घाव अजुनी...

मंगळवार, १३ जानेवारी, २००९

पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत.

मन उद्विग्न झाले आहे. असणारे काम, मिळणारे वेतन, कामाचे समाधान याबाबत फारशा काही तक्रारी नाहित. परंतु लोकांच्या विचारधारा, जगाच्या जाऊ देत (निदान सध्या तरी) पण जवळच्या माणसांची बंद असलेली विचारांची झापडे अनुभवास आली की जीवाची नुस्ती काहिली होते.
 आज आजूबाजूला विचार करणारे कुणी दिसतच नाही. हा आपल्या मनोवृत्तीचा तर दोष नाही ना. असेही स्वतःला विचारून बघितले. पण नाही. जगाला विचार न करता मुर्खपणाच्या सुरक्षिततेतच जगायला आवडतांना दिसत आहे.
देवाचे अस्तित्व नाकारायचे ठरवल्यावर स्वतःवरचा विश्वास शतपटींनी वाढवायला हवा. किंबहूना असा आत्मविश्वास वाढल्यावरच पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत उतरू शकते. मग जगायचे कुणाच्या आशेवर. संकटकाळी बघायचे कुणाकडे. याचे उत्तर म्हणून आपण स्वतः उरतो. व अगदीच असहायतेच्या क्षणी आपली माणसे उरतात. अशावेळी आपल्या माणसांनी हिंमत द्यायला हवी. पण हे लोक जेव्हा आपल्या भल्यासाठी पून्हा देवाची करूणा भाकतात तेव्हा त्यांची कीव करावी की आपली हा प्रश्न पडतो. या आंधळ्यांना आत्मविश्वास कधी मिळेल. पूजा, व्रत, उपवास, नवस, भविष्य, वास्तूशास्र, भूत-प्रेत कल्पना यासारख्या गोष्टींचा हिरीरीने प्रचार करणा-या विद्वान (प्रश्नार्थक) लोकांना सामाजिक जबाबदारी अथवा प्रज्ञेला जाणवणा-या शरमेची काहीच जाणीव होत नसावी का. भविष्य ऐकायला येणारा हा किमान मुर्खाच्या नंदनवनात वावरत असतो पण भविष्य सांगणा-याला नक्की माहित असेते की हे जे की मी सांगतोय याची घटीतक्षमता अतिशय बेभरवशाची आहे. भविष्य सांगून झाल्यावर तो हे खरं ठरो व माझा धंदा वाढो यासाठी पून्हा प्रार्थना करत असतो. या प्रार्थनेतला फोलपणाही त्याला माहित असतोच. दूस-याचा फायदा घेणारी ही मनोवृत्ती सामाजिक संवेदनशीलतेत केव्हा बदलणार आहे.
घरी महालक्ष्मीचे आगमन साजरे होते. का. तर नातू व्हावा म्हणून नवस केला होता म्हणे. म्हणजे हे कर्तृत्व गेलेच हातातून. पून्हा वर आईची श्रद्धा, वेड्या तुला समजत नाही जे काही चांगले होते ते यामूळेच. यावर विचार केला कुठेतरी जाऊन जीव द्यावा. आणि मग आईला म्हणाव बघ किती चांगले झाले ते. पण लगेच डोळ्यासमोर दृश्य आले. मी जीव देण्याच्या प्रयत्नात अयशस्वी होतो. आई दवाखान्यात म्हणते, बघ बाबा तुला विश्वास नाही. पण आज लक्ष्म्यांमूळे तुझा जीव वाचला. किंवा मी मरतोच आणि आई तिच्या सुनेला म्हणते, बाई काही दूःख करू नकोस. ऐन लक्ष्म्या बसल्या असतांना गेला. त्याला नक्की स्वर्ग मिळेल बघ.या सगळ्या गराडयातून सुटका करण्यासाठी अवघं आयुष्यच या खुळ्या देवभोळेपणाला घालवण्यासाठी वाहून घ्यावं हे ठरवलं आहे. घरी पंचपक्वानांचा बेत असतांना मी घरी थांबलो नाही त्यामुळे माझी मनस्थिती ठिक आहे ना, अशा चौकशा करणारे एक महाभाग भेटलेच. आता याचीही सवय करून घ्यायला हवी. शेवटी नासलेले नारळ देवाला सगळे वाहणारे व चांगल्या खोबरेदार नारळाचा नखाएवढा तुकडा त्या दगडाजवळ ठेवणा-या श्रद्धाळू लोकांचे हे जग आहे. हे कदाचित बदलणारही नाही. कारण या व्यवस्थेवर पोटे भरणारे लोक विचारांना चालना मिळणार नाही यासाठी कायम कार्यरत असतात. पण मी स्वतः, वाटल्यास माझ्या अगदी जीवलग माणसांना सोडून, असलं आंधळेपणाचं, आत्मनाशाचं, दडपणाचं जीवन कदापिही जगणार नाही.
आता भीती आहे ती स्वतःच्या प्रज्ञेची आणि श्रध्दा आहे ती फक्त मानवी मूल्यांवर. आता साथ फक्त दया दूःखितांची, द्वेष दांभिकांचा, प्रहार अप्पलपोटेपणावर आणि हार निर्भयतेच्या गळ्यात. माझ्या तथाकथित पुण्याईचा आणि पापांचाही मीच हिशेबनीस, मीच न्यायाधिश. कारण जे काही आहे ते माझ्याच कार्याची फळे असतील. चुकलो तर माफी मागायला दुसरी कडे जायला नको. गंगेत न्हाऊन, देवदर्शन घेऊन पापे धूतल्यावर पून्हा नवीन पापे करायला सिद्ध व्हायला नको. देवाच्या नावाने देणगी द्यायला नको. कारण करायचाच नाही कुठला भ्रष्टाचार की देवालाही लाच द्यावी लागेल. कमवायचं घामाचं आणि जगायचं स्वाभिमानानं.माझं स्वच्छ, नितळ, हलकं मन.

1 comments:

bapusaheb sonawane म्हणाले...

i am very impressed by yr vievs. I shall try to attach with yu.