घाव अजुनी...

शुक्रवार, ११ डिसेंबर, २००९

शब्दांचा प्रवास

भाषेची गंमत अनुभवतांना आपल्या संग्रही भाषेचे ज्ञानही सहजपणाने जमा होते हे सांगतांना शांता शेळके यांनी राजीनामा या शब्दाचा गंमतीशीर प्रवास सांगितला आहे.मी तुमचे काम करायला तयार आहे व मला यासंबधी तुमच्या अटी मान्य आहे (म्हणजे मी राजी आहे) या अर्थाने जे पत्र नोकर मालकाला देतो त्याला राजीनामा असे म्हटले जाते. मूळ अरबी असलेला शब्द मराठीत येतांना मात्र अगदी उलट अर्थाने येतो.
 माझी तुमच्याकडे काम करण्याची इच्छा नाही (म्हणजे मी राजी नाही ) या अर्थाने मराठीत राजीनामा ( खरे तर नाराजीनामा )दिला जातो.
इंगा दाखवणे या वाक्प्रचाराचा उगम मी कुठल्या पुस्तकात वाचला ते आता आठवत नाही पण हा उगमही असाच रंजक आहे. पूर्वी चर्मकार (चांभार) समाजातील बांधव कातडी कमावण्याचा धंदा करत असत. नुकतेच काढलेले व नदी अथवा तत्सम पाणवठ्यावरून भिजवून वाळत घातलेले कातडे मोठे निब्बर असायचे. त्याला मनासारखा आकार द्यायचा (पादत्राणे बनवण्यासाठी) तर ते पहिल्यांदा नरम पडायला हवे. त्यासाठी या चांभाराकडे इंगा नावाचे औजार होते. त्याने या कातड्याला चांगले बडवून काढले की ते नरम पडे आणि मग ते चांभाराच्या मनासारखे निमुटपणे आकार घेई. आजही एखाद्याला वठणीवर आणायचे तर इंगा दाखवल्याशिवाय पर्याय नसतो.
आपण सहजपणाने भाषा वापरतो पण ती तितक्या सहजपणाने आकाराला आलेली नसते. तिच्यामागे आपले सामाजिक व सांस्कृतिक संचित असते. त्या भाषेच्या नाना कळा समजून उमजून ती वापरली तर ती अधिकाधिक आनंददायी बनते.