुसद्देगिरी आणि सबळ राजकीय पार्श्वभूमी प्रामुख्याने कारणाभूत होती. पंतप्रधान पदावर स्त्री विराजमान झाली याचा अर्थ समाजमनातील पुरूषवर्गाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता असे या ठिकाणी म्हणता येणार नाही.

स्वातंत्र्याेत्तर काळात स्त्रीला स्वतःच्या नव्या रुपाची, आत्मभानाची जाणीव होण्यामागे अनेक घटना प्रसंग, संस्था संघटना कारणीभूत होत्या. या घटनांच्या यादीत इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याच्या घटनेला अर्थातच महत्तवाचे स्थान द्यावे लागेल. या काळातील चळवळी, सत्याग्रह, आंदोलने यातूनही स्त्रीमन हळूहळू बदलत गेले. स्वातंत्र्योत्तर काळातल्या साठच्या दशकात जी नवी सुशिक्षित पिढी उदयास आली या पिढीचे प्रतिनिधित्व करणा-यांमध्ये स्त्रियांच्या प्रमाणाचा आलेखही अर्थातच चढता होता. पारंपरिक शिक्षणप्रणालीत बरेच अमुलाग्र बदल घडून आलेले होते. परिणामस्वरूप स्त्रियांना पुरूषांप्रमाणेच शिक्षणासाठी कुटुंबापासून, घरापासून दूर रहावे लागले. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात शिरलेल्या स्त्रियांनाही या अनुभवाचा सामना करावा लागला. एकटे राहून शिक्षण घेण्यासाठी सहाध्यायी मुली असणे अथवा वस्तीगृहाची सोय अशा बाबी अल्पस्वल्प प्रमाणात उपलब्ध होत्या. परंतु नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी एकटे राहण्याच्या प्रसंगाचा सामना करतांना मात्र स्त्रीविषयी समाजाचे असलेले ॓मत॔ प्रकर्षाने उघडे पडत गेले. याच काळात स्त्रिया अल्पप्रमाणात का होईना पोलिसदलात सहभागी होऊ लागल्या. स्त्रियांचा पेहराव बदलला. नव्या फॅशनचे कपडे वापरात येऊ लागले. स्त्रिया वाहन चालवू लागल्या. शिक्षण क्षेत्रातही मुलींची लक्षणीय प्रगती होऊ लागली. वृत्तपत्रांच्या बातम्या व इतर प्रसिध्दीमाध्यमातून स्त्रीचे कर्तृत्व उजेडात येऊ लागले. स्वातंत्र्याेत्तर काळात स्त्रियांच्या शोषणाविरूध्द, त्यांच्यावर होणा-या अन्यायाविरूध्द अनेक कायदे केले गेले. पुरूषांनी विविध घटनांमध्ये स्त्रियांवर केलेला अन्याय उजेडात येऊन पुरूषांना अारोपीच्या पिंज-यात उभे केले गेले. परपुरुषांच्या संबंधाने गरोदर राहणा-या अविवाहित पापिण ठरवण्यात धन्यता मानणारा समाज पुरूषाच्या वासनावृत्तीवर कडक ताशेरे ओढण्यास धजावू लागला. ठिकठिकाणी उघडकीस येणारी वासनाकांडे, स्त्रियांचे शोषण या सारख्या घटनांमध्ये पुरुषांवर टिका होऊ लागली. स्त्रियांना जाळून मारण्याच्या घटना, वेश्याव्यवसायासाठी स्त्रियांची होणारी खरेदी-विक्री, सामुहिक बलात्काराच्या घटना, स्त्रियांच्या वाढत्या आत्महत्या यासारख्या घटनांवर आंदोलने करण्याच्या भूमिकेतून नवनवीन स्त्री संघटना उदयास आल्या. या स्त्रीसंघटनांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर आंदोलने करतांना वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून आपल्या देशात स्त्रीवादाचा उदय झालेला दिसून येतो.

आपल्या देशातील स्त्रीवादाचे नेमेके स्वरुप व स्त्रीवादाच्या नेमक्या तत्त्वांची ओळख करुन घेण्यापूर्वी आपल्या देशातील, समाजातील स्त्रीचे नेमके स्थान आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतात स्त्रीला पूर्वापार दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहण्यापेक्षा तिला स्त्री म्हणून पाहिले जाते. जन्माला येण्यापासून तिच्यावर बाईपण लादले जाते. मूळातच आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छाच कोणत्याही स्त्रीची नसते. एकाच घरात भाऊ-बहीण म्हणून वाढणा-या दोघांना वागवण्यात जन्मदात्री स्त्री भेदभाव करते. मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून वाढवला जातो तर मुलगी ही परक्याचे धन म्हणून जोपासली जाते. त्याच कारणाने लहान मुलीचे अजाण अवस्थेतले, को-या पाटीसारखे असलेले मन हे तिला आदर्श गृहीणी बनवण्याच्या हेतूनेच घडवले जाते. मुलींनी नजरेला नजर देऊ नये, हळू आवाजात बोलावे, डोक्यावरचा पदर पडू देऊ नये, स्वयंपाक कसा करावा, कपडे कसे धूवावेत, भांडी कशी घासावीत, नटावे कसे, बसावे कसे, उठावे कसे, पुरूषांची मर्जी कशी राखावी या सारख्या सल्ल्यांचे अखंड पारायण मुलीच्या घडत्या वयात त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात असते. मुलींनी जाड होऊ नये म्हणून कमी खावे, कमनिय, सुंदर दिसावे, आदर्श बहीण, प्रेयसी, पत्नी, आई, वहीनी व्हावे. त्यातच त्यांच्या जन्माचे खरे सार्थक आहे हे मुलींच्या मनावर बिंबवले जाते. सीता, द्रौपदी, राधा, मीरा, गांधारी, सती सावित्री अशा पारंपरिक स्त्रीव्यक्तीरेखांची उदाहरणे त्यांना वारंवार दिली जातात. एकूण स्त्रीच्या जन्माचे सार्थक पुरूषांना, समाजाला अभिप्रेत असणारी ॓स्त्री॔ बनण्यात, कुणाची तरी पत्नी, प्रेयसी, बहीण किंवा आई असण्यातच आहे असे साचेबंद विचार पेरून स्त्रीचे व्यक्तिमत्त्व घडवले जाते.

स्त्रीवादाचे प्रारंभिक व मूलभूत तत्त्व म्हणजे स्त्रीला या सर्व सामाजिक दांभिकतेची जाणीव होऊन स्वतःच्या माणूस म्हणून असणा-या अस्तित्त्वाची ओळख होणे हे होय. पारंपरिक विचाराच्या कुठल्याही स्त्रीला आपल्याला पून्हा हा स्त्रीचा जन्म लाभावा अशी ईच्छा होणे शक्य नाही. ॓सात जन्म हाच पती मिळावा॔ ही स्त्रीकडून केली जाणारी अपेक्षा ही पुरूषीवर्चस्वाखाली स्त्रीने स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक ठरते. स्त्री वादाच्या तत्त्वात नेमके हेच बसत नाही. स्त्रीला स्त्री म्हणून नव्हे तर एक मााणूस म्हणून स्वतःच्या व्यक्तित्त्वाचा अर्थ कळायला हवा. तिला तिचे माणूस म्हणून असणारे हक्क कळायला हवे आणि स्त्रीत्वाला आपले दूर्देव मानणा-या स्त्रीने आपल्या माणूस म्हणून असलेल्या अस्मितेची ओळख पटवून घेऊन त्या अस्तित्त्वाचा सार्थ अभिमान बाळगायला हवा असे स्त्रीवादाचे तत्त्व सांगते.

स्वतःच्या स्त्रीत्वाला ओझे मानना-या स्त्रीला स्वतःच्या माणूसपणाची जाणीव होणे आणि समाजमनाकडून तिचे होत असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शोषण तिला कळणे या दोन बाबी समांतरपणे घडून येणा-या आहेत. नव-याला चांगलेचंूगले करून खायला घालायचे आणि मग त्याच्या चेह-यावरचे समाधान न्याहाळत त्यातच धन्यता मानायची, नव-यानेही मित्रांशी, आप्तेष्टांशी ॓आमची ही अमूक अमूक भाजी खूपच छान करते.॔ अशी स्त्रीची ओळख करुन द्यायची आणि स्वयंपाकीणीसारखे हे कौतुक एेकूण स्त्रीने मोहरून जायचे, अशी पारंपरिक स्त्री व्यक्तीरेखा जेव्हा बदलते तेव्हा तिला तिच्यावर लादल्या गेलेल्या दूय्यमत्त्वाची जाणीव होत असते आणि स्वतःच्या अस्तित्वाचीही वेगळी ओळख पटत असते. स्त्रीला अशाप्रकारे तिच्या अवमूल्यनाची व तिच्यावर होणा-या अन्यायाची जाणीव झाली आणि आपल्या दडपल्या जाणा-या अस्तित्वाच्या रक्षणासाठी तिने संघर्षाचा पवित्रा घेतला म्हणजे तिच्या ठायी स्त्रीवाद अस्तित्वात येण्यास सुरूवात झाली असा त्याचा अर्थ होतो.

स्त्रीवाद हा स्त्रीला ॓स्व॔ ची ओळख होण्याच्या प्रक्रीयेतून अस्तित्वात येतो. ही ॓स्व॔ ची ओळख म्हणजे काय? जगात प्राणी म्हणून गणल्या गेलेल्या एकंदरीत सर्व जातींमध्ये जगण्याची धडपड ही एकवाक्यता प्रामुख्याने आढळून येते. खाणे, पिणे, प्रजनन करणे व स्वतःच्या अंतापर्यंत आपले अस्तित्व टिकवून ठेवणे ही कामे सर्व जनावरे सहजप्रेरणेने करत आलेली आहेत. माणूस मात्र या सर्वांहून वेगळा आहे. विचार आणि सृजन या दोन बाबी माणसाला प्राण्यापांसून प्रामुख्याने वेगळे ठरवतात. पारंपरिक समाजमन स्त्रीला या माणूसपणाचे द्याेतक असलेल्या सृजनप्रक्रीयेपासून व विचारप्रक्रीयेपासून दूर ठेवते. शरीर जिवंत रहावे म्हणून केलेल्या कामांमधून सृजन होत नाही. जेव्हा संस्कृतीच्या निर्मीतीत माणूस स्वतः एक घटक म्हणून सामील होतो, विचारप्रक्रीयेच्या अनुषंगाने स्वतःचा जीव ओतून आपला सृजनशील सहभाग नोंदवतो तेव्हा त्याला स्वत्त्वाची जाणीव होते. ॓काम म्हणजे पैसा मिळविण्यासाठी केलेले काम नव्हे. पैसा हा कामाचा एक व्यावहारीक परिणाम आहे. ज्या क्षेत्रात व्यक्तीच्या सर्व क्षमतांची कसोटी लागते व त्याला स्वतःच्या सुप्त सामर्थ्याची ओळख पटते ते काम. अशा कामामधूनच मनुष्यजातीचा विकास होत असतो. व अशा त-हेचे काम आपल्या हातून केव्हाच निसटले आहे याची जाणीव स्त्रीला झाली आहे.१२ अशी जाणीव होणे म्हणजेच स्त्रीला स्वतःला जनावराच्या पातळीवर ढकलले गेल्याची जाणीव होणे होय. अशा जाणीवेतूनच आजचा विचार स्त्रीवाद विकास पावला आहे.

भारतातील स्त्रिया सुशिक्षित झाल्यानंतर स्त्रियांनी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणे आणि समाजपरिवर्तन करून समाजाच्या नव्या रचनेत आपला कृतीशिल सहभाग नोंदवणे ही आपली प्राथमिक गरज असल्याचे स्त्रियांच्या लक्षात आले. फक्त कुटुंबापूरते मर्यादित राहून नव-याच्या कलाने त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे, कुटंुबाचे पालनपोषण करणे आणि फक्त कुटुंबासाठीच आपल्या सर्व क्षमता पणाला लावणे, विचारांचा बंदिस्तपणा स्विकारून घाण्याच्या बैलासारखे फिरत राहणे म्हणजेच ॓स्वत्त्वाची हत्या॔ पर्यायाने जिवंतपणी केलेली एक आत्महत्याच आहे हे कळणं म्हणजे स्त्रीवादाच्या मूलभूत तत्त्वाची जाणीव होणे होय. आपल्या डोळ्यासमोर जग पूढे वाटचाल करते आहे आणि आपण मात्र थंडपणाने समाजमनाने लादलेल्या पुरस्कारांना व कौतुकभरल्या शब्दांना गोंजारत बसणे ही घोर आत्मवंचना आहे याचा साक्षात्कार होणे व या साक्षात्कारातून जगाकडे व स्वतःकडे एका नव्या दृष्टीने पहायला शिकणे ही स्त्रीवादाच्या उभारणीची सुरूवात आहे.

स्त्रीवादाची मूलभूत बैठक म्हणून कुटुंबव्यवस्थेलाच नकार द्यायचा निर्णय घेणे असा वरील विवेचनाचा अर्थ होतो काय याचा विचार या ठिकाणी सर्वप्रथम करावा लागेल. स्वतःच्या स्वत्वाची जाणीव स्त्रीला होणे गरजेचे आहे याचा अर्थ अशी स्वत्वाची जाणीव पुरूषवर्गाला झालेली आहे असा आहे. मग पुरूषाने कुटुंबव्यवस्थेचा त्याग केला आहे काय असा प्रश्न उभा राहतो. याचा विचार करू जाता लक्षात येते की पुरुषाने कुटुंबप्रमूख म्हणून आपले काम पार पाडतांनाच स्वतःचे स्वत्त्व टिकवले आहे. याचा अर्थ असा की स्त्रीला स्वजाणीव मिळवायची असेल तर कुटंुबव्यवस्थेचा त्याग करण्यापेक्षा कुटुंबातले स्वतःचे स्थान तिला बदलावे लागेल. त्याचबरोबर कुटुंबाच्या कक्षा भेदून समाजाचा घटक म्हणून स्वतःला सिध्द करावे लागेल. ॓स्वतःच्या गृहीणी या भूमिकेला ठाम नकार देणे याचा अर्थ घर, संसार, नवरा, मुले-बाळे सोडणे असा नव्हे. लग्न की करीअर असा पर्याय ठेवणे नव्हे. तर या दोन गोष्टींची फारकत करणे चुकीचे आहे हे समजून घेणे. घर, लग्न, आईपण यांच्याच बरोबर करिअरही तितकीच महत्त्वाची व ती या गोष्टींबरोबरही करता येते हे समजून घेणे महत्त्वाचे.१३

