घाव अजुनी...

बुधवार, १८ मार्च, २०१५

कैदी

शब्दांना पॅरालिसिस नि लुळे जाहले अर्थ 
मौनाचे डायालिसिसही पुन्हा ठरे निरर्थ...
.
धूरकट प्रतिमा सा-या नाती सारी लख्ख
मळकट लालिमा लेउन सांजवेळ ही मख्ख...
.
गढूळल्या लाटांच्या खडकांशी लोचट धडका
हुळहूळल्या आकांशांची चिता घेतसे भडका...
.
झगमगत्या वारूळांशी मुंग्यांचा व्याभिचार
तगमगत्या अंतर्मनाला खुणावतो अविचार...
.
धमन्यातून धावे रक्त जणु दंगल सैरावैरा
हृदयातून होऊ पाही हा कैदी अता फरारा...
***

धोका


धोका दिलास बाई
मौका मिला न कोई...
.
एकजात हे मवाली
इनमे भला न कोई...
.
थापा मारते गर्दी
तनहा मिला न कोई...
.
नाटकबाजी सगळी
परदा खुला न कोई...
.
हसणे उधार माझे
धंदा चला न कोई...

***

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

घाव अजुनी....


घाव अजुनी उरात आहे
चेव अजुनी सुरात आहे..

पान पिकुनी पिचून गेले
भाव अजुनी भरात आहे..

आव कशाला अताच मोठा
नाव अजुनी पुरात आहे..

गाव उद्ध्वस्त विराण झाले
ठाव अजुनी घरात आहे..

नाव तुझे का गर्जुन गेले
धाव अजुनी धुरात आहे..

साव असा मी उगाच प्रिये
डाव साधते वरात आहे..
***

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

ये....

ये पुन्हा तापल्या दुधात साखर घोळून जा...
मीठ जरा लाडक्या जखमेवर चोळून जा...

क्रूर तुझी तलवार बेजार जिंकून आता...
ये जरा बाहूपाशात 'हार' तर माळून जा..

जा जीवा तू माहेरी फक्त माहेरासाठी तुझ्या...
जाताना 'पण' एक कर 'त्याचे' घर टाळून जा...

भोग कपाळीचे, कुठवर रे ही हळहळ...
कर गलबला, नियंत्याचे अक्षर गाळून जा...

तू सनातन आक्रमक शुद्धवंशी गे प्रिये...
ये मनातुन हो विवेकी बुद्धावर भाळून जा...
***