घाव अजुनी...

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

एक स्वप्न

सकाळी सकाळी जाग आली. अंथरुणावर उठून बसल्याबसल्या जांभई दिली. पुन्हा स्टाइलिशपणे एक चुटकीही तोंडासमोर वाजवली. आणि पाचर बसल्यासारखे तोंड उघडेच राहीले. काही केल्या बंद होईना.अंगाचा थरकाप उडाला. आरशासमोर जाऊन उभा राहिलो. माझी ती केविलवाणी अवस्था बघून डोळ्यातून आसवे ओघळली. आता काय करावे. तशास अवस्थेत कसेबसे कपडे घातले आणि तोंडाला हात लावून बाहेर आलो. रस्त्याच्या पूढच्याच वळणावर एक हॉस्पिटल होते. तिथे गेलो. लोक विचित्र नजरेने पहात होते. वेटींगरुम मध्ये दोनजण आधीच होते. तोंडाला हात लावलेल्या अवस्थेत तिथे बसलो. एकेक क्षण युगासारखा वाटत होता. तेवढ्यात डॉक्टरांनी आत बोलावले. तोंडाला चार वेळा हाताने इकडून तिकडून तपासले. मग म्हणाले, "उशीर केलात. लवकर आला असतात तर काही करू शकलो असतो." सगळे ब्रम्हांड आठवत होते. आईवडील, भाऊबहीण, माझे कॉलेजचे मित्र. आता आपलं कसं होईल. हॉस्पिटल बाहेर आलो. सैरभैर.............................. जाग आली तेव्हा अंग घामाने थबथबलेले होत. हे स्वप्न होतं या आनंदाने हरखुन गेलो. आरशापूढे जाऊन तोंड हवे तसे उघडून मिटून बघितले. आयुष्यातल्या पूढच्या प्रत्येक जांभईच्यावेळी हे स्वप्न मला वाकूल्या दाखवून जाते. अगदी आजतागायत.
स्वप्नांचा जसा आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांशी संबंध असतो तशीच ती बहूतेकवेळा अतर्क्य असतात. एखादे स्वप्न पडतांनाच हे स्वप्न आहे व हे आपल्याला आगोदर पडले होते याची जाणीव ही काही वेळा होत असते. स्वप्नात काही कारणाने जाग आली तर पून्हा लगेच झोपल्यावर त्या स्वप्नाची लिंक पून्हा जुळते याचा ही अनुभव ब-याच जणांनी घेतला असेल. एकूण काय तर जाणीवेच्या कक्षेबाहेर धावू पाहणारा हा विषय चर्चेला भरपूर अवकाश देणारा आहे. माझे स्वप्न खुपच अतार्कीक. असे वाटणा-यांनी आपली अशी स्वप्ने (अर्थात खरीखुरी) शेअर करायला हे चांगले निमित्त ठऱावे.

पौराणिक वा आधूनिक सर्वच असले लेखन स्वाभाविक

 'मराठी लिखाण आणि लैंगिकता' या 'मुक्तसुनीत' यांच्या लेखाबदद्ल...
मराठी असो की जगातल्या कोणत्याही वाङ्मयातले साहित्य असो ते त्या त्या स्थलकालपरत्वे अस्तित्वात असलेल्या जनमानसांचे प्रतिबिंब बहूतेकवेळा असते. माणूस हा वेगळेपणाच्या कितीही बढाया मारत असला तरी तो अंतिमतः एक प्राणीच असतो. आणि प्राण्यांच्या स्वाभाविक खोडी त्याच्या अंतरंगात कायम दडून बसलेल्या असतात. वर सांस्कृतिकतेची, माणूसपणाची जाड गोधडी त्यानं पांघरलेली असते. पण मूळ पातळीवर आल्यावर त्यांचे हे पाशवीपण उचल खातेच. विरूद्धलिंगी व्यक्तीबदद्ल असलेले लैंगिक आकर्षण हे वंशवृद्धीच्या आदीम प्रेरणेचे द्योतक मानले गेले आहे. पूराण काळात (आणि आताही) सामान्य माणसाने लैंगिकतेबद्दल बोलणे हे निषिद्ध मानल्या गेल्याने देवदेवतांच्या तसेच पूराणातील इतर नायक नायिकांच्या प्रणयकथा (खरेतर भोगकथा) सविस्तर वर्णन करून सांगितल्या गेल्या. सामान्यांना संस्कृतचे गम्य नसल्यामुळे (आजही ) अक्षरशः दैवी फळांच्या प्राप्तीसाठी आजही या किळस आणणा-या कथांची पारायणे सुरू आहेत. (एक चपखल उदाहरण- गुरूचरित्र पारायण) संस्कृत जर सर्वश्रुत असती तर लोकांनी या पारायणकारांना पिटाळून लावले असते. सारांशाने या पूराणकारांनी किंवा गौरी देशपांडे, मेघना पेठे, विभावरी आदींनी असे कसे काय बुआ लिहीले या वर चर्चा करण्यापेक्षा आपले लक्ष वेधून घेणारे असे त्यात काय आणि का आहे हे निरलसपणे समजून घेतले तर आश्चर्य वाटण्याचे कारणच उरणार नाही. लैंगिकतेवर मुक्त लिहीले जाते म्हणून ना पूराणे वाईट ना आधूनिक मराठी साहित्य वाईट. पूराणे अन्वयार्थाने व आरोपणाच्या माध्यमातून (ब-याचशा छुप्या सामाजिक उद्देशांनी ) मानवाच्या मूलभूत प्रवृत्तींशी भिडली तर आजच्या साहित्याने कुठलीही भीड न बाळगता जे असते ते साहित्यात उतरवले इतकेच.

पक्षी

स्वतंत्र, मुक्त, स्वच्छंद
असं काही म्हणायचं तर,
पक्षीच येऊन बसतात
उदाहरणांच्या फांद्यांवर.

पक्षी तसे नशीबवान असतात
खेडं असो गाव असो की असो शहर
किंवा महानगरही असू देत
करतील घरटं हवं तिथे
कित्येकदा मोडलं तरी..

पिलांना भरवण्याचं सामर्थ्य
घेऊन येतातच ते जन्मजात,
कुठल्याही पदवी शिवाय
कुठल्याही स्पर्धेशिवाय...












***

रविवार, १३ मार्च, २०११

यत्किंचित....

आहे आकाश निरभ्र
नाही कशाचीच कमी,
का कुणास ठाऊक नेहमी
स्वतःला बजावत असतो मी.

सुर्यही उगवतो अन् तसाच चंद्र
सभोवताली नितळ वारे,
रात्र ही घेऊन चमचम तारे
जग हे अवघे निश्चिंत सारे.

आता भवताली सुखाचा समुद्र
हातात माझ्या सर्व सुत्रे,
जाते मिळत जे जे हवे ते
कमी कशाची कधीच नसते.

पण कधी चमकते काही शुभ्र
पाऊस जरासा जातो कोसळून,
झुळूक गारवा जातो जवळून
मनात जाते काही चमकून.

अन् गडबडती सारे यमक
खोल ह्रदयातून येते कळ,
ओलावते जखम तीच पून्हा
यत्किंचित मी तुझ्याविना.
***