घाव अजुनी...

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

आयुष्यभर...

रात्रभर कुशीत घेतलेल्या
मोगऱ्याचा धुंदगंध,
जाणवत रहातो
दिवसभर अंगांगावर..

रात्रभर गाढ झोपलेल्या
कळ्या-फुलांच्या गालावरचा
निरागस निर्धास्तपणा,
जागवत रहातो
दिवसभर वळणावळणावर...

रात्रभर स्तब्ध लयीत
भिरभिरणाऱ्या असंख्य
आठवणींची वटवाघळे,
लटकून राहतात
दिवसभर फांदीफांदीवर...

रात्रभर कवेतून
निसटू पाहणारी
आढ्यातखोर स्वप्ने,
खुणावत राहतात
दिवसभर नाक्यानाक्यावर..

दिवसभराची बेभान धुंदी
रात्रभराची निवांत झोप
अन् धांडोळा घेणारी जाग्रणे,
बागडत रहातात
आयुष्यभर अंगाखांद्यावर..!
***

बैलांनो...

तुमच्या लेखणीच्या तोंडाला
मुसक्या बांधल्यात
अन् तुम्ही
गपगुमान कोळपताहात
मालकाचं पीक..

मग
सांज ढळल्यावर
मालकानं टाकलेला कडबा
बसता सवयीने चघळत..

तुमचा मालकच
गावचा जहागीरदार..
मग अधूनमधून
तुम्हीच ठरता मानाचे बैल..

स्वतःची लेखणी
अशी दावणीला बांधून घेणाऱ्या
बैलांनो..

हा मालकच
एकदिवस सोपवणार आहे तुम्हाला
खाटकाच्या हाती..!
•••

व्हाट्सअप व्हाट्सअप..

व्हाट्सअपवर आपले
चार पाच ग्रुप असतात...

एक आपल्या कट्टर जातीचा..
इकडे आपण
'आपले' महापुरूष
'आपले' पराक्रम
'आपले' शत्रू नि 'आपली' गौरवगीते
यावर रक्त सळसळवणाऱ्या पोस्ट टाकतो..

का म्हणजे..?
अहो, आपल्या पराक्रमी जातीशिवाय
या जगाच्या इतिहासात दूसरं आहेच काय...!

एक कवितेचा ग्रूप असतो...
इथे आपण
प्रेम, निसर्ग, आई, देशभक्ती ई.ई. वर
आणि कधी कधी चक्क
मानवतावाद, विवेकवाद यावर कविता टाकतो..

का म्हणजे?
अहो आपण कित्ती मोठे उपेक्षित साहित्यिक आहोत
हे कसं विसरता...!

एक आपल्या अधूनमधून जिवलग
अधूनमधून मतलबी मित्रांचा ग्रूप असतो..
जातीविरहीत, धर्मविरहीत, प्रांतविरहीत,
भाषाविरहीत नि अजून काय काय विरहीत...
पूरोगामी ग्रूप..
आपला व्यापकपणा येथे ओसंडून वाहतो..

कसा म्हणजे?
अहो आपण सुशिक्षित नि खुल्या
विचाराचे नव्हे का...!

आणि आपला एक गुपचूप ग्रूपही असतो..
दूप्पट तिप्पट लोकांची आडवी तिडवी आसने..
आचकट विचकट विनोद
याची त्याची आयभैन एक करणाऱ्या शिव्या.
लफडी, छेडछाड, बलात्कार असणाऱ्या
चमचमीत क्लिपा, फोटो वगैरे....

या ग्रूपचे आपण फक्त वाचक नि दर्शक असतो..
का म्हणजे..?
अर्रर्र.. आपण सभ्य नव्हे का...!

असो...
दुधाच्या भांड्यात दही पडू नये
नि
मिठाच्या बरणीत साखर पडू नये
याची काळजी घेत घेत आपण
व्हाट्सअप व्हाट्सअप खेळत असतो...
***

धास्ती

डोळ्यातलं पाणी अडवा
अन् डोळ्यातच जिरवा..!

कित्येक वर्षांपासून
तुम्ही
ही मोहीम यशस्वीपणे
राबवता आहात..!

आणि विशेष म्हणजे
अचानक पाझर फुटू नये म्हणून
तुम्ही कमालीचे जागरूक असता सदैव..!

या जिरवलेल्या अथांग आसवांवरच
काढत असता
सहोदरांच्या सुखाची पिके..

अन् पुन्हा
आनंदाची आसवंही जिरवता आतच..!

कारण
तुम्हाला सदैव असते
बांध फुटायची धास्ती..!!
***