घाव अजुनी...

रविवार, १० जानेवारी, २०१०

साय

किती जपावे तरी
एखादा शब्द निघून जातो
फुलवावे फुलताटवे तरी
एखादा काटा बोचून जातो.



नेहमी असावे प्रयत्नात
असावी सरळसरळ नाती
तरी मनोमनी राहून जाते
एक तरी सुरकुती.

दाह व्हावा आता कमी
म्हणून घालावी हळू फुंकर
आग अशी का भडकते
याचे मिळत नाही उत्तर.

आसवे झेलण्यासाठी
दाखवावे आपलेपण
का उचकटतात अशावेळी
दुःखावरल्या खपल्या पण.

मनातल्या निर्भेळ स्नेहावर
का अशी ही जमते साय
चालावे इतके जपून तरी
का स्वप्नांवर पडतो पाय
०००