घाव अजुनी...

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

धास्ती

डोळ्यातलं पाणी अडवा
अन् डोळ्यातच जिरवा..!

कित्येक वर्षांपासून
तुम्ही
ही मोहीम यशस्वीपणे
राबवता आहात..!

आणि विशेष म्हणजे
अचानक पाझर फुटू नये म्हणून
तुम्ही कमालीचे जागरूक असता सदैव..!

या जिरवलेल्या अथांग आसवांवरच
काढत असता
सहोदरांच्या सुखाची पिके..

अन् पुन्हा
आनंदाची आसवंही जिरवता आतच..!

कारण
तुम्हाला सदैव असते
बांध फुटायची धास्ती..!!
***

स्वप्न

तुम्ही एखादे स्वप्न बघता..

पण या स्वप्नामध्ये
तुमच्याशिवाय
इतरही काही लोक असावेत
असं तुम्हाला वाटू लागतं..

मग तुम्ही
तुमच्या स्वप्नाचं मेकअप करता..

त्याच्या राठ मिशाखालील
ओठांना लावता लिपस्टीक,
अथवा
नाजूक गालांचं करता शेव्हींग..!

सामील केलेल्या लोकांच्या
आग्रहापोटी..

तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या कानात
घालता एखादे डूल,
अथवा
त्याच्या कपाळावर
गोंदवता एखादं फुल..

मग तुमचं स्वप्न
तुम्हालाच अनोळखी वाटू लागतं,
परकं भासू लागतं..!

बाकी तुम्ही नंतर सामील केलेले लोक
त्या स्वप्नाची यथासांग वाट लावून
वर पुन्हा हसून घेतात तुमच्यावर ..

त्यांचा काहीच दोष नसतो,
ते स्वप्नं मूळात त्यांचं नसतंच..

मग तुम्ही
कितीतरी काळ वागवत रहाता
तुमच्या स्वप्नाचं कलेवर...
अन्
मिरवत रहाता
तुम्ही नंतर सामील केलेल्या लोकांचे
शिव्याशाप..!
***

आई

आई समोर तोकडी पडते
शब्दांची पोतडी
अपूरा पडतो जन्म..

आई भेटत रहाते
वळणावळणावर..
वटारत असते डोळे,
घालत असते पाठीत रट्टे..

फिरवत असते तोंडावरून हात
भरवत असते घास..

आई डोकावत असते बरेचदा
बायकोच्या काळजी करणाऱ्या डोळ्यातून..
आई
न्याहाळत असते
लेकीच्या अभिमान मिरवणाऱ्या नजरेतुन..

आईची छाप असते
झाडाच्या सावलीवर
आई भेटत असते झुळूकेतल्या गारव्यात..

आई व्यापून असते
तुमच्या नसानसातला आनंद,
रग, मस्ती, दाह, कळ...

आईला माहित असतं
तुमचं हगणं,मुतणं,चिडणं, रडणं..!

'आई' हे प्रकरण साधसुधं नाही..

आईला कळत नसेल तुमची
शब्दांमधली कविता
पण आईमुळेच प्राप्त झालाय
तुमच्या अख्ख्या आयुष्याला अर्थ..!
***

ठणक

दाढेच्या मागच्या बाजूला
दातात खोलवर अडकलेल्या
भाजीच्या देठासारखी,
भंडावून सोडतेय
तुझी सय..

सगळं भान विसरून
तिचा ठाव घेण्याच्या
प्रयत्नात
मी बऱ्याचदा दिसतोय
विदूषक..

खरं तर
दोष भाजीच्या देठाचा नसतोच,
दोषी असते
दातांमधली पोकळी..

तसाच
आठवणींचाही दोष नसतोच,
दोषी असतात
जागोजाग निर्माण झालेल्या
पोकळ्या..

दातात सोने, चांदी वा सिमेंट भरून
भागवता येईल हो..

पण
दुर्धर जगण्यातल्या
अलवार पोकळ्या
कशाने भरता येतील..!

कशी थांबवता येईल
ही जीवघेणी ठणक..!!
***