घाव अजुनी...

रविवार, ९ मे, २०१०

नवस

उडणाऱ्या धूळीची
वाट गावाकडची,
सांजावलेला दिवस
ओढघराकडची.

अंगाला अंग घासत
आमचा चाललेला कळप,
उगाच बें बें करीत
कधी थांबत कधी पळत.

घरापाशी आल्याबरोबर
वेगळा झालो कळपापासून,
हात बदलले हाकणारे
जीव दाटला कसमसून.

टरकामधला प्रवास
खायला कोवळा चारा,
वाटलं आज सुखाला
नशिबानं दिलाय थारा.

गळ्यात घातलेला हार
अन कुंकवाने पूजन,
देवापूढं मान दाबून
मला घडवल्या गेलं दर्शन.

जीव एकवटून माझा
मी पाय घट्ट रोवले,
जेव्हा शेंदऱ्या दगडाजवळ
लालभडक रक्त पाहिले.

पाय खोरले जात होते
इतकेच आहे आठवात,
खच्चून साद दिली होती
जीवघेण्या आवाजात.

माझाच बळी देऊन देवा
इतका नवस कर पुरा,
एकदा पोटचं लेकरू धरून
नुसता लावून बघ सुरा.

थरारलास ना आतून
मग कशी असेल माझी माय,
कसे तुझे दानव भक्त
कसा तुझा उलटा न्याय.
000

3 comments:

बाबासाहेब जगताप म्हणाले...

www.manogat.com वरून यशवंत जोशी यांची टिप्पणी


अंगाला अंग घासत । आमचा चाललेला कळप,
उगाच बें बें करीत । कधी थांबत कधी पळत ॥ एका निश्चिंत प्रवासाचा शेवट... हृदयद्रावक.
औरंगाबादला ब्रुक बॉण्ड कं. च्या पशुवधगृहातील म्हशींच्या आकांताचे वर्णन मागे एकदा वाचनात आले होते. वधस्थानाकडे जाण्याला त्या जीव तोडून विरोध करीत; एव्हढेच नव्हे, जीव वाचविण्यासाठी वरून खाली उडी मारून आत्महत्या करून घेत!

BinaryBandya™ म्हणाले...

faarch chaan

Firasta.... म्हणाले...

माझाच बळी देऊन देवा
इतका नवस कर पुरा,
एकदा पोटचं लेकरू धरून
नुसता लावून बघ सुरा.


Vaa farach chaan kavine ne mukya janawarala vacha dili janu..