घाव अजुनी...

रविवार, २२ मार्च, २००९

स्त्रीवादाचे यश आणि अपयश व नवा दृष्टीकोन.

प्रकरण ५ वे


प्रस्तावना
अभ्यासविषयाच्या या अंतिम टप्प्यात मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारधारेच्या यशापयशाची चर्चा प्रामुख्याने करावयाची आहे. आतापर्यंतच्या विवेचनात मराठी वाङ्मयातील सर्वच प्रवाह व चळवळींच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी साहित्यविचाराच्या प्रेरणा, पार्श्वभूमी व समकालिन स्वरुपावर भाष्य करण्यात आले आहे.
मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यविचार हा परभृतपणामूळे एकांगी ठरतो या विधानाची सिध्दता मागील प्रकरणातील विवेचनातून प्रत्ययास येते.

स्त्रीवादी साहित्याच्या मराठी वाङ्मयातील सामर्थ्यस्थळांचा आढावा घेऊन या चळवळीतील सांस्कृतिक चिकित्सेच्या संदर्भातील असमर्थतेवर व वर्गवादी दृष्टीकोनावर भाष्य करणे हा या प्रकरणाचा मुख्य आशय आहे. या विवेचनातून ही विचारधारा सर्वसमावेशकतेच्या अभावी यशस्वी ठरू शकलेली नाही या विधानाची सिध्दता करण्यावर भर राहील.

प्रकरणाच्या उत्तरार्धात भारतीय सांस्कृतिक संदर्भात नव्या स्त्रीवादी दृष्टीकोनाची गरज प्रतिपादीत करून तत्संबंधीच्या विवेचनातून अभ्यासप्रकल्प पूर्णत्वास नेला जाणार आहे.

५.१ वर्तमानकालिन मराठी वाङमयातील स्त्रीवादाची शक्तिस्थाने.
मराठी वाङ्मयात आज स्त्रीवादी विचार हळूहळू स्थिरावू पहातोय. याविचारसुत्रांमध्ये काही कमतरता असल्या तरी त्याची काही शक्तिस्थानेही आहेत. या शक्तिस्थानामुळे आक्षेपांना प्रत्युत्तरे देत स्त्रीवादी विचारधारा मराठी वाङ्मयात आपला मार्ग प्रशस्त करू पाहते आहे. या शक्तिस्थानांचा आढावा प्रस्तुत मुद्यात घ्यावयाचा आहे.

स्त्रीला दुय्यम लेखन्याची व स्त्रीशोषणाची प्रदीर्घ परंपरा भारतीय संस्कृतीने जोपासलेली असली तरी स्त्रीवादी चळवळ व वाङ्मयातील स्त्रीवाद या दोनही संकल्पना पाश्चात्त्यांकडून आयात कराव्या लागल्या. याची कारणमिमांसा आपण यापूर्वीच्या विवेचनातून सविस्तरपणे केलेली आहे. मराठी वाङ्मयात स्त्रीवादी प्रेरणांच्या आविष्कारामागे मुख्य प्रेरणा ही पाश्चात्त्यस्त्रीवादी विचारधारेची आहे. ही पाश्चात्त्यविचारधारा मराठीतल्या तत्पूर्वीच्या सपक स्त्रीसहानुभूतीपेक्षा अतिशय जहाल व भारतीय संस्कृतीला झोंबणारी होती. मराठी वाङ्मयातल्या स्त्रीवादाच्या शक्तिस्थानाचा विचार करतांना हा स्त्रीवाद पाश्चात्त्यांईतकाच प्रखरपणे, इथल्या संस्कृतीरक्षकांना फारशी भीक न घालता अविष्कृत झाला या बाबीचा निर्देश सर्वप्रथम करणे महत्त्वाचे वाटते.

मराठी वाङ्मय व एकूणच मराठी माणूस हे बरेचसे परंपराप्रिय आहेत. कारण या परंपरांनी एकूणच मराठीपणाची धूरा वाहणा-या धूरीणांना आपापली सत्तास्थाने सुरक्षित ठेवणे सोपे जाते. परिणामी वाङ्मयात नवे काही येऊ घातले की ते परदेशी म्हणून त्याविषयी नाके मुरडली जातात. या अशा नाके मुरडणा-यांनी आपली प्रतिभा भाषांतरांच्या हंडयांनी युरोपियनांच्या घरी पाणी भरण्याच्या कामाला लावलेली असते हा भाग अलहीदा. नवकाव्याच्या पायी मर्ढेकरांसारख्या प्रतिभावंताला मराठी वाङ्मयाच्या तथाकथित शिलेदारांनी कोर्टाच्या खेटया घालायला लावल्या होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. स्त्रीवादी वाङ्मयविचार हा मराठीत अविष्कृत होतांना स्रियांवर भारतीय संस्कृतीने घातलेली कठोर बंधने विचारात घेता पाश्चात्त्यांप्रमाणे या विचाराला येथे मोकळा श्वास घेता येणे मुश्किलच होते. अशा प्रसंगी हा स्त्रीवाद तोडूनमोडून भारतीय परंपरेला गोंजारत तिच्यावर विखारी टिका करणे टाळत आणि परिणामस्वरूप कृतकपणे अविष्कृत होण्याची शक्यता होती. परंतू स्त्रीवादी विचार मराठीत अविष्कृत होतांना त्याने परंपरेची ही झापडे पुर्णपणे काढून टाकली. स्त्रीचे मन, स्त्रीचे शरीर, पुरुषाची दांभिकता, संस्कृतीचा अप्पलपोटेपणा या सर्वांविषयी खुले विचार मांडले गेले. स्त्रीवादी साहित्यविचार त्यामुळे अंतर्विरोधापासून स्वतःला वाचवू शकला.

स्त्रीवादी विचार मांडतांना मराठी वाङ्मयात स्वीकाराल्या गेलेल्या या निर्भिडपणाचे उदाहरण म्हणून प्रभा गणोरकरांनी व्यक्त केलेले पूढील विचार पहा, `आपल्या देशात हजारो वर्षांपासून कोटयावधी माणसांना बुध्दी असते हे मुळी हेतुपुरस्सर, राजकिय हेतूने, गुंडाळूनच ठेवले गेेले आहे. बाईला तर बुध्दीच नसते असे बिंबवण्यात आले. माणसांना गुरांप्रमाणे, पशूंप्रमाणे वागवणारा देश, रुढी, परंपरा, व्यवस्था यांच्या कुंपणात अडकवणारा हा देश आहे. या देशाचा हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो आहे. हजारोवर्षांची ही प्राचीन संस्कृती कोणता नवा विचार जगाला देते आहे. पाश्चात्त्य संस्कृती, विचार, तत्वज्ञान यांना नाके मुरडणे सोपे आहे पण वैचारीक प्रगती, शेकडो प्रकारचे शोध, मानवी जीवनीसंबधी, समकालिन प्रणालींसंबधी साहित्य, कला, विज्ञान या संबंधी अखंड विचार हे पाश्चात्त्य जगताचे खरे वैशिष्टय आहे. `माणुस॔ या प्राण्याबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल, त्याच्या अस्तित्त्वाबद्दल आशा असणारी, त्याच्या बुध्दीला मुक्त करणारी विचारशक्तीला मोकळे आकाश देणारी ती संस्कृती आहे. विचारांच्या चिंचोळ्या प्रदेशात अखिल समाजाला कोंबून ठेवण्याने या समाजाचे काय होणार याचा विचारवंतांनी विचार करण्याची वेळ आली अाहे.॔१

स्त्रीसाहित्याविषयीच्या व्यासपीठावरुन गणोरकरांनी मांडलेली ही भूमिका फक्त पाश्चात्त्यांचे अवाजवी समर्थन करणारी म्हणून धुडकावून देता येत नाही. भारतीय संस्कृतीचा दांभिकपणा ती उघडा पाडते. स्त्रीवादी विचारधारेचा मराठी वाङ्मयामधील हा असा निर्भीड आविष्कार हे या विचाराचे सामर्थ्य ठरते. स्त्रीवाद हा पाश्तात्त्यांकडून मराठी वाङ्मयात येत असतांना या विचाराच्या आगमनाच्या वाटा प्रशस्त करण्याचे काम भारतातील स्त्रीवादी चळवळीने व ताराबाई शिंदे, विभावरी शिरुरकर या लेखिकांच्या अल्प प्रमाणातल्या परंतु सशक्त स्त्रीजाणिवा व्यक्त करणा-या वाङ्मयाने केले हे ही या ठिकाणी नमुद करणे आवश्यक आहे.

स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल समाजमनात पूर्वी खूपच टोकाचे गैरसमज होते. आजही या गैरसमजांची तीव्रता कमी झालेली नाही. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारांबद्दलही सुरूवातीला काही गैरसमज निर्माण झाले. जागतिक वाङ्मयातील स्त्रीवादाबद्दल असलेले काही समज तर खरेही होते. उदाहरणार्थ स्त्रीवादी वाङ्मयविचार हा पुरूषांचा तिरस्कार करणारा व स्त्री लेखिकांना भडक लैंगिक चित्रणे करण्यास परवाना देणारा आहे असा प्रवाद या विचारांबद्दल पसरलेला होता. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारधारेने मात्र ब-याच प्रमाणात या आक्षेपांचे निराकरण करण्यात यश मिळवले आहे.

स्त्रीवादी वाङ्मयविचाराने स्त्रियांच्या व एकूणच मराठी वाङ्मयाला पारंपरिकतेच्या गर्तेतून बाहेर काढण्याची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी वाङ्मयातील पुरूषांनी व स्त्रीलेखिकांनीही केलेले स्त्रीचित्रण हे प्रामुख्याने पारंपरिकच होते. एखादा अपवाद वगळता ही स्त्रीपात्रे मध्यम आणि उच्चवर्गीय विश्वाच्या मर्यादित रिंगणात फिरणारी होती. १९७५ च्या कथा लेखिका संमलेनाच्या अध्यक्षा जोत्स्ना देवधर म्हणतात, ॓फाफटपसारा, सैलबांधणी, कृत्रिम भाषा, गहिवर, अतिरंजितता या पलिकडे या कथांमध्ये काहीच नसते. ही कथा कथा रहात नाही॔२ या िनरीक्षणातून मराठीतील तत्कालिन स्त्रीसाहित्याचे चित्र उभे रहाते. स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या आगमनानंतर मात्र स्त्रीचित्रण हे स्वतंत्र बाण्याचे व अधिक मोकळा श्वास घेणारे होऊ लागले. या नव्या वाङ्मयातील स्त्रीला आपल्यावर लादल्या गेलेल्या परालंबित्वाची जाणीव झालेली आहे. आपल्यात काहीतरी कमतरता आहे हे सतत सांगितल्या गेल्याने हे परावलंबित्व आल्याची जाणीवही तिला झालेली आहे. कमल देसाई यांच्या ॓हॅट घालणारी बाई॔ या शीर्षकरचनेतच स्त्री-पुरूष संयोगाने उभ्या राहणा-या एकत्रित व्यक्तिमत्वाचा निर्देश केला गेला आहे. फक्त सासू, सुन, नणंद, भावजय अशा नात्यांच्या सावलीत चित्रित होणारी स्त्री स्वतंत्र, संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आज मराठी वाङ्मयात काही प्रमाणात येत आहे. याचे श्रेय मराठीतील स्त्रीवादी वाङ्मयविचाराला जाते.

स्त्रीवादी वाङ्मयविचाराचे अजून एक महत्त्वाचे शक्तिस्थान म्हणजे या विचारामूळे मराठी वाङ्मयातील पुरुषलेखकांची दृष्टीही काही प्रमाणात बदलली आहे. पूर्वीच्या पुरुषलेखकांच्या लेखनातील स्त्रीची प्रतिमा ही पारंपरिक होती. लेखकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन ही स्त्रीपात्रे साहित्यात वावरत असत. उदाहरणार्थ पू.भा.भावे यांच्या कथालेखनातील स्त्रीप्रतिमांचे चित्रण पहा. भावे नायिका निर्माण करतांना त्या असीम त्यागाच्या मूर्ती असाव्यात असे दाखवितात. नायक मात्र रगेल आणि रंगेल वृत्तीचा चित्रित करतात. त्यांच्या मते स्त्रीला त्याग, प्रेम, सेवा, समर्पण यांचे आदर्श जागविण्यासाठीच परमेश्वराने घडवले आहे. पुरुष हा प्रमादशील असतो. स्त्रीने मात्र तसे होता कामा नये. अशा मतांमधून मराठी वाङ्मयातील पारंपरिक विचारांच्या लेखकांच्या मताचे एक प्रतिनिधिक चित्र उभे रहाते.

स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या प्रभावाने मात्र नव्याने लिहिणा-या व काही प्रस्थापित पुरुषलेखकांचाही दृष्टीकोन बदलण्यात यश मिळवले आहे. गंगाधर गाडगीळ, जी.ए.कुळकर्णी, रा.रं.बोराडे, आनंद यादव, राजन गवस, उत्तम बंडू तुपे आदी साहित्यिकांच्या वाङ्मयातून स्त्रीच्या पारंपरिक स्थानाबद्दल चीड निर्माण झाल्याचे निदर्शक ठरणारी स्त्रीचित्रणे दिसून येतात. ॓राघववेळ॔ या नामदेव चं कांबळेंच्या कादंबरीतील नायिका ही नव्या युगाच्या कठोर व निश्चयी स्त्रीचे प्रतिनिधिक चित्र ठरते. सुधारणेच्या प्रभावाने उत्तम बंडू तुपे यांची ॓झुलवा॔ मधली नायिका पारंपरिक भोगदासीपणाला नकार देण्याचे सामर्थ्य दाखवते. स्त्रीवादी भूमिकेचा आशय व्यक्त करणारी ही अशी स्त्रीचित्रणे पुरुषांच्या फक्त वाङ्मयातून अविष्कृत झाली आहेत असे नव्हे तर वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, वेगवेगळी चर्चासत्रे व परिसंवादांमधून पुरुष विचारवंतांनी स्त्रीवादी वाङमयविचाराच्या समर्थनार्थ भूमिका मांडल्या आहेत. मराठी वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यविचाराच्या शक्तिस्थानांमध्ये या विचाराने मिळवलेले सर्वंकष वाङ्मयविश्वाचे या प्रकारचे पाठबळ ही एक उल्लेखनिय बाब ठरते.

पारंपरिक मराठी वाङ्मयात स्त्रीविषयी जे लिखाण झाले ते एकतर सौंदर्यदृष्टीच्या पातळीवर अथवा कारुण्याने तिच्या दुःखाचा पाढा वाचण्याच्या पातळीवर झालेले आढळून येते. आपल्या वेदनामयी जीवनातील दुःखाची ठसठस अधिकाधिक भिडणा-या शब्दात मांडून दयेची मागणी करणा-या स्त्रीपात्रांची रेलचेल या वाङ्मयात होती. स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या प्रभावाने मात्र या चित्रणांची सौंदर्य व दुःख पातळीवरची मर्यादितता ब-याच प्रमाणात संपुष्टात आली. स्त्रीवादी साहित्यचळवळीच्याच पुढेमागे मराठी वाङ्मयात दलित साहित्यचळवळीचा झंझावात उदयास आला. नवसाहित्याच्या अभिव्यक्तीला पोषक अशा रचनातंत्राच्या सहाय्याने वास्तवपातळीवरचे भेदक चित्रण या वाङ्मयातून वाचकांच्या समोर आले. दलित साहित्यामूळे हिरव्या कुरणात, पांढ-या ढगात, शुभ्र चांदण्यात विहार करणारे मराठी वाङ्मय ख-या अर्थाने जमीनीवर आले. स्त्रीवादी वाङ्मयविचाराला समकालिन ठरलेल्या दलित साहित्यचळवळीचा प्रभाव अर्थातच स्त्रीवादी वाङ्मयविचारावर पडणे साहजिकच होते.

स्त्रीवादी वाङ्मयविचार हा पारंपरिक पुरुषी दृष्टीकोनाला नकार देणारा होता. या नकारामागचे एक प्रमुख कारण म्हणून भारतीय धर्मव्यवस्थेचा निर्देश अपरिहार्यपणे सामोरा येत होता. परिणामस्वरुप स्त्रीवादी वाङ्मयविचारातून धार्मिक परंपरांशीसुध्दा विद्रोह मांडला गेला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच काळात केलेली हिंदूधर्माची चिकित्सा ही स्त्रीविषयींच्या मुद्दयांवर स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करणारी होती. या सर्व विचारप्रभावांच्या अनुषंगाने विद्रोह व नकार या दोन मार्गांनी मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी वाङ्मयविचारांची वाटचाल सुरू झाली. जहाल भाषा व प्रखर प्रतिमांच्या सहाय्याने स्त्रीसाहित्याने पारंपरिक पुरुषी दृष्टीकोनाचा बुरखा फाडला. दलित साहित्यातून एकलव्याचे तर स्त्रीवादी साहित्यातून सीता, द्रौपदीचे दाखले देऊन नव्या अंगाने विचारप्रक्रीयेला चालना देण्यात आली. आज स्त्रीवादी वाङ्मयविचार आणि दलितसाहित्य चळवळ यांच्यात दूर्देवाने फारसे अनुबंध आढळत नसले तरी विद्रोह ही स्त्रीवादी वाङ्मयविचाराची दोन मुख्य विचारसुत्रे या विचाराची शक्तीस्थाने असल्याचे या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे.

