घाव अजुनी...

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

वाईट करणाऱ्यांचे खरेच वाईट होते काय?


महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे. मंदीरातील अभिषेक बंद करण्यावरुन वाद घालणाऱ्या पुजारी आणि इतर संबंधित मंडळींचे हात दानपेटीतल्या भ्रष्टाचारात देखील प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या गुंतलेले आहेत हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मंदीरातील मुर्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या साडीचोळीचा लिलाव होऊन ह्याच साड्या पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतीला भक्तांच्या माथी मारल्या जातात हे सर्वांना माहित असेलच. पण तुळजाभवानीच्या दानपेटीतील दागिन्यांचा इतक्या पद्धतशीर पणे अपहार करुन गब्बर बननाऱ्यांचे हे कृत्य त्यांच्या अपूर्व धाडसाची प्रचीती देऊन जाते. ( इथे कुणाचे चारआणे किंवा एखादी पेन्सिल चोरली तर देव शिक्षा देईल याचा आम्हाला भयंकर धाक असतो.) तुळजाभवानीच्या गुप्तदानपेटीत भाविक जो पैसा व दागिने टाकतात त्याचा दरमहा लिलाव करण्याची पद्धत आहे. या लिलावात फक्त ठराविक लोकांनाच भाग घेता येईल याची व्यवस्था केली गेलेली आहे. या लिलावाच्या मूळ बोली रक्कमेत व लिलावात भाग घेण्याच्या शुल्कात गेल्या दहा पंधरा वर्षात अवघ्या काही हजारांची वाढ झालेली आहे. आणि या शुल्काचा फक्त काही हिस्सा घेऊन अनेकांना लिलावात भाग घेऊ देण्याचे औदार्य अनेकवेळा दाखवण्यात आलेले आहे. आणि जे काही शुल्क घेतले त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष व धर्मादाय आयुक्तांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्याच्या नियमालाही तिलांजली दिली गेली. हे सगळे आपल्या उपस्थितीत व्हायला हवे याची तत्कालीन जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना माहित नसण्याचीच शक्यता आहे किंवा हेतूपूरस्सर त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले असणेही शक्य आहे. या सगळ्या लबाड साखळीत अनियमितपणा निर्माण झाल्यामुळे म्हणा की काही अन्य कारणामूळे म्हणा या सर्व प्रकाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. धर्मादाय आयुक्तांनी दानपेटीत जमा होणाऱ्या देणगीची सरासरी काढण्याच्या उद्देशाने एक महिन्याच्या अंतराने दानपेटी उघडली तेव्हा त्यात तब्बल बावीस लाख रुपये रोख, त्रेचाळीस तोळे सोन्याचे दागिने व साडेपाचकिलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षातील लिलावाची माहिती प्रशासनाला देतांना संबंधितांकडे दहा वर्षात सेहेचाळीस ग्राम सोने व अर्धा कीलो चांदी इतकेच दान जमा झाल्याची माहिती दिली होती. एकंदरीत लोकांच्या श्रद्धाभावनेचा (!) गैरफायदा घेऊन लिलावात सहभागी लोकांनी वर्षानुवर्ष स्वतःचे उखळ पांढरे करुन घेतले. लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका असे म्हणत मूर्तीची झीज होत असल्याचा अहवाल असतांनाही अभिषेकांवरच्या बंदीला विरोध केला. या सर्वात त्यांना भवानीच्या कोपाची भीती कशी वाटली नाही याचा विचार भोळीभाबडी जनता आता करत असेल. पण या लोकांना नक्की माहित असते की आपल्या समोर जो मांडला आहे तो फक्त दगड आणि तो आपले काही वाकडे करु शकत नाही. म्हणून मुजोरपणाने देवादेखत लोकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे काम ही मंडळी बिनबोभाटपणे करु शकतात. जनतेचे प्रातिनिधीक स्वरुपातले प्रतिनिधीसुध्दा केले त्याला भरावे लागेल अशी निरर्थक आशावादी विधाने करुन या प्रकारांकडे दुर्लक्ष करतात. पण जर केले त्याला भरावे लागले असते तर हजारो लोकांचे मुडदे पाडण्यात सहभागी असणाऱ्या दाऊद इब्राहीमला अख्खे आयुष्य सुखासमाधानात जगायला मिळाले नसते. कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठे पुरस्कार मिळून कृतकृत्य होता आले नसते. जो लबाडी करतो त्याच्या विरोधात कायदा माननाऱ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. करेल तो भरेल या नावाने सुजाण लोक शांत बसून राहीले तर या अपप्रवृत्तींचे दिवसेंदिवस फावणार आहे. कारण यांना पक्के कळून चुकलेले असते की असे काहीच भरावे लागत नाही.

3 comments:

अनामित म्हणाले...

हाच प्रकार शिर्डी आणि शेगावला पण सुरु असतो. त्या लोकांना माहिती आहे की देव काही करू शकत नाही, म्हणुन हे असे धाडस करतात.

श्रध्देचा फायदा घेतला जातो हे शंभर टक्के सत्य आहे. लेख उत्तम!!

Shantanu म्हणाले...

Uttam lihilay.
Khara aahe . Dev kharach asel tar devane nyay-nivada karava !
-Shantanu Deo

Prashant म्हणाले...

कमाल आहे.
पण जिथे पैसा आला तिथे कपटी लोक आकर्षित होतात हे खरंय....

आपणच स्वतःला श्रद्धेच्या काही चुकिच्या कल्पनांत गुंतवून ठेवले आहे. जे आपण देवदर्शनासाठी जातो, तिथे मुळ उद्देश राहतो बाजूला आणि आपण अनावश्यक कर्मकांडांत गुंतुन बसतो.

मी स्वतः जेव्हा मंदिरात जातो, तेव्हा फक्त दर्शनासाठीच जातो. फुलं नाही, खण नारळ नाही, चेकबुक नाही आणि अभिषेक नाही.
दान सुद्धा कधीकधीच आणि माफक नाणी.

जिथे भक्तांच्या सोयीबद्दल आणि सामाजिक कार्याचा भाग असतो तिथे योग्य ट्रस्ट किंवा संस्थांवर विश्वास ठेवावा... आधी व्यवस्थित माहिती गोळा करुन.