एकंदरीत गृहीणी या एकाच भूमिकेला सर्वस्व अर्पण न करता चौफेर सामाजिक कामांमधून व्यक्तिमत्त्वाला आकार देणे असा या विवेचनाचा सारांश आहे. घरात बाई म्हणून वावरतांना पारंपरिक विचारांची स्त्री नकळतपणे नव-यासोबतच्या संबंधाला, आईपणाला अवास्तव महत्त्व देते. लैंगिक संबंधांमध्ये स्त्रीची भूमिका पूर्णपणे शरणागती स्विकारणारी असते. आई म्हणून आदर्श भूमिका निभावणे व नव-याच्या हरत-हेच्या सुखासाठी त्याच्या हातातले खेळणे बनून स्त्रिया या एकप्रकारे सोन्याच्या पिंज-यातच आपले आयुष्या घालवत असतात. त्यांनी स्वतःला पंख आहेत हा विचारच मारून टाकलेला असतो. मग बाहेरच्या जगात वावरण्यासाठी, या पिंज-यातून सुटण्यासाठी नोकरी करण्याचा मार्ग स्त्री स्विकारते. नोकरी मधून होणा-या अर्थार्जनातून स्त्रीला आत्मविश्वास प्राप्त होतो. परंतु याचा अर्थ असा नाही की नोकरी करणा-या स्त्रीचे या बाबतीतले सर्वच प्रश्न या मार्गाने सुटतील. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी करणे वेगळे आणि स्वतःच्या क्षमतांना न्याय देणारी आव्हानात्मक नोकरी करणे अर्थातच वेगळे आहे. प्रायव्हेट सेक्रेटरी, िरसेप्शनिस्ट, सेल्सगर्ल, नर्स, अंगणवाडी शिक्षिका, ब्युटीशियन अशा हलक्या-फुलक्या नोक-या व व्यवसाय म्हणजे कुटुंबाशीच समांतर पिंज-यासारख्या नोक-या होत. अधिकारी, तहसिलदार, डाॅक्टर, दिग्दर्शक अशाप्रकारच्या आव्हानात्मक नोक-या केल्या तर त्या स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यापूरत्या मर्यादित न राहता त्यांना समाजातील सुखदुःखांशी जोडतात व समाजपरिवर्तनात सहभागी असणारा एक मूलभूत व क्रियाशिल घटक म्हणून व्यक्त होण्याची संधी देतात. अशी संधी मिळवणे अथवा अशा संधीच्या शोधात असणे म्हणजेच स्त्रीवाद होय.

ब-याचदा स्त्रियांना अधिकाराची पदे देण्याचे टाळले जाते. किंबहूना स्त्रियाच अशी जबाबदारी स्विकारण्यास नाखूष असतात. पूढाकार घेण्यासाठी, जबाबदारी स्विकारण्यासाठी स्त्री तयार होत नाही. याला कारण स्त्रीच्या मनाची पारंपरिक जडणघडणच कारणीभूत असते. आपण स्त्री आहोत, बाईमाणूस आहोत, आपल्याला हे शक्य होईल का?, ॓पूरुषांना॔ आपण कामाला लावू शकू का? अशा शंका जेव्हा स्त्रीच्या मनात येतात तेव्हा त्याचा संदर्भ तिच्यावर पूर्वसूरींनी लादलेल्या स्त्रीत्वाशीच लागतो हे या ठिकाणी स्पष्टपणे प्रत्ययास येते. प्रथमतः हे स्त्रीत्व झुगारून आपल्यातही कोणत्याही सर्वसामान्य माणसाईतकी विचार करण्याची, नियोजनाची काम करून घेण्याची कुवत आहे हे स्त्रीने स्वतःला बजावणे म्हणजे स्त्रीवाद होय.

॓स्त्रियांना शिक्षणाने त्यांच्या हक्कांची जाणीव होते॔ हे सुध्दा काही संदर्भातच मान्य करता येईल. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करतांनाच समाजमनाने त्यांच्यासाठी शिवणकाम, गृहशास्त्र, शिक्षिका, नृत्यदिग्दर्शिका, फॅशन डिझायनर, सेल्समनशिप, रिसेप्शनिस्ट, ब्यूटीशियन, नर्सिंग अशी काही क्षेत्रे राखीव करून टाकली आहेत. आपण स्त्री म्हणून हे करू शकत नाही व स्त्री म्हणून हेच केले पाहिजे ही विचारसरणी म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाचीच प्रामुख्याने निदर्शक ठरते. आणि अशा ॓स्त्रीत्व॔ जोपासणा-या नोक-यांमधून स्त्रीला पैसा, मानसन्मान जरी मिळाला तरी समाजाच्या जडणघडणी मधल्या क्रियाशिल सहभागापासून ती दूरच रहाते व यातून तिला झालेली तथाकथित स्वत्त्वाची जाणीवही ही मर्यादित स्वरूपाचीच ठरते. स्त्रीने मिळवलेले शिक्षण व तिने केलेले काम याचा उपयोग जेव्हा सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने होईल तेव्हाच त्या शिक्षणाला व कामाला अर्थ आहे असे स्त्रीवाद मानतो.

स्त्रीला समाजात वावरत असतांना कसल्याही दडपणाखाली वागावे लागू नये. समाजातील कोणत्याही सामान्य व्यक्तिप्रमाणे आणि आत्मविश्वासाने तिने वावरायला हवे. तिला तिच्या स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वास हवा. त्याचबरोबर स्वतःला केवळ स्त्री म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणूकीचा निर्भीडपणे निषेध करण्याची मानसिक तयारी सुध्दा स्त्रीने ठेवायला हवी. स्त्रीवादाचा अंगिकार करून समाजात प्रवेश करत असतांना स्त्रीची अवहेलना करणारे, तिच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणारे अनेक अडथळे तिच्या मार्गात उभे राहतील. या अडथळ्यांचा मुकाबला तिने आत्मविश्वासाने करणे हाच स्त्रीवाद होय.

स्त्रीत्व म्हणून जे काही स्त्रीच्या व्यक्तीत्वावर अधोरेखित केले गेलेले आहे त्या तथाकथित स्त्रीत्वाच्या आडून काही फायदे मिळविण्याचा मोह हा स्त्रीने टाळायला हवा. कारण अशा तडजोडींनी मिळणारे फायदे स्विकारणे म्हणजे स्वत्वाला नाकारून उपकाराची पारंपरिक सावली आणखी गडद करण्याचाच प्रकार ठरतो. धडधाकट तब्येतीच्या तरूण माणसाला उभ्याने प्रवास करावा लागला तर त्याला कोणी आपणहून सहसा जागा करून देत नाही. स्त्रीला मात्र ब-याचवेळा तशी जागा देऊ केली जाते. समाजमनाच्या या अशा दयाबुध्दीच्या वर्तनाने स्त्रीचे स्त्रीत्व, असहायपण व आगतिकता या बाबी अधोरेखित केल्या जातात. स्त्रीने एकदा स्वत्त्वाची जाणीव स्विकारला की स्त्रीत्वाचे असे मिळणारे फायदे घेणे कटाक्षाने टाळायला हवे. स्त्रीबद्दलचे पूर्वग्रह, दूजाभाव याबाबतीत स्त्रीने कधीही तडजोड स्विकारायला नको. दूय्यमपणाची भूमिका नाकारून समान दर्जा मिळवण्यासाठी तिने लढायलाच हवे. वेतनाच्या बाबतीत, अधिकाराच्या बाबतीत, संधीच्या बाबतीत जेथे स्त्रीवर अन्याय होईल तिथे तिने आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला हवा. स्त्रीवादाचा अंगिकार केला म्हणजे पुरूषांशी युध्द पूकारले असाही त्याचा अर्थ होत नाही. स्त्रीवादाला अनुकूल वाटणारी पण स्त्रीला समाधानी करण्यासाठी अथवा तिचे तोंड बंद करण्यासाठी दिली जाणारी थातूरमातूर बक्षीसे स्त्रीने काकदृष्टीने आेळखायला हवी. स्त्रीवादी असणे म्हणजे जशी स्वतःची नव्याने ओळख होणे आहे तशीच समाजाच्या दांभिकतेला निर्भयपणे उघडे पाडणेही स्त्रीवादाला प्रामुख्याने अपेक्षित आहे.

