साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात. साहित्य आणि समाज या विषयात समाजाच्या अंगाने साहित्याचा आणि साहित्याच्या अंगाने समाजाचा अशा दोन पद्धतींनी विचार केला जातो. यामध्ये साहित्य हे समाजव्यवहारांना प्रभावित करते हा समाजवादी साहित्यिकांचा आवडता सिद्धांत आहे.
किंबहूना साहित्य हे समाजाला वळण लावते असेही म्हटले जाते. या विधानांची सिद्धता करणारे संशोधन करून कुणी पदवी मिळवली की नाही याची माहिती नाही. परंतु अनेक चर्चा प्रसंगी या विचारांची मांडणी करणारे अनेक विचारवंत आढळतात. पण थोडा खोलवर विचार करु पाहता साहित्य हे समाजावर कितपत परिणाम करते ही या बद्दल शंका व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. तिच गोष्ट समाजव्यवहारांचा साहित्यावर होणारा परिणाम किती या प्रश्नाची आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो हे विधान ही असेच फसवे आहे. मुळात वास्तवचित्रण हा साहित्यगुण मानायलाच साहित्यसमीक्षेत स्पष्ट नकार दिला जातो. सैद्धांतिकच्या पातळीवर साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या बाबतीत निश्चितपणाचा अभाव आहे. तरीही समाजव्यवहारावर साहित्य काही परिणाम करते किंवा करु शकते हे विधान निश्चितपणे नाकारता येते. अर्थात हे विधान आधूनिक मराठी वाङ्मयाला अधिक चपखलपणे लागू पडते. ज्या साहित्याने समाजावर काही परिणाम केला असेल त्या साहित्याला साहित्य म्हणून मान्यता देण्यास प्रस्थापित साहित्यजगत खळखळ करते हे ही ओघाने आलेच. स्वांतंत्र्याची स्फुर्तीगीते असो की कष्टकऱ्यांची गीते ज्यांनी जगण्याला नवा हूरुप दिला ती काव्ये म्हणून मात्र मान्यता पावू शकती नाहीत. मराठी साहित्यात फडके, खांडेकर यांच्या साहित्याने कुणाच्या जीवनव्यवहारावर मनोरंजनापलिकडे जाऊन प्रभाव टाकला आणि तो एकूण मराठी भाषक समाजाच्या प्रमाणात किती होता या प्रश्नाच्या उत्तरातच समाज आणि साहित्य यांच्यात रेखाटला गेलेला संबंधांचा बडेजाव फुकाचाच असल्याचे सत्य दडलेले आहे. मराठी साहित्याला नवे वळण देणारे त्याला अभिनव स्वरुपात प्रस्तुत करणारे म्हणून ज्या मर्ढेकर नि नेमाडय़ांच्या साहित्याचा उल्लेख केला जातो ते महाराष्ट्राच्या समाजव्यवहारांचे परिणामस्वरुप किती होते आणि जागतिक साहित्यप्रवाहाच्या आणि जागतिक घडामोडींच्या किती छायेखाली होते या ही प्रश्नचाचे उत्तर साहित्य आणि तत्स्थलकालिन समाजाच्या संबंधातला दूरावा सांगणारेच आहे. आज बहूतांशी महाराष्ट्राचा समकालिन साहित्याशी संबंधच राहिलेला नाही. वृत्तपत्रे, चटपटीत मजकूर, चकचकीत पाने आणि चमचमीत छायाचित्रे यांनाच आता वाचणारे नि पाहणारे शिल्लक आहेत. समाजाच्या साहित्यव्यवहाराची चिंता वाहणाऱ्या तथाकथिक धूरीणांनी जो साहित्यव्यवहार अख्ख्या महाराष्ट्राचा म्हणून जोपासला आहे तो खरेच तसा आहे का याचा विचार आता व्हायला हवा. पुलं, अत्रे किंवा तत्सम साहित्यिकांचे नाव माहित नाही असे घर महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही असल्या टाईपची वाक्ये म्हणजे तद्दन खोटारडेपणा आहे हे आपण कधी मान्य करणार. महाराष्ट्राच्या घराघरात आढणाऱ्या पुस्तकात फार तर वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या भुलथापा मारणाऱ्या चोपडीचा उल्लेख तेवढा करता येईल. याउप्पर महाराष्ट्राच्या मनावर आणि एकूणच जीवनव्यवहारांवर ज्ञानदेव, तुकारामांच्या मध्ययुगीन साहित्याने आणि रामायण, महाभारता सारख्या पौराणिक कथांनी काय जो परिणाम केला तेवढाच साहित्य आणि समाजाचा संबंध...... बाकी सगळ्या बढायाच.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा