घाव अजुनी...

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

आई.. आजकाल..

आई आजकाल
नोकरी करणारी, कमावती असते..

आई आजकाल
तिच्या बाळासाठी
चांगलं महागडं
पाळणाघर निवडू शकते.

आजही तिने
तेच शी अन् शू धूत बसावं
असं म्हणून कसं चालेल..!

आई आजकाल
तिच्या लेकरासाठी
हवा तो पदार्थ
चुटकीसरशी
अॉनलाईन मागवू शकते..

आजही तिने
स्वयंपाकघरात राबायला हवं
असं म्हणणं
जुनाट विचारांचं ठरेल..

पण
आई आजकाल
हे जे काही करतेय
त्यासाठी लेकरू तरी
जन्माला का घालावं..?

ते ही मागवावं की
आधूनिक पद्धतीने
असंच अॉनलाईबिनलाईन..!

"अर्रर्र..
किती निष्ठूर विचार..
काही मातृत्वसुख,
काही भावनाबिवना आहेत की नाही..!"

हम्मम्..
तेच..!

आई आजकाल सक्षम आहे
पण आईने
तिच्या लेकरासाठी
मागवू नये अॉनलाईन
मायेचा स्पर्श, अंगाईगीत
अन्
तिच्या लेकराचा
जीव की प्राण असलेली
तिच्या हातची भाजी-पोळी..!

इतकेच..

बाकी आजकालची आई
स्वतंत्र, सक्षम, स्वाभिमानी आहे
हे मान्यच आहे..!
***

पुन्हा

कशालाच नसतो
कसलाच अर्थ
असा साक्षात्कार झालाय
अखेरीस....!

दारूच्या ग्लासात
विरघळवून टाकल्या आहेत
बऱ्याच कविता...

मग मनोमन असं वाटलं की
आता हाडेही शिल्लक नसतील त्यांची..

पण नंतर पाहातोय तर
या सगळ्या हलाहालातुन
पुन्हा नव्याच कविता
जन्माला आल्याहेत..

आणि आता तर
त्यांच्या भाळी झळाळतेय
अमरत्वाची खूण...

मी जीव एकवटून
नष्ट करू पहातोय
त्या संजीवन कवितांना..

अन् पुन्हा जन्मास येताहेत
नव्या कविता...!
***

प्रवासी

तुम्ही
या प्रजातीचा
युगानुयुगांचा अंश घेऊन
निर्मितीक्षम वयापर्यंत वाढता..

शोधून पारखून
एक निर्मितीक्षम जोडीदार निवडता..

तुमच्यातल्या सनातन अंशाला
जन्माला घालून
त्याचे
त्याच्या निर्मितीक्षम वयापर्यंत
पालनपोषण करता...

शक्य झालेच तर
त्याला पुन्हा
अनुकूल जोडीदार निवडण्यास
मदत करता..

इथे तुमचे इतिकर्तव्य होते..

"नातनातीचं
तोंड पाहिलं की मी मरायला मुक्त..!"
असं तुम्ही सहजप्रेरणेने म्हणता..

राजेहो..!
तुम्ही,
तुमचे पुर्वज,
तुमचे वारस,
तुमच्या वारसांचे वारस
अन् त्यांचेही वारस........
या सगळ्या आहेत
एकाच दिशेने,
एकापाठोपाठ
कमी अधिक लांबीत
धावणाऱ्या रेल्वेगाड्या..

प्रवासी तर वेगळाच आहे.

तो आलाय
अब्जावधी वर्षांच्या
कालविवरातुन...

तो निघालाय
अनंताच्या प्रवासाला..

त्याला पुढच्या स्टेशनपर्यंत सोडून या..
त्याशिवाय
तुमच्या जीवाला चैन पडणार नाही..!
***

स्टेशन


आयुष्याच्या
अमुकतमुक वळणावर
काय काय विसरायचं आहे
याची पक्की यादी
तुम्ही तयार करून ठेवली होती...

आजही त्या यादीतले
सगळेच कडूगोड जिन्नस
तुमच्या लख्ख लक्षात आहेत...

आयुष्याच्या
अमुकतमुक वळणावर
कशाकशाचं भान ठेवायचंय
हे मात्र तुम्ही विसरून गेला आहात..

आयुष्यातली वळणंही
आताशा कमी झाली आहेत..

सगळं कसं
सरळ सरळ होत चाल्लंय..

स्टेशन जवळ येतेआहे..!
***