स्त्रीवादी विचारात स्वसामर्थ्याची जाणीव होण्याला जसे महत्त्वाचे स्थान आहे तसे स्वतःच्या हक्कांची जाणीव होणे हे सुध्दा अभिप्रेत आहे. मातृत्वासारख्या निसर्गाने दिलेल्या विशेष बाबी स्त्रीच्या अस्तित्त्वाचाचा एक भाग आहे. आणि स्त्रीने उचललेली मातृत्वाची जबाबदारी ही समाजाच्या वाटचालीतला एक आवश्यक भाग आहे. यामूळे प्रसृतीकाळात मिळणा-या सवलती या स्त्रियांच्या हक्काच्या सवलती ठरतात. स्त्रीला समाज अशी सवलत देेतो याचा अर्थ तो स्त्रीवर उपकार करतो असे मुळीच नाही याची जाणीव स्त्रीला होणे स्त्रीवादात अपेक्षित आहे. विवाह, पती, मुले, कुटुंब हे स्त्रीच्या जीवनाचे भाग आहेत परंतु हे भाग म्हणजे स्त्रीचे जीवन नव्हे.

स्वतःच्या अस्तित्वाला सिध्द करण्यासाठी स्त्री देत असलेल्या दिर्घ लढयातून स्त्रीवाद आकाराला आला आहे. आणि ही प्रक्रीया अजूनही सुरूच आहे. स्त्रीला मालमत्तेत वाटा, वारसाहक्क, मतदानाचा अधिकार आदी हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला. स्त्रीपुरूष समानतेच्या तत्त्वाने सर्वच क्षेत्रात योग्य स्थान मिळाले पाहिजे, असा आग्रह केला गेला. यातूनच स्त्रीस्वातंत्र्याची संकल्पना उदयास आली. स्त्री ही तिच्या सहचराचे बांडगूळ नसून तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिला तिचे व्यक्तित्त्व तिच्या मर्जीप्रमाणे घडविण्याचा अधिकार आहे हा विचार बळावू लागला. आर्थिक स्वावलंबन आणि मताचे स्वातंत्र्य प्राप्त होण्यातूनच स्त्रीस्वातंत्र्याचा उदय होऊ शकतो या मुद्यावर स्त्रीवादी चळवळीत भर दिला गेला. ॓स्त्रीवाद॔ ही संकल्पना अस्मिता लढयातून उत्क्रांत झाली. कला, कायदा, रुढी, संस्था आणि लोकमत या सर्व स्थरांवर स्त्रियांना माणूसपणाचा हक्क प्राप्त होण्यासाठी जाणीवपूर्वक लढली जाणारी राजकीय सामाजिक लढाई म्हणजे ॓स्त्रीवाद॔ होय.

॓खाजगी, सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळीवर होणा-या स्त्रियांच्या दडपणूकीबद्दल जाणीव होणे/करणे आणि त्याचबरोबर या दडपणूकीविरोधी झगडण्याची तयारी असणे म्हणजे स्त्रीवादाचा अंगिकार करणे होय॔ अशा शब्दात स्त्रीवादाची व्याप्ती स्पष्ट केली गेलेली आहे.१४

जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादी विचार
स्त्रीवादी चळवळ ही जशी एक सामाजिक व राजकीय चळवळ म्हणून विस्तार पावत गेली तसतसे या चळवळीचे वाङ्मयीन समीक्षाविचारातले वेगवेगळे दृष्टीकोन स्त्रीवादी साहित्यसमीक्षकांनी मांडले. स्त्रीवादी वाङ्मयविचार हे स्त्रीवादी चळवळीच्या उत्तरार्धात ठोस अशा तात्त्विक स्वरूपात व्यक्त हाेऊ लागले. विसाव्या शतकाच्या मध्यावर स्त्रीवादी चळवळ आणि स्त्रीवादी वाङ्मयविचार हे काहीशा समांतरपणे विकास पावत असलेले दिसून येतात. वाङ्मयाचा विचार हा स्त्रीकेंद्री विचारातून व्हावा हा विचार १९५० च्या नंतर उदयास आलेला आहे. प्रबोधनयुगापासून स्त्रियांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा सुरू केला होता त्या लढयाचे प्राथमिक ध्येय हे पूरूषाच्या सावलीतून बाहेर पडणे हे होते. पुरूषी वर्चस्वापासून मुक्ती हे ध्येय असल्याने एकूणच स्त्रीवादाचा भर हा पुरूषप्रधानतेवर टिका करण्याचा होता. १९५० च्या नंतर मात्र स्त्रीवादी वाङ्मयविचार हा एकत्रितपणे व संघटितपणे समोर येऊ लागला.

जागतिक पातळीवरील स्त्रीवादी वाङ्मयीन विचाराचा उगम हा पाश्चात्त्य देशात झाला. तत्पूर्वी गेली अनेक दशके सुरू असलेल्या स्त्रीवादी चळवळीचा परिणाम म्हणून वाङ्मयात स्त्रीकेंद्री विचारधारा उदयास आली. कार्ल मार्क्सने मांडलेला वर्गविरहीत समाजरचनेचा सिध्दांत हा स्त्रीवादाला पोषक होता. परिणामस्वरूप मार्क्सवादी, समाजवादी अशा विकसीत व प्रस्थापित होत असलेल्या वाङ्मयीन विचारधारांमधली अनुकूल अशी तत्त्वे उचलत व नव्या स्त्रीकेंद्री तत्वांची रचना करत स्त्रीवादी वाङ्मयविचार विकास पावत गेला. मार्क्सवादी, फ्राॅईडवादी, लेकनवादी विचारप्रणालीचे पुरस्कर्ते समीक्षक आपापल्या विचारधारेप्रमाणे स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या विकासात आपले योगदान या काळात देत होते. काही समीक्षकांनी तर स्त्रीवादी समीक्षा अशी काही संकल्पना होऊ शकते हे मान्य करायलाच नकार दिला. केवळ पुरूषप्रधानतेविरूध्द जहाल व बंडखोरपणे लिहिलेल्या साहित्याची भलावण करणे हेच स्त्रीवादी समीक्षाविचाराचे कार्य आहे अशा आशयाची टोकाची मतेही काही साहित्यसमीक्षकांकडून व्यक्त केली गेली.

सॅण्ड्रा गिल्बर्ट या साहित्यिक, समीक्षक विदूषीने सर्वप्रथम स्त्रीवादी समीक्षेची चौकट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गिल्बर्ट यांनी स्त्रीच्या मानसिक व सांस्कृतिक जडणघडणीवर असलेल्या पितृप्रधान समाजरचनेच्या प्रभावाचे परखडपणे आणि विस्ताराने विवेचन केले आणि या विवेचनाला आधारभूत मानून जार्ज इलियटच्या कादंब-यांची स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या दृष्टिकोनातून समीक्षा केली. गिल्बर्ट यांच्या मते पितृप्रधान मूल्ये ही स्त्रीचे सर्व स्थरांवरील वर्तन नियंत्रित करत असतात. एखादी स्त्री जरी स्वतःला बंडखोर व सर्जनशील म्हणवत असली तरी बंडखोरीच्या, सर्जनशीलतेच्या तिच्या संकल्पना या प्रत्यक्षाप्रत्यक्ष पितृसत्ताक मूल्यांच्या बंधनात अडकलेल्या असतात. कारण स्त्री ज्या जीवनपध्दतीत वाढते ती जीवनपध्दतीच तिला वेळोवेळी पुरूषसत्तेसमोर वाकवत असते. आपले आयुष्य हे पुरूषासाठीच घडवले जाणार आहे आणि त्यातच आपल्या आयुष्याचा खरा अर्थ आहे हे तिच्यावर बिंबवले जाते. आपला गोरा रंग, कमनिय शरीर, गोड आवाज, प्रेमळपणा अाणि इतर असे अनेक गुण हे पुरूषासाठीच आहे अशी तिची समजूत घडवणारी जीवनपध्दती तिच्यावर लादली जाते. पितृप्रधान संस्कृतीत मुलगा हा पित्याचा उद्धारकर्ता मानला जातो, तर मुलगी ही आईने पित्याला दिलेली भेटवस्तू आहे अशी समजूत असते. एखादया चलनी नाण्याप्रमाणे पिता मुलीली दुस-याला भेट देऊन तिचे हस्तांतर करीत असतो. अशा समाजरचनेत स्त्री ही कुणाची ना कुणाची तरी ठेव असते. कधी पित्याची, कधी नव-याची. या मालकांच्या अमर्याद इच्छांपूढे स्त्रीला कायम मान तुकवावी लागते. जार्ज इलियटच्या कादंब-यांमधून स्त्रियांच्या या पराविलंबत्वाची चिकित्सा केलेली असून स्त्रीने या पितृसत्ताक पकडीतून सुटून स्वतःची खरी जागा शोधण्याचा संदेशही दिलेला आढळतो. त्यामूळे सॅण्ड्रा गिल्बर्ट यांनी इलियटला स्त्रीवादी लेखिकांची जननी म्हटले आहे.१५

