उदास उन्हाचं रुप घेऊन
पांघरलेली सर्वत्र उदासी
दबकत वावरणारा वारा
झाडाझाडांच्या पायथ्याशी.
अंतहीन लांबलचक रस्ते
ओकाबोका आसमंत
पाचोळ्याची हालचाल अन्
झुडुपांचेही झुलणे संथ.
आठवणींची मनात गर्दी
दाटलेले हे अंतःकरण
कुठल्या कसल्या दुःखाला हे
चढलेले अवचित स्फुरण.
जडावलेले पाय आता
लागेल जणू केव्हाही ठेच
ह्रदयाला विदीर्ण करते
पोकळपणाची ही बोच.
रस्त्यावरल्या वाटसरुच्या
मनात असले विचार भयाण
पोचतील ना घरापर्यंत
कासावीस हे माझे प्राण?
1 comments:
very good but that is unandateble peome for me
टिप्पणी पोस्ट करा