घाव अजुनी...

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

कासावीस

उदास उन्हाचं रुप घेऊन
पांघरलेली सर्वत्र उदासी
दबकत वावरणारा वारा
झाडाझाडांच्या पायथ्याशी.

अंतहीन लांबलचक रस्ते
ओकाबोका आसमंत
पाचोळ्याची हालचाल अन्
झुडुपांचेही झुलणे संथ.

आठवणींची मनात गर्दी
दाटलेले हे अंतःकरण
कुठल्या कसल्या दुःखाला हे
चढलेले अवचित स्फुरण.

जडावलेले पाय आता
लागेल जणू केव्हाही ठेच
ह्रदयाला विदीर्ण करते
पोकळपणाची ही बोच.

रस्त्यावरल्या वाटसरुच्या
मनात असले विचार भयाण
पोचतील ना घरापर्यंत
कासावीस हे माझे प्राण?

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

साहित्य आणि समाजातील संबंध; कितपत खरे?

साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात. साहित्य आणि समाज या विषयात समाजाच्या अंगाने साहित्याचा आणि साहित्याच्या अंगाने समाजाचा अशा दोन पद्धतींनी विचार केला जातो. यामध्ये साहित्य हे समाजव्यवहारांना प्रभावित करते हा समाजवादी साहित्यिकांचा आवडता सिद्धांत आहे.

रविवार, १० जानेवारी, २०१०

या जातींचं करायचं काय?

जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे. उरलेली ही संवेदनशीलता ही मनात निबरपणाच्या कित्येक थरांखाली दडून बसलेली आहे. जून्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. पण सर्वथा टाकून द्यावी असावी जात ही काही कुणाला सोडाविशी वाटत नाही. या जातीला प्रत्येक मनातून व समाजातून हद्दपार करण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. पण जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्याच काहींनी करून टाकली आहे.

साय

किती जपावे तरी
एखादा शब्द निघून जातो
फुलवावे फुलताटवे तरी
एखादा काटा बोचून जातो.