ऐतिहासिक साहित्यामध्ये किंवा पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रवांदांमध्ये स्त्रीला अलौकीक देवस्वरूप मानन्यात आलेले आढळून येते. परंतु इतिहास व संस्कृती मधील स्त्रीची प्रतिमा ही स्त्रीची मती कुंठीत करण्यासाठी व तिला शोषणसुलभ बनविण्यासाठीच मांडली गेली असल्याचे हेलन सिझू हिने पटवून दिले आहे. स्त्रीच्या पुरूषकेंद्री संस्कृतीकडून वेढले जाण्याचे सविस्तर विवेचन सिझूने केले आहे. पुरूषसत्ताक संस्कृतीत स्त्रीला स्वतंत्र अस्तित्त्वच नाही. तिचे अस्तित्व फक्त शरीरसंबधांपूरतेच मर्यादित आहे. स्त्री ही चंद्रासारखी परप्रकाशित तर पुरूष हा सुर्यासारखा स्वयंप्रकाशित मानला गेला आहे. पुरूष हा संस्कृतीच्या जडणघडणीत क्रियाशीलपणे व स्वत्त्वानिशी सामील होता. परिणामस्वरूप तो प्रगतीची घोडदौड करणारा, ताठ, उत्साही व िनर्माता म्हटला गेला आहे. स्त्री मात्र पंगू, दासी मानली गेली आहे. पुरूषाला स्त्रीची प्रतिमा जशी हवी होती तशी ती त्याने बनवली आणि संस्कृतीच्या इतिहासात ती तशीच रूढ होत गेली. स्त्रीच्या प्रतिमेचे ब-याच प्रमाणात उदात्तीकरण केले गेल्याचेही आढळून येते. स्त्रीही अनंत, अव्याख्येय व जगत््माता मानली गेली आहे. परंतु असे मानने म्हणजे स्त्रीच्या निर्बलीकरणाची व्यवस्था करणे होय. स्त्रीला अधिकाधिक शोषणसुलभ बनवण्याच्या प्रक्रीयेतून स्त्रीला आदिशक्ती मानल्या गेल्याचे हेलन सिझू हिचे म्हणणे आहे. स्त्रीला जेव्हा अनंत, अव्याख्येय म्हटले जाते त्याचवेळी तिला स्वतःचे व्यक्तित्व नाही, स्वतःचे स्वत्व नाही ही गोष्ट दृढ केली जाते. संस्कृतीच्या इतिहासात पुरूषाने घडवलेली स्त्री प्रतिमा हेच स्त्रीदास्याचे मुख्य कारण आहे. वास्तविकरित्या स्त्रीला अशा प्रकारच्या रूपात जेव्हा मानले जाते तेव्हा ती तशी नसतेही. परंतु पुरूषवर्चस्वाच्या दडपणाखाली ती या प्रतिमांचा, परिमाणांचा स्वीकार करते आणि हे सर्व स्वतःवर लादून घेते. परंतु स्त्रीची ही तथाकथित प्रतिमा एका अर्थाने फसवी आहे, स्त्रीचे स्वत्व नाकारणारी आहे.१६

जागतिक पातळीवरील स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या प्रारंभिक संरचनेत सॅण्ड्रा गिल्बर्ट, हेलेन सिझू आदी स्त्रीवादी साहित्यसमीक्षकांनी मोलाचे योगदान दिले आहे. हेलेन सिझूने स्त्रीवादी साहित्याचे स्वरूप कसे असावे या विषयी मौलिक विवेचन करून स्त्रीवादी वाङ्मयविचाराची पायाभरणी केली. तिच्या मते स्त्रियांचे साहित्य उगम व शेवट अशा स्वरूपाचे, पारंपरिक असता कामा नये. स्त्रियांचे साहित्य हे एकाच वेळी सर्व बाजूंनी विकसित होत जाणारे लेखन असले पाहिजे. साहित्यरचनेची पारंपरिक तंत्रे व आकृतीबंध हे पुरूषवृत्तीची निदर्शक मानून होता होईल तितकी टाळायला हवीत. स्त्रीचे लेखन हे काळाच्या कक्षा भेदणारे व अनादी, अनंत असले पाहीजे. पुस्तक लिहून संपले म्हणजे त्या आशयाबद्दलची तिची विचारप्रक्रीया थांबली असे व्हायला नको. तर्काने लिहीलेले व अंदाज व्यक्त करणारे लेखन स्त्रियांनी टाळायला हवे. अन्वयार्थाच्या फाफटपसा-यात शिरण्यापेक्षा भावगर्भतेच्या जवळ जाणारे लेखन हे ख-या अर्थाने स्त्रीच्या स्वत्वाला गवसणी घालणारे ठरेल असे हेलन सिझूने प्रतिपादित केले आहे. हेलन सिझू पुरूषांच्या व स्त्रियांच्या लेखनाची तुलना करतांना म्हणते, की एखादया गोष्टीबद्दल शोक करणे म्हणजे ती गेलेली गोष्ट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासारखे होईल. असा शोक करणे हे पुरूषवृत्तीचेेच लक्षण आहे. कारण पुरूषवृत्तीमध्ये एखाद्या गोष्टीवरील अधिकार नाहीसा होणे ही बाब पुरूषी सहनशिलतेच्या कक्षेबाहेरची असते. स्त्री मात्र हा शोक पचवून पुढे जात असते. म्हणजेच निर्माण झालेली कमतरता किंवा तोटा उगाळत न बसता, आहे ते वास्तव स्वीकारून स्त्री पुढे जात असते. ितच्यावर मात करण्याचा ती प्रयत्न करते. या अर्थाने स्त्रीचे साहित्य हे पुरूषाच्या साहित्यापेक्षा मूलभूतरित्या वेगळे असायला हवे. ॓आपल्या सांस्कृतिक विश्वात स्त्रीने खुप रडून घेतले आहे. पण एकदा हे अश्रु संपले की स्त्रीच्या आत असलेला आनंदाचा अखंड झरा बाहेर येईल आणि तेच स्त्रीचे खरे सामर्थ्य असेल. या सामर्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी स्त्रीला आधी मुक्त व्हावे लागेल आणि मुक्ततेचा आनंद जसा निखळ, विशुद्ध व सौंदर्यपूर्ण असतो तसाच तिचा साहित्यातील उद््गार असेल.॔१७

