लौकिक सारे ध्येय मनाचे
सामावलेले या हातात,
तरीही अजून भूक जागी
या देहाच्या कणाकणात.
पंखांना अजूनही वाटे
घ्यावे पुढचे आकाश कवेत,
स्नायू असे हे वाकत राहो
अन् झेपावत या हवेत.
पण काही ओंजळींचीच होती
कालच तर ही तहान माझी,
खांद्यांना या नव्हती पेलवत
आशा अपेक्षांची ओझी.
पण आता उंच भरारीस्तव
धावपळीचा कणकण क्षणक्षण,
विचार जर करतो थांबून
'का उरात असले हपापलेपण? '
या अतृप्ती अन् व्यस्ततेचे
मग मला उमगते उत्तर
'पुसायचे आहे तू दाखवलेले
ते तुझ्या नि माझ्यातले अंतर. '
०००
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा