घाव अजुनी...

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

वाफ

.
पायी चालणाऱ्याला
सायकल हवीय,
सायकलवाल्याला बाईक
अन् बाईकवाल्याला कार हवीय..
.
हॕचबॕकवाला सेडानसाठी
नि सेडानवाला
लक्झरी एसयुव्हीसाठी झुरतोय..
.
बेघराला घर हवंय
झोपडीवाल्याला वनरूमकिचन
अन्
वनरूम किचनवाल्याला
टू बीएचके हवाय..
.
थ्री बीएचके वाला पेन्टहाऊससाठी
अन् पेन्टहाऊसवाला
फार्महाऊस बँगलोसाठी
मरमर करतोय..
.
अशा
कित्येक पायऱ्या आहेत..
.
तुम्ही
यापैकी
एखाद्या पायरीवर जन्माला येता..
.
अन्
जीतोड मेहनत किंवा
लांड्यालबाड्या करून
दोनचार पायऱ्या वर चढता..
.
मग
यातल्याच एखाद्या पायरीवर
तुमची यथासांग वाफ होते..!
****

शनिवार, २२ जुलै, २०१७

खरं तर...

.
माणसं तर
सहोदर आहेत
एकमेकांची..
.
एकमेकांसाठी
त्यांचा जीव
हळहळतो सदैव..
.
एकमेकांच्या
जीवावर उठल्यात
टोप्या, फेटे
अन्
दाढ्या नि शेंड्या..
.
बुरखे, ओढण्या, पदर
अन् टिकल्या बांगड्यांची
चाल्लीय उगाच फरफट..
.
पण खरं तर
अजुनही...
माणसं सहोदर आहेत
एकमेकांची...
.
त्यांचा जीव
हळहळतो
एकमेकांसाठी...!
***

पुन्हा पुन्हा अन्...

तुझ्याच गर्भातली
तुटली जुळली रसायने
पुन्हा पुन्हा अन्
अवतरलो मी.
.
कातर गहिवर चिडके रडके
लाडीगोडीचे ताणेबाणे
पुन्हा पुन्हा अन्
बागडलो मी.
.
झालो निब्बर जरठ दगड
वादळलो रगमस्तीने
पुन्हा पुन्हा अन्
विरघळलो मी.
.
झालो किंचित नि अनंत चराचर
पण तुझ्यातल्या मृगजळाने
पुन्हा पुन्हा अन्
गोंधळलो मी.
.
पुन्हा पुन्हा हे सांगून सवरुन
झेपावयाच्या अथक प्रयत्ने
पुन्हा पुन्हा अन्
तुरूंगलो मी....!
***


रविवार, १७ जुलै, २०१६

गुरूवंदन

मागणी तसा पुरवठा असं करणाऱ्या कविलोकांबद्दल साहित्यिक वर्तुळात फारशी चांगली धारणा नसते..
पण एकमेव मैत्रिणीने तिच्या मुलीसाठी वरील विषयावर कविता मागितली..
मला अर्थातच हट्ट मोडता आला नाही..
आणि मी काही कवी नाही साहित्यवर्तुळाची भीडभाड बाळगायला...
:D
***
#गुरूवंदना
प्रश्न अनेक मनाला पडतात
पण भीती कधीच नसते त्यांची,
तुमचा आधार असतो सर
तुमच्याकडे असतात उत्तरे सगळ्यांची...
.
कष्टाने, अभ्यासाने तुम्ही
गुरू, शिक्षक आणि सर बनून,
अनमोल ज्ञानकण विश्वामधले
देता मला प्रेमाने शिकवून...
.
दिवसभरात ही शाळाच असते
माझे जग अन् माझे घर,
आई, बाबा अन् मित्रसुद्धा
तुम्हीच तर असता माझे सर...
.
मोठी होईन, जग जिंकेन
देश, प्रदेश सारा पुढे नेईन,
गुरू म्हणून तुमचे नाव
या हृदयात कायम ठेवीन...
.
गुरूपौर्णिमेच्या आजच्या दिवशी
माझे विनम्र वंदन तुम्हाला,
आयुष्यभर शिकत राहीन सर
विसरू नका तुमच्या विद्यार्थिनीला..
***