सुरूवातीच्या स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या मांडणीला ॓सेक्स्युअल पाॅलिटिक्स॔ अशा संभावनेला सामोरे जावे लागले. असे असले तरी केवळ पुरूषप्रधानतेवर टिकात्मक साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येणार नाही. तर स्त्रीची स्वतःची ओळख सांगणारे, स्वत्व उलगडणारे साहित्य हेच ख-या अर्थाने स्त्रीवादी साहित्य ठरेल. अशा अधिकाधिक विस्तारीत दृष्टीकोनाकडे स्त्रीवादी वाङ्मयविचाराची वाटचाल होण्यास ही मांडणी उपयोगाची ठरली. एलेन शोवाल्टर यांनी आपल्या ॓द न्यू फेमिनिस्ट क्रिटीसिझम॔ (१९८५) या ग्रंथात सर्वप्रथम स्त्रीवादी साहित्यशास्त्राची रुपरेषा मांडली. ॓शोवाल्टरच्या या साहित्यशास्त्रीय मांडणीमूळे १९६० पासून सुरू असलेली स्त्रीवादी साहित्यसमीक्षी ही सेक्स्युअल पाॅलिटिक्स मधून बाहेर पडली व स्त्री साहित्याच्या विश्लेषणाची यथार्थ दिशा पूढे यायला त्यामूळे मदत झाली.१८

स्त्रीसाहित्याचे विश्लेषण व मूल्यमापन हे पारंपरिक निकषांनी न करता स्त्रीकेंद्री निकषांनी व्हावे अशी नवी भूमिका एलेन शोवाल्टर यांच्या स्त्रीवादी साहित्यशास्त्राने विशद केली आहे. शोवाल्टर यांनी स्त्रीवादी समीक्षेचे फेमिनाइनक्रिटिक व गायनोक्रिटिक अशा दोन भागात विभाजन केले आहे.

फेमिनाइनक्रिटिक याला जुना करार असेही म्हटले आहे. पुर्वापार चालत आलेल्या संकेतांनी पुरूष अथवा स्त्रीसाहित्यिकांच्या साहित्याचे स्त्रीवादी वाचन अशी भूमिका घेणारे समीक्षक व समीक्षा फेमिनाइनक्रिटिक या प्रकारात मोडतात. स्त्रीवादी साहित्याचे मूल्यमापन स्त्रीच्या भूमिकेत जाऊन केले पाहिजे असा या प्रतिपादनाचा अर्थ आहे.१९ पारंपरिक साहित्यातील पात्रांचे वर्तन हे पुरूषप्रधान अथवा पुरूषकेंद्री दृष्टीकोनाने चित्रीत केलेले असते. हाच दृष्टीकोन स्त्रीकेंद्री करून या साहित्याचे पूनर्वाचन केले जाणे शोवाल्टर यांना अपेक्षित आहे. एका सामान्य माणसाच्या शंका घेण्यावरून रामाने सीतेला आपले पावित्र्य सिध्द करायला सांगून तिला अग्नीपरीक्षा द्यायला लावली. रावणाच्या राज्यात असतांना सीतेचे पावित्र्या शाबूत राहिले काय? अशा स्वरूपाची ती शंका होती. पती आज्ञा पाळून पारंपरिक रितीने सीता आपले पावित्र्या तथाकथितपणे सिध्द करते. याच घटनेचे स्त्रीकेंद्री वाचन करतांना सीता रामाच्या आज्ञेवरुन अग्नीपरीक्षा देण्याएेवजी रामाला विचारू शकते, की रामही ज्या काळात राहिला त्या काळात रामाचे पावित्र्य शाबूत राहिले काय? किंवा दुस-या बाजूने विचार करता सीता ही रावणाने पळवून नेलेली होती आणि रावण तिच्या असहायतेचा फायदा घेऊ शकत होता. रावणाच्या या वर्तनाची शिक्षा रावणाला देण्याचा विचार करण्याएेवजी एका असहाय स्त्रीकडूनच राम अग्निपरीक्षेची अपेक्षा कशी करू शकतो? असे अनेक प्रश्न पारंपरिक साहित्याच्या स्त्रीवादी वाचनातून उभे राहतात व पुरूषांचे सांस्कृतिक वर्चस्व अधिकच टोकदारपणे सामोरे येते. मराठीत रा.ग.जाधव यांनी अभिजात महाकाव्यातील स्त्रीपुरूष संबंधांचे आकलन पारंपरिक पुरूषकेंद्री दृष्टीतून न करता स्त्रीकेंद्री दृष्टीतून करण्याची भूमिका विशद केली आहे. ती एका अर्थाने फेिमनाइनक्रिटिकचाच भाग होय.२० कोणत्याही साहित्यकृतीत पुरूषाला काय वाटते ही एकतर्फी भूमिका घेतली गेलेली आढळून येते. याउलट स्त्रीची भूमिका काय असू शकेल याचा विचार स्त्रीच्या भूमिकेतूनच केला गेला पाहिजे.

स्त्री लेखिकांनी लिहिलेल्या पारंपरिक साहित्यातही पूरूषप्रधान विचारांनीच स्त्रीप्रतिमेचे आकलन केलेले आढळून येते. एलेन शोवाल्टर यांच्या फेमिनाइनक्रिटिक या संज्ञेत सामाविष्ट स्त्रीवादी वाङ्मयविचार हा अशा साहित्याचेही स्त्री प्रधान भूमिकेतून वाचन करण्यावर भर देतो.

एलेन शोवाल्टरने स्त्रीवादी साहित्यशास्त्राचा दूसरा भाग म्हणून गायनोक्रिटिक ही संज्ञा वापरली. याला नवा करार असे म्हटले आहे. शोवाल्टरच्या मते स्त्रीचे म्हणून एक वैशिष्टयपूर्ण अनुभवक्षेत्र असते. या अनुभव क्षेत्रासाठी तिने ॓वाईल्ड झोन॔ अशी संज्ञा वापरली आहे. मासिक पाळी व त्याचा शारीरिक आणि मानसिक अवस्थांशी असणारा जीवशास्त्रीय संबंध, गर्भधारणेप्रसंगा स्वतःच्या शरीरात, स्वतःच्या शरीराचे, भावनांचे सत्त्व देऊन दूसरा जीव वाढविण्याचा वैशिष्टयपूर्ण अनुभव, अपत्याचे संगोपन करत असतांना होणारी शारीरिक, भावनिक देवाणघेवाण, स्तनपानाचा अनुभव आदी प्रसंगातले स्त्रीच्या अनुभवसृष्टीचे वैशिष्टयपूर्ण वेगळेपण एलेन शोवाल्टरने महत्त्वाचे मानले आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीची जीवन जगण्याची पध्दती, परस्परसंबंधांतली व भावनिक, शारीरिक क्रियाप्रतिक्रियांमधली स्त्रीविशिष्टता, भाषेच्या वापरातील स्त्रीविशिष्ट संकेत या सगळ्यांमूळे स्त्रीचे एकूणच अनुभवविश्व पुरूषाच्या अनुभवविश्वापेक्षा वेगळे ठरते. पुरूष जेव्हा साहित्यनिर्मीती करतो तेव्हा तो त्याच्या कुवतीप्रमाणे त्यातल्या स्त्रीपात्रांचे हे अनुभव चितारण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही पुरूष हे अनुभव स्वतः घेऊ शकत नाही आणि त्याचे परकायाप्रवेशाचे तथाकथित कौशल्यही या बाबतीत निकामीच ठरते. मूळात पुरूषमन व स्त्रीमन यांच्यात असलेले अंतरही यात महत्त्वाची भूमिका बजावते असे एलेन शोवाल्टरचे मत आहे. स्त्रियांची शारीरिक व मानसिक वृत्ती ही जन्म देण्याची असते. दूस-याला स्वतःत समावून घेण्याची व स्वतःत रुजवण्याची असते. याउलट पुरूषीवृत्ती मात्र अहंकारयुक्त व वर्चस्व, अधिकार गाजवणारी असते. अर्थात स्त्रियांची ही ॓स्त्रीवृत्ती॔ म्हणून जी काही आहे ती मूळातली नसून तिच्यावर लादलेली आहे. असे मार्गारेट मीड या संशोधिकेने सिध्द केले आहे. न्यू गिनी आणि आसपासच्या बेटांवरील आदीवासींचा अभ्यास केल्यानंतर या आदीवासी समुहातील स्त्रिया महत्वाकांक्षी अाणि अाक्रमक आहेत. त्या शिकार व शेती असे बाहेरचे व्यवसाय करतात. पुरूष सौम्य आणि नम्र आहेत. ते घरकाम करतात, मुलांचे संगोपन करतात. यावरून स्त्रीमध्ये आणि पुरूषामध्ये आढळणारे गुणधर्म हे जन्मजात नाहीत, तर सामाजिक परिस्थितीने ते त्यांच्यावर आरोपित केलेले आहेत हे सिध्द होते.२१ या अशा लादलेल्या गुणांचा विचार जरी बाजूला ठेवला तरी शोवाल्टरने स्त्री-पुरूषांमधील नैसर्गिक शरीरभेदांचा जो विचार स्त्रीवादी विचारधारेत महत्त्वाचा मानला त्याला नजरेआड करता येणार नाही. स्त्रीसाहित्याच्या आकलनासाठी व विश्लेषनासाठी पुरूषकेंद्री समीक्षादृष्टी उपयोगाची नसते, या भूमिकेमागे स्त्रीनिष्ठ अनुभवांचे वेगळेपण शोवाल्टरने गृहीत धरलेले आहे. स्त्रीसाहित्यातील स्त्रीविशिष्ट अनुभवांचे आकलन एकूण चार प्रकारात करता येईल असे शोवाल्टरला वाटते. १) स्त्रीच्या शारीरिक वैशिष्टयांशी संबंधित अनुभव. २) स्त्रीच्या मानसिक भावविश्वाशी संबंधित अनुभव. ३) स्त्रीची भाषाभिव्यक्तीमधली वैशिष्टयपूर्णता. आणि ४) स्त्रीच्या सांस्कृतिक अनुभवविश्वाचा अन्वयार्थ. या चार दृष्टीकोनातून स्त्रीविशिष्ट अनुभवांचे आकलन करता येईल अशी संकल्पना एलेन शोवाल्टरने मांडली.

