घाव अजुनी...

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उमर कोवळी

जग बोंबलते माजले होते...
जीव जरी ते लाजले होते...
.
उमर कोवळी होती आपुली...
ओठ तरीपण भाजले होते...
.
बंद का होती खिडक्या दारे...?
लग्न कुणाचे वाजले होते...?
.
व्याधी मिटल्या रोगही टिकला...
औषध कुठले पाजले होते..?
.
भेटलो होतो डोळे मिटून...
नाव तरी का गाजले होते...?
***

रविवार, १९ एप्रिल, २०१५

पिसाट वारा

पिसाट वारा सुटला आता...
मनास थारा कुठला आता...
.
माय अशी ही उजाड झाली...
पिलास चारा कुठला आता...
.
चकार शब्द तु बोलत नाही...
तुझा मशवरा पटला आता...
.
स्वप्ने धावती रानोमाळ...
पतंग अखेर कटला आता...
.
दारु नाही झिंगही नाही...
तोल खरेतर सुटला आता...
.
बोलुन गेलो सुसाट मी अन्...
ओठ तुझा का मिटला आता...
****

सोमवार, २३ मार्च, २०१५

नागीण

तु सुखी रहाविस आस ही अनंत आहे
तु सुखी आहेस ही आजही खंत आहे...
.
चिंब चिंब भिजलोय, आसमंत धुंद दिसे
पण सखे खरे तर पाणी गळ्यापर्यंत आहे...
.
रातराणी फुलते, निःशब्द नि गळून जाते
चांदण्यात गुंतल्या वा-यास ना उसंत आहे...
.
थरारलेले ओठ प्रिये, रोमहर्षी ही मिठी
मात्र दिवान्यास या गळफास तो पसंत आहे...
.
लाख ठेचला सखे, मी फणा हा विखारी
पण तव प्रितीची नागीण ही जिवंत आहे...


***

आगतिक

समुहातलाच एक मी ठरतो तेव्हा
नुसताच आगतिक मी उरतो तेव्हा...
.
पदर तुझा सावरते भुवई माझी
पुन्हा एकदा सनातन ठरतो तेव्हा...
.
दुर्दम्य बढाया या भरात येती
मी ओंजळीने सागर भरतो तेव्हा...
.
शोधतो तव नयनी पाणावलेपण
अविरत आंतरिक मी झरतो तेव्हा...
.
अजाण वाटेने तू चालत जाशी
माय हरवल्यागत भिरभिरतो तेव्हा...
.

****