घाव अजुनी...

गुरुवार, ३ मे, २०१८

निश्चय

.
आज तुझ्याबद्दल
काहीच लिहायचं नाही
असा निश्चय केला होता..!
.
त्या नादात बरंच काही
इकडचं तिकडचं लिहून टाकलंय..
.
मला पोहता येत नाही..
.
पण
माझे पाय एकसारखे तळ नसलेल्या
तुडुंब डोहाकडे खेचले जाताहेत..
.
तू डोहात आहेस की
डोहापल्याड..?
***

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

इतरांचं काय होतं..?

.
प्रत्येक क्षणाला
अब्जावधी शुक्राणू
झेपावताहेत ध्येयाकडे..
.
प्रत्येकात आहे चेतना..
.
पण एखादाच
भिडतो ध्येयाशी..
.
इतरांच्या
चेतनेचं काय होतं..?
.
या अनादी ब्रह्मांडात
अनंतकोटी बियांनी
स्वतःमध्ये
अविरतपणे जपलेला असतो
एक सुप्त जीव..
.
त्यांपैकी
रूजतात थोड्याफार...
.
इतर जीवांचं काय होतं..?
.
सहस्त्रावधी मेंदूंच्या
गहन पसाऱ्यात
सारखी उधाणत असतात
अभिव्यक्तिच्या आवाक्याबाहेरची
अजागळ वादळं..
.
काही उतरतात शब्दात..
काहींची होतात अक्षरं..
.
इतरांचं काय होतं..!
*****

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

झुळुक

.
तुमचा
रस्ता तोच आहे..
पण
रस्त्यावरची झाडं
नाहीयेत आता...
.
त्यामुळं
'रस्ता चुकलाय'
असं तुम्हाला उगाच वाटतंय..
.
झाडांना
निर्दयीपणे विसरायला शिका..
.
मग कालांतराने
हा रस्ताही
तुम्हाला
ओळखीचा वाटू लागेल..!
.
असो..
पण झाडं निष्ठूर असतात..
.
तुमच्या
विस्मृतींच्या असीम अनंतराळात
ती राखून असतात
त्यांचं अस्तित्व..!
.
तुमच्या
पुढील उण्यापुऱ्या आयुष्यात
येत रहाते अधूनमधून
एखादी
जहरी झुळुक..!
***

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

कण


मी अंगणात
पहूडलोय उन्हात
बघत आकाशात..
.
माझ्या समोरच्या सुर्याला
इवल्याशा कणात घेऊन
हिंडणारी आकाशगंगा,
स्वतःच एक कण बनून
सामावलीय तिच्या दीर्घिकेत
.
अन्..
या दीर्घिकेचा थेंब
तरंगतोय
विश्वाच्या अथांग समुद्रात...
.
तुझा सुर्य कुठे आहे?
.
तू तुझ्या घरात आहेस
कि अंगणात आहेस?
***