एकंदरीत जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादी विचारांचा आढावा घेत असतांना एलेन शोवाल्टरने त्यात दिलेले योगदान हे मोलाचे आहे. पाश्चात्य स्त्रीवादी वाङ्यमयविचाराची काही महत्त्वाची अंगे या एकूण विवेचनातून आपल्या दृष्टीक्षेत्रात येतात.

स्त्रीवादी वाङ्मय हे आहे त्या स्त्रीप्रतिमेला आहे त्या संकेतांनी साकार करण्यातून अभिव्यक्त होणे अवघड आहे. मूळात स्त्रीसमोर असलेली तिची सांस्कृतिक प्रतिमा ही तिच्या मूळ स्वरूपापेक्षा सर्वार्थाने वेगळी व तिच्यावर लादलेली आहे. स्त्रीवादी विचारसरणी स्त्रीवर लादलेल्या या प्रतिमास्वरूपाला नकार देते. जे तिच्यात उदात्त आहे असे आजपर्यंत तिला संस्कृती बजावत आली, उदा. त्याग, प्रेम, सहनशीलता, सौंदर्य तेच तिच्या स्वत्वाला गमावून बसण्यास कारणीभूत ठरले आहे. ज्यावर संस्कृतीने टिका केली अथवा ज्या स्त्रीवैशिष्टयांची हेटाळणीच्या स्वरूपात संभावना केली गेली, उदा. स्त्रीस्वभावाची चंचलता तेच स्त्रीच्या सामर्थ्याचा उगम ठरू शकतात. अशा त-हेने पारंपरिक विचारधारांना फाटा देऊन काहीशा विसंगतीने व विरोधाभासातूनच स्त्रियांना आपली सुसंगत विचारसरणी मांडावी लागणार आहे.

प्रबोधन युगानंतर अठराव्या व एकोणीसाव्या शतकात स्त्रीचा जगाशी संबंध येऊ लागला पण तोही अत्यंत मर्यादित स्वरूपात. या काळात अत्यल्प प्रमाणात स्त्रियांनी केलेल्या वाङ्मयनिर्मितीत पुरूषांचे वर्चस्व गृहीत धरले गेले. सांस्कृितक चौकटीच्या भाषिक व आशयाच्या मर्यादित परिघातच स्त्रियांनी स्वतःला व्यक्त करण्यात धन्यता मानली. परंतु स्त्रीवादी वाङ्मयविचार स्त्रियांच्या भाषेतील, शब्दसंग्रहातील व अभिव्यक्तीतील वैशिष्टपूर्णतेला महत्त्व देतो. स्त्रियांना निसर्गतःच लाभलेल्या काही क्षमतांना फाटा देऊन पारंपरिक पुरूषी वाङ्मयबंधांचे अनुकरण करणे स्त्रीवादाला मान्य नाही. ॓बायकी भाषा॔ असा शब्दप्रयोग करतांना आता निदान रुपकार्थाने तरी, वाङ्मयीन प्रतिमांचे पुरूषांनी वापरलेले पारंपरिक अर्थ बदलून स्त्रियांनी केलेला शब्दांचा व प्रतिमांचा वापर असा करायला हवा.२२

समकालिन पारंपरिक दृष्टीकोनाने केलेल्या समीक्षेचा अन्वयार्थ लावल्यामूळे स्त्रीवादी वाङ्मयविचार आता नवे पर्याय शोधू पहात आहे. तथाकथित सौंदर्यवादी निकषांतील परात्मता व अस्तित्त्ववाद यांना अवाजवी महत्त्व देऊन जागतिक वाङ्मयात जागतिक वाङ्मयात पुरूषी दृष्टीकोनाचे प्रमाणत्व प्रतिपादित केले गेले आहे. स्त्रीवादी समीक्षा ही अशा दडपशाहीविरुध्द बंडखोरी करते. ही समीक्षा तात्त्विक भूमिकेतून साहित्याकडे न जाता वाङ्मयविचाराच्या मांडणीतूनच तात्त्विक विचारांचा शोध घेते आहे. स्त्रीवादी विचाराचा वाङ्मयीन स्वीकार करून त्याबरहूकूम आपले वाङ्मयीन कार्य पार पाडण्याचे काम हे जिकरीचे आणि पावलापावलांवर बुद्धीभेदाची शक्यता निर्माण करणारे आहे. पारंपरिक वाङ्मयविश्वातील लेखकापासून आशय, अभिव्यक्ती, वाचक आणि सर्वच घटक हे पुरूषकेंद्री म्हणून स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या दृष्टीकोनातून गुन्हेगार आहेत. सर्वांनाच पुरूषीवर्चस्वाच्या अंगाने अगदी नकळतपणे लिहिण्याची, वाचण्याची व टिका करण्याची सवय लागलेली आहे. या कारणामुळे स्त्रीवादी वाङ्मय हे दूय्यम ठरविले जाण्याचा धोका आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचे गमक म्हणजे पुरूष स्त्रीकेंद्री लिहू शकतो हे स्त्रीवादी वाङ्मयविचाराने मर्यादित स्वरूपातच मान्य केले असले तरी स्त्रीही पुरूषकेंद्री लिहूच काय वाचूही शकते, नव्हे ती आतापर्यंत याच भूमिकेतून वाचत आली आहे. हे स्त्रीवाद सर्वार्थाने मान्य करतो. एखादी वाङ्मयकृती स्त्रीला ॓स्त्री॔ म्हणून वाचण्यास शिकवणे यात स्त्रीवादी वाङ्मयविचाराचे गमक दडले आहे.

स्त्री ही पुरूषापेक्षा वेगळ्या प्रकारची वाचक व समीक्षक आहे. तिचे वाचन व तिने वाङ्मयाचा लावलेला अन्वयार्थ हा लिंसापेक्ष असतो. म्हणून तो पुरूषापेक्षा मुलतः वेगळा ठरतो. उत्तान शृंगारीक दृश्याचे चित्रण जर साहित्यकृतीत आले असेल तर त्यात स्त्रीच्या शरीराचे कामूक वर्णन आढळून येते. अशा वर्णनाचे वाचन स्त्री पुरूष दोघेही लिंगसापेक्ष करतील. परिणामस्वरूप पुरूषांची प्रतिक्रिया उत्तेजित होणारी असेल तर स्त्रीवर मात्र स्त्रीच्या शरीराच्या तसल्या वर्णनाचा होणारा परिणाम हा पुरूषवाचकापेक्षा वेगळा असेल. अशाप्रकारच्या या वेगळेपणाची मर्यादा ही अमर्याद आहे.

पुरूषानी मांडलेली वाङ्मयेतिहासाची संकल्पना स्त्रीवाद हा कल्पित कथा मानतो. कारण साहित्येितहासात साहित्याला मध्यवर्ती मानले आहे. स्त्रीवादी वाङ्मयविचार मात्र अशा साहित्याचे तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक परीप्रेक्ष्यातून स्त्रीकेंद्री पूनर्वाचन करण्यावर भर देतो. या पूनर्वाचनातून स्त्रीला दूय्यम ठरवणा-या समाजाचा दांभिकपणा उघडकीस येतो आणि मग असे साहित्य हे अभिजात वगैरे काही नसते. तर ते तद्दन टाकाऊ स्वरूपाचे असते असे स्त्रीवादी वाङ्मयविचार मानतो.

२.४ निष्कर्ष
१. शिक्षणामूळे मिळालेली नवी दृष्टी व समानतेच्या मूल्यांची झालेली जाणीव यामूळे सुशिक्षित स्त्रियांनी सर्वप्रथम स्त्रियांची दुःखे मांडणा-या लेखनाला सुरुवात केली. यालेखनामागे राजाराम मोहन राॅय, गोपाळ हरी देशमुख, न्यायमुर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर, गो.ग.आगरकर आदी सुधारकांनी मांडलेल्या स्त्रीविषयक आधुनिक विचारांचे पाठबळ होते.

२. महात्मा फुले यांच्या लेखन व विचारकार्याने स्त्रियांचा आत्मसन्मान जागरूक केला. तत्कालिन स्त्रियांच्या लेखनाने उद््भवलेल्या वादात त्यांनी हिरीरीने स्त्रियांची बाजू घेतली. वि.रा.शिंदे, ताराबाई शिंदे, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे लेखनकार्य व मार्क्सवाद, समाजवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, दलित साहित्य चळवळ आदी विचारधारांमूळे स्त्रीवादी साहित्याच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली.

३. भारतातील स्त्रीवादी विचारांच्या तत्वांमागे भारतीय समाजात स्त्रीला देण्यात आलेले नेमके स्थान आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आग्रहापायी तिच्या व्यक्तिमत्त्वाचे केले गेलेले दमन या विरूध्दची प्रतिक्रीया ही प्रामुख्याने दिसून येते.

४. परंपरांमधल्या दांभिकतेची जाणीव स्त्रीला करून देणे, स्वतःच्या माणूसपणाची ओळख करून देऊन त्याविषयी अभिमान निर्माण करणे, समाजातील रचनात्मकतेत सहभागासाठी त्यांना प्रवृत्त करणे या व अशा तत्त्वांची मांडणी स्त्रीवादासंदर्भात झालेली आहे.

५. जागतिक वाङ्मयात सॅण्ड्रा गिल्बर्ट, हेलन सिझू, एलेन शोवाल्टर, सिमाॅन दि बोव्हा आदी विदूषींनी स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मांडणी केली. वाङमयातील स्त्रीशरीरनिष्ठ अनुभव, मनोविश्लेषण, शब्दसंग्रह आदींचे चित्रण व छूपे पुरूषवर्चस्व यांचा शोध घेण्यावर स्त्रीवादी वाङ्मयाचा भर आहे.

२.५ संदर्भ व टिपा
१. मारवाडे प्रा.नरेंद्र, आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, २००५, पृ. ६३.

२. तत्रैव. पृ. ६७.

३. भोळे भास्कर लक्ष्मण, भारतीय साहित्याचे निर्माते, महात्मा जोतीराव फुले, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, पुनर्मुद्रण, २००४, पृ. १६.

४. तत्रैव. पृ. १७.

५. कित्ता.

६. फडके य.दी., म.फुले समग्र वाङ्मय, म.रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, चौथी आवृत्ती, १९९१, पृ. ३७५.

७. पांढरीपांडे सु.श्री., गांधीवाद आणि स्त्रीवाद, श्रीवाणी, आक्टो.९३, पृ. ६९.

८. पवार गो.मा., भारतीय साहित्याचे निर्माते, विठ्ठल रामजी शिंदे, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, पुनर्मुद्रण २००६, पृ. ५७.

९. शिंदे उषा रावसाहेब, विभावरी शिरुरकर यांचे वाङ्मय-स्त्रीवादी आकलन, अमृत प्रकाशन, कळवण, प्रथमावृत्ती १९९५, पृ. ५.

१०. शिंदे ताराबाई, स्त्री-पुरूषतुलना (लेख), स्त्रीचा आत्मशोध, संपा-डाॅ.मृणालिनी शहा, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, प्रथमावृत्ती २०००, पृ ६०.

११. सोमण डाॅ.अंजली, स्त्रीवादी मूल्यदृष्टी आणि साहित्य (लेख), मूल्यसंकल्पना व साहित्यविचार, डाॅ. बाळकृष्ण कवठेकर गौरव ग्रंथ, संपा. प्रकाश मेदककर, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, पृ.२१७.

१२. धोंगडे डाॅ.अश्विनी, स्त्रीवादी समीक्षा- स्वरूप आणि उपयोजन, दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे, प्रथमावृत्ती १९९३, पृ.२०.

१३. तत्रैव, पृ. २१.

१४. भागवत विद्युत, महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चळवळीचा आढावा, परामर्श खंड १, १९८९. पृ. ३७.

१५. डेविस राॅबर्ट आणि रोनाल्ड शेलिफर, कंपेम्पररी लिटररी क्रिटीसिझम, लिटररी अॅण्ड कल्चरल स्टडीज, लाँगमन, न्युयार्क अॅण्ड लंडन, १९८९, पृ. ४९३-५११.

१६. तत्रैव, पृ. ४८२.

१७. गुनेव शेजा, अ रिडर इन फेमिनिस्ट नाॅलेज, राउल्टएज, लंडन, १९९१, पृ. २२९.
१८. वरखेडे मंगला, स्त्रियांची नवकथा- वाटा आणि वळणे, पृ. ५-६.

१९. डेविस राॅबर्ट आणि रोनाल्ड शेलिफर, उ.नि., पृ. ४५२.

२०. जाधव रा.ग., कला,साहित्य व संस्कृती, सुगंधा प्रकाशन, पुणे, १९८६, पृ. ३०-३५.

२१. सोमण डाॅ.अंजली, उ.नि. पृ. २१४.

२२. धोंगडे डाॅ.अश्विनी, उ.नि. पृ. ५८.
***

1 comments:

Ashintosh म्हणाले...

haa lekha sathi mr dot upakram dot org he vyaasapeeth yogy aahe ase vaTate.

to