घाव अजुनी...

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

पक्षी

.
तुमच्या मनसोक्त जगण्याला
या जगरहाटीने दिलाय
एक निर्दयी चकवा..
.
खरं तर
तुमचं जर
जीवापाड प्रेमच नसतं
कुणावरही,
तर तुम्हीही नसता बनलात
कोणाचंही सर्वस्व..
.
तुमच्या अशा
एकमेकांत लीन होण्यातुन
नसती अस्तित्वात आली
तुमची लाडकी लेकरं..
.
आणि मग
तुम्हाला मरणाची अजिबातच
वाटली नसती भिती..!!
.
मग तुम्ही तुमच्या मनासारखं
मनसोक्त जगत..
खात, पित, हिंडत
मनसोक्त मरून गेला असता...
.
मानमर्यादा, प्रतिष्ठा..
अन् जीव धडधाकट ठेवण्यासाठी
सोसाव्या लागणाऱ्या
या मरणयातनांमधून सुटला असता...
.
असो..
.
तुमचा जीव गुंतलेला
हा पसारा आहे म्हणून
मजबूत आहेत, राहतील..
या पिंजऱ्याचे गज..!
.
पिंजऱ्यातला पक्षी
गपगुमान खात राहील
पुढ्यात टाकलेले दाणे..!
****

रविवार, १ डिसेंबर, २०१९

माकड

विचारांचं माकड
अखंडपणे
या झाडावरून त्या झाडावर
उंडारत रहातं..
.
अंतहीन पसरलेली
झाडून सगळी झाडं
तुझ्याच अरण्ण्यात आहेत सामील..
.
शेवटी माकड ते माकडच..
.
त्याला
या जंगलात
धड घरही बांधता येत नाही..
.
त्याच्यात
या अरण्ण्याचा
किर्ररं घनदाट तळ गाठण्याचीही
हिंमत नाही...
****

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

आयुष्यभर...

रात्रभर कुशीत घेतलेल्या
मोगऱ्याचा धुंदगंध,
जाणवत रहातो
दिवसभर अंगांगावर..

रात्रभर गाढ झोपलेल्या
कळ्या-फुलांच्या गालावरचा
निरागस निर्धास्तपणा,
जागवत रहातो
दिवसभर वळणावळणावर...

रात्रभर स्तब्ध लयीत
भिरभिरणाऱ्या असंख्य
आठवणींची वटवाघळे,
लटकून राहतात
दिवसभर फांदीफांदीवर...

रात्रभर कवेतून
निसटू पाहणारी
आढ्यातखोर स्वप्ने,
खुणावत राहतात
दिवसभर नाक्यानाक्यावर..

दिवसभराची बेभान धुंदी
रात्रभराची निवांत झोप
अन् धांडोळा घेणारी जाग्रणे,
बागडत रहातात
आयुष्यभर अंगाखांद्यावर..!
***

बैलांनो...

तुमच्या लेखणीच्या तोंडाला
मुसक्या बांधल्यात
अन् तुम्ही
गपगुमान कोळपताहात
मालकाचं पीक..

मग
सांज ढळल्यावर
मालकानं टाकलेला कडबा
बसता सवयीने चघळत..

तुमचा मालकच
गावचा जहागीरदार..
मग अधूनमधून
तुम्हीच ठरता मानाचे बैल..

स्वतःची लेखणी
अशी दावणीला बांधून घेणाऱ्या
बैलांनो..

हा मालकच
एकदिवस सोपवणार आहे तुम्हाला
खाटकाच्या हाती..!
•••