स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या सामर्थ्यस्थळात भर टाकणारे अजून एक महत्त्वाचे अंग म्हणजे समकालिन मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्य समीक्षेचा प्रवाह होय. स्त्रियांच्या साहित्याची पारंपरिक दृष्टीने होणारी समीक्षा ही स्त्रीच म्हणून त्या साहित्याकडे काहिशा पुर्वग्रहदुषितपणाने कटाक्ष टाकून होत असे. स्त्रीमध्ये सृजनशक्ती असते आणि ती वाङ्मयाच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकते हे मान्य करायलाच पूर्वी प्रस्थापित पुरुष समीक्षक तयार होत नसत. विभावरी शिरूरकरांच्या वाङ्मयावर प्रतिक्रीया देतांना हे लेखन स्त्रीच्या नावाआडून एखाद्या पुरुषानेच केले असले पाहीजे अशा आशयाचे मत मराठी वाङ्मयाच्या समीक्षक जगतातून व्यक्त करण्यात आले होते.

समकालीन मराठी वाङ्मयातील समीक्षादृष्टी मात्र अगदी सहजपणाने कुठल्याही एेतिहासिक भूमिकेचा आव न आणता स्त्रीवादी दृष्टीने समीक्षा करत आहे. ॓तारे जमीन पर॔ या चित्रपटाच्या परीक्षणात या शालेय जीवनावरील चित्रपटात समाजाचा अर्धा भाग व्यापून असलेल्या मुली मूळीच कशा काय दाखविण्यात आल्या नाहीत या बद्दल एका समीक्षकाने सखेद आश्चर्य व्यक्त केलेले दिसून येते.३ स्त्रीवादी दृष्टीचा समाजमनात होत असलेला परिपोष या अशा लेखनातून प्रत्ययास येतो. रा.ग.जाधव यांनी स्त्रीवादी समीक्षेसंबंधी व्यक्त केलेले विचार यापूर्वीच्या विवेचनात येऊन गेलेले आहेतच. स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या लक्षणीय प्रभावाच्या अनुषंगाने मराठी समीक्षेने हा नवा दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. मेघना पेठे, कविता महाजन, सानिया, कमल देसाई अशा लेखिकांच्या वाङ्मयाची समीक्षा वाचतांना एका स्त्रीच्या लेखनाची समीक्षा म्हणून वेगळी अशी प्रतवारी अथवा पूर्वग्रह त्यात आढळत नाही. सर्वसामान्या श्रेष्ठ कलाकृतीची विशेषणे अगदी सहजपणे या साहित्याला लावली जातात. विभावरींच्या लेखनाबद्दल लिहिता बोलतांना ॓एका बाईने असे कसे काय बुवा लिहिले॔ असा आविर्भाव आणला गेला होता. आज मात्र स्त्री ही पुरुषांईतकीच शारीरिक भावना बाळगून असते आणि तिच्या भावना तिच उत्कटपणे व समर्थपणे व्यक्त करु शकते हे स्वीकारले जात आहे. याचे श्रेय आपसूकच स्त्रीवादी वाङ्मयविचाराला जाते.

स्त्रीवादी वाङ्मयविचाराच्या मराठी वाङ्मयातील या अशा शक्तिस्थानांचा विचार करत असतांना विद्यापीठीय व संस्थात्मक पातळीवर स्त्रीवादी वाङ्मयाच्या संदर्भात वैपूल्याने होत असणा-या अभ्यासाचा निर्देश करणेही गरजेचे ठरते. या अभ्यासातून या विचारधारेतील अनेक सुत्रे नव्या अंगाने प्रकाशात येत आहेत. पाश्चात्य साहित्यविश्वातील या विषयावरचे ताजे मंथन अल्प प्रमाणात का होईना मराठीत आणले जात आहे.

स्त्रीवादी साहित्यविचाराच्या सामर्थ्यस्थळांची यादी मात्र या इथपर्यंतच मर्यादित ठरते. कमतरतेच्या स्वीकारातूनच पूर्णत्वाकडच्या वाटचालीची सुरूवात होत असते. स्त्रीवादी वाङ्मयविचाराने आतापर्यंतच्या दोन ते अडीच दशकांच्या वाटचालीत बरेचसे आक्षेप खोडण्यात जरी यश मिळवले असले तरी या विचाराच्या उपरेपणामूळे, वर्गवादामूळे व सांस्कृतिक चिकित्सेबाबत स्वीकारलेल्या भिडस्तपणामूळे हा विचार पठारावस्थेप्रत पोचल्यासारखा झाला आहे.

अभ्यासविषयाच्या या पूढील मांडणीत मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचाराच्या या कमतरतांचे विवेचन करावयाचे आहे. अर्थात या विवेचनामागील हेतू या विचाराला अधिकाधिक स्थलकालसंदर्भीय वास्तवाप्रत नेऊन अधिकाधिक पक्की वैचारीक बैठक प्राप्त करून देणे हाच राहील.

५.२ सांस्कृतिक चिकित्सेच्या संदर्भात स्त्रीवादाची असमर्थता
भारतीय संस्कृती आणि स्त्रीवाद या दोन बाबींचा जेव्हा एकत्रित विचार करण्याची वेळ येते तेव्हा या दोन बाबी एकमेकांच्या विरोधात उभ्या असल्याचे आपणास दिसून येते. स्त्रीवादी वाङ्मयविचाराने आपले प्रस्थान मराठी वाङ्मयात बसवतांना मात्र धर्म व संस्कृती िचकित्सेच्या बाबतीत मिळमिळीत धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. स्त्री व शूद्रांच्या बाबतीत आपले तत्वज्ञान मांडतांना हिंदू धर्माने व त्याभोवतालच्या सांस्कृतिक परिवेशाने केलेला अक्षम्य भेदभाव स्त्रीवादी वाङ्मयविचारातून आजही फारशा काही प्रमाणात दृगोचर होत नाही.

प्राचीन व पूर्वसुरींच्या साहित्याचे स्त्रीकेंद्री वाचन करणे हा एक स्त्रीवादी वाङमयविचारातला महत्त्वाचा भाग आहे. असे वाचन करतांना आपल्या संस्कृतीची पायाभरणी करणारे वेद, श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत यासारख्या वाङ्मयाला अग्रक्रम दिला गेला पाहिजे.

पारंपरिक विचारसरणीत स्त्री ही पुरूषांच्या सुखाचे साधन मानले जाते. साधारणपणे मानवजन्म हा श्रेष्ठ मानला जातो. प्राचीन दाखल्यांकडे नजर टाकली असता मात्र ॓नरजन्म॔ असा लिंगसापेक्ष उल्लेख सर्वत्र झालेला दिसून येतो. स्त्री मात्र फक्त पुरुषाला रतिसुख व पुत्र देण्यासाठीच जन्माला येते असे म्हटले आहे. या बाबातीत मनू, कौटिल्य आणि कालिदासाची मते प्रतिनिधिक स्वरुपात उद््धृत करता येतील. मनुस्मृतीने म्हटले आहे ॓स्त्रिया प्रजनन करण्यासाठी असतात. अपत्याचे उत्पादन, जन्मलेल्या अपत्याचे पालन आणि दररोजचा लोकव्यवहार या गोष्टी प्रत्यक्षरीत्या स्त्रीवर अवलंबून असतात. अपत्य, धार्मिक कार्ये, शुश्रुषा, उत्तम रतिसुख आणि पितरांचा व स्वतःचा स्वर्ग या गोष्टी पत्नीच्या आधीन असतात.४ मनुने इतरत्रही स्त्री ही फक्त पुरुषांच्या सुखसेवेची साधन असते अशा आशयाची मते व्यक्त केलेली आहेत. यातून मनुने स्त्रीजन्माला पुरुषसेवेसंबंधी धार्मिक कामे आणि पुरुषाला उत्तम रतिसुख देऊन त्याला पुत्रसुख प्राप्त करुन देण इतक्यापुरतेच मर्यादित करुन टाकले आहे. महाकवी कालिदासाने रघूवंशात सीतेविषयी मतप्रदर्शन करतांना आपली स्त्रीविषयक मते मांडली आहेत. विवेकपूर्ण व रसपूर्ण वाङ्मयासाठी प्रसिध्द असलेल्या कालिदासाच्या वाङ्मयातून पूढील प्रकारचे मत व्यक्त होणे म्हणजे त्यांच्यात परिपोषित झालेल्या भारतीय संस्कृतीच्या विचारांचाच दृश्य व अपरिहार्यपणे अभिव्यक्त झालेला परिणाम होय. कालिदास म्हणतो, ॓किर्ती हेच ज्याचे धन असते, ते लोक किर्तीला स्वतःच्या शरीरापेक्षाही श्रेष्ठ मानतात. मग त्याने (रामाने) इंद्रियांच्या उपभोगाचा विषय असलेल्या वस्तूपेक्षा (सीतेपेक्षा) किर्तीला श्रेष्ठ मानले तर नवल कसले?॔ सीतेला ज्या वाङमयाची नायिका मानले जाते त्या नायिकेचा एका फटक्यात उपभोग्य वस्तू असा स्पष्टपणे कशाप्रकारे केला जातो हे या ठिकाणी स्पष्ट होते.५ कौटील्यानेही आपल्या अर्थशास्त्रात ॓स्त्रिया पुत्रनिर्मितीसाठी असतात॔ असे म्हटले आहे. तो म्हणतो, ॓पहिल्या पत्नीला स्त्रीधन वगैरे देऊन आणि तिच्या उपजिवीकेची योग्य ती सोय करुन पुरुषाने अनेक स्त्रियांशी लग्न करावयास हरकत नाही. कारण स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी असतात.॔६ म्हणजेच कौटील्याच्या या अशा शास्त्रनियमानुसार संपत्ती असणारा पुरुष भोगलालसेपायी अनेक स्त्रियांशी लग्न करु शकतो. या व अशा कित्येक मतांची रेलचेल सांस्कृतिक म्हणवल्या जाणा-या आपल्या पारंपरिक वाङ्मयातून दिसून येते.

स्त्रीवादी वाङ्मयविचार या व अशा सांस्कृतिक मतांची चिकित्सा कितपत करू शकतो या बाबत थोडा विचार करू. स्त्रीवादामध्ये स्त्रीकेंद्री दृष्टीकोनातून साहित्याचे पुनर्वाचन करण्याचा जो मुद्दा मांडला गेला आहे त्या अनुषंगाने अशी चिकित्सा करता येते. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारप्रवाह मात्र अशा चिकित्सेच्या वाटेला जातांना दिसत नाही. मराठी वाङ्मयाच्या या असमर्थतेची उदाहरणे स्त्रियांनी लिहिलेल्या पौराणीक विषयांवरील कादंबरीवाङ्मयामधून शोधता येतात.

डॉ.सुमती क्षेत्रमाडे यांनी महाभारतावर कादंबरी लिहितांना गांधारीच्या व्यक्तीरेखेने प्रभावित होऊन ॓सत्यप्रिय गांधारी॔ असे नाव कादंबरीला दिले. आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात की ॓कादंबरीत रेखाटलेली पात्रे महर्षी व्यासांनी जशी रेखाटली आहेत, तशीच तिथून उचलून मी या कादंबरीत ठेवली आहेत. त्याच्या मूळ व्यक्तीमत्त्वाला मी कुठेही यत्किंचितही धक्का लावण्याचे वृथा धारिष्टय दाखवलेले नाही.॔७ एेंशीच्या दशकात म्हणजे जवळपास आधूनिक काळातच महाभारतावर कादंबरी लिहितांना या महाकाव्यातील स्त्रियांच्या मनाची आगतिकता लेखिकेने स्त्रीच्या दृष्टीकोनातून रेखाटने टाळले आहे. मी जसेच्या तसे महाभारत आपल्यासमोर मांडले आहे असे म्हणतांना माझी ही कलाकृती वाचकांना आवडेल असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे. समाजमनाला धक्का देईल, त्याला दुःख वाटेल असे काही पातक आपल्या हातून घडू नये अशीच भूमिका लेखिकेची आहे. ॓आपला होणारा पती अंध आहे हे गांधारीला कळले तेव्हा फार उशीर झाला होता. सत्याप्रमाणेच पातिव्रत्त्य हा आपला धर्म आहे, हे माननारी गांधारी डोळ्यांवर पट्टी बांधून विवाहमंडपात आली॔८ अशाप्रकारे थोडक्यात नायिकेवर ओढवलेली दूरावस्था व त्याला कारणीभूत असलेल्या खोटया पातिव्रत्त्याच्या व स्त्रीकर्तव्याच्या कल्पनांचे चित्रण करण्यात आलेले आहे.

मूळ कथारूप, घटनाप्रसंग कायम ठेवूनही पौराणीक कथांमधील स्त्रियांच्या मनोविश्लेषणाची नवी मांडणी करता येणे शक्य आहे. परंतु समकालीन मराठी वाङमयातील स्त्रीसाहित्याने मात्र असा पावित्रा कुठेच घेतलेला आढळून येत नाही.

एकंदरीत मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यविचार स्त्रीकेंद्री विचारातून वाङ्मयनिर्मिती करतांना स्त्रीला छुपेपणाने व मोठे ठरवण्याचा आव आणत दुय्यम लेखना-या संस्कृतीची चिकित्सा करण्यास असमर्थ ठरतो. संस्कृतीच्या या स्त्रीला समानत्व नाकारणा-या बाबींची चिकित्सा करुन त्यांच्या दडपणातून स्त्रीवादी साहित्यविश्व जोवर बाहेर पडत नाही तोवर त्याला आपले खरे सत्व गवसणार नाही.

५.३ स्त्रीवादी चळवळीतील वर्गवाद
मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यचळवळीच्या माध्यमातून या प्रवाहाचे जे काही चित्र समोर येते. त्या चित्रातून या विचारविश्वाची कक्षा मर्यादित करणारे एक महत्त्वाचे अंग प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे स्त्रीवादी वाङ्मयविचारातील वर्गवादाचे अंग होय. आधुनिक मराठी वाङ्मयाला पूर्वीपासूनच या अशा मर्यादितपणाचा शाप मिळालेला आहे. फक्त एकाच वर्गाच्या साहित्य प्रवाहाला साहित्याचा मुख्य प्रवाह मानन्याची रीत आजही आढळून येते. एकोणीसशे साठ नंतर उदयास आलेल्या ग्रामीण व दलित साहित्यप्रवाहांनी जरी मराठी वाङ्मयाच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी या साहित्यातील भिंती अजूनही पूर्णतः नाहिशा झालेल्या नाहित. अखिलभारतीय(?) पातळीवरच्या मराठी वाङ्मयाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ग्रामीण, दलित या व अशा इतर प्रकारात गणल्या गेलेल्या साहित्यकृतींची हटकून उपेक्षा होते.

स्त्रीवादी साहित्यचळवळीची धूरा वाहणा-या लेखिकांचा वर्ग नजरेखालून घातला तर साहित्याच्या तथाकथित मूख्य प्रवाहाप्रमाणेच या प्रवाहाची एकला चलो रे ची भूमिका प्रकर्षाने जाणवते. मूळात वाङ्मय हे त्याच्या आशयविषयापेक्षा अभिव्यक्तीपध्दती वरून जेव्हा श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवले जाते तेव्हा लेखकाला त्याच्या विचाराइतकेच विश्व संपूर्ण मानून चितारायची परवानगी मिळते. वाङमयाचा कस अशाप्रकारे ठरवतांना प्रसंगी सद्सद््विवेक बुध्दीशी केलेली प्रतारणासुध्दा कलारूप धारण करण्याची शक्यता बळावते.

प्रस्तुत अभ्यासविषयात स्त्रीवादी वाङ्मयविचाराचे विवेचन करतांना एकोणाविसशे सत्तर नंतर जागतिक स्त्रीवादी विचारधारेच्या साहित्यशास्त्रीय प्रभावाने उदयास आलेल्या साहित्यकृतींना विषयवस्तू म्हणून गृहीत धरले गेले आहे. या साहित्याच्या ज्या लेखिका आहेत त्या प्रामुख्याने उच्चशिक्षित, उच्चभ्रू, आणि उच्चवर्णीय या वर्गातल्या आहेत. असे विशिष्ट वर्गातले असणे म्हणजे वाङ्मयाच्या दृष्टीने काही अपराध ठरतो असे या ठिकाणी म्हणायचे नाही. परंतु मराठी वाङ्मयाने आपले स्वरुप साकार करण्याच्या दिर्घकालिन प्रक्रीयेत सृजनशील म्हणवल्या जाणा-या मनाची झापडे बंद ठेवल्याने स्वतःवर मर्यादिततेचा डाग लावून घेतला. आज आधूनिक काळाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाङ्मयात जे वेगवेगळे सवते सुभे निर्माण झाले आहेत त्यांच्या कारणांच्या मूळाशी सुरुवातीच्या काही दशकात मराठी वाङ्मयाने स्वीकारलेले बधीरपण असल्याचे स्पष्ट आहे. वाङ्मयाची उंची वाढायची असेल तर त्याच्या आशयविषयाया पायाही तेवढाच विस्तारीत असायला हवा. सरळसोट एकखांबी तत्वाने वाढणारी रचना ही ठरावीक उंचीवर पोचल्यावर अपरिहार्यपणे कोसळते.

समकालीन मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी वाङ्मयविचाराची वाटचालही मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या वाटचालीच्या पावलावर पाऊल टाकून चालू आहे. मराठी वाङ्मय सुरूवातीच्या काळात फक्त मर्यादित वर्गापूरतेच लेखकवर्गाच्या व विषयवस्तूच्याही संदर्भात राहण्याला वर्गवर्चस्वाच्या भावनेबरोबरच इतरही सामाजिक कारणे होती हे ही या ठिकाणी नमूद करायला हवे. या काळात शिक्षणाचा व नव्या कलाजाणीवांचा प्रसार फक्त एकाच वर्गापुरता मर्यादित होता. ही मर्यादितता स्वातंत्र्याेत्तर काळानंतरी दोन दशकांपर्यंत कायम होती. अशा परिवेशात लिहिणा-यांनी स्वतःच्या जीवनानुभवाला फारतर वाचकवर्गाच्या जीवनजाणीवेपर्यंतच विस्तारीत केले. वाचक व लेखक यांच्यातील वर्गसाम्यामूळे या अशा मर्यादेत भरच पडली. हे परिस्थितीचे वैशिष्टय लक्षात घेतल्यानंतरही स्वतः सुशिक्षित व प्रगल्भ झाल्यावर आपल्या देशबांधवांपर्यंत हे लाभ पोचवण्याचे प्रयत्न फारसे हिरीरीने झाले नाहित. महात्मा फुले यांच्यासारखे मोजके सुधारक सोडले तर तथाकथित बहूसंख्य समाजसुधारकांच्या समाजसुधारणांच्या चळवळी स्वतःच्या वर्गाला सुशिक्षित करणे, त्यांच्यातल्या हानिकारक प्रथापरंपरा व कर्मकांडांना दूर करणे अशाप्रकारे स्वतःच्याच वर्गाचा उद्धार करण्यापुरत्या मर्यादित होत्या. परिणामस्वरूप या काळातील वाङ्मयही हे एकाच साच्यातून, ठराविकच आशयभान घेऊन व्यक्त झाले. त्याच्या या अशा संकुचितपणाने व्यक्त होण्यामागे वाङ्मयातील धूरीणांनी जोपासलेली वर्गकक्षेची बंधनेही कारणीभूत होती हे सुध्दा या ठिकाणी सहजासहजी नजरेआड करता येणार नाही.

स्त्रीवादी साहित्यचळवळीच्या सुदैवाने आज मराठी वाङमय हे ठराविक वर्गापूरते मर्यादित असल्याची परिस्थिती नाही. प्रतिनिधिक स्वरुपात का होईना पण एखाद्या समाजवर्गातील एकही साहित्यकृती प्रकाशित झालेली नाही असे म्हणणे आता धाडसाचेच ठरू शकते. वाचकवर्गाची संख्येच्या बाबतीतली मर्यादितता व झपाटयाने कमी होत जाणारी वाचनसंस्कृती ही आज एकूण वाङ्मयासमोरची समस्या असली तरी आज जो काही वर्ग वाचतो आहे तो समाजाच्या सर्व स्थरांचे, वर्गांचे प्रतिनिधित्व करणारा आहे असे म्हणता येते. म्हणजे स्त्रीवादी साहित्यचळवळीला फक्त विशिष्ट उच्चभ्रू, उच्चवर्ण व नागरी समाजापूरतेच अगदी अपरिहार्यपणे मर्यादित रहावे लागेल अशी परिस्थिती नाही. मग सर्वंकष होता येण्याच्या या संधीचा फायदा आज मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी साहित्यचळवळ उचलू पाहते का याचा शोध घेऊ पाहता वेगळेच सत्य समोर येते.

मराठीत स्त्रीवादी म्हणून लेखन करणा-या स्त्रियांचे लेखनविषय, त्यांच्या साहित्यातील पात्रे, प्रतिमा, प्रतिके ही अतिशय मर्यादित स्वरुपाच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतांना दिसतात. सानिया, गौरी देशपांडे, कमल देसाई यांच्या साहित्यात तर सरळ सरळ पाश्चात्यपणाचाच शिरकाव आहे. हे या लेखिकांचे अनुभवविश्व आहे असे म्हणावे तर भारतीय स्त्री म्हणून जे काही ॓सोसणे॔ आहे त्यालाही या लेखिका अधूनमधून गोंजारतांना दिसतात. या स्त्रियांच्या लेखनातून अनुभवलेल्या स्त्रीजीवनाचे चित्रण येण्याएेवजी जे काही अनुभवावेसे वाटते अशा स्त्रीजीवनाचे कल्पनेच्या पातळीवरचे मुक्त चित्रण येतांना दिसते. या लेखिकांच्या लेखनातून जे सामोरे येते त्यापेक्षा अगदी वेगळे जीवन सध्या स्त्रिया जगत आहेत. मराठी वर्तुळातल्या उच्चभ्रू वर्गातही स्त्रिया असे जगत असतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आहे त्या व्यंगाला नकार देऊन अपेक्षित असे अव्यंग जीवन रेखाटणे हा वाङ्मयाचा जरी स्थायीभाव असला तरी असे रेखाटलेले कल्पित हे अस्तित्वातल्या वास्तवात मूळे रोवूनच उभे असायला हवे. परंतु या अशा उप-या चित्रणातून स्त्रीवादी वाङ्मय वर्गवादाच्या कक्षा घट्टपणे आवळून घेतांना दिसते.

पाश्चात्य विश्वातल्या स्त्रीवादी लेखनाकडून नजर भारतीय जीवन चित्रण करणा-या लेखिकांवर अथवा स्त्रीवादी वाङ्मयावर वळवली असता आशा बगे, कविता महाजन, सुनीता देशपांडे, कमल पाध्ये, नीरजा, उर्मिला पवार, माधवी देसाई यांच्या लेखनाकडे दृष्टीक्षेप जातो. या स्त्रीवादी वाङ्मयातली स्त्रीपात्रे ही भारतीय पार्श्वभूमीतली, संस्कृती व संस्कारांशी मुकपणे तर कधी उघडपणे झगडणारी आहेत. कविता महाजन यांच्या ॓ब्र॔सारख्या कादंबरीत आशयाचे अवकाश विस्तारलेले जरी असले तरी हा विस्तार कादंबरीच्या नायिकेसमोर आलेल्या अपरिहार्यतेतून आकारास आलेला दिसतो. नव-याने दिलेली सापत्न वागणूक विसरून जाण्यासाठी ही नायिका समाजात स्वतःला झोकून देते. त्यापूर्वीचे तिचे आयुष्य उच्चमध्यमवर्गीय गृहीणीचेच आहे. नव-याने दुसरे लग्न करेपर्यंत परंपरेच्या ओझ्याखाली स्वतंत्र जाणीवा दाबून ठेवणारे आहे. या स्त्रीवादी साहित्याच्या लेखिकांमध्ये प्रामुख्याने काही कारणास्तव पुरुषवर्गाची सावली हरवण्यातून जागृत झालेल्या स्त्रीजाणीवा व्यक्त करणा-या लेखिका आहेत. इतर स्त्रीवादी वाङ्मय हे सामाजिकदृष्टया वरच्या, शैक्षणिकदृष्टया पूढारलेल्या वर्गातील स्त्रीचित्रणांना प्राधान्य देणारे आहे. या स्त्रीसाहित्यातील स्त्रीपात्रे ही स्वतःच्या मर्यादित भावविश्वातील दुःखांना चिरंतन दुःख मानून त्यांना सोसत राहतात. अर्थात दुःखाची अशी प्रतवारी करता येत नाही परंतु संवेदनशीलतेच्या अंगाने स्वतःच्या परिघाबाहेरील जगातील वेदनांचे स्वरुप जाणून घेण्यातूनही आपल्या सोसण्याची काहीली कमी करता येते व स्वतःची सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या मार्गावर वाटचालही करता येते हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे.

स्त्रीवादी साहित्यचळवळीतल्या अभिव्यक्ती कक्षांची मर्यादितता जेव्हा दलित व ग्रामीण स्त्रियांच्या भावविश्वाचा विषय येतो तेव्हा अधिकच प्रखरपणे जाणवू लागते. एरवी छुप्या पुरुषवर्चस्वाशी लढा देण्याची भाषा करणारी स्त्रीवादी साहित्यचळवळ दलित व ग्रामीण वर्गातील साहित्याला कमी प्रतीचे ठरवण्यासाठी पुरुषांच्याच आयुधांचा बिनदिक्कतपणे व तितक्याच बेमालूमपणे वापर करते.

दलित आत्मकथनांविषयी एका स्त्रीवादी साहित्यसमीक्षिकेने व्यक्त केलेली अस्सल वाङ्मयीन मते पहा. ॓दलित आत्मकथनांमधून दलित लेखिकांनी मात्र ॓स्व॔त्वाविषयी किंवा तिच्या बदलत्या स्त्रीमानसिकतेतून फारसं कथन केलेलं नाही. भावनिक स्तरांवर प्रचंड कल्लोळ असतांना लिखाणातून फक्त सामाजिकता व्यक्त करणं, ही दलित लेखिकेच्या लेखनातली उदासिनता कुठेतरी थांबायला हवी. ही कोंडी कुठेतरी फुटली पाहीजे. नाहीतर कालांतराने दलित स्त्री आत्मकथनांचा स्थायीभाव ठरेल. याची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. कारण आत्मकथनात जर स्वतःच्या भावछटा उमटणार नसतील तर भविष्यकाळात ती फक्त ॓समाजचित्रे॔ म्हणून ओळखली जातील आणि दलित स्त्रिया स्वानुभवकथनाच्या एका चांगल्या वाङ्मयीन प्रवाहापासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होईल.९ मराठी वाङ्मयातील दलित साहित्यप्रवाहांची अपरिहार्यपणे दखल घ्यावी लागल्यावर दलित आत्मकथनांमधून तोचतोचपणा, आक्रस्ताळेपणा व कसलेही मूल्य नसलेले सरधोपट चित्रण येत असल्याचा आरोप केला गेला. या अशा वाङ्मयदृष्टया असलेल्या अवगुणांमूळे दलित साहित्याचा प्रवाह आटून जाईल अशी भीतीही दाखवण्यात आली. दलित आत्मकथनांचे हे मूल्यमापन या कथनांमधील सांस्कृतिक व धार्मिकतेच्या नावाखाली समाजातील विशिष्ट वर्गाच्या अनाचारी, अमानवी वागणूकीची चिरफाड करणा-या चित्रणातल्या भेदकतेला घाबरून केले गेले होते. या साहित्यामूळे ज्या परंपरेच्या तथाकथित मोठेपणाचा बडेजाव जगभर मारता येत होता, त्या परंपरेचा बुरखा फाडला जाऊ लागला. स्वकीयांची ही पारंपरिक अमानुषता झाकून ठेऊन स्वतःची वर्चस्ववृत्ती जोपासण्याचा भाग म्हणून दलित आत्मकथनांमधील चित्रणांवर तोचतोचपणाचा आरोप केला गेला. जे अनुभवले ते लिहीण्यापेक्षा आम्हाला जसे वाटते तसे लिहा असे बजावण्याचा हा प्रकार आहे. वर स्त्रीवादी वाङ्मयचळवळीने दलित स्त्रीच्या आत्मकथनापर लेखनाची तथाकथित समीक्षा करतांना हाच पवित्रा स्वीकारला आहे. समाजचित्रणांना नाकारून स्त्रियांनी स्वतःचे भावविश्व रेखाटावे असे या ठिकाणी म्हटले आहे. साहित्याच्या अभिव्यक्तीत जे सामोरे येते त्यामागे भोगलेले एकूणच सामाजिक व सांस्कृतिक संचीत उभे असते. ते वगळून कोणत्या भावविश्वाची अपेक्षा येथे व्यक्त केली गेली आहे ते कळणे कठीण आहे. पाश्चात्य स्त्रीवादी साहित्यशास्त्राच्या अनुषंगाने स्त्रीविशीष्ट अनुभवांची अपेक्षा या ठिकाणी केली गेली असेल तर दशकभरापासून साहित्यक्षेत्रात वावरणा-या स्त्रीवादी लेखिकांना जे अजून पूरते जमले नाही ते पहिलेवहिले आत्मकथन लिहिणा-या दलित स्त्रीकडून कसेकाय अपेक्षित केले जाऊ शकते. हा असा ॓समाजचित्रणे॔ ठरण्याचा धाक दलित आत्मकथनांना दाखवण्यामागे परंपरेचे वस्त्रहरण होऊ नये अशीच अपेक्षा प्रामुख्याने दिसून येते.

दलित साहित्याबरोबरच ग्रामीण साहित्य लिहिणा-या स्त्रियांच्या वाङ्मयाचेही स्त्रीवादी विचारधारेच्या दृष्टीने समीक्षण होतांना िदसत नाही. उलट ग्रामीण साहित्य म्हणून ज्या अविर्भावात या साहित्याची नोंद घेतली जाते, तोच पवित्रा या लेखनाच्या बाबतीत स्त्रीवादी साहित्यचळवळी कडून घेतला जातो. मंगला वरखेडे, अश्विनी धोंगडे ही अशी काही मोजकी नावे सोडली तर मराठी वाङ्मयात स्त्रीवादी जाणीवांचा शोध घेणा-या समीक्षकांची वानवा आहे. समकालीन वाङ्मयावर असा दृष्टीक्षेप फारसा कुणी टाकलेला आढळत नाही.

स्त्रीवादी वाङमयचळवळीने मराठी वाङ्मयात वरीलप्रकारे वर्गवादी वाटचाल केली असल्याचे स्पष्ट करतांना या चळवळीने हा स्वतः फक्त स्त्रियांच्या साहित्यापूरतेच मर्यादितपणे बांधून घेतले असल्याचेही निदर्शनास आणणे आवश्यक ठरते. स्त्रीवादी साहित्य हे फक्त स्त्रियांचे साहित्य असू शकत नाही हे स्त्रीवादात तत्वतः मान्य करण्यात आले असतांना समकालीन मराठी वाङ्मयातील पुरूषलेखकांचे स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करणारे लेखन स्त्रीवादी वाङ्मयचळवळीच्या चर्चेचा विषय ठरतांना दिसत नाही. याचा अर्थ या चळवळीने उच्चभ्रू, सवर्ण, दलित, ग्रामीण अशा वर्गांबरोबरच स्वतःला पुरुषांपासून तोडणारा स्त्रीवर्ग ही आकाराला आणला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. समीक्षाक्षेत्राच्या बाबतीत ही स्थिती असतांना साहित्यनिर्मितीच्या बाबतीतही आपल्या अभिव्यक्तीचा विस्तार वर्गाच्या बाहेर फारसा होणार नाही याची दक्षता किंवा अशा विस्ताराविषयी बाळगलेली उदासिनता स्त्रीवादी साहित्यक्षेत्रात दिसून येते.

आपल्या बाहेर असणारे विशाल जग, त्यातील वेगवेगळ्या स्तरांवर जगणा-या स्त्रिया, त्यांच्या जगण्यातले वेगळेपण हे मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी म्हटल्या जाणा-या लेखिकांच्या साहित्यातून आढळत नाही. प्रत्येक स्तरातल्या स्त्रीचे अनुभवविश्व वेगळे असते, दुःखाची दाहकता वेगळी असते, जीवनसंदर्भ वेगळे असतात आणि त्यांच्या या वेगळेपणाला त्यांनी भोगलेले संचित कारणीभूत असते. असे हे बहूविध स्तरांवरले स्त्रीजीवन चितारण्यात स्त्रीवादी लेखिका अयशस्वी ठरत आहेत. स्त्रियांची ही वर्गविभिन्नता फक्त जातीवरच नव्हे तर आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, धार्मिक व भौगोलिक अशा सर्वच पातळ्यांवर आपल्या सामोरी येते. फक्त सवर्ण आणि सवर्णेतर स्त्रीच ही एकमेकांपेक्षा वेगळी आहे असे नाही. त्या त्या वर्गांतर्गतही स्त्रियांमध्ये अदृश्य भिंती उभ्या आहेत.

एकंदरीत मराठी वाङ्मयाला स्त्रीवादीसाहित्य चळवळीच्या सर्वसमावेशक अशा स्वरुपातल्या मांडणीची गरज आहे. श्रीमंत स्त्रियांचा, नोकरी करणा-या स्त्रियांचा, सवर्ण स्त्रियांचा, दलित स्त्रियांचा, शेतकरी स्त्रियांचा अशा वेगवेगळ्या स्त्रीवादी विचारांच्या वाटा एकत्रित मिळण्यातूनच या विचारप्रणालीला मराठी वाङ्मयात आपले स्थान बळकट करण्यासाठी पाठबळ मिळेल. वर्गवादी विचारसरणीमूळे आजही दलित व ग्रामीण साहित्यात भरीव कामगिरी करणा-या स्त्रीलेखिकांना स्त्रीवादी साहित्यचळवळ ही आपली वाटत नाही. स्त्रीवादी साहित्यचळवळीत होत असलेल्या विचारमंथनातून या कक्षा विस्तारायला हव्यात. जेणेकरून स्त्रियांच्या भावविश्वाचे पदर उलगडणारा हा प्रवाह मूलभूतरित्या व सर्वंकषपणे सशक्त होईल.

५.४ स्त्रीवाद: एक नवा दृष्टीकोन
मराठी वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यचळवळीचा पाया भक्कम होण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेतली गेली पाहीजे याचे विवेचन प्रस्तुत मुद्दयात करावयाचे आहे. स्त्रीवादाला गरज आहे ती भारतीय पारश्वभूमीच्या बाबतीत काही नवी तत्वे स्वीकारण्याची. रंजनवादी व पारंपरिक दृष्टीने लेखन करणा-या बहूसंख्य लेखिका मराठी साहित्यक्षेत्रात आहेत. लोकप्रियतेच्या दृष्टीने त्यांच्या साहित्याला वाचकही भरपूर आहेत. अशा लेखिकांना दर्जेदार म्हणून गणल्या जाणा-या साहित्यासंबंधीच्या कुठल्याही चर्चेत सहजासहजी स्थान दिले जात नाही. परंतु वाङ्मयाच्या एकूण वाचनसंस्कृतीला पुरुषकेंद्री विचारातून बाहेर काढायचे असेल तर साहित्याच्या या माध्यमातून स्त्रीवादी साहित्याला जावे लागेल. त्यासाठी अशा लेखिकांमध्ये स्त्रीवादी जाणीव विकसित करण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. पाश्चात्य जगताच्या तुलनेत आज भारतात वाचणा-या स्त्रियांचे प्रमाण अगदीच कमी आहे. या दृष्टीने स्त्रियांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लावणे हे उद्दीष्ट स्त्रीवादी विचाराला भारतीय संदर्भात बाळगावे लागेल. पाश्चात्य जगतातली विषमता ही प्रामुख्याने आर्थिक स्वरुपाची आहे आणि फारतर तिला वर्णभेदाचाही रंग आहे. भारतात मात्र आर्थिक, धार्मिक, जातीय, प्रांतिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर विषमता आहे. या सर्व स्तरांवरील स्त्रियांविषयीचे वाङ्मय त्या त्या संदर्भात निर्माण व्हायला हवे. स्त्री-पुरुष समानतेच्या अंतिमत्वाकडे वाटचाल करण्याचे ध्येय स्त्रीवादाने बाळगले आहे. भारतीय पार्श्वभूमीवर मात्र स्त्रीवादी साहित्य विचाराला स्त्रियांमधील असमानतेशी लढा देण्यापासून सुरूवात करावी लागणार आहे.

स्त्रीवादी साहित्यसमीक्षा ही एक स्त्रीवादी वाङ्मयविचाराची महत्त्वाची बाजू आहे. मराठीतील समीक्षीक्षेत्रात या समीक्षापध्दतीमूळे निश्चितच नवी भर पडली आहे. परंतु या समीक्षेची तात्विक चर्चा खुप झाली असली तरी तिचे उपयोजन मात्र अल्प प्रमाणात झालेले दिसून येते. स्त्रीवादी समीक्षेच्या संकल्पनात्मक चर्चेत पुरुषीसमीक्षापध्दतीला नकार देण्याची भाषा वारंवार वापरली जाते. परंतु समीक्षेचा पुरुषीपणा दाखवून देण्याचे काम मात्र अजूनपर्यंत झालेले नाही. पारंपरिक समीक्षापध्दतीतल्या पुरुषी दृष्टीकोनाची खोलात जाऊन जोपर्यंत ओळख करून घेतली जात नाही तो पर्यंत तिला नाकारण्याची भाषा ही वरवरचीच ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्या दृष्टीने मराठी वाङ्मयात आतापर्यंत झालेल्या निवडक समीक्षेची समीक्षा करून तिच्यात पुरुषीपणा कसा आहे हे दाखवणे आवश्यक आहे. एखाद्या बाबीला नकार द्यायचा म्हणजे अशा नकारामूळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. पुरुषी समीक्षेला नकार दिल्यानंतर स्त्री-पुरुष समानतेचा आविष्कार करणा-या समीक्षातंत्रांची मांडणी करणे गरजेचे आहे. अशा मांडणीतच आगोदर दिल्या गेलेल्या नकाराला सार्थकता प्राप्त होते. या अनुषंगाने स्त्रीवादी समीक्षेने नव्या आकलन संकल्पना, मूल्यमापनतत्वे ठोसपणे मांडायला हवीत. पुरुषी म्हणून सद्दयस्थितीलल्या समीक्षेला नकार देण्याची भाषा करायची आणि त्याच संकल्पनांचा वापर करुन समीक्षा करायची हा असा अंतर्विरोध स्त्रीवादीसाहित्यसमीक्षेने टाळायला हवा.

स्त्रीवादी साहित्यसमीक्षेने आपल्या समीक्षेच्या कक्षा विस्तारीत करायला हव्या. निव्वळ स्त्रीलेखिकांच्याच साहित्यामधून स्त्रीवादी जाणीवांचा शोध घेण्याबरोबरच पुरुषलेखकांच्या साहित्यातील पुरुषकेंद्रा संदर्भांचा बुरखा फाडायला हवा. त्याच बरोबर पुरुषलेखकांच्या साहित्यातूनही स्त्रीवादी जाणीवांचा शोध घेऊन असे साहित्य समोर आणायला हवे. स्त्रियांचे मनोविश्लेषणात्मक अनुभव हे फक्त स्त्रियांच्याच साहित्यातून व्यक्त होतात काय यावर विचार केला असता स्त्रीच्या मनोविश्वाच्या जडणघडणीचा वेगळेपणा तरलतेने टिपून तिची मनोस्पंदने नेमकेपणाने उलगडणा-या पुरुषांच्या साहित्यकृती मराठी वाङ्मयात दाखवता येतात. ॓माहेरपणात सोबतीणींसोबत आनंदाने बागडणारी आणि कातरवेळेला व्याकूळतेचा चटका सोसणारी स्त्री अरविंद गोखले यांनी ॓कातरवेळ॔ या कथेत नेमकेपणाने टिपली आहे. ॓भोग॔ या कथेत रा.रं.बोराडे यांनी चित्रीत केलेली सरस्वती तिच्यापेक्षा वयाने प्रौढ असलेल्या नव-याला तुपलोण्याची खुराक देेते. तरीही तिचा नवरा झोपायला देवळात जातो. परिणामी अपरात्री जागत दळण दळत बसलेल्या आईला तिचे मूल विचारते, ॓माय तू आजून झोपली न्हाईस.॔ तेव्हा सरस्वती म्हणते, ॓काय करू बापा, देवानं इतकं बळ दिलंय अंगात, ते कुठं जिरवाया नको का.॔ यात रा.रं.बोराडे यांनी स्त्रीच्या भावविश्वाचा वेगळेपणा जपून ते उलगडलेले दिसून येते.

भारताला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्यातल्या ब-याच बाबी स्विकारणीय तर काही बाबी तिरस्करणीय आहेत. या अनुषंगाने स्त्रीवादी दृष्टीकोनातून भारतीय संस्कृती, धर्म आदींची चिकित्सा व्हायला हवी. हा विचार जसा स्त्रीला आत्मभान मिळवून देणारा ठरणार आहे. तसा तो भारतीय विचारपरंपरेतील किल्मीषे गाळून तिला नवी झळाळी मिळवून देणाराही ठरावा. आज स्वतःला आधूनिक म्हणवणारी भारतीय स्त्रीसुध्दा व्रतवैकल्ये, पूजा, नवस, जप, तप, व्रत आदी बाबींना कवटाळून मानव्यपणाला तुडवणा-या घृणास्पद प्रथापरंपरांना जोपासतांना दिसते. वाङ्मयातून होणा-या यासंबंधींच्या चित्रणांचे परखड परिक्षण व्हायला हवे. ॓स्त्रीच्या शरीरासंदर्भात सर्वच बाबतीत आणि सर्वच पातळ्यांवर तिच्यासाठी एक अपराधित्वाची भावना संस्कृतीने निर्माण केलेली आहे. तिच्या शरीराला एक सांस्कृतिक वस्तु बनवून टाकून समाजाने तिचे सर्व आनंद नाहीसे करून टाकले आहेत॔ अशा या संस्कृतीबद्दलच्या वाङ्मयाचे सर्वांगीण अर्थनिर्णयन व्हायला हवे. पुरुष समीक्षकांनी स्त्रीवादी भूमिकेतून कलेली संस्कृती चिकित्सा ही आज मराठी वैचारीक वाङ्मयातून डॉ.आ.ह.साळूंखे यांनी केलेली आहे. त्याची चर्चा स्त्रीवादी व्यासपीठांवरून व्हायला हवी. अशा मंथनातून वाङ्मयाभिव्यक्तीत अशा चिकित्सेचे प्रतिबिंब पडू शकेल.

स्त्रीचे आत्मभान जागृत करणारी चळवळ म्हणून स्त्रीवादाकडे पाहिले जाते. स्त्रीला माणूसपण नाकारणा-या पुरुषवर्चस्वाविरुध्द लढा पुकारतांना स्त्रीवादाकडून कोणाचे माणूसपण नाकारले जाणार नाही, यासाठी स्त्रीवादाने सजग असणे जरूरी आहे. अमेरीकेसारख्या प्रगत देशात स्त्रीवादी चळवळ वेगाने पूढे गेली आणि वेगाच्या भरात तिथल्या कृष्णवर्णीय समाजातही स्त्रिया आहेत याचा त्या चळवळीला विसर पडला. आणि नंतरच्या काळात कृष्णवर्णीय स्त्रियांना आपला वेगळा स्त्रीवादाचा लढा द्यावा लागला. परिणामस्वरूप वाङ्मयातही असे स्तरीकरण झाले. माणूसपण नाकारले म्हणून लढणारा स्त्रीवाद आणि घरातल्या पाळीव पशूला मिळणा-या दयेइतकी सहानुभूतीसुध्दा नाकारली म्हणून लढणारा स्त्रीवाद असे हे स्तर आहेत. दुर्देवाने या दोन स्तरांत नंतर मोठे अंतर निर्माण झाले. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचाराची वाटचालही यासंदर्भात चिंताजनकच आहे. प्रतिमा इंगोले, ललिता गादगे, सरोजिनी बाबर या ग्रामीण जीवनानुभव रेखाटणा-या व हिरा बनसोडे, बेबी कांबळे, प्रज्ञा लोखंडे, ज्योती लांजेवार, प्रतिभा आहिरे या दलित स्त्रियांच्या जीवनातली आधूनिक काळातल्या दूःखांची लक्तरे टांगणा-या तसेच उषा डांगे, गोदावरी परुळेकर या साम्यवादासाठी झटणा-या स्त्रियांच्या साहित्याची दखल स्त्रीवादी म्हणून आजपर्यंत कोणी व किती घेतली हा प्रश्न आहे. दलित, ग्रामीण, किंवा मार्क्सवादी असा स्तर किंवा विचारधारा स्वीकारली म्हणून या लेखनातल्या स्त्रीत्वाचा स्तर उणावतो काय? सानिया, गौरी देशपांडे, मेघना पेठे, कमल देसाई यांनी मध्यमवर्गीय स्त्रियांच्या दुःखाचे, आत्मभानाचे भावविश्व टिपले. त्यांचा स्त्रीवादी दृष्टीकोनातून अभ्यास झाला तसा तो सर्वच स्तरांमधून येणा-या साहित्याचा व्हायला हवा. दलित स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण स्त्रीवादी साहित्य, आदिवासी स्त्रीवादी साहित्य अशा पोटचळवळींची बीजे आतापासूनच रुजून पून्हा सवतेसुभे उभे राहण्यापेक्षा या सर्वच प्रवाहांना एकत्रित घेऊन त्यांच्यातल्या स्त्रीवादी जाणिवांचा शोध घेण्यातून स्त्रीवादी साहित्यविचाराचा परिघ विस्तारायला हवा.

स्त्रीवादी साहित्यसमीक्षेत नेमस्त व जहाल असे दोन गट पडलेले आहेत. जहाल स्त्रीवादाने भाषाच नाकारण्याची भूमिका घेतली असल्याचे आपण यापूर्वी पाहीले आहे. भाषा पुरुषवर्चस्व व्यक्त करणारी आहे हे मान्य करूनही ती भाषाच नाकारण्याचा पर्याय हा तितकासा योग्य वाटत नाही. मूळात ज्या भाषेत वर्चस्व मिळवण्याची प्रवृत्ती आहे त्या भाषेला नकार देणे म्हणजे ॓ती भाषा मला हवी तशी वाकवून मी तिच्यावर वर्चस्व मिळवू शकत नाही॔ अशी न्यूनगंड बाळगणारी कबूली देण्यासारखे आहे. भाषाव्यवहार हा परिवर्तनशील आहे. आणि स्त्री-पुरुषांच्या समंजस व सर्वंकष जवळ येण्यातून वर्चस्वाची व दडपणाची ही परिमाणे भाषेतून आपोआपच गळून पडणारी आहेत. त्या दृष्टीने सकारात्मक विचार करायला हवा. ही भाषाच नको अशी भूमिका घेण्यात अर्थ नाही. या अशा भूमिकांमूळे स्त्रीवादी साहित्याला मुख्य प्रवाहापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यासारखेही होते. आज ग्रामीण, दलित आदी साहित्यप्रवाहांना सक्षमतेने स्वतःत सामावून घेऊन मराठी वाङ्मयाची वाटचाल सुरू आहे. किंबहूना आजचा ग्रामीण व दलित वाङ्मयप्रवाहच मराठी वाङ्मयाचा मुख्य प्रवाह वाटाव इतपत स्वीकारशील व वास्तवाभिमुख वाटचाल मराठी वाङ्मयाने केली आहे. असे असतांना स्त्रीवादी साहित्याचा सर्वस्वी वेगळेपणाचा आग्रह फारकाळ टिकू नये.

स्त्रीवादी साहित्यातले स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आता हळूहळू व्यवहारातही मान्य होत आहे. स्त्री-पुरुषांमध्ये असलेला भेद हा फक्त नैसर्गिक पातळीपूरताच रहावा. सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक अशा सर्वच भावविश्वात स्त्री-पुरुष समानतेचे नवे जग निर्माण करण्याचे ध्येय स्त्रीवाद बाळगून आहे. मराठी वाङ्मयातील स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल स्थलसापेक्ष अशा सर्वच संदर्भांना नव्या दृष्टीने विचारात घेऊन ध्येयाकडे व्हायला हवी.

५.५ निष्कर्ष
१. मराठी वाङ्मयातील पारंपरिक मतप्रवाहाची फारशी तमा न बाळगता पाश्चात्य स्त्रीवादी विचारधारेच्या तत्वांमधली प्रखरता घेऊन स्त्रीवादी विचार मराठी वाङ्मयात उदयास आला आहे.

२. निर्भीडपणाने व खुलेपणाने मराठी वाङ्मयाच अविष्कृत होतांना स्त्रीवादी विचारधारेने स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज दूर करण्यात यश मिळवले आहे.

३. पारंपरिक वाङ्मयातील स्त्रीचित्रणांना नवा आशय देणे, पुरुषलेखकांचा स्त्रीचित्रणांबद्दलचा दृष्टीकोन बदलणे, स्त्रीवादी समीक्षाविचाराच्या माध्यमातून साहित्याचे नव्या अंगांनी आकलन करणे, पुरुष समीक्षकांमध्ये स्त्रीवादी जाणीवांबद्दल जागरुकता निर्माण करणे असे महत्त्वाचे बदल स्त्रीवादी साहित्यविचारामूळे मराठी वाङ्मयविश्वात घडून येत आहेत.

४. स्त्रीला दूय्यमत्व देणा-या सांस्कृतिक मतांची चिकित्सा करण्याची वाट प्रशस्त करण्यात मात्र स्त्रीवादी वाङ्मयविचार अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर स्त्रीवादी विचारविश्वाचे ठराविक वर्गापूरते मर्यादित असणे त्याच्या यशस्वीतेला बाधा आणणारे ठरते आहे.

५. स्त्रियांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे, सर्वच स्तरांमधल्या स्त्रीलेखिकांमध्ये स्त्रीवादी जाणीवांचा प्रसार करणे, स्त्रीवादी समीक्षेच्या कक्षा दलित, ग्रामीण अशा सर्वच साहित्यक्षेत्रांपर्यंत विस्तारीत करणे, पुरुषांच्या साहित्यकृतींनाही समीक्षाविषयाच्या कक्षेत घेणे, कुटुंब, धर्म, समाज, जाती अशा पातळीवर वैविध्यपूर्ण जीवन जगणा-या स्त्रियांच्या संदर्भातील स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करणा-या, विस्तृत आशयाचा पट धारण करणा-या वाङ्मयनिर्मीतीला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक दांभिकतेची परखड चिकित्सा करणे आदी नव्या दृष्टीकोनांच्या स्वीकारातून स्त्रीवादी वाङ्मयविचाराने मराठी वाङ्मयक्षेत्रात आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

५.६ संदर्भ व टिपा
१. गणोरकर डॉ.प्रभा, अध्यक्षीय भाषण, ५वे समरसता साहित्य संमेलन, विषय- स्त्रीसाहित्य आणि समरसता, समरसता साहित्य परिषद, मुंबई, प्रथमावृत्ती, २००३, पृ.५१,५२.

२. परांजपे डॉ.तारा, मराठी कथाशंभरीतील स्त्रीचित्रण, रजत प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, २००१, पृ.८४,८५.

३. दैनिक सकाळमधील सप्तरंग पुरवणीतील लेख, मार्च, २००८.

४. साळुंखे डॉ.आ.ह., हिंदू संस्कृती आणि स्त्री, लोकवाङ्मयगृह, मुंबई, सातवी आवृत्ती, २००७,पृ.११०.

५. कित्ता.

६. तत्रैव, पृ.१११.

७ क्षेत्रमाडे डॉ.सुमती, सत्यप्रिय गांधारी(प्रस्तावना), सन पब्लिकेशन्स, पुणे, नवी आवृत्ती १९९५, पृ.११.

८ तत्रैव, पृ.१४.

९. गरुड डॉ.श्यामल, साठोत्तर स्त्रीआत्मचरित्र(लेख), स्त्रीसाहित्य आणि समरसता, समरसता साहित्य परिषद, मुंबई, प्रथमावृत्ती, २००३, पृ